स्कंध ९ वा - अध्याय १० वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


७७
राया, खट्वांगासी दीर्घबाहु पुत्र । रघु तो विख्यात पुत्र त्याचा ॥१॥
रघूचा तो अज, दशरथ त्याचा । श्रीविष्णु जयाचा पुत्र होई ॥२॥
राम-लक्ष्मणही भरत शत्रुघ्न । अंशें नारायण पुत्र त्याचे ॥३॥
परब्रह्म रामा वंदूनि तयाचें । चरित्र संक्षेपें कथिती मुनि ॥४॥
कल्याण आमुचें करो तो श्रीराम । पित्यास्तव वन स्वीकारी जो ॥५॥
वासुदेव म्हणे चरण कोमल । सीतचेही कर असह्य त्या ॥६॥

७८
काननीं सौमित्र तेंवी हनुमंत । सेविती रामास अत्यादरें ॥१॥
कौशिकमखांत बालपणीं तेणें । गतप्राण केले मारीचादि ॥२॥
जनकमंदिरीं स्वयंवरास्तव । भंगियेलें शिवचाप शौर्ये ॥३॥
जनकनंदीनीरुपी चित्शक्तीसी । वरिलें भक्तांसी तोषवूनि ॥४॥
अयोध्येसी जातां दर्प भार्गवाचा । हरिला प्रत्यंचा ओढूनियां ॥५॥
वासुदेव म्हणे पितृवचनार्थ । कैकेयीचा शब्द पुढती मानी ॥६॥

७९
काननीं राक्षसीनासिकेचा छेद । राक्षसांचा वध केला बहु ॥१॥
वृत्त तें रावणा कथी शूर्पणखा । सीतेच्या स्वरुपा वर्णी तेंवी ॥२॥
मोहित पौलस्त्य मारिचासमेत । येऊनि सीतेस हरुनि नेई ॥३॥
मार्गांत जटायु अडवी तयातें । राम सीते, सीते, करुनि रडे ॥४॥
शोधितां सीतेस पाही जटायूसी । करी क्रिया त्याची परम दु:खें ॥५॥
वासुदेव म्हणे कबंधाचा वध । सुग्रीवाचें सख्य पुढती होई ॥६॥

८०
वालिवधोत्तर वास्तव्य त्याठायीं । सीताशुद्धि होई, पुढती सेतु ॥१॥
लंकेमाजी जातां होई घोर युद्ध । अंतीं दुष्टवध केला रामें ॥२॥
सीताभेट होतां सकलां आनंद । बिभीषणा राज्य अर्पी प्रभु ॥३॥
पुष्पकविमानीं बैसूनि पुढती । मार्ग आक्रमिती अयोध्येचा ॥४॥
भरतासी वृत्त कथी हनुमान । वृत्त तें ऐकूनि सकलां हर्ष ॥५॥
वासुदेव म्हणे भरताची भेट । आनंदाची लूट तयावेळीं ॥६॥

८१
पुढती नगरीं प्रवेशले राम । भेटती येऊन माता हर्षे ॥१॥
अन्यदिनीं होई अभिषेकोत्सव । त्रेतायुगीं सर्व म्हणती कृत ॥२॥
पितृआज्ञेसम श्रीरामाची आज्ञा । वंद्य सकलांना वाटे बहु ॥३॥
आदर्श श्रीराम सकळ राजांसी । नसे आधि-व्याधि राज्यीं त्याच्या ॥४॥
अपमृत्यु कोणा न येईचि साचा । सतीधर्मे सीता रामा सेवीं ॥५॥
एकपत्नीव्रत आचरुनि राम । प्रजासंरक्षण करीतसे ॥६॥
वासुदेव म्हणे दाशरथी राम । कैवल्यनिधान वंदुं प्रेमें ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 02, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP