स्कंध ६ वा - अध्याय ६ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


२९
विरंचीआज्ञेनें दक्ष प्रजापति । साठ कन्यकांसी जन्म देई ॥१॥
पितृवत्सल त्या होत्या सकळही । पिता तयां देई योग्य स्थळीं ॥२॥
दश त्या धर्मातें, तेरा कश्यपातें । अर्पिल्या चंद्रातें सत्तावीस ॥३॥
कृशाश्व तैं भूत, अंगिरा यांप्रति । अर्पिल्या प्रत्येकीं दोन दोन ॥४॥
अवशिष्ट चार अर्पिल्या तार्क्ष्यासी । कश्यपा संतती बहु होई ॥५॥
वासुदेव म्हणे धर्मादींचा वंश । निवेदिती शुक नृपाळातें ॥६॥

३०
भानुपुत्र देवऋषभ धर्मासी । इंद्रसेन त्यासी पुत्र होई ॥१॥
विद्योत ‘लंबेचा’ स्तनयित्नु त्याचे । संकट ‘ककुभेतें’ पुत्र एक ॥२॥
संकटा कीकट तया दुर्गाभक्त । देव भूलोकांत विख्यात ते ॥३॥
‘जामीलागीं’ स्वर्ग, नंदीचा तो पिता । विश्वदेवमाता ‘विश्वा’ होई ॥४॥
विश्वेदेवांप्रति कांहीं न संतति । साध्य ते ‘साध्वेसी, पुत्र होती ॥५॥
अर्थसिद्धि तयां पुत्र होई एक । ‘मरुत्वती’ पुत्रद्वय ऐका ॥६॥
मरुत्वान्‍ जयंत ऐसीं नामें त्यांचीं । दुजा उपेंद्रचि विष्णुअंशें ॥७॥
मुहूर्ताभिमानी देव ‘मुहूर्तेसी’ । मुहूर्त फलासी देती हेचि ॥८॥
वासुदेव म्हणे ‘संकल्पेचा’ पुत्र । नाम त्या ‘संकल्प’ कामपिता ॥९॥

३१
‘वसूचे’ ते अष्ट द्रोण, प्राण, वसु । दोष, विभावसु, अग्नि, अर्क ॥१॥
ध्रुव, ऐसे अष्टवसु ते विख्यात । ‘अभिमती’ पुत्र हर्ष, शोक ॥२॥
प्राणकांता ‘ऊर्जस्वती’ प्रति सह । आयु, पुरोजव, पुत्र, तीन ॥३॥
ध्रुव-धरणीतें नगराभिमानी - । देव, बहु जनीं पुत्र होती ॥४॥
अर्क-वासना तीं तर्षादिक पुत्रां । अग्नि-वसोर्धारा द्रवणकांसी ॥५॥
कृत्तिका-अग्नि तैं स्कंदा जन्म देती । पुत्र विशाखांदि स्कंदाप्रति ॥६॥
दोष-शर्वरींसी शिशुमार पुत्र । श्रीहरीचा अंश भाग्यवंत ॥७॥
वसु-अंगिरसी पुत्र विश्वकर्मा । पुत्र तया जाणा चाक्षुषमनु ॥८॥
विश्वेदेव साध्यगण त्याचे पुत्र । वासुदेव वृत्त पुढती कथी ॥९॥

३२
विभावसुकांता ‘उषेसी’ आतप । व्युष्ट, तैं रोचिष पुत्र तीन ॥१॥
पंचयाम पुत्र आतपासी होई । दिवस तो पाहीं कर्ममूळ ॥२॥
अवशिष्ट याम तीन ते रजनी । पूर्वोत्तर यामीं अर्ध दिन ॥३॥
वासुदेव म्हणे धर्माचा हा वंश । पुढील वृत्तान्त परिसा आतां ॥४॥

३३
भूतासे सरुपेपासूनि असंख्य । रुद्र नामें पुत्र प्राप्त झाले ॥१॥
भूतेपासूनि त्या रैवतादि भूत - । प्रेत, विनायक पार्षद ते ॥२॥
अंगिरा-स्वधेतें पितर सतीसी । अथर्वांगिरसचि वेद जाणें ॥३॥
कृशाश्वार्चिषेतें धूम्रकेश पुत्र । देवलादि चार शिषणेप्रति ॥४॥
तार्क्ष्य-विनतेसी गरुड - अरुण । कद्रूप्रति जाण सकळ सर्प ॥५॥
पतंगीचे पक्षी, शलभ यामिनीचे । वर्णी वंश ऐसे वासुदेव ॥६॥

३४
सत्तावीस कन्या दिधल्या चंद्रासी । रोहिणीची प्रीति तया बहु ॥१॥
दक्षशापें तेणें क्षयरोगी चंद्र । लाभे कलामात्र उ:शापानें ॥२॥
त्रयोदश कन्या कश्यपा ज्या त्यांचा । विस्तार मी आतां कथितों राया ॥३॥
तिमीसी जळचर, सरमेसी व्याघ्र । सुरभीसी द्विशफ पशु होती ॥४॥
ताम्रेसी गृध्रादि, क्रोधवशे सर्प । मुनि अप्सरांस प्रसवली ॥५॥
इलेचे त्या वृक्ष, सुरसा राक्षसां । गंधर्वां अरिष्टा प्रसवे बहु ॥६॥
काष्टा एकशफां दनु बहु पुत्रां । द्विमूर्धादि थोरां प्रसवली ॥७॥
वासुदेव म्हणे वंशाचा विस्तार । ऐकणें सकळ आवश्यक ॥८॥

३५
दनुपुत्रांतूनि कन्या स्वर्भानूची । स्वीकारी नमुचि स्वप्रभा ते ॥१॥
वृषपर्वाकन्या शर्मिष्ठा प्रख्यात । ययाति सानंद वरीतसे ॥२॥
दनुपुत्र वैश्वानरा कन्या चार । लावण्यसुंदर ‘उपदानवी’ ॥३॥
‘हयशिरा’ तेंवी पुलोमा, कालका, । प्रथमा, हिरण्याक्षा कांता शोभे ॥४॥
द्वितीया क्रतूची,अवशिष्ट दोन । कश्यपचि जाण वरी तयां ॥५॥
पौलोम तैं कालकेय तयांप्रति । साठसहस्त्रचि दानव ते ॥६॥
निवातकवच, वधिले अर्जुनें । पूर्वी इंद्राज्ञेनें यज्ञशत्रु ॥७॥
सिंहिकेचे ठाईं विप्रचित्ती सुत । एकोत्तरशत जन्म घेती ॥८॥
राहु तो वडील, केतु तो अंतिम । वासुदेव ध्यान द्यावें म्हणे ॥९॥

३६
आदितीच्या कुशीं येई हृषीकेशी । द्वादश तियेसी पुत्र होती ॥१॥
विवस्वान्‍, अर्यमा, पूषा तेंवी त्वष्टा । सविता, भग, धाता, विधाताही ॥२॥
वरुण, मित्र, शक्र तेंवी उरुक्रम । सुविख्यात जाण आदित्य हे ॥३॥
विवस्वान - संज्ञेप्रति श्राद्धमनु । यमुना तेंवी यम द्वंद्व होई ॥४॥
पुढती संज्ञाचि अश्विनी होऊनि । हिंडतां अश्विनीकुमार ते ॥५॥
विवस्वाना अन्य कांता नामें छाया । प्रसवे ती जया अपत्यां तें ॥६॥
शनैश्वच, मनुसावर्णि हे पुत्र । तपती कन्या, वर संवरण ॥७॥
अर्यमा आदित्यकांता ते मातृका । विस्तार तियेचा मनुष्य हे ॥८॥
पूषालागीं नाहीं जाहलें संतान । दक्षयज्ञीं भग्नदंत ज्याचे ॥९॥
त्वष्टा दैत्यस्वस्त्रा वरी ते ‘रचना’ । सन्निवेष जाणा पुत्र तिचा ॥१०॥
विश्वरुप नामें बंधु तयाप्रति । होता तो प्रसंगीं देवगुरु ॥११॥
वासुदेव म्हणे गुरु अपमानें । सोडून देवांतें गेला होता ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 08, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP