प्रस्तावना - प्रगाढ व्यासंग
नाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.
प्रवर्तीत केलेल्या परमार्थ धारेंत हरि-हरांचा प्रीतिसंगम जसा घडून आला, त्याचप्रमाणें गहिनीनाथांचा योगवारसा स्वीकारणार्या प्रकाशनाथांच्या परंपरेंतही हरिहरैक्याचा भार मुरलेला दिसतो. कदाचित् संपूर्ण मराठी लोकमानसाला व्यापून टाकणार्या निवृत्ति-ज्ञानदेवांच्या प्रभावामुळेच हें घडलें असेल. या समन्वयशील संस्कारांनीं समृध्द बनलेल्या आदिनाथांनी आदिनाथ शिवाच्या परंपरेंतील वाड्:मयाप्रमाणेंच आदिनारायण विष्णूच्या परंपरेंतील वाड्याचाही व्यासंग केलेला दिसतो. प्राचीन मराठी संत-पंत-वाड्मयाचें त्यांनी केलेले आलोडन नाथलीलामृताच्या ओवीओवींतून ओसंडत आहे.
मुकुंदराज-ज्ञानदेवांपासून श्रीधर-महीपतींपर्यंतचे सर्व श्रेष्ठ संत -पंत आदिनाथांच्या आदराचा नि अध्ययनाचा विषय बनलेले आहेत. ग्रंथाच्या मंगलाचरणांत आणि उपसंहारांत त्यांनी या सर्व कविवरांना त्यांच्या ग्रंथनामनिर्देशांसह केवळ उपचारानें वंदन केलें नाहीं, तर त्यांच्या वाणीच्या ऋणाची कृतज्ञतापूर्वक जाणीव व्यक्त करण्याचाच त्यांचा नम्र हेतु आहे. अरुपाला रुप देणार्या ज्ञानदेवांच्या प्रभाव जसा त्यांच्या वाणीवर दिसतो, तसाच कवनकुशळ मुक्तेश्वराचाही . या दोन महाकवींच्य वाक्सरितांत आदिनाथांच्या प्रज्ञेनें मनसोक्त अवगाहन केल्यामुळें त्यांच्या कवनसरणीला एका आगळ्या आत्मविश्वासा़चें लेणें लाभलेलें दिसतें. रसडोळस वाचकांना नाथलीलामृतांत ज्ञानेश्वर-मुक्तेश्वरांच्या संस्कारमुद्रा ठायी ठायीं उमटलेल्या आढळतील.
आदिनाथांचा प्राकृताप्रमाणेंच संस्कृतावरही चांगला अधिकार दिसतों उपनिषदांपासूनचें बहुतेक प्रतिनिधिक वेदान्त-वाड्मय त्यांच्या व्यासंगकक्षेंत आलेलें दिसतें. आपल्य़ा विवेचनाच्या पुष्टीसाठीं त्यांनी श्रुतिवाक्यांचा वारंवार आधार घेतला आहे. अद्वैतवेदान्ताच्या समर्थनाच्या सर्व युक्ति त्यांनी अवगत केलेल्या आहेत. योगवासिष्ठ ( ११.४ ) भगवद्गीता ( ११.१३८ ) आणि भागवत ( १. १०७ ) यांचे त्यांनी साक्षात् संदर्भच वारपले आहेत. शंकराचार्यांच्या चरित्राचें कथन करतांना ( अ. २७ ) ’ शाकरदिग्विजया ’ प्रमाणेंच शंकराचार्यांच्या ’ हस्तामलक ’, ’ मनिषापंचक ’, कालभैरवाष्टक ’, इत्यादी कृतींचा विस्तृत वापर केला आहे. ’ हस्तामलका ’ वरील एकनाथांच्या टीकेचाही ( २७.१८७ ) ते आवर्जून उल्लेख करतात.
’ मनीषापंचक ’ तर त्यांनी संपूर्ण उद्धृत करुन त्यावर आपल्या समर्थ ओवीत विवरण केलें आहे ( २७. २७८-२९७).
पंधराव्या अध्यायांत भर्तृहरीचें चरित्र सांगतांना ’ शतकत्रयां ’ तील एक प्रसिध्द श्लोक ( ’ या चिन्तयामि....’) उद्धृत केलेला असून, ’ जेणे शतकत्रय केलीं निर्माण ’ ( १५.१७१ ) असा त्या कृतीचा स्पष्ट नामनिर्देश केला आहे. सत्ताविसाव्या अध्यायांत ( ओ . २६३-२७४ ) आदिनाथांनीं ग्रंथनामाचा निर्देश टाळलेला असला, तरी शंकराचार्याच्या नांवावरील वज्रसूचिकोपनिषदाचा संक्षिप्त अनुवाद केलेला आहे.
याशिवाय संस्कृतांतील अनेक धर्मग्रंथ, काव्यग्रंथ, स्फुट सुभाषितें, न्याय, इत्यादींचे प्रतिध्वनि नाथलीलामृतांत जाणकारांना जागोजाग जाणवतील.
जीर्णकवि संत महान । त्यांसी मागून भिक्षादान । सुरस चरित्र पक्वान्न । अन्नछत्र श्रवणाचें ॥ ( १.७४ )
अशा विनयी शब्दांत आदिनाथांनीं आपल्या व्यासंगाची ग्वाही दिलेली आहे.
N/A
References : N/A
Last Updated : February 06, 2020
TOP