स्कंध ८ वा - अध्याय १ ला
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
१
नमो देवदेवा, तुज वासुदेवा । शिरीं माझ्या ठेवा कृपाहस्त ॥१॥
व्यासमुनिराया घेईं नमस्कार । अज्ञानांध:कार दूर करीं ॥२॥
भक्तिभावें वंदूं योगेश्वर शुकां । भक्तिनंदादीपा उजळीती जे ॥३॥
श्रोत्यांसवें माझें मस्तक चरणीं । स्फुरो दिव्य वाणी प्रासादिक ॥४॥
कष्टनिवारक स्कंध हा अष्टम । आरंभूं वंदून सकल भूतां ॥५॥
परीक्षिती म्हणे गुरो, स्वायंभुव । मन्वादिक वृत्त कथिलें मज ॥६॥
अन्य मनूंचाही कथाव्या वृत्तान्त । वर्तमान, भूत, भविष्यही ॥७॥
लीला ईश्वराच्या कथाव्या मजसी । ज्ञाते नित्य गाती ईशकथा ॥८॥
वासुदेव म्हणे ईशकथागानीं । रंगूनियां जनीं धन्य व्हावें ॥९॥
२
निवेदिती शुक स्वायंभुवादिक । कल्पीं या प्रसिद्ध मनु सहा ॥१॥
आद्य वृत्त राया, निवेदिलें तुज । कपिलांचें वृत्त कथिलें तेंही ॥२॥
आकूति भगिनी जे देवहूतीची । यज्ञचि तिजसी पुत्र हरी ॥३॥
वृत्त मी तयाचें निवेदितों आतां । वनांत एकदां मनु गेला ॥४॥
सुनंदेच्या तीरीं एका पायावरी । शत वर्षे करी उग्र तप ॥५॥
साक्षात्कार निद्रेमाजी उद्गारला । गानीं त्या रंगला वासुदेव ॥६॥
३
सर्व देहांमाजी वसे वासुदेव । चेतविता सर्व जीवांप्रति ॥१॥
परी कोणीही न तया चेतविता । जग हें झोंपतां साक्षी जागा ॥२॥
ऐशा ईश्वरासी जन न जाणती । आश्चर्य हें लोकीं वाटे मज ॥३॥
ईश्वरें सकळ व्यापिलें हें विश्व । तेणेंचि जें तुज दिधलें असे ॥४॥
भोगूनियां तेंचि राहीं तूं संतुष्ट । परद्रव्यध्यास करं नको ॥५॥
दृष्टीची जो दृष्टि असूनि नयन । कदा अवलोकन करिती न ज्या ॥६॥
तया ईश्वरासी भजावें सर्वदा । जन्मादिक ज्याचा खेळ असे ॥७॥
सकलकर्ता जो मायेचा नियंता । स्वामी ऐश्वर्याचा निरिच्छ जो ॥८॥
वासुदेव म्हणे इच्छामात्रें जग । निर्मी जो सहज नमन तया ॥९॥
४
निद्रेंतचि मनु बरळतो ऐसें । मानूनि वधातें सजले दैत्य ॥१॥
यज्ञनामें हरी वधी तैं दैत्यातें । यामदेव त्यातें साह्य होती ॥२॥
प्रति मन्वंतरीं सहा अधिकारी । असती हें धरीं नित्य ध्यानीं ॥३॥
मनु, मनुपुत्र, देव, इंद्र, ऋषि । अंशावतारही असे एक ॥४॥
स्वायंभुवमनु पुत्र त्याचे दोन । यामादि ते जाण देव, राया ॥५॥
मरीच्यादि ऋषि, यज्ञ तोचि इंद्र । तोचि अवतार अंशरुपें ॥६॥
वासुदेव म्हणे अन्य मन्वंतरीं । होते अधिकारी कोण ऐका ॥७॥
५
स्वारोचिषमन्वंतर । मनु तेथ अग्निपुत्र ॥१॥
द्युमंतादि पुत्र त्यासी । देव तदा तुषितादि ॥२॥
यज्ञपुत्र इंद्र जाण । नाम जयासी रोचन ॥३॥
ऊर्ज, प्राण तेंवी स्तंभ । बृहस्पति, अत्रि, दत्त ॥४॥
च्यवन, ऐसे सप्तऋषि । ‘विभु’ अवतार बोलती ॥५॥
वेदशिरा, तुषितापुत्र । दीक्षा ज्याची ब्रह्मचर्य ॥६॥
वासुदेव म्हणे मुनि । जाती दीक्षेंत रमूनि ॥७॥
६
प्रियव्रतपुत्र मनु तो उत्तम । नाम तेंचि जाण मन्वंतरा ॥१॥
पवनादि दशपुत्र तयाप्रति । सत्य तैं भद्रादि देव तदा ॥२॥
सत्यजित इंद्र, वसिष्ठाचे पुत्र । प्रमदादि सप्त ऋषि तदा ॥३॥
धर्मपत्नी सूनृतेसी सत्यसेन । अवतार जाण तोचि तदा ॥४॥
सत्यव्रत त्याचा बंधु इंद्रासवें । निर्दाळी दुष्टांतें विक्रमानें ॥५॥
वासुदेव म्हणे प्रति मन्वंतरीं । भक्तां प्रतिपाळी शारड्गधर ॥६॥
७
उत्तमाचा बंधु तामस पुढती । मनु नाम तेंचि मन्वंतरा ॥१॥
पृथु, ख्याति आदि पुत्र त्या मनूचे । सत्यक, हरी ते देव तदा ॥२॥
त्रिशिख तो इंद्र ज्योतिर्धामादिक । ऋषीही ते सप्त तया वेळीं ॥३॥
हरिमेधापत्नी हरिणीसी हरि । पुत्र तो त्या काळीं अवतार ॥४॥
संकटीं गजेंद्रा सोडविलें तेणें । वैधृत्यादि जाणें अन्य देव ॥५॥
संरक्षिले वेद प्रयत्नें देवांनीं । नष्टचि जे जनीं जाहले त्यां ॥६॥
राव म्हणे कैसा गजेंद्रविमोक्ष । निवेदूनि मज धन्य करा ॥७॥
वासुदेव म्हणे वृत्त तें रसाळ । ऐकूनि तराल भवसिंधु ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : November 19, 2019
TOP