स्कंध ८ वा - अध्याय ११ वा
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
७१
ईशकृपेनें हा लाभतां विजय । इंद्र वदे काय बळिसी ऐका ॥१॥
घेऊनियां रुपें बालिशभावानें । मूढहो, आम्हांतें खेळवितां ॥२॥
परी बले, आतां पाचारीं मित्रांतें । वांचवीं प्राणांतें वज्र आलें ॥३॥
बळि म्हणे इंद्रा, खेळ हा काळाचा । अभिमान ऐसा न करीं व्यर्थ ॥४॥
जय-पराजय मृत्यु वा रणांत । निश्चयेंचि साच वीराप्रति ॥५॥
भाषणें या तव ज्ञात्यालागीं कींव । कथी वासुदेव बळिवाक्य ॥६॥
७२
बोलूनियां बळि ताडी दिव्य बाण । इंद्र तैं ताडन करी वज्र ॥१॥
पतन बळीचें पाहूनियां जंभ । करी गदाघात ऐरावता ॥२॥
मातली तैं वेगें रथ करी सज्ज । देई धन्यवाद जंभ तया ॥३॥
प्रशंसूनि सोडी प्रखर तो बाण । परी घेई प्राण इंद्र त्याचा ॥४॥
पाहूनि तें बल, पाक तैं नमुचि । करिती इंद्रासी समर घोर ॥५॥
बल-पाकासी तैं वधिलें इंद्रानें । नमुचि क्रोधानें तदा धांवें ॥६॥
वासुदेव म्हणे नमुचीचें बल । बाधे न त्या वज्र नवल इंद्रा ॥७॥
७३
वृत्रासुरादींचे वध ज्या वज्रानें । नमुचीसी तेणें बाधा नसे ॥१॥
पाहूनियां इंद्र तुच्छ लेखी वज्रा । नभोवाणी तदा होई एक ॥२॥
इंद्रा, आर्द्र शुष्क वस्तूनें नमुचि । न मरे कदापि वरें माझ्या ॥३॥
ऐकूनियां इंद्र योजी जलफेन । तदा गतप्राण नमुचि होई ॥४॥
देवांसी आनंद तदा बहु होई । नारद थांबवी बोधें युद्ध ॥५॥
सायंकाळीं शुक्र, बळिआदि दैत्यां । अर्पूनि सामर्थ्या सौख्य देती ॥६॥
वासुदेव म्हणे बळिराज ज्ञाता । पराजयें चिंता न गणीं खेद ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : November 22, 2019
TOP