प्रस्तावना - ग्रंथकार आदिनाथ भैरव
नाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.
नाथलीलामृताचे कर्ते आदिनाथ भैरव हे निघोजें ( ता. खेड, जि. पुणें ) या गांवचे. पुणें-नाशिक मार्गावर पुण्यापासून पंधरा
मैलावर असणार्या मोशीपासून डावीकडे तीन मैल अंतरावर निघोजें गाव आहे. या गांवी क्षेत्रपाल भैरवनाथाचें एक गाजतें
ठाणें आहे. आदिनाथांचें घराणे. गुरवाचें असल्यामुळें तें पिढयान् पिढया भैरवनाथांच्या उपासनेंत रंगलेलें होतें. त्यांच्या
पित्याचें नांवही भैरवनाथ असेच होतें. मार्तंड भैरव ( खंडोबा ) आणि तुळजाभवानी हीं त्यांचीं कुलदैवत ( १.३६ ) होतीं.
शैव संस्कारांनीं संपन्न असलेल्या घराण्यांत आदिनाथांना जन्म लाभला. त्यांचा पिता भैरावनाथ हा नाथसंप्रदायाचा
दीक्षित होता. आदिनाथांना नाथसंप्रदायाची दीक्षा पित्याकडूनच प्राप्त झाली. सहुरुंचें वत्सल छायाछत्र आदिनाथांना
दीर्घकाल लाभलें असावें. नाथलीलामृताच्या रचनेची प्रेरना त्यांना सहुरुंकडूनच लाभली; परंतु ग्रंथसिध्दीचा सोहळा मात्र
त्यांना पाहायला मिळाला नाहीं. ’ तेणे करविला हा ग्रंथ । परि ग्रंथापूर्वी तो समाधिस्थ । ’ (२८. ३१२) असा विषादोद्गार
आदिनाथांनीं काढला आहे.
आदिनाथ भैरव हे प्रतीतिसंपन्न नाथयोगी होते. त्यांनीं नाथसंप्रदायाचा पैतृक वारसा आपल्या प्रज्ञावैभवानें आणि
साधनासमृध्दीनें परिपुष्ट केला आणि शके १७५६ मध्यें नाथलीलामृताची रचना करुन त्याचें आपल्या परीनें शब्दांकन केले.
या सुंदर ग्रंथाच्या निर्मितीनंतर अकरा वर्षांनी, वैशाख वद्य ११ शके १७६७ या दिवशीं त्यांनी नाशिक क्षेत्रीं कृतार्थतेनें
महासमाधीचा स्वीकार केला. रामनवमीचा महामुहूर्त साधून आपल्या ग्रंथाची सांगता करणार्या सत्पुरुषानें अखेर
रामचरणांकित भूमींतच देह ठेवावा, ही घटना दैवी औचित्याकडी संकेत करणारी आहे.
N/A
References : N/A
Last Updated : February 06, 2020
TOP