स्कंध ८ वा - अध्याय २३ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१४८
दयावंताचें तें दयाळु भाषण । ऐकूनियां मन बळिचें द्रवे ॥१॥
आनंदसागरा पातली भरती । कंठही दाटती भक्तिभावें ॥२॥
अश्रुपुर त्याच्या लोटती लोचनीं । जोडूनियां पाणी उभा राहे ॥३॥
म्हणे देवा, ऐशा अनुग्रहासम । घडलें कांहीं न कर्म माझें ॥४॥
नीचानें या तुज वंदिलेंही नाहीं । प्रयत्नचि पाहीं केला तैसा ॥५॥
साक्षात्‍ वंदनाचा केवढा प्रभाव - । असेल, सदय तूंचि देवा ॥६॥
बोलूनियां ऐसें ब्रह्मा विष्णु शिवां । दंडवत केला प्रणिपात ॥७॥
वासुदेव म्हणे पाशमुक्त बळि । जावया सुतलीं सिद्ध होई ॥८॥

१४९
होउनि उपेंद्र रक्षिलें देवांसी । हर्ष अदितीसी होई बहु ॥१॥
पाशमुक्त पौत्र पाहूनि प्रल्हाद । म्हणे आम्हीं दैत्य धन्य झालों ॥२॥
कृपापात्र देवांसम झालों आम्हीं । कल्पवृक्ष जनीं तूंचि आम्हां ॥३॥
प्रल्हादासी देव बोलताती पौत्र । घेऊनि सुतल गाठीं सौख्यें ॥४॥
गदापाणी द्वार रक्षीन मी तव । दर्शनें त्या नित्य तुटती बंध ॥५॥
आज्ञेसम भक्त सुतलांत जाती । शुक्रांसी मंडपीं वदला देव ॥६॥
यज्ञन्यून सर्व करावें संपूर्ण । वासुदेव धन्य कथागानें ॥७॥

१५०
वंदूंनियां शुक्र बोलले हरीसी । यज्ञहेतु तूंचि एक देवा ॥१॥
यथासांग यज्ञ तुझ्याचि लाभार्थ । जाहला कृतार्थ दैत्यराज ॥२॥
तैसेंचि त्वन्नामें न्यून पूर्ण होई । आज्ञा मान्य पाहीं परी तव ॥३॥
बोलूनियां ऐसें पूर्ण केला यज्ञ । समर्थ वामन धर्मकार्यीं ॥४॥
यास्तव उपेंद्र योजी तया ब्रह्मा । विमानीं वामना घेई इंद्र ॥५॥
वासुदेव म्हणे शिवादिक देव । करिती कौतुक अदितीचें ॥६॥

१५१
परीक्षितीलागीं शुक महायोगी । बोलले कथा ही कथिली तुज ॥१॥
पापविनाशी हें वामनचरित्र । कथा अलौकिक प्रभुच्या बहु ॥२॥
रज:कणांहूनि संख्या ते अपार । वर्णन करील कोण त्यांचें ॥३॥
नित्य वामनाची कथा हे ऐकतां । पठण करितां सौख्यलाभ ॥४॥
सर्वकार्यारंभीं कथा हे ऐकतां । कर्मासी न्यूनता न राहेचि ॥५॥
वासुदेव म्हणे अंतीं मोक्षलाभ । वामनचरित्र नित्य गावें ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 01, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP