स्कंध ६ वा - अध्याय ३ रा
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
१४
रावप्रश्नें मुनि यमदूतवृत्त । कथिती राजास तेंचि ऐका ॥१॥
पुशिती यमासी कर्मफलदाते । देव कोणते तें निवेदावें ॥२॥
निर्णय कर्मांचा बहुतांचे हाती । श्रेष्ठ तयांमाजी तरी कोण ॥३॥
आपणचि श्रेष्ठ तरी अन्य कोणी । रोधिलें येऊनि आम्हांप्रति ॥४॥
नारायणनाम उच्चारितां देव । येऊनि अभय देते झाले ॥५॥
निवारुनि आम्हां धाडिलें या स्थानीं । संदेह फेडूनि वदले यावें ॥६॥
वासुदेव म्हणे दूतांचें वचन । ऐकूनियां यम वदला तयां ॥७॥
१५
नारायणनाम उच्चारीत यम । म्हणे नारायण सकलाधार ॥१॥
शास्ता मी केवळ जंगम जीवांचा । चालक ईशाचा दास नम्र ॥२॥
तंतु वस्त्रामाजी तेंवी मी विश्वांत । स्वाधीन हें विश्व त्याच्या असे ॥३॥
वेसणनिबद्ध पशूसम जीव । जाणती न देव ऋषीही त्या ॥४॥
सकल पदार्थ अवलोकी नेत्र । परी पदार्थांस न दिसेचि तो ॥५॥
तैसेंचि ईश्वरा ज्ञान सकलांचें । पाही न तयातें परी कोणी ॥६॥
दूत त्याचे नित्य हिंडती सर्वत्र । दर्शनें कृतार्थ सकल त्यांच्या ॥७॥
वासुदेव म्हणे विष्णुदूतभेटी । होईल तयांचीं हरती पापें ॥८॥
१६
ब्रह्मा, शिव, सनत्कुमार, नारद । कपिल, प्रल्हाद, जनक, मनु ॥१॥
भीष्म, बलि, शुक, यम जो मी ऐसे । रहस्य धर्माचें जाणिताती ॥२॥
देव, ऋषि, सिद्ध, असुर, मानव । चारण, गंधर्व, विद्याधर ॥३॥
रहस्य धर्माचें जाणती न तेही । श्रेष्ठ धर्म पाहीं भागवत ॥४॥
संजीवनी जयां ज्ञात न ते वैद्य । औषधें अनेक योजिताती ॥५॥
तेंवी न नामाचें रहस्य जाणिती । मूढ ते कष्टती अन्य मार्गे ॥६॥
दूतहो, यास्तव भक्तांसी शासन । करणें, मज ऐसें बळ ॥७॥
संरक्षक त्यांचा असे भगवान । कदा त्यांचे प्राण हरुं नका ॥८॥
वासुदेव म्हणे यम कथी, भक्तां । काळाचाही कदा धाक नसे ॥९॥
१७
पुत्रकलत्रादि विषयनिमग्न । पापी भक्तिहीन नरकोद्युक्त ॥१॥
आणावे ते नर यमसदनासी । ईशपादांबुजीं नम्र न जे ॥२॥
अपराध ऐसा घडला यास्तव । नमितां क्षमील दयाळु जो ॥३॥
रायाप्रति शुक म्हणती भक्तीवीण । पापविनाशनमार्ग नसे ॥४॥
भक्तीविण यज्ञयागादि ते व्यर्थ । कर्मग्रंथि दृढ होई तेणें ॥५॥
ऐसें यमोक्त हें माहात्म्य भक्तीचें । वंदिती भक्तांतें यमदूत ॥६॥
उपद्रव भक्तां देऊं नये कदा । निश्चय तयांचा दृढ होई ॥७॥
राया, अगस्तींनीं मयलपर्वतीं । कथिला मजसी इतिहास हा ॥८॥
वासुदेव म्हणे गूढ तो इतिहास । दावील जनांस भक्तिपंथ ॥९॥
N/A
References : N/A
Last Updated : November 08, 2019
TOP