कृष्णजयंती - देवकी गर्भात भगवत्संचार

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


शेषासी म्हणती स्वये भगवान । पुढे त्वां जाऊन प्रकाशावे ॥१॥
सातवा तो गर्भ अत्यंत तेजस्वी । प्रगटे मनस्वी अनंत जो ॥२॥
तेज ते वाढले कंस भयभीत । दक्षता ठेवित अत्यंत तो ॥३॥
सात मास होता आज्ञापिली माया । गर्भाते न्यावया माधवाने ॥४॥
वसुदेव जाया रोहिणी गोकुळी । तेथे गर्भ बळी ठेवी माये ॥५॥
मायेने तो गर्भ रोहिणीचे पोटी । ठेवितां हाकाटी थोर झाली ॥६॥
गर्भवती कैशी रोहिणी जाहली । मात बोभाटली थोर तेव्हा ॥७॥
पुन्हां देववाणी सांगत सर्वांसी । वसुदेव वीर्यासी धरितसे ॥८॥
तिज नाही दोष निर्दोष हे सती । रोहिणी निश्चिती वाणी झाली ॥९॥
आपुलिया भेणे गर्भ नष्ट झाला । ह्याच आनंदाला कंस धरी ॥१०॥
मज भेणे पळाला गर्भ तो लोपला । आनंद कंसाला हाच झाला ॥११॥
किंचित्काळ जातां वसुदेव मनी । येत संचरोनी रमाधव ॥१२॥
वैष्णव धाम जे कां पूर्ण परब्रह्म । जो कां पूर्ण काम जगत्प्रभु ॥१३॥
वसुदेव मनी प्रवेशला देव । नारायण भाव झाला त्यासी ॥१४॥
अवघा नारायण वसुदेव झाला । समाधि सुख भला अनुभवी ॥१५॥
नाही कंसभय नाही सुख दु:ख । सकळ हरिख वसुदेव ॥१६॥
नाही द्वंद्व भय तारिसि उरले । द्वैत मावळले मुळीहुनी ॥१७॥
ऐसा तदाकार बने वसुदेव । होतां भगवत्भाव प्राप्त त्यासी ॥१८॥
तेथोनियां मग देवकी गर्भात । हरि प्रवेशत पूर्णपणे ॥१९॥
परंधाम जेव्हां संचरोनी आले । रुप पालटले देवकीचे ॥२०॥
विलक्षण तेज विलक्षण प्रभा । दिसत प्रतिभा गर्भाची ती ॥२१॥
कंस घाबरला चिंतातुर झाला । घेईना निद्रेला जागा सदा ॥२२॥
कडेकोट केला तेव्हां बंदोबस्त । ठेवीयले मस्त दैत्य द्वारी ॥२३॥
कडक पाहारा बैसवीत कंस । देतसे सायास दंपतीला ॥२४॥
विनायक म्हणे झाला चमत्कार । ऐकावा साचार सावधाने ॥२५॥

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP