स्कंध ६ वा - अध्याय ५ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


२४
दक्ष पांचजनीउदरीं अर्यश्व । जाहले सुपुत्र दशसहस्त्र ॥१॥
प्रजोत्पादनाची दक्षाआज्ञा होतां । पश्चिम दिशेचा धरिती पंथ ॥२॥
सिंधु नदी जेथें सागरासी भेटे । तीर्थी त्या तपातें प्रवर्तले ॥३॥
मोक्षाधिकारी ते कर्ममार्गी रत । पाहूनि नारद दु:ख पावे ॥४॥
वासुदेव म्हणे हर्यश्वा नारद । करी कूटबोध तोचि ऐका ॥५॥

२५
हर्यश्वहो, तुम्हीं मूढ केंवी झालां । विसरुनि गेलां भूमिनाश ॥१॥
एकचि पुरुष वसे या राष्ट्रांत । बिळ एक तेथ तेंवी असे ॥२॥
बाहेरी जाण्याचा मार्ग न तयासी । स्त्री एक बहुरुपी वसे तेथें ॥३॥
जारिणीपतीही वसे एक तेथ । सरिताही उभयवाही एक ॥४॥
पंचविंशतीचें विचित्र सदन । विचित्र कथन करी हंस ॥५॥
नित्य भ्रमे ऐसें स्वतंत्रचि चक्र । निर्मिलें तयास क्षुर वज्रें ॥६॥
जाणतां न कीम हें, पितृआज्ञा भाव । न कळूनि उपाय करितां भिन्न ॥७॥
वासुदेव म्हणे नारदाची वाणी । हर्यश्व ऐकूनि घेती बोध ॥८॥

२६
लिंगशरीर ते भूमि । जीव तेणेंचि बंधनीं ॥१॥
नाश तयाचा नेणतां । व्यर्थ मोक्षाच्या त्या वाटा ॥२॥
स्वत:सिद्ध सर्वसाक्षी । तया पुरुष बोलती ॥३॥
तया ईश्वराचें ज्ञान । न घडे तरी व्यर्थ श्रम ॥४॥
फिरुनि येण्याचा न मार्ग । बिळ तेंचि ब्रह्मरुप ॥५॥
बहुरुपें धरी बुद्धि । जीव तियेचा तो पति ॥६॥
लंपट तो होतां दु:ख । भोगी गतिही अनेक ॥७॥
उभयत्र प्रवाहिनी । नदी माया येई ध्यानीं ॥८॥
निर्मूनियां ते सृष्टीसी । संहारही करी तेचि ॥९॥
वासुदेव म्हणे बोध । यांचा न होतांचि कष्ट ॥१०॥

२७
पंचविंशति त्या तत्त्वांचा आधार । आत्माचि केवळ ज्ञेय एक ॥१॥
शास्त्र तोचि हंस कथी दिव्य ज्ञान । कालचक्र क्षीण करी जगा ॥२॥
संसारनिवृत्त व्हावें हेचि आज्ञा । न जाणतां कर्मा काय फल ॥३॥
निवृत्तींत ऐसे रमले हर्यश्व । आनंदें नारद निघूनि गेले ॥४॥
ऐकूनि तें वृत्त क्रुद्ध होई दक्ष । निर्मी शबलाश्व लक्षावधि ॥५॥
तेही नारायणतीर्थीचि तपार्थ । जाऊनि ईशास प्रार्थिताती ॥६॥
नमो नारायणा, पुराणपुरुषा । शुद्ध सत्त्वरुपा महाहंसा ॥७॥
ऐसे संतानार्थ करितां जपास । नारद तयांस ज्ञान बोधी ॥८॥
वासुदेव म्हणे यापरी नारद । बोधितां दक्षास क्रोध येई ॥९॥

२८
क्रोधावेशें दक्ष भेटे नारदासी । म्हणे वंचिलेंसी बालकांतें ॥१॥
ऋणत्रयमुक्त न होती तयांसी । दीक्षा संन्यासासी व्यर्थ असे ॥२॥
अनुभवावीण विषयवैराग्य । न घडेचि चांग न कळे तुज ॥३॥
गृहस्थांसी वंशच्छेदनाचा मार्ग । दाऊनियां ढोंग माजविसी ॥४॥
सोशिलें एकदां पुनरपि तेंचि । करिसी, शापासी घेईं आतां ॥५॥
कोठेंही न थारा लाभेल तुजसी । कदा न वससी एका ठाईं ॥६॥
ऐकूनि तथास्तु बोलले नारद । स्वीकारिला शाप आनंदानें ॥७॥
वासुदेव म्हणे शुक सज्जनासी । म्हणती सहजचि सहिष्णुता ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 08, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP