स्कंध ९ वा - अध्याय २० वा
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
१४८
परीक्षिते, आतां पुरूवंश ऐकें । धन्य तूं त्या वंशें जाहलासी ॥१॥
वंशीं या राजर्षि ब्रह्मर्षीही झाले । श्रेष्ठता पावले ज्ञानें जगीं ॥२॥
पूरुपुत्र जनमेजया प्रचिन्वान् । प्रवीर त्या जाण नमस्यु त्या ॥३॥
चारुपद, सुद्यु, बहुगव, संयाति । रौद्राश्व तो अहंयातीलागीं ॥४॥
ऋतेयुआदिक रौद्राश्वरासी दश । पुत्र रंतिभार ऋतेयूचा ॥५॥
अप्रतिरथ त्या पुत्र जो धाकुटा । कण्व पुत्र त्याचा सुविख्यात ॥६॥
मेधातिथि त्याचा, प्रस्कण्वादि विप्र । पुत्र तया देख बहुत होती ॥७॥
वासुदेव म्हणे ऋतेयूचा वंश । क्षात्रधर्मरत परिसा आतां ॥८॥
१४९
ऋतेयूचा ज्येष्ठ पुत्र जो सुमति । रैभ्य तयाप्रति पुत्र एक ॥१॥
दुष्यंत तयाचा सुविख्यात पुत्र । तयाचें चरित्र कथितों ऐकें ॥२॥
मृगयेसी राव हिंडतां एकदां । आश्रमीं कण्वांच्या प्राप्त झाला ॥३॥
तयास्थानीं एक लावण्यलतिका । पाहूनियां चित्ता मोह त्याच्या ॥४॥
मोहित होऊनि वदला तियेसी । कोणा क्षत्रियाची सांगें कन्या ॥५॥
अपात्रीं कदापि पुरुवंशजाचें । मोह न पावतें चित्त ऐसें ॥६॥
वासुदेव म्हणे खाण लावण्याची । सत्यचि ते होती शकुंतला ॥७॥
१५०
विश्वामित्राची मी कन्या ते वदली । माता मम गेली त्यजूनि मज ॥१॥
मेनका तियेचें नाम महाभागा । दिन एक व्हावा वास एथ ॥२॥
ऐकूनि दुष्यंत बोलला तियेसी । कुशिक कुळासी वदसी योग्य ॥३॥
राजकन्या जगीं अनुरुप पति । स्वयेंचि शोधिती धर्मज्ञा त्या ॥४॥
संवाद यापरी होऊनि तयांचा । विवाहही साचा होई वनीं ॥५॥
वासुदेव म्हणे गांधर्वपद्धति । रीत क्षत्रियांची पुरातन ॥६॥
१५१
अमोघवीर्यत्वें राजर्षीपासूनि । गर्भ त्याचि दिनीं राहियेला ॥१॥
अन्य दिनीं राव गेला स्वनगरीं । आश्रमीं राहिली शकुंतला ॥२॥
योग्यकालीं पुत्र जाहला तियेसी । कण्व जातकादि करिती त्याचें ॥३॥
लोकपालअंशे पुत्र तो विक्रमी । आयाळ धरुनि आणी सिंहा ॥४॥
नृपाच्या सदनीं जातां शकुंतला । मान्यता तियेचा न देई तो ॥५॥
कारण विवाह नव्हता प्रकट । लोकापवादास भ्याला राव ॥६॥
वासुदेव म्हणे नभोवाणी तदा । होई काय ऐका सभेमाजी ॥७॥
१५२
जन्मदाता तूंचि नृपा, या बाळाचा । पित्यासम पुत्रा गुण गोत्र ॥१॥
चर्मकोश मात्र माता ते केवळ । पित्याचेंचि कुळ पुत्रा लाभे ॥२॥
स्वीकार यास्तव करीं या पुत्राचा । अपमान कांतेचा करुं नको ॥३॥
ऐकूनि ते वाणी पुत्रासवें कांता । स्वीकारुनि राजा सौख्य भोगी ॥४॥
वासुदेव म्हणे पित्यामागें पुत्र । जाहला विख्यात जगामाजी ॥५॥
१५३
चक्रवर्ति तो नृपाळ । चक्रचिन्ह हस्तावर ॥१॥
चरणीं चिन्ह कमलाचें । सामंतेय गुरु त्याचे ॥२॥
गंगा-यमुनांचे तीरीं । भरत बहु यज्ञ करी ॥३॥
धेनु गजही वांटिले । विप्रां संतोषित केलें ॥४॥
बाहु उभारितां हात । पोंचती न जैं नभास ॥५॥
तेंवी योग्यता भरताची । जगीं न येई कोणासी ॥६॥
सप्त-विंशतिसहस्त्र । वर्षे भरताचें राज्य ॥७॥
वासुदेव म्हणे राजा । पुढती पावला वैराग्या ॥८॥
१५४
विदर्भ कुळींच्या राण्या तया तीन । वैराग्यसंपन्न राजा तयां- ॥१॥
वदला, अपेक्षा न मन तुमची । पुत्र वा नव्हेचि धन माझें ॥२॥
यास्तव त्यागूनि सर्व हें वनांत । जाईन मी अद्य अत्यानंदें ॥३॥
विपर्यास त्याच्या होई वचनाचा । नाश स्वपुत्रांचा करिती राण्या ॥४॥
व्यभिचारिणी हा मानितो आम्हांसी । ऐसें मनामाजी येई त्यांच्या ॥५॥
यास्तव आपुले नव्हेत तयांसी । वधूनि नृपासी तोष द्यावा ॥६॥
वासुदेव म्हणे हेतु जरी शुद्ध । जाहला निर्वंश परी त्यांचा ॥७॥
१५५
मरुत्सोम यज्ञ पुत्रास्तव तदा । करणें भरता प्राप्त झालें ॥१॥
मरुत्देवांनीं त्या अर्पियेला पुत्र । नाम भरद्वाज जयाप्रति ॥२॥
वृत्त त्याचें आतां विस्मयकारक । निवेदिती शुक परीक्षिता ॥३॥
एकदां ‘उतथ्य’ बंधूच्या भार्येसी । संग बृहस्पति करुं इच्छी ॥४॥
‘ममता’ तैं होती गर्भिणी, तियेचा - । गर्भ प्रतिबंधा करी तया ॥५॥
क्रोधें बृहस्पति वदला तैं गर्भा । अंध होईं माझा शाप ऐसा ॥६॥
वासुदेव म्हणे बृहस्पतिवीर्य । पावलें पुत्रत्व तयावेळीं ॥७॥
१५६
परी त्या पुत्रासी रक्षी न ममता । संरक्षीं या पुत्रा म्हणे गुरु ॥१॥
तीही त्या तैसेंचि वदली यास्तव । नाम ‘भरद्वाज’ तया पुत्रा ॥२॥
अंतीं त्यागूनियां गेलीं तया दोघें । मरुत तयातें नेती गृहीं ॥३॥
वासुदेव म्हणे पुढती मरुत । पुत्र भरतास अर्पिती तो ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : December 02, 2019
TOP