स्कंध ९ वा - अध्याय २४ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१९२
विदर्भासी कुश, क्रथ, रोमपाद । बभ्रु रोमपादपुत्र जाणा ॥१॥
कृति, उशिका त्या चेदि, दमघोष - । इत्यादिक पुत्र पुढती होती ॥२॥
क्रथा कुंति, धृष्टि, निर्वृति, दशार्ह । व्योम तैं जीमूत, विकृति तो ॥३॥
भीमरथ, नवरथ, दशरथ । शकुनि, देवरात करंभीचा ॥४॥
देवक्षत्र, मधुक, कुरुवश, अनु । पुरुहोत्र, आयु, सात्वतही ॥५॥
भजमानादिक तया सप्त पुत्र । होतें कांताद्वय भजमाना ॥६॥
वासुदेव म्हणे निम्लोच्यादि त्रिक । शताजितादिक अन्येप्रति ॥७॥

१९३
सात्वताचा देवावृध तया बभ्रु । उभय हे बहु ख्यात जगीं ॥१॥
पंचषष्टयाधिक चतुर्दश सहस्त्र । जन होती मुक्त बोधें त्याच्या ॥२॥
सात्वत पुत्र जो महाभोज तोही । श्रेष्ठ संज्ञा येई वंशा तेचि ॥३॥
वृष्णीतें सुमित्र युधाजित पुत्र । शिनि, अनमित्र युधाजिता ॥४॥
अनमित्रा निम्न तया सत्राजित । शिनीतें सत्यक, युयुधान त्या ॥५॥
सत्यकाचा तेणें सात्यकि त्या नाम । जय ‘कुणि’ जाण युगंधर ॥६॥
तृतीय पुत्र जो अनमित्रा वृष्णि । श्वफल्क त्या जनीं ख्यात पुत्र ॥७॥
वासुदेव म्हणे अक्रूर तयाचा । पुत्र त्रयोदशांमाजी मुख्य ॥८॥

१९४
देववान, उपदेव अक्रूरासी । पुत्र, ‘सुचीरा’ ती भगिनी तया ॥१॥
वृष्णीचा द्वितीय पुत्र चित्ररथ । पृथु विदूरथआदि त्याचे ॥२॥
सात्वतसुत जो अंधक तयातें । कुकुरादि होते पुत्र चार ॥३॥
वन्हि, विलोमा तो कपोतरोमाही । अनु, अंधकही दुंदुभि तो ॥४॥
अरिद्योत, पुनर्वसूचा आहुक । ‘आहुकी’ तयास भगिनी एक ॥५॥
देवक तैं उग्रसेन त्याचे पुत्र । देववानादिक देवकाचे ॥६॥
देवकीआदिक कन्याही त्या सप्त । वसुदेव त्यांस वरी प्रेमें ॥७॥
वासुदेव म्हणे उग्रसेनातेंही । कंसादिक पाहीं पुत्र नऊ ॥८॥

१९५
कंसा, कंसवतीआदि पंच कन्या । वसुदेवभ्रात्यांना दिल्या होत्या ॥१॥
वृष्णिपौत्र विदूरथा पुत्र ‘शूर’ । भजमान थोर पुत्र तया ॥२॥
शिनि, स्वयंभोज तयासी हृदीक । देवबाव्हादिक पुत्र तया ॥३॥
देवमीढा ‘शूर’ मारीषा त्या कांता । वसुदेवादिकां जन्म देई ॥४॥
उदरीं जयाच्या यावयाचे देव । सन्मानिती देव जन्मतां त्या ॥५॥
आनक-दुंदुभि नाद होई नभीं । नाम दुजें त्यासी तेणें प्राप्त ॥६॥
वासुदेव म्हणे जयावरी कृपा । व्हावयाची त्याचा सहजोत्कर्ष ॥७॥

१९६
पृथाआदि पंचकन्याही शूरासी । कुंति नामें त्यासी मित्र एक ॥१॥
ज्येष्ठ कन्या पृथा अर्पिली तयातें । कुंति या संज्ञेतें पावली ती ॥२॥
दुर्वासशुश्रूषा करितां ते कुंति । सुप्रसन्न चित्तीं मुनिराज ॥३॥
सूर्यादिक पंच देवतांचे मंत्र । अर्पिले तियेस दुर्वासांनीं ॥४॥
स्मरशील ज्यासी देईल तो पुत्र । कथिलें कुंतीस मंत्र देतां ॥५॥
वासुदेव म्हणे कौमार्यावस्थेंत । एकदां सूर्यास पाचारी ती ॥६॥

१९७
मंत्राची प्रचीति पहावयास्तव । जपियेला मंत्र नवल तदा ॥१॥
पाहूनि सूर्यातें प्रार्थिलें तयासी । क्षमावें मजसी म्हणे कुंती ॥२॥
सूर्य म्हणे माझें दर्शन न व्यर्थ । होऊनिही, पुत्र, कुमारी तूं ॥३॥
बोलूनि यापरी अर्पूनियां गर्भ । जाहला अदृश्य सूर्यदेव ॥४॥
पुढती कुंतीसी जाहला कुमार । कुंती भयाकुल तदा होई ॥५॥
पेटींत त्या अंतीं घालूनि उदकीं । त्यागिलें तयासी सरितातटीं ॥६॥
वासुदेव म्हणे अधिरथा तोचि - । लाभला, तयासी कर्ण नाम ॥७॥

१९८
पुढती पांडूसी अर्पियेली कुंती । वृद्धशर्म्यालागीं श्रुतदेवा ॥१॥
दंतवक्र नामें पुत्र तो तियेचा । वैकुंठी प्रभूचा द्वारपाल ॥२॥
तृतीय भगिनी नामें श्रुतकीर्ति । ते वसुदेवाची भाग्यवती ॥३॥
केकयाधिराज धृष्टकेतुकांता । संतर्दनादि त्यां पुत्र पांच ॥४॥
चेदिपति दमघोषा श्रुतश्रवा । शिशुपाल जाणावा पुत्र तिज ॥५॥
विंदानुविंद ते राजाधिदेवीतें । वृत्त कथि ऐसें वासुदेव ॥६॥

१९९
उग्रसेनकन्या ‘कंसा’ देवभागें - । वरिली, तियेतें दोन पुत्र ॥१॥
चित्रकेतु, बहब्दल तिचे पुत्र । ‘कंसावती’ पुत्र सुवीरादि ॥२॥
देवश्रव्याची ते कांता, आनकाची । ‘कंका’ सत्य तेंवी पुरुजित्‍ माता ॥३॥
‘राष्ट्रपालिका’ ते सृंजयाची पत्नी । वृष दुर्मर्षणादि पुत्र तिज ॥४॥
शूरभू शामका, हरिकेशादिक । कर्णिका-कंकांस ऋतधामादि ॥५॥
सुदामिनीप्रति शमीकापासूनि । सुमित्रादि जनीं पुत्र होती ॥६॥
वत्सकाची मिश्रकेशी ते अप्सरा । वृकादिक पुत्रां जन्म देई ॥७॥
वासुदेव म्हणे वृकाची दुर्वाक्षीं । तक्ष पुष्कारादि पुत्र तिज ॥८॥

२००
वसुदेवाचे हे कथिले बांधव । आतां त्याचे पुत्र, स्त्रिया ऐका ॥१॥
पौरवी, रोहिणी, भद्रा, मदिरादि । महा भाग्यवती देवकी ते ॥२॥
वसुदेवा ऐशा स्त्रिया अष्टादश । ऐका त्यांचे पुत्र कथिले तेचि ॥३॥
पौरवीतें सुभद्रादि ते ‘द्वादश’ । रोहिणीतें बल, गदादि ते ॥४॥
मदिरेसी नंद, उपनंदादिक । रोचनेसी हस्त, हेमांगद ॥५॥
इलेतें यादवमुख्य । उरुआदि । कौसल्येतें केशी पुत्र झाला ॥६॥
विपृष्टाची माता जाणें धृतदेवा । श्रमा शांतिदेवा माता शोभे ॥७॥
उपदेवेसी ते कल्पादिक पुत्र । तेंवी वसुआदिक श्रीदेवेसी ॥८॥
देवरक्षितेसी गदादि ते नऊ । सहदेवेसी पूरु विश्रुतादि ॥९॥
वासुदेव म्हणे आतां देवकीचे  पुत्र ध्यानीं घ्यावे भाग्यवंत ॥१०॥

२०१
कीर्तिमान तो सुषेण । भद्रसेन, ऋजु जाण ॥१॥
संमर्दन तेंवी भद्र । राम शेषाचा अवतार ॥२॥
साक्षात्‍ श्रीहरि आठवा । पुत्र शोभे वसुदेवा ॥३॥
कन्या सुभद्रा तयाची । राया, तव पितामही ॥४॥
वासुदेव म्हणे ऐसीं । अपत्यें हीं वसुदेवासी ॥५॥

२०२
धर्मक्षयें पाप पावे यदा वृद्धि । अवतार घेई तदा प्रभु ॥१॥
साधुसंरक्षण धर्माची स्थापना । करी तो अजन्मा मायाधीश ॥२॥
कारण तयासी नसेचि हें परी । भूमिभार हरी या निमित्तें ॥३॥
लीलादर्शनें तैं श्रवणें - पठणें । मोक्ष पावे तेणें बद्ध जीव ॥४॥
ऐसा दयाभाव कारण तें अन्य । यास्तवचि कृष्ण करी लीला ॥५॥
अल्पही त्या लीला ऐकतां पठतां । उद्धार जीवांचा ऐसी दया ॥६॥
वासुदेव म्हणे भक्तांवरी प्रेम । अजन्मा तो जन्म तेणें घेई ॥७॥

२०३
हरिलीलामृत अल्पही प्राशितां । मार्ग मरणाचा भंग पावे ॥१॥
अल्पही श्रवणें संसारविमुक्ति । कदाही न तृप्ति अमृतें या ॥२॥
प्राशितां हें सर्व वासनांचा त्याग । होई तैं लीनत्व कृष्णपदीं ॥३॥
यादव-पांडव लीलागानें धन्य । जाहलें दर्शन गोड गोड ॥४॥
अहो, मुखशोभा वर्णवें न त्याची । कर्णी कुंडलांची शोभा बहु ॥५॥
सुहास्यवदन पाहूनियां मन । होई तें तल्लीन काय वर्णूं ॥६॥
मीलनोन्मीलन करिती म्हणोनि । पांपण्यांचा मनीं क्रोध येई ॥७॥
वासुदेव म्हण जगत्सुंदराचें । अत्यंत संक्षेपें वृत्त ऐका ॥८॥

२०४
परीक्षिता, कंसकारागृहीं जन्म । मथुरेसी जाण तयाप्रति ॥१॥
चतुर्भुज रुप माता-पित्यांप्रति । दावूनि पुढती गोकुळांत - ॥२॥
जाऊनि, ऐश्वर्य वाढवी गोपांचे । वधी पूतनेतें तेंवी अन्यां ॥३॥
वासुदेव म्हणे लीला त्या गोकुळीं । करुनियां जाई मथुरेप्रति ॥४॥

२०५
वधूनियां कंसादिका । धाक दावियेला दुष्टां ॥१॥
अष्टोत्तर शताधिक । सोळा सहस्त्र स्त्रियांस - ॥२॥
वरिलें, दश प्रत्येकीसी । पुत्र जाहले तयांसी ॥३॥
वेदमार्ग प्रसिध्यर्थ । केले यज्ञही बहुत ॥४॥
तया भारतीययुद्धीं । दृष्टिक्षेपें दुष्ट वधी ॥५॥
ऐसा भूमार हरिला । विजय अर्जुना दिधला ॥६॥
आत्मबोध उद्धवातें । करुनि जाई निजधामातें ॥७॥
वासुदेव म्हणे स्कंध । नवम अर्पूं वसुदेवास ॥८॥

इतिश्री वासुदेवकृत अभंग-भागवताचा स्कंध ९ वा समाप्त.
॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥


N/A

References : N/A
Last Updated : December 02, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP