स्कंध ५ वा - अध्याय ७ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


४२
संकल्पेंचि राज्य अर्पूनि भरता । ऋषभ तो गेला वनामाजी ॥१॥
मानूनियां आज्ञा विश्वरुपकन्या । वरिली ते धन्या ‘पंचजनी’ ॥२॥
पंचमहाभूतें अहंकारप्रति । पुत्र पंच होती भरता तेंवी ॥३॥
सुमति, राष्ट्रभृत्‍ तेंवी सुदर्शन । तैसा ‘आवरण’ धुम्रकेतु ॥४॥
‘अजनाभद्वीपा’ भरताच्या नांवें । नाम तें जाणावें भरतवर्ष ॥५॥
प्रजावत्सल तो होता महाज्ञानी । रमे यज्ञकर्मी ईश्वरार्थ ॥६॥
पुढती हृदयीं प्रगटला हरी । पीतांबरधारी शामवर्ण ॥७॥
तदा स्वपुत्रांस अर्पूनियां राज्य । पुलहाश्रमास गेला राव ॥८॥
वासुदेव म्हणे भक्तियोग त्याचा । निवेदिती ऐका मुनि आतां ॥९॥

४३
गंडकीच्या तीरीं पुलहआश्रम । श्रीहरिदर्शन होई तेथें ॥१॥
चक्रयुक्त तेथें पाषाण बहुत । चक्रनदी सार्थ नाम तेणें ॥२॥
उपवनीं तेथें एकाकी भरत । राही आठवूनि ॥३॥
कंदमुळें पुष्पें तुलसी अर्पूनि । श्रीहरिपूजनीं दंग झाला ॥४॥
ऐसा कांहीं काळ लोटतां ईश्वर - । प्रेमें, गहिंवर तया येई ॥५॥
दर्शनोत्सुका त्या न दिसेचि कांहीं । अश्रुपूर येई नयनीं नित्य ॥६॥
ध्यानमग्न ऐशा हृदयर्‍हदांत । भरुनि आनंद वाहूं लागे ॥७॥
बुद्धि त्या आनंदीं मारितांची दडी । पूजेचें न राही भान तया ॥८॥
वासुदेव म्हणे पूजक पूजन । पूज्यभानहीन तेचि पूजा ॥९॥

४४
भक्तिबळें लागे समाधि यापरी । प्रगटे शरीरीं दिव्य तेज ॥१॥
मृगचर्म जटा मस्तकीं पिंगट । प्रात:काळीं जप करी राव ॥२॥
सूर्यबिंब यदा येई उदयाचळीं । सूर्याची तैं करी आराधना ॥३॥
प्रकृतीसी पर शुद्ध सत्त्वात्मक । शरण सूर्यास तया भावें ॥४॥
कर्मफलदाई तेज तें संकल्पें । निर्मी जगतातें प्रतिपाळीही ॥५॥
उपाधिरुप या बुद्धीसी जे गति । देई, तयाप्रति शरण असों ॥६॥
वासुदेव म्हणे ऐसा अर्थ ज्याचा । राव जपे मंत्रा नित्य ऐशा ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP