स्कंध ९ वा - अध्याय ८ वा
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
५९
रोहिता हरित, हरितासी चंप । सुदेव, विजय पुढती क्रमें ॥१॥
भरुक, वृक तैं बाहुक पुढती । तयाचें हरिती राज्य शत्रु ॥२॥
वनामाजी देह पडतां तयाचा । राणी सती जातां उदरीं गर्भ ॥३॥
पाहूनि तियेसी निवारिती मुनि । सपत्नीच्या मनीं उपजे द्वेष ॥४॥
चारिलें तैं विष तिजप्रति परी । ईश जया तारी भय न तया ॥५॥
विषासवें जन्म पावला म्हणूनि । ‘सगर’ चि जनीं संज्ञा लाभे ॥६॥
वासुदेव म्हणे सार्वभौम नृप । शासन दुष्टांस करिता झाला ॥७॥
६०
हैहय, बर्बर, यवन, शकादि । मातले तयांसी सगर दापी ॥१॥
वध न करितां शिक्षा करी तयां । मुंडन कित्येकां योजीतसे ॥२॥
अर्ध मुंडनाची शिक्षा कोणाप्रति । मोकळे कोणासी केश प्राप्त ॥३॥
नग्न राहूनियां कफनीचि ल्यावी । कोणी स्वीकारावी कौपीनचि ॥४॥
वासुदेव म्हणे विविध यापरी । राव शिक्षा करी दुर्जनांसी ॥५॥
६१
सुमति, केशिनी सगराच्या स्त्रिया । और्वऋषि तया गुरु होता ॥१॥
बहु अश्वमेध केले नृपाळानें । एकदां इंद्रानें हरिला अश्व ॥२॥
सुमतीचे पुत्र बहुत उन्मत्त । पित्राज्ञेनें देश खणिला त्यांनीं ॥३॥
शोधित ते अश्व गेले ईशान्येसी । कपिल तयासी बसले जेथें ॥४॥
समीप तयांच्या पाहूनियां अश्व । सांपडला चोर गर्जले तैं ॥५॥
सोंग करी पहा, पिटा या दुष्टासी । आतां डोळे झांकी पहा केंवी ॥६॥
वासुदेव म्हणे त्यागूनि विचार । निर्णय तो घोर अपराध ॥७॥
६२
साठ सहस्त्र ते पुत्र अविवेकी । सशस्त्र धांवती मुनीवरी ॥१॥
इंद्रमायेनें ते जाहले मोहित । स्वकर्मेचि मृतप्राय दुष्ट ॥२॥
कोलाहल त्यांचा ऐकूनियां मुनि । नेत्र उघडूनि अवलोकिती ॥३॥
भस्म सकलांचें जाहले त्या क्षणीं । सर्वसाक्षी अग्नि क्रोध पावे ॥४॥
क्रोध कपिलांसी नव्हता लवही । क्रोध न कदाही स्पर्शे ज्ञात्या ॥५॥
वासुदेव म्हणे सांख्यशास्त्रनौका । निर्मिली त्या श्रेष्ठा नमन भावें ॥६॥
६३
असमंजा पुत्र होता केशिनीतें । स्मरण गतजन्मीचें तयालागीं ॥१॥
कुसंग कदाही न घडो यास्तव । स्वीकारी मूढत्व जाणूनियां ॥२॥
एकदां सरयूतीरींच्या बालकां । बुडवी उदकामाजे स्वयें ॥३॥
राज्याबाहेरी त्या देतां हांकलूनि । बालकें देऊनि पुढती गेला ॥४॥
आश्चर्य सकलां वाटलें त्यावेळीं । नृपालागीं होई पश्चात्ताप ॥५॥
वासुदेव म्हणे अंशुमान त्याचा । दक्ष सगराच्या सेवेमाजी ॥६॥
६४
अश्वशोधार्थ तो राजाज्ञेनें जाई । भस्मराशी पाही कपिलाश्रमीं ॥१॥
सन्निधचि अश्व दिसला तयातें । वंदी कपिलांतें अंशुमान ॥२॥
म्हणे मुने, तूंचि परब्रह्मस्वरुप । अज्ञानें त्वद्रूप न कळे आम्हां ॥३॥
शुद्ध सत्वरुपा, त्रिगुणोद्भवांसी । बोध कैशारीती व्हावा तव ॥४॥
भेद-मोहत्यागें सनत्कुमारादि । विवेकें जाणिती रुप तुझें ॥५॥
भाग्येंचि हें आम्हां जाहलें दर्शन । करितों वंदन भावें तुज ॥६॥
वासुदेव म्हणे स्तवन यापरी । अंशुमान करी श्रेष्ठर्षीचें ॥७॥
६५
कृपावलोकनें बोलले तैं मुनि । जाईं हा घेऊनि अश्व यज्ञी ॥१॥
गंगोदकावीण पितरउद्धार । नसेचि साचार ध्यानीं असो ॥२॥
प्रदक्षिणा तदा घाली अंशुमान । नगरीं घेऊन अश्व जाई ॥३॥
पूर्ण करी यज्ञ हर्षे तैं सगर । प्रेमें अर्पी राज्य अंशुमाना ॥४॥
ज्ञानमार्गे जाई उद्धरुनि राव । गातो वासुदेव वृत्त प्रेमें ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : December 02, 2019
TOP