१६९
दिवोदास तेंवी मित्रेयु च्यवन । सुदामासी जाण सहदेव ॥१॥
सोमकासी जंतुआदि शत पुत्र । पृषत कनिष्ठ पुत्र त्याचा ॥२॥
द्रुपद तयाचा पिता द्रौपदीचा । धृष्टद्युम्न त्याचा पुत्र जाणा ॥३॥
धृष्टकेतु त्याचा पांचाल यांप्रति - । संज्ञा, या जगतीं जनमेजया ॥४॥
वासुदेव म्हणे भर्ग्याश्वाचा वंश । निवेदिती शुक ऐशापरी ॥५॥
१७०
अजमीढपुत्र ऋक्ष जो तयाचा । वंश आतां ऐका अत्यानंदें ॥१॥
संवरणपुत्र कुरु कुरुपति । परीक्षिताआदि पुत्र तया ॥२॥
सुधनु जो त्याचा सुहोत्र तयासी । च्यवन तैं कृती पुढती वंश ॥३॥
उपरिचर तो वसु, बृहद्रथ । कुशांबादि पुत्र चेदिपति ॥४॥
बृहद्रथाचा तो कुशाग्र तयासी । ऋषभ पुढती सत्यहित ॥५॥
वासुदेव म्हणे पुष्पवान् त्यासी । पुत्र जन्हु ज्यासी नाम तोचि ॥६॥
१७१
बृहद्रथालागीं अन्यस्त्रीच्या ठाईं । पुत्र एक होई शकलयुक्त ॥१॥
पाहूनि शकलें, टाकिला बाहेरी । जरा नामें आली राक्षसी तैं ॥२॥
‘जीव’ ‘जीव’ ऐसें म्हणूनि तियेनें । जोडितां शकलें ‘जरासंध’ ॥३॥
सहदेव, सोमापी, तो श्रुतश्रवा । वंश हा जाणावा पुढती त्याचा ॥४॥
जन्हूसी सुरथ तया विदूरथ । जनमेजय पुत्र सार्वभौमा ॥५॥
राधिक, आयुत, क्रोधन पुढती । देवातिथि त्यासी ऋष्य जाणा ॥६॥
वासुदेव म्हणे दिलीप, प्रतीप । प्रतीपाचे पुत्र ऐका तीन ॥७॥
१७२
देवापि, शंतनु, बाल्हीक हे तीन । देवापि सोडून नगर गेला ॥१॥
शंतनु तो पूर्वजन्मीं ‘नहामीष’ । स्पर्शे त्याच्या नाश पावे जरा ॥२॥
यास्तव तयासी शंतनु हें नाम । पडतां अवर्षण राज्यामाजी ॥३॥
द्वादश वर्षे तो पुशी विप्रांप्रति । कारण कथिती विप्र तदा ॥४॥
ज्येष्ठबंधुराज्य भोगिसी हा दोष । राज्य ज्याचें त्यास म्हणती अर्पी ॥५॥
ऐकूनि तें राव बंधूसी वनांत । विनवूनि राज्य घेईं म्हणे ॥६॥
वासुदेव म्हणे योजना अतर्क्य । जाहली ते स्पष्ट ध्यानीं घ्यावी ॥७॥
१७३
शंतनूचा मंत्रि बुद्धिमंत विप्र । पाठवी पूर्वीच वनामाजी ॥१॥
देवापीसी त्यांनीं पाखंडमतानें । मोहूनि ठेविलें सहेतुक ॥२॥
वेदमार्ग तेणें निंदिला यास्तव । येई पतितत्व तयालागीं ॥३॥
राज्याधिकारा तो यास्तव अयोग्य । शंतनु निर्दोष तेणें होई ॥४॥
सुवृष्टि त्यायोगें, तेणें जन सुखी । देवापि पुढती योगी होई ॥५॥
कलापग्रामीं तो राहिला अद्यापि । सोमवंशवृद्धि करावया ॥६॥
वासुदेव म्हणे कृतयुगारंभीं । करील देवापि वंशवृद्धि ॥७॥
१७४
प्रतीपाचा पुत्र बाल्हीक जो त्याचा । निवेदितों आतां वंश ऐका ॥१॥
सोमदत्त तया होता एक पुत्र । तया पुत्रत्रय भूरिआदि ॥२॥
शंतनु जो पूर्वी कथिला, तयातें । गंगेपासूनि ते ख्यात ॥३॥
धीवरकन्या जे शंतनूची कांता । चित्रांगद तिचा प्रथम पुत्र ॥४॥
विचित्रवीर्य तो जाणावा द्वितीय । वधिती गंधर्व चित्रांगदा ॥५॥
धीवरकन्या ते जाणें सत्यवती । कौमार्यी तिजसी पाराशर ॥६॥
वासुदेव म्हणे व्यास भगवान् । साक्षात् नारायण प्रगटले ॥७॥
१७५
वेदसंरक्षण केलें श्रीव्यासांनीं । पुत्र तयांचा मी शुक एक ॥१॥
‘भागवत’ मज कथिलें तयांनीं । सर्वही वर्जूनि अन्य शिष्य ॥२॥
काशिराजकन्या अंबा, अंबालिका । विचित्रवीर्याच्या स्त्रिया दोन ॥३॥
लंपटत्वें क्षयरोगें तो निमाला । अपत्य तयाला नव्हतें कांहीं ॥४॥
सत्यवती आज्ञेनें तैं अंबिकेतें । व्यास पुत्रदाते, धृतराष्ट्र तो ॥५॥
अंबालिकेचा तो पांडुराज तो जाण । विदुर तो जाण दासीपुत्र ॥६॥
वासुदेव म्हणे धृतराष्ट्रा शत- । पुत्र, कन्या एक दु:शला ते ॥७॥
१७६
मैथुन पांडूसी वर्ज्य होतें शापें । यम, वायु, इंद्रें, कुंतीप्रति - ॥१॥
दिधले, ते युधिष्ठिर भीमार्जुन । माद्रीप्रति जाण पुत्रद्वय ॥२॥
कुमारदत्त ते नकुल सहदेव । विख्यात पांडव हेचि जनीं ॥३॥
पांडवांपासूनि द्रौपदीचे पांच । प्रतिविंध्य पुत्र युधिष्ठिरा ॥४॥
श्रुतसेन भीमा, श्रुतकीर्ति पार्था । शतनीक साचा नकुलाप्रति ॥५॥
श्रुतकर्मा पुत्र जाण । सहदेवासी । वासुदेव कथी पुढती ऐका ॥६॥
१७७
पौरवीसी धर्मा, देवक तो सुत । भीमा घटोत्कच हिडिंबेसी ॥१॥
कालीपासूनि तैं सर्वगत तया । सुहोत्र सहदेवा जयेचा तो ॥२॥
करेणुमतीचा नकुला निरमित्र । अर्जुनाचे पुत्र ऐकें आतां ॥३॥
नागकन्या उलूपीसी इरावान । तो बभ्रूवाहन चित्रांगीचा ॥४॥
मणिपूरपति स्वीकारी तयातें । पुत्रिकाधर्मातें अवलंबूनि ॥५॥
वासुदेव म्हणे सौभद्र विख्यात । अर्जुनाचा पुत्र कथिती मुनि ॥६॥
१७८
अभिमन्यु-उत्तरेचा तूं नृपाळा । रक्षिलें तुजला गर्भी कृष्णें ॥१॥
जनमेजय, श्रुतसेन, भीमसेन । तेंवी उग्रसेन पुत्र तव ॥२॥
तक्षकदंशानें कोपेल तो ज्येष्ठ । आरंभील सत्र सर्पांचें तो ॥३॥
अश्वमेधयाजी पावेल पदवी । शतानीक त्यासी पुत्र ज्ञाता ॥४॥
सहस्त्रानीक त्या अश्वमेधज तो । असीम कृष्ण तो पुढती क्रम ॥५॥
निमिचक्र त्यासी, तदा राजधानी । जाईल बुडोनि यमुनाजळीं ॥६॥
वासुदेव म्हणे कौशांबीं नगरी । राजधानी पुरी पुढती जाण ॥७॥
१७९
चित्ररथ, कविरथ, वृष्टिमान् । पुढती सुषेण सुनीथ तो ॥१॥
नृचक्षूतें सुखीनल, परिप्लव । सुनय तो शूर मेधावी त्या ॥२॥
नृपंजय, दूर्व, तिमि, बृहद्रथ । सुदास, शतानीक, दुर्दमन ॥३॥
बहीनर, दंडपाणी तेंवी निमि । क्षमक तो जनीं पुढती राया ॥४॥
वासुदेव म्हणे द्विज-क्षत्रियांचा । विस्तार हा ऐसा कथिती शुक ॥५॥
१८०
भावी मागधाचे नृपाळ ऐकावे । भविष्य जाणावें शुकोक्त तें ॥१॥
जरासंध सहदेव तो मार्जारि । श्रुतश्रवा तेंवी अयुतायु तो ॥२॥
निरमित्र, सुनक्षत्र, बृहत्सेन । कर्मजिता जाण सृतंजय ॥३॥
विप्र, शुचि क्षेम तया धर्मसूत्र । शमालागीं पुत्र द्युमत्सेन ॥४॥
सुमति, सुबल, पुढती सुनीथ । सत्यजिता विश्वजित् पुत्र ॥५॥
रिपुंजय त्याचा अंतिम वंशज । सहस्त्राब्दें राज्य करितील हे ॥६॥
वासुदेव म्हणे बृहद्रथाचा हा । शुकांनीं कथिला पुढिल वंश ॥७॥