प्रस्तावना - एक परिचय
नाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.
श्रीनाथलीलामृत : एक परिचय
नाथसंप्रदाय हा मध्यकालीन भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे. इसवी सनाच्या
आकराव्या शतकाच्या अखेरीस मत्स्येंद्रनाथशिष्य गोरक्षनाथांनीं या अद्वैताधिष्ठित आणि योगप्रधान संप्रदायाचे दृढ संघटन करुन त्याला अखिल भारतीय स्वरुप दिलें. ज्ञानदेवांनी गोरक्षनाथांना ’ योगाब्जिनीसरोवरु । विषयविध्वंसैकवीरु । ’ अशा विशेषणांनीं गौरविलें आहे. गोरक्षनाथांच्या योगाधिकारानें आणि करुणामय तेजस्वितेनें अनेक मार्गावर वाटचाल करणारे परमार्थाचे पांथिक त्यांच्याकडे आकर्षित झाले आणि त्यांच्या दिग्दर्शनानें मार्गक्रमणा करुं लागलें. गोरक्षनाथांचें हे एक अनन्य साधारण वैशिष्टय आहे कीं, त्यांनीं नाना मतांतील सत्त्वांश ग्रहण करुन आणि हीण जाळून टाकून, भारतीय साधनेचें शुध्दीकरण करण्यासाठीं ’ अवघा हलकल्लोळ ’ केला. त्यांच्यापूर्वीच्या सिध्दांच्या साधनाविशेषांच आणि विचारधनाचा त्यांनी विवेकानें स्वीकार केला आणि भारतीय धर्मजीवनांत क्रांति घडविणार्या प्रतीतिप्रामाण्याला मोकळी वाट करुन दिली.
त्याचमुळें चौर्यांशीं सिध्दांबरोबरच गोरक्षप्रमुख नवनाथांच्या कथागाथांनी सर्व मध्ययुगीन भारतीय वाङ्गमय भारले गेले आहे. काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यत आणि कायावरोहणापासून कामरुपापर्यंत सार्या भारतांतील लोकभाषीय वाङ्गमयांत गोरक्षनाथ आणि त्यांचे सहभागी -अनुगामी यांच्या सिध्दींच्या कथा गूढतेनें गायिलेल्या दिसतात; त्यांच्या विचारांचे अनुवाद केलेले आढळतात.
महाराष्ट्रानें तर गोरक्षनाथांचा वारसा हातोहात सांभाळला. ज्ञानदेवांच्या द्वारां नाथसंप्रदायाचें साधनावैभव एका आगळया
समृध्दीनें सह्याद्रीच्या दर्याखोर्यांत बहरलें आणि संतसाधकांची मांदियाळी मराठी जनांना अनवरत भेटर राहिली.
नाथलीलामृताचा कर्ता आदिनाथ भैरव हा याच महिमामय नाथसंप्रदायाचा एक थोर वारसदार आहे. त्याचा हा ग्रंथ
नाथसिध्दांच्या कथा कवनकुशलतेनें गाणारा असून त्यांत नाथविचारांचेंही विशद विवरण जागोजाग आलेले आहे.
एकोणिसाव्या शतकाच्या प्रथमार्धात रचला गेलेला हा ग्रंथ परंपरेच्या सुदृढ आधारावर उभा असल्यामुळें त्याचें आपल्य़ा
साधनेच्या इतिहासांत निश्चित महत्व आहे. २८ अध्यायांचा आणि ५४९३ ओव्यांचा हा ग्रंथ दुर्दैवानें उपेक्षित राहिला
आहे. या स्वरुपाच्या अन्य मराठी ग्रंथांहून हा अनेक पटींनीं आणि अनेक परींनीं श्रेष्ठ ग्रंथ असूनही, त्याची उपेक्षा व्हावी, ही खेदाची बाब आहे. ही अक्षम्य उपेक्षा थांबावी, या हेतूनेंच हें प्रस्तुत संपादन मराठी वाचकांना नम्रपणें सादर करीत आहोंत. वाचक भाविकतेप्रमाणें चिकित्सकतेनेंही त्याचें मननपूर्वक पठण करतील, असा विश्वास आहे.
N/A
References : N/A
Last Updated : February 06, 2020
TOP