स्कंध ८ वा - अध्याय १२ वा
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
७४
निवेदिती शुक राया, हा वृत्तांत । कळे कैलासांत सकल शिवा ॥१॥
मोहिनीस्वरुप घेऊनि विष्णूनें । देवां अमृतानें तुष्ट केलें ॥२॥
ऐकूनि भवानीसवें पार्श्वगण । शंकर घेऊन येती तेथें ॥३॥
सत्कार विष्णूंनीं केला शंकराचा । स्तवनें शिवाचा प्रगटे हर्ष ॥४॥
बोलती शंकर देवा, तूं शाश्वत । जगद्रूपी तूंच परि न जड ॥५॥
इह-परसौख्य त्यागूनि साधक । सेविताती तुज निष्कामत्वें ॥६॥
वासुदेव म्हणे हरि निरपेक्ष । अर्पितो जीवास कर्मफल ॥७॥
७५
ऐश्वर्य न तुझें देवा, स्वार्थास्तव । भक्तानुग्रहार्थ केवळ तें ॥१॥
द्वैताद्वैतकार्य-कारण तूं एक । सुवर्णालंकार एक जेंवी ॥२॥
अज्ञानें वर्णिती तुज नानापरी । दोष कोणावरी देवा, त्याचा ॥३॥
ब्रह्मा, ईश परमेश्वर वा स्वतंत्र । धर्म ऐसें तुज म्हणती कोणी ॥४॥
मरीच्यादि आम्ही सत्त्वगुणोत्पन्न । आम्हांही न ज्ञान इतरां काय ॥५॥
वायूसम तव संचार सर्वत्र । दावीं आम्हां रुप मोहिनीचें ॥६॥
वासुदेव म्हणे प्रार्थी ऐसें शिव । देई प्रत्युत्तर विश्णु तया ॥७॥
७६
गूढभावें विष्णु बोलले शिवासी । दैत्यमोहकारी पाहीं रुप ॥१॥
बोलूनियां ऐसें अदृश्य जाहले । उअप्वन झालें रम्य तेथ ॥२॥
उपवनशोभा पाहती शंकर । पातली सुंदर नारी तोंचि ॥३॥
कंदुकक्रीडा ती करी आनंदानें । स्वरुप वर्णावें काय तिचें ॥४॥
असे नसे किंवा ऐसें त्याली वस्त्र । अवयव स्पष्ट दिसती तेणें ॥५॥
कंदुकताडना वांके यदा खालीं । तदा वक्षस्थलीं किंचित्कंप ॥६॥
वासुदेव म्हणे पुष्पाहारभारें । भासे भंग पावे कृश कटि ॥७॥
७७
ताडनानें पावे मोद । नाचुं लागे तैं कंदुक ॥१॥
हर्श पावे तैं सुंदरी । ताडी कंदुक वरि वरि ॥२॥
नेत्रचापल्य तियेचें । वर्णवे न त्या काळींचें ॥३॥
रत्नकुंडलांनीं मुख । शोभा पावे अलौकिक ॥४॥
होई क्रीडतां धांदल । वस्त्र आंबाडाही सैल ॥५॥
एका हस्तें करी क्रीडा । अन्यें सांवरी ते वस्त्रा ॥६॥
वासुदेव म्हणे ऐसी । मोहिनीची मोहक कृति ॥७॥
७८
पाहूनि ते लीला दंग झाले शिव । जाणूनि तें स्मित करी नारी ॥१॥
फेंकूनि कटाक्ष कंदुक कवळी । बेभान त्या वेळीं होती शिव ॥२॥
भूतगण देवीसान्निध्य न स्मरे । कंदुक उसळे दूर तोंचि ॥३॥
मागोमाग त्याच्या धांवली सुंदरी । सूक्ष्म वस्त्र करी दूर वायु ॥४॥
पाहूनि तें शिव जाहले व्याकुळ । फेंकी तैं कटाक्ष फिरुनि नारी ॥५॥
विव्हल तैं शिव दुर्लक्षूनि अंबा । स्पर्शावया अंगा जवळी जाती ॥६॥
वासुदेव म्हणे पाहूनि सलज्ज । मोहिनी कुंजांत लपूनि बैसे ॥७॥
७९
आकर्षूनि चित्त जाई लताकुंजी । मागोमाग जाती शिवसांब ॥१॥
पाहूनि तयांसी करी पलायन । शिवही धांवून धरिती केश ॥२॥
बळेंचि तिजसी ओढूनि जवळी । हृदयीं कवळी भोलासांब ॥३॥
व्याधपाशीं जेंवी हरिणी घाबरे । मोहिनी बावरे तैशापरी ॥४॥
अस्ताव्यस्त केश आरक्त नयन । सर्वांगासी घर्म ऐसी स्थिति ॥५॥
वासुदेव म्हणे मुक्त होई अंतीं । भेटे प्रयत्नांतीं परमेश्वर ॥६॥
८०
बाहुपाशमुक्त होऊनि पळाली । शिवाची घांवली मूर्ति मागें ॥१॥
कामपराभूत जाहले शंकर । वृषासम धैर्य धरवेना त्यां ॥२॥
मागोमाग धांव घेतांचि स्खलन । पावूनि लंघून जाती भूमि ॥३॥
अंतीं व्याकुळता पाहूनि आपुली । प्रभूची जाणिली माया सर्व ॥४॥
रेतस्खलन तें होई ज्या ज्या स्थळीं । सुवर्णाची झाली भूमि तेथ ॥५॥
वासुदेव म्हणे मोहिनीस्वरुप । त्यागूनि अच्युत प्रगट होई ॥६॥
८१
बोले वैकुंठविहारी । झालों संतुष्ट अंतरीं ॥१॥
स्वयें तुज मी भुलवितां । वरुनि धैर्यानें विवेका ॥२॥
स्वस्वरुपीं होसी स्थिर । तेणें तोषलें अंतर ॥३॥
माय मोह अन्य कोण । ऐसे लंघील तुजवीण ॥४॥
आतां मम माया कदा । मोहूं शके न त्वच्चित्ता ॥५॥
कालरुपी मी निमित्त । जाणें मज मायाधीश ॥६॥
वासुदेव म्हणे ऐसी । थोरथोरां माया नाडी ॥७॥
८२
परीक्षिते, ऐसा सत्कार पावून । कैलासीं निघूनि गेले शिव ॥१॥
मजही मायेनें मोह पडे ऐसा । मग पामरांचा पाड काय ॥२॥
ऐसें पार्वतीसी बोलूनि कथिती । योगनिद्रेमाजी असतां पुरा ॥३॥
पुशिलेंसी तोचि पुराणपुरुष । काल वेद तेथ कुंठितचि ॥४॥
निवेदिती शुक राया, या श्रवणें । पठणें वा जाणें मायानाश ॥५॥
सर्वकाल देव भक्तांचा कैंवारी । कृपेनें अर्पिली सुधा देवां ॥६॥
वासुदेव म्हणे भक्तवत्सलासी । सप्रेम वंदिती शुकदेव ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : November 22, 2019
TOP