स्कंध ६ वा - अध्याय २ रा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य



ऐकूनि न्यायज्ञ म्हणती विष्णुदूत । नि:पाप हा दंड्य केंवी झाला ॥१॥
पिता, गुरु, साधु, नि:पक्षपातीही । जरी हा यमचि ऐसें करी ॥२॥
शरण कोणासी जावें तरी सांगा । धन्याच्याचि मार्गा क्रमिती दूत ॥३॥
अनुकरण ज्या घडावें थोरांचें । अंधार हा तेथें आश्चर्यचि ॥४॥
अनंत जन्मींच्या पातकांची होळी । होऊनियां गेली नामोच्चारें ॥५॥
अपारचि असे नामाचा महिमा । दया नारायणा नामें येई ॥६॥
नामस्मरण हें सर्व प्रायश्चित्त । वासना समस्त जळती नामें ॥७॥
‘चतुराक्षरी’ हा जपलासे मंत्र । नेऊं नका यास यमलोकीं ॥८॥
वासुदेव म्हणे कथिती विष्णुदूत । सर्वप्रायश्चित्त नामचि हें ॥९॥

१०
भलत्याही मिषें प्राशितां अमृत । येई अमरत्व जैशापरी ॥१॥
कोण्याही निमित्तें तेंवी ईशनाम । मुखीं घेतां जन पापमुक्त ॥२॥
दूतहो, संशय जरी अंतरांत । पुसूनि धन्यास यावें तरी ॥३॥
धर्मरहस्य हें जाणे यमधर्म । दूतहो, जाऊन पुसा तया ॥४॥
वासुदेव म्हणे महिमा नामाचा । ऐकूनि यमलोका गेले दूत ॥५॥

११
अजामिळ तदा होई पाशमुक्त । पाहूनि मुदित विष्णुदूतां ॥१॥
वंदितां तयाचा आशय जाणून । दूत अंतर्धान पावताती ॥२॥
अजामिळासी तो स्मरला संवाद । म्हणे भक्तिमार्ग श्रेष्ठ बहु ॥३॥
स्वकर्माचा तया होई पश्चात्ताप । निर्भत्सीं स्वयेंच आपणासी ॥४॥
म्हणे लंपट मी जाहलो शूद्रीसी । ब्राह्मण्य लयासी गेलें माझें ॥५॥
धिक्कारचि असो भज कुलांगारा । अव्हेर मीं केला साध्वी स्त्रीचा ॥६॥
कृतघ्न मी झालों माता-पितरांसी । प्राप्तचि मजसी नरकलोक ॥७॥
न कळे ते कोठें गेले यमदूत । कोठें चतुर्भुज देवही ते ॥८॥
वासुदेव म्हणे अजामिळाप्रति । भासलें स्वप्नचि दृश्य सारें ॥९॥

१२
म्हणे जाहलों मी धन्य । पूर्वपुण्यें हें दर्शन ॥१॥
अंतीं नारायणस्मृति । झाली मज पातक्यासी ॥२॥
पुढती संयमें वागून । ईशपदां मी चिंतीन ॥३॥
जारिणीचें मी खेळणें । मुक्त होईन हरिनामें ॥४॥
भक्तसमागम अल्प । होतां पावला विराग ॥५॥
गंगाद्वारीं निघूनि गेला । तेथ आराधी प्रभूला ॥६॥
वासुदेव म्हणे ऐका । अजामिळ मुक्त कैसा ॥७॥

१३
इंद्रियदमनें आंवरुनि मन । आत्मरममाण होई सदा ॥१॥
ब्रह्मरुपीं लीन होतां विष्णुदूत । दिसते तयास फिरुनि तेचि ॥२॥
वंदूनि तयांसी गंगेमाजी देह । टाकूनियां दिव्य देह घेई ॥३॥
बैसूनि विमानीं गेला वैकुंठासी । ध्वजा हरिनामाची फडकावीत ॥४॥
राया, ऐशापरी नामाचा प्रभाव । जाणूनियां भाव नामीं असो ॥५॥
पुत्रमिषें नारायण नाम घेतां । पावला वैकुंठा अजामिळ ॥६॥
ऐकूनि हे कथा स्मरेल ईश्वरा । मुक्ति तया नरा कां न लाभे ॥७॥
वासुदेव म्हणे नारायणनाम । पातकदहन सहज करी ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 08, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP