स्कंध ८ वा - अध्याय १३ वा
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
८३
चतुर्दश मन्वंतरांतूनि सहा । निवेदिलीं पहा म्हणती शुक ॥१॥
अवशिष्ट आतां कथितों मी अष्ट । देऊनियां चित्त श्रवण करीं ॥२॥
सप्तम हें असे नामें वैवस्वत । मन्वंतर श्रेष्ठ परीक्षिता ॥३॥
विवस्वानपत्नी संज्ञेप्रति यम- । यमुना, हें युग्म श्राद्धदेव ॥४॥
तोचि श्राद्धदेवमनु या काळींचा । इक्ष्वाकुआदि त्या पुत्र दश ॥५॥
आदित्य वसु ते रुद्र विश्वेदेव । आश्विनीकुमार मरुत् ऋभु ॥६॥
वासुदेव म्हणे देव, पुरंदर । इंद्र, ऋषि सप्त कश्यपादि ॥७॥
॥८४॥
कांता कश्यपमुनींची । अदिती जे श्रेष्ठ सती ॥१॥
पुत्र आदित्य तियेचे । धाकुटा त्या वामन साजे ॥२॥
वैवस्वत मन्वंतरीं । हाचि जाणावा श्रीहरी ॥३॥
प्रभु भक्तजनत्राता । निराधारांचा तो पिता ॥४॥
वासुदेवाची प्रार्थना । देईं दर्शन वामना ॥५॥
८५
विवस्वानपत्नी छायेच्या उदरीं । अपत्यें जाहलीं तीन श्रेष्ठ ॥१॥
पुत्र सावर्णि तो मनूचा पुढती । मन्वंतराप्रति तेंचि नांव ॥२॥
विवस्वानपत्नी संज्ञाचि वडवा । अश्विनीकुमारां प्रसवली ॥३॥
निर्मोकादि पुत्र देव सुतपादि ते । होतील, बळीतें इंद्रपद ॥४॥
त्रिपाद भूदानें मान हा तयासी । त्यागूनि सद्गति मिळवील तो ।५॥
गालव व्यासादि सप्तर्षी होतील । ‘देवगुह्य’ विप्रश्रेष्ठ एक - ॥६॥
पुत्र त्याचा सार्वभौम अवतार । बळीसी तो इंद्र करिल बळें ॥७॥
वासुदेव म्हणे ‘दक्षसावर्णि’ तें मन्वंतर साचें पुढती होई ॥८॥
८६
दक्षसावर्णि हा वरुणाचा पुत्र । होईल साचार मनु तदा ॥१॥
भूतकेतुआदि पुत्र त्या मनूचे । ‘अद्भुत’ विराजे इंद्रपदीं ॥२॥
द्युतिमानादिक जाणें सप्त ऋषि । ऋषभ त्या काळीं अवतार तो ॥३॥
आयुष्मान् अंबुधारेचा तो पुत्र । अद्भुतासी इंद्र करिल बळें ॥४॥
वासुदेव म्हणे ‘ब्रह्मसावर्णि’ तें । मन्वंतर साचें पुढती ख्यात ॥५॥
८७
मनु उपश्लोकपुत्र । ‘ब्रह्मसावर्णि’ त्यां नांव ॥१॥
भूरिषेणादिक पुत्र । शंभु तदा होई इंद्र ॥२॥
सुवासनादिक देव । ऋषि हविष्मानादिक ॥३॥
विष्वसृजाचा जो पुत्र । विश्वक्सेन अवतार ॥४॥
वासुदेव म्हणे तोचि । श्रेष्ठ आधार इंद्रासी ॥५॥
८८
धर्मसावर्णि तें पुढती मन्वंतर । त्याचि नामें थोर मनु तदा ॥१॥
सत्यधर्मादिक पुत्र त्याचे दश । विहंगमादिक देव तदा ॥२॥
वैधृत तो इंद्र, अरुणादि ऋषि । कांता आर्यकाची वैधृता जे ॥३॥
धर्मसेतु नामें पुत्र जो तियेचा । पोषक विश्वाचा अवतार तो ॥४॥
वासुदेव म्हणे ‘रुद्रसावर्णि’ तें । मन्वंतर ज्ञाते निवेदिती ॥५॥
८९
मनु तयावेळीं रुद्रसावर्णीचि । देववान आदि पुत्र त्याचे ॥१॥
ऋतधामा इंद्र, हरितादि देव । तपोमूर्त्यादिक सप्त ऋषि ॥२॥
सत्यसहसाच्या सूनृता पत्नीसी । स्वधामा जो तोचि अवतार ॥३॥
वासुदेव म्हणे त्रयोदशसंख्य । मन्वंतर श्रेष्ठ परिसा आतां ॥४॥
९०
‘देवसावर्णि’ त्या मन्वंतरा नाम । मनूचेंही नाम तेंचि तदा ॥१॥
चित्रसेनादिक पुत्र, सुकर्मादि - । देव, दिवस्पति नामें इंद्र ॥२॥
निर्मोकादि ऋषि, देवहोत्रपत्नी - । बृहतीपासूनि योगेश्वर ॥३॥
वासुदेव म्हणे तोचि अवतार । आतां मन्वंतर अंतिम तें ॥४॥
९१
‘देवसावर्णीचि मनु-मन्वंतर । उरुआदि पुत्र तयालागीं ॥१॥
पवित्रादि देव, शुचिनामें इंद्र । अग्नि बाव्हादिक ऋषि सप्त ॥२॥
बृहद्भानु सत्रायण - वितानेचा । अवतार साचा तयावेळीं ॥३॥
कर्मकांडाचा तो करील विस्तार । दिन एकमात्र विरंचीचा ॥४॥
चतुर्दश मनुकथा ही ऐकतां । पठतां वा, कृपा श्रीहरीची ॥५॥
वासुदेव म्हणे मन्वंतरें ऐसीं । ‘कल्प’ नाम त्यासी सांकेतिक ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 22, 2019
TOP