स्कंध ६ वा - अध्याय १५ वा
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
६८
चित्रकेतूप्रति उठवूनि मुनि । म्हणती चिंतूनि पाहीं राजा ॥१॥
जयास्तव शोक करिसी तो कोण । भूत वर्तमान भविष्यही ॥२॥
गारुड हें राया, जाणावें मायेचें । उदकें वाळूचे कण जेंवी - ॥३॥
वियोग पावती, क्षणोक्षणीं तेंवी । जन्म-मृत्यु पाहीं जीवांचे हे ॥४॥
सकलही बीजें उत्पत्तिसमर्थ । नसती, केवळ हरिइच्छा ॥५॥
आदि अंतीं जेंवी विश्व हें अव्यक्त । तैसेंचि सांप्रत ध्यानीं घेई ॥६॥
बालकांचा खेळ संसार हा तैसा । ध्यानीं घेई राजा ईश्वराचा ॥७॥
एकाचि ब्रह्मांत जाती या अनादि । तैसीच जीवाची स्थिती असे ॥८॥
वासुदेव म्हणे सन्मुनींचा बोध । ऐकूनि सावध होई राजा ॥९॥
६९
नम्रभावें राव म्हणे तुम्ही कोण । हिंडतां जाणून जीवदु:खें ॥१॥
सनत्कुमारादि सिद्ध महाज्ञातें । हिंडती जनांतें उद्धराया ॥२॥
शोकसागरीं मी बुडतों दयाळा । प्रदीप्त करावा ज्ञानदीप ॥३॥
बोलते तैं मुनि अंगिरा जो तो मी । पुत्र मज जनीं दिधला जेणें ॥४॥
जाणूनि हा शोक पातलों या स्थानीं । धरुनियां मनीं बोधहेतु ॥५॥
बोधावें तुजसी हेचि होती इच्छा । परी पुत्रइच्छा होती तुज ॥६॥
अशाश्वता हे राया, संसाराची । अद्यापि नव्हती ज्ञात तुज ॥७॥
वासुदेव म्हणे अंगिरा नृपातें । मिथ्या संसाराचें कथिती रुप ॥८॥
७०
शब्दस्पर्शादि विषय । तेंवी सकल ऐश्वर्य ॥१॥
स्वप्न मनोराज्यचि कीं । अशाश्वत सर्व लोकीं ॥२॥
सत्यचि हें जरी सौख्य । तरी पावे कां विनाश ॥३॥
जरी पाहतां पाह्तां । नाश होई ऐश्वर्याचा ॥४॥
तरी भ्रम्चि तो ऐसें । म्हणूं नये काय सांगें ॥५॥
पाप-पुण्याची कल्पना । कारण जे पूर्वकर्मा ॥६॥
मग फळें मात्र त्यांचीं । सत्य मानावीं तीं कैसीं ॥७॥
पांचभौतिक हा देह । माझा म्हणे तया भय ॥८॥
राया, चिंतूनियां आत्मा । करुनि घेईं सत्य ज्ञाना ॥९॥
पुढती देती एक मंत्र । जेणें दर्शन प्रत्यक्ष ॥१०॥
वासुदेव म्हणे शुक । निवेदिती हें रायास ॥११॥
N/A
References : N/A
Last Updated : November 18, 2019
TOP