प्रस्तावना - आदिनाथांचे घराणें

नाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.


आदिनाथांचे घराणें आजही निघोजें गांवी नांदतें आहे. परंतु सर्व हस्तलिखितसंग्रह आगीमुळें नष्ट झालेला असल्यामुळें
भैरवनाथ व आदिनाथ यांच्या ग्रंथकर्तृत्वाचा विशेष शोध घेण्याचीं साधनें मिळण्याची आशा नष्ट झाली आहे.
नाथलीलामृतांत ज्या ग्रंथांचे संदर्भ जागोजाग विखुरलेले आहेत, ते महत्त्वपूर्ण ग्रंथ त्यांच्या नेहमींच्या व्यासंगांतले
असल्यामुळे निघोजें येथील संग्रहांत मिळायला हवे होते. परंतु दुर्दैवानें आपण त्या संग्रहाला पारखे झालो आहोंत.

भारत इतिहास संशोधक मंडळाच्या संग्रहांत ( बाडांक ४६४ ) निघोजे येथील भैरवनाथांच्या नित्योपासनेंत वापरल्या
जाणार्‍या आरत्या-स्तोत्रांचें एक लहानसें बाड आहे. हें बाड निघोजें येथील गणेश सखो कुलकर्णी यांनीं अगदी अलीकडे
( १३ सप्टेंबर १८९५ ) लिहिलेलें आहे. या बाडांत भैरवनाथ -जोगेश्वरी या देवतांच्या आरत्या, स्तुतिपर श्लोक, पदें वगैरे
आहेत. लेखण आपपाठांनीं भ्रष्ट बनलेलें आहे. निघोज्याच्या भैरवाला अनेकवार ’ निघोजमल्ल ’ म्हटले आहे.

या बाडांतील बहुतेक आरत्या ’ दास ’ या मुद्रेनें अंकित आहेत. एका आरतींत ’ दास त्रिंबकभट ’ अशी मुद्रा आहे, तर एक
पोवाडेवजा भैरवगौरवपर पद कोणा शंकररावानें रचलेलें आहे. एका दास-मुद्रांकित आरतींतील पुढील उल्लेख चिंतनीय
आहें :
तूंचि भक्त तूंचि देव, परि या जगीं नाही भाव । म्हणोनि भैरवातें आंगी राहोनि स्वयमेव ॥
त्याचे मुखें वदविशी नाथा, वचन बरवें । म्हणोनि भक्त येती तुझें ऐकूनी नांव ॥
हा आरतीकार भैरवनाथ देवाला उद्देशून म्हणतो आहे कीं, " हे नाथा, तूंच देव आहेस आणि तूंच भक्तही आहेस. परंतु या
जगांत भाव नसल्य़ामुळे लोकांना प्रचीति घडविण्यासाठीं तूं भैरवाच्या अंगीं स्वयमेव संचारुन त्याच्या मुखांतून ’ बरवें
वचन ’ वदवतोस आणि त्या दैवी प्रत्ययामुळें लोक तुझ्याकडे धाव घेतात. " आरतीकाराच्या या उद्गारांतून असें सूचित
झालें आहे कीं, भैरवनाथदेवाचा भक्त भैरव ( आदिनाथांचा पिता व गुरु ) याच्या मुखानें साक्षात् भैरवनाथच बोलत असे.

प्रस्तुत बाडांत ’ नेमाचे अभंग ’ या शीर्षकाखालीं या भैरवनाथभक्त असलेल्या भैरवाचे दोन अभंग दिले आहेत :
धावे पावे नाथराया । भक्तवत्सला सखया । दीनानाथा दीनबंधु । कृपासागर करुणासिंधु ॥
तूंचि माझी जनक-जननी । कोण पाहे तुजवांचोनी ॥ शरणागताची माउली । भैरव दासातें पावली ॥
शरण तुझें तुज आलें । आतां सांभाळावें भलें । सर्व सत्ता तुझी नाथा । देवा योगेश्वरीकांता ॥
तूं जडमूढां उध्दरीसी । कृपाहस्तें तूं तारीसी ॥ रोगाविण नामस्मरणीं । रत झाला भैरव चरणीं ॥
भैरवनाथाशीं असें तादात्म्य पावलेला भक्त भैरवासारखा पिताच गुरु म्हणून लाभल्यानें आदिनाथांचे पारमार्थिक भरणपोषण अतीव आस्थेनें झाले असणार, हे उघड आहे.

N/A

References : N/A
Last Updated : February 06, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP