कृष्णजयंती - कृष्णजन्म

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


वसुदेवे तेव्हां गर्भ तो नमिला । बहुत जो भ्याला कंसराया ॥१॥
निष्ठुर तो कंस करिल याचा घात । म्हणोनी विव्हळत वसुदेव ॥२॥
तंव देवकी बोले माझे शस्त्र आण । कंसाचे हनन करिते मी ॥३॥
मजपुढे काय कंस हा मशक । होते मी छेदक तयाची की ॥४॥
तंव अधिकचि वसुदेव घाबरे । तदंग थरारे कंसभये ॥५॥
म्हणे हळू बोले देवकीचा पति । तंव तो रमापति खवळला ॥६॥
कैचा कंस कैचे भय त्याचे सांग । आतां मी अभंग मारीतसे ॥७॥
म्हणे वसुदेव देवकी भ्रमली । शिरी पाणी घाली शांतवाया ॥८॥
भय त्याचे कांही झाल्याहि जाईना । मग दयाघन दया येत ॥९॥
पांच वरुषाचे बाळ प्रगटले । सौंदर्याचे भले सार जैसे ॥१०॥
सजला घन:श्याम रुप अनुपम । धरी पूर्ण काम रमारंग ॥११॥
नेसला पीतांबर वनमाळा कंठी । महानुभाव दिठीं प्रगटला ॥१२॥
शंख चक्र गदा पद्म असे हाती । ऐसा हा श्रीपति प्रगटला ॥१३॥
मधुर हांसणे मधुर पहाणे । मधुर बोलणे त्याचे असे ॥१४॥
ऐसा देव जेव्हा प्रगटोनी बोले । आण शस्त्र भले माझ्य़ा हाती ॥१५॥
कंसाते माराया आलो भगवान । स्वये प्रगटोन बोले ऐसे ॥१६॥
वसुदेवे मग धरिले चरण । देवासी शरण जाहलासे ॥१७॥
माझे पुत्र व्हावे ऐशी माझी आशा । तरी जगदीशा पूर्ण करी ॥१८॥
लहान होवोनी लौकिक आचर । अर्भक साचार बन देवा ॥१९॥
परी कंसभये असे भयभीत । म्हणोनि त्वरित उपाय करी ॥२०॥
जरी कंसालागी भीसी वसुदेवा । सांगतो त्या भावा आदरावे ॥२१॥
घेवोनियां मज गोकुळासी जावे । यशोदेस द्यावे मजलागी ॥२२॥
तेथे माझी माया असे जे जन्मली । घेवोनीयां भली आण येथे ॥२३॥
माझीया कृपेने निर्विघ्न घडेल । सकळ होईल कार्य सुखे ॥२४॥
अदृश्य होवोनी मग तो मुरारी । मातृगर्भी करी प्रवेशाते ॥२५॥
दिशा प्रसादल्या प्रसन्न वायु झाले । प्रसन्न ते भले जगत्रय ॥२६॥
समय मध्यान्हीचा मास श्रावणाचा । कृष्णपक्ष साचा जो कां असे ॥२७॥
वर्षाऋतुघन वर्षत अपर । घेत अवतार तेव्हां प्रभु ॥२८॥
श्रीहरी जन्मा आले विश्व आनंदले । वसुदेव केले स्त्रोत्र तेव्हा ॥२९॥
स्वर्गामाजी सुर देवासी स्तविती । आनंदित मति बहु झाली ॥३०॥
स्मरोनियां वाक्य मग भगवंताचे । काय करी साचे वासुदेव ॥३१॥
उचलोनी बाळ घेत स्कंधावरी । चालला झडकरी वसुदेव ॥३२॥
विजा चमकती मार्ग त्या दाविती । जैसा जात पंथी वसुदेव ॥३३॥
अथांग भरली यमुना तेवेळी । स्पर्शाया वनमाळी तेव्हां पाही ॥३४॥
निर्भय वसुदेव उतरे नदीत । यमुना चढत पदस्पर्शा ॥३५॥
जाणोनी यमुना-ह्र्द्गत श्रीहरी । पदस्पर्श करी तिचे ठाय़ी ॥३६॥
स्पर्श होतांचि ते दुभंग जाहली । वाट देत भली वसुदेवा ॥३७॥
गोकुळी प्रकटला नंद मंदिरांत । यशोदा निद्रिस्थ पलंगावरी ॥३८॥
प्रसवली कन्या तिज ठावी नाही । उघडीच पाही द्वार होती ॥३९॥
निर्भय प्रवेशे ठेवी तेथे हरी । घेवोनी सत्वरी माया चाले ॥४०॥
घेवोनियां आला आला कारागृही । तंव बिड्या देही जखडल्या ॥४१॥
देवकीचेपाशी कन्या ती ठेवितां । करित आकांता रडोनियां ॥४२॥
जागे झाले तेव्हा सर्व पहारेकरी । जातात सत्वरी कंसाकडे ॥४३॥
कंसालागी मात दु:खद सांगती । देवकी-प्रसूती दैत्य जाणा ॥४४॥
मदोन्मत्त कंस धांवत पातला । उचली कन्येला आपटाया ॥४५॥
पदर पसरिला देवकीने त्यासी । विनवी तयासी नम्रपणे ॥४६॥
तया पाषाणासी मुळी दया नाही । सिद्ध आपटायासी अधम तो ॥४७॥
आपटाया जाई तंव ती वरचेवरी । गेलीच निर्धारी सांगे मग ॥४८॥
मूर्खा तुझा शत्रु जगी जन्मलासे । मृत्यु भय कैसे चुकणार ॥४९॥
सकळांसी मृत्युकाळ न चुके कोणा । कैसे अंत:करणा कळेनाच ॥५०॥
अदृश्य जाहली प्रभुजीची माया । धडकी ह्रदयाला कंसाचीया ॥५१॥
विनाशकाल त्याचा जवळि पातला । धरी दुर्बुद्धिला हतभागी ॥५२॥
विनायक म्हणे कलीचे आख्यान । ऐका सावधान बोधासाठी ॥५३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP