स्कंध ८ वा - अध्याय ४ था
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
१७
गजेंद्रासी मुक्त केलें हें पाहूनि । वर्षिली देवांनीं सुमनें बहु ॥१॥
दुंदुभीचा नाद गंधर्वांचें गान । करिती स्तवन चारणादि ॥२॥
विदारित नक्रमुखांतूनि एक । जाहला प्रगट पुरुष दिव्य ॥३॥
वंदूनि ईश्वरा गेला तो स्वर्गांत । सर्वांच्या समक्ष हूहूरुपें ॥४॥
देवलासी जळीं ओढितां नक्रत्व । शापें, त्या उ:शाप तैसा होता ॥५॥
वासुदेव म्हणे स्वरुपतालाभ । होई गंधर्वास प्रभुदर्शनें ॥६॥
१८
राया गजेंद्र, तो पुरा । द्रविड देशांतील राजा ॥१॥
नांव त्यांचें इंद्रद्युम्न । गांठी तपार्थ कानन ॥२॥
मलयाचलीं तो एकदां । मौन घेऊनि बैसतां ॥३॥
मुनि अगस्ति पातले । तयां नाहीं सन्मानिलें ॥४॥
क्रोधाकुल तैं अगस्ति । नृपाळासी शाप देती ॥५॥
म्हणती होईं अज्ञ गज । राव स्वीकारी तें वच ॥६॥
भक्तिसामर्थ्ये गजासी । होती पूर्वजन्मस्मृति ॥७॥
वासुदेव म्हणे मुक्त । पुढती झाले गज नक्र ॥८॥
१९
शुकमहामुनि बोलले रायासी । मुक्त गजेंद्रासी करुनि हरी ॥१॥
म्हणे हे गजेंद्रा प्रभातीं, जो नित्य । जपेल हें स्तोत्र भक्तिभावें ॥२॥
अंतसमयीं त्या लाभे शुद्ध बुद्धि । पावेल सद्गति जयायोगें ॥३॥
ब्राह्यमुहूर्ती जे होऊनि एकाग्र । चिंतितील तुज, मजही भावें ॥४॥
सरोवर, गिरी, वन, वृक्ष, लता । तेंवी या पर्वता गुहांसवें ॥५॥
ब्रह्मा, विष्णु, शिवमंदिर, कौस्तुभ । क्षीराब्धि, श्रीवत्स, वैजयंती ॥६॥
सुदर्शन, पांचजन्य तैं गरुड । लक्ष्मी तेंवी शेष नारदादि ॥७॥
मत्स्य-कूर्मादिक अवतार माझे । सूर्यचंद्रही जे चिंतितील ॥८॥
अग्नि, ओंकार तैं माया, गोब्राह्मण । धर्मसनातन, दक्षकन्या ॥९॥
गंगा-यमुनादि नद्या, ऐरावत । ध्रुव, पुण्यश्लोक सप्त ऋषि ॥१०॥
स्मरतील त्यांचीं दग्ध होती पापें । मोद हरिवचें वासुदेवा ॥११॥
२०
बोलूनि हें नारायण । हर्षे फुंकी पांचजन्य ॥१॥
लीला करुनि यापरी । बैसे देव गरुडावरी ॥२॥
संगें घेऊनि पार्षद । गांठी आनंदें वैकुंठ ॥३॥
शुक निवेदिती राया । कल्याणाची इच्छा जया ॥४॥
सूर्योदयापूर्वी तेणें । चरित्र हें गावें प्रेमें ॥५॥
नित्य सुस्नात होऊन । गातां सकळ काम पूर्ण ॥६॥
वासुदेव म्हणे मुक्ति । सहज लाभे सद्भक्तासी ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : November 19, 2019
TOP