नाथलीलामृत - रचनास्थान व रचनाकल
नाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.
ग्रंथकारानें अठ्ठाविसाव्या अध्यायाच्या अंतीं ग्रंथरचनेच्या स्थलकालाविषयींचा तपशील पुढीलप्रमाणे नोंदविला आहे :
नर्मदेचे उत्तरतीरीं । विक्रमशकाचें माझारी । श्रीभैरववरदें वैखरी । आदिनाथ नमीतसे ॥
संवत् अठराशें नव्वद । विश्वावसु संवत्सर प्रसिध्द । विटपक्षेत्रीं ग्रंथ अगाध । सिध्द झाला गुरुकृपें ॥
शके सतराशें छपन्न । गुरुवासर परम सुदिन । जयंति संवत्सर नामाभिधान । ध्रुवजपद श्रोतयां ॥
मासोत्तम चैत्रमास । रामजयंति पुण्यदिवस । शुध्द्पक्ष माध्यान्हास । ग्रंथ समाप्त पैं झाला ॥ ( २८.३७४-३७७ )
या ओव्यांत ’ विटपक्षेत्र ’ या नांवानें ग्रंथ- रचनास्थानाचा निर्देश आहे. विटपक्षेत्र म्हणजे सातारा जिल्ह्यातील, खानापूर
तालुक्यांत असणारें विटें हे गांव असावें. विटें हें गांव भैरव अवधूत ज्ञानसागर या प्रख्यात दत्तोपासकाच्या घराण्यामुळें
प्रसिध्द आहे. नाथलीलामृताच्या रचनेच्या वेळीं विटें येथें भैरव अवधूत ज्ञानसागर् हे विद्यमान होते. रेवणसिध्देश्वराच्या
डोंगराचें सान्निध्य, नाथपंथीयांना प्रिय असणार्या दत्तात्रेयाचें वास्तव्य आणि साधुसहवासाचा लाभ यांमुळे नाथलीलामृताचा कर्ता ग्रंथरचनाकाळीं विटें येथें विसावला असावा.
ग्रंथकारानें ग्रंथरचनाकालाची नोंद विक्रम संवताम्त आणि शालिवाहन शकांत अशी दुहेरी केली आहे. चैत्र शुध नवमी
( रामनवमी ), गुरुवार, शके १७५६, जयनाम संवत्सर, या दिवशी नाथलीलामृताच्या रचनेची सांगता झाली. या वेळीं विक्रम संवत् १८९० चालू होता. या तिथीला १८ एप्रिल १८३४ ही इंग्रजी तारीख येतें. ग्रंथांत केलेला उपरिनिर्दिष्ट कालोल्लेख बहुतांश बरोबर आहे. शक-संवताचा मेळ जमतो. शके १७५६ या वर्षाचें संवत्सरनाम ’ जयंति ’ दिले आहे, तें ’जय’ हवें.
मोडक-जंत्रीप्रमाणे वार मात्र जमत नाहीं. या तिथीला मोडक-जंत्रींत शुक्रवार दिलेला आहे.
रचनाकाळाच्या संदर्भात टिल्लू प्रतींतील पाठांनीं थोडा गोंधळ उडविला आहे. टिल्लू प्रतींत स्थळकाळाच्या ओव्यांचा पाठ
असा आहे :
संवत् सतराशें नव्वद । विश्वावसु संवत्सर प्रसिध्द । विटपक्षेत्रीं ग्रंथ अगाध । सिध्द झाला गुरुकृपें ॥
शके सोळाशें त्र्यांयशीं जाण । गुरुवासर परमसुदिन । दुर्भती संवत्सर नामाभिधान । ध्रुवजपद श्रोतयां ॥
मासोत्तम जेष्ठमास । शुध्द त्रयोदशी उत्तम दिवस । नाथलीलामृत सुरस । ग्रंथ समाप्त पैं झाला ॥ ( २८.३७५-३७७ )
टिल्लू पाठांतील या कालोल्लेखांत शकसंवताचा मेळ जमत नाहीं. शकांक आणि संवत्सरनाम यांचाही मेळ जमत नाही.
शके १६८३ ऐवजीं शके १७८३ असा शकांक गृहीत धरला, तर मात्र त्या वर्षीची ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी बरोबर गुरुवारीं
पडल्य़ाचा पडताळा येतो. परंतु तरीही शक-संवताच्या निर्देशांच्या संगतीचा प्रश्न पडतोच. एकून या टिल्लू प्रतींतल्या
कालोल्लेखांतील गोंधळाचा उलगडा करणें हस्तलिखित प्रतींच्या अभावी आज तरी अशक्य आहे.
N/A
References : N/A
Last Updated : February 06, 2020
TOP