स्कंध ६ वा - अध्याय १३ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


६१
वृत्रवधें इंद्राविण सकलांतें । हर्ष अंतरातें ऋषि देवां ॥१॥
परीक्षिति म्हणे इंद्रासी कां दु:ख । निवेदावें मज मुनिश्रेष्ठा ॥२॥
निवेदिती शुक वृत्रवधा इंद्र । नव्हताचि सिद्ध हत्याभयें ॥३॥
परी देव ऋषि अभय त्या देती । अश्वमेधें जाती म्हणती पापें ॥४॥
ब्रह्महत्या परी आरक्तवसन । शुभ्रकेश जाण न सोडी त्या ॥५॥
थांब थांब ऐसे करी सदा शब्द । मृतमत्स्यगंध श्वासा तिच्या ॥६॥
इंद्र ‘मानसांत’ लपला जाऊनि । हविर्द्रव्य अग्नि देईचिना ॥७॥
कमलतंतूची धरुनियां आशा । जाई देवराजा कमलनालीं ॥८॥
वासुदेव म्हणे ब्रह्महत्या कैसी । दूर होई हेंचि चिंती इंद्र ॥९॥

६२
नहुषासी देव देती इंद्रपद । होई परी धुंद ऐश्वर्ये तो ॥१॥
अभिलाष अंतीं करी इंद्राणीचा । पावला सर्पत्वा परी अंतीं ॥२॥
नहुषपतन होतां इंद्राप्रति । प्रेमें पाचारिती मुनिश्रेष्ठ ॥३॥
कमलनालस्थ इंद्रें शंकरासी । आराधितां त्याची कृपा होई ॥४॥
आश्रितरक्षण केलें तैं लक्ष्मीनें । अश्वमेधयज्ञें प्रभुसी सेवी ॥५॥
तेणें ब्रह्महत्त्यादोष होई नष्ट । पठतां हें चरित्र सर्वकाळ ॥६॥
संसारांत यश येईनियां मोक्ष । लाभे, वासुदेव कथितो वृत्त ॥७॥

अभंग-भागवत सप्ताहाचा दुसरा दिवस समाप्त.


References : N/A
Last Updated : November 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP