कृष्णजयंती - वसुदेव-देवकी विवाह व आकाशवाणी
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
वर्हाड मांडियेले थोर वसुदेवाचे । आणि देवकीचे मथुरेत ॥१॥
कंसाची बहिण बहु प्रिय त्यासी । करि आनंदेसी समारंभ ॥२॥
बोळवण करी रथांत घालोनी । आपण होवोनी सारथि तो ॥३॥
कलि माजावया देवांनी उपाय । रचिला अपाय ऐका कैसा ॥४॥
अशरीरीणी वाणी तेव्हा उद्भवली । आनंदाचे काळी अंतरिक्षी ॥५॥
कैसा निजलासी कंसा दैत्येश्वरा । परम चतुरा बलवन्ता ॥६॥
जया भगिनीसी प्रेमे बोळविसी । तिच्या भविष्यासी न जाणसी ॥७॥
अष्टम गर्भ इचा करिल तुझा घात । परम कृतांत निपजेल ॥८॥
ऐकतांच वाणी दैत्य खवळला । अति काढी भला म्यानांतूनी ॥९॥
सिद्ध झाला वसुदेवे प्रार्थियेला । समय त्यास केला समजाया ॥१०॥
इचा आठवा गर्भ देईन तुजला । सोड भगिनीला धर्म करी ॥११॥
इच्या पासोनियां तुज मृत्यु नाही । वधीसी कां पाही भगिनीस ॥१२॥
तेव्हा कंसा आला विचार मनांत । खड्ग आवरित आपुले तो ॥१३॥
परम त्रस्त झाला राज्यांत पातला । करी दंवडीला रज्यामाजी ॥१४॥
जेथे जेथे साधु विप्र आणि गाई । कृतांत मी होई तेथे तेथे ॥१५॥
आजपासोनियां कंस वैरि त्यांचा । करावा की साचा घात जाणा ॥१६॥
सकळ दैत्यांसी सांगे बोलावोनि । गोब्राह्मण हननी सिद्ध व्हावे ॥१७॥
वेद बुडवावे पाखंड स्थापावे । अधर्माचे करावे अभ्युत्थान ॥१८॥
त्यांत नारदमुनि येवोनि सांगति । तया कंसाप्रति हित त्याचे ॥१९॥
आठवा म्हणिजे गणना कोठोनी । विचार तूं मनी केला नाही ॥२०॥
समजला कंस म्हणे घात झाला । कैसे आठव्याला ओळखावे ॥२१॥
देवकी वसुदेव परतोनि आणिली । दम्पती ठेविली कारागृही ॥२२॥
विनायक म्हणे अधर्माचा ध्वज । उभारला माज येवोनियां ॥२३॥
N/A
References : N/A
Last Updated : February 02, 2020
TOP