प्रस्तावना - आदिनाथ ते आदिनाथ
नाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.
आदिनाथांना पित्याकडून लाभलेला परमार्थ-परंपरेचा वारसा महाराष्ट्राच्याच नव्हे, तर भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एका दिव्यधारेशीं निगडित आहे. आदिनाथ भैरव हे गहिनीनाथांच्या एका अलक्षित शिष्यशाखेंतले अधिकारी पुरुष होत.
गहिनीनाथांनीं निवृत्तिनाथांच्या द्वारां प्रवाहित केलेल्या धारेनें महाराष्ट्राचें अंतरंग सर्वांगीं कसें भिजवून टाकलें, तें
आपल्याला माहीत आहे. गहिनीनाथांनी प्रवाहित केलेल्या दुसर्या एका धारेत आदिनाथ भैरव तीर्थरुपता पावले आहेत.
ही गुप्त सरस्वतीसारखी धारा केवळ आदिनाथांच्या नाथलीलामृतामुळेंच प्रकट झाली आहे. आपल्य़ा या थोर परंपरेचा
परिचय घडवितांना आदिनाथ भैरव म्हणतात.
मुख्य श्रीआदिनाथ उमारमण । तेथून मत्स्येंद्रा प्राप्त गुह्यज्ञान । मत्स्येंद्रे गोरक्षा उपदेशून । नाथपंथ विरुढविला ॥
जेणे नव्याण्णव कोटि भूप । उध्दरिले निजप्रतापें । तेणे होऊन सकृप । उपदेशिलें गहिनीतें ॥......
सकृत होऊनि गहिनीनाथ । प्रकाशनाथातें उपदेशित । तेणे अनुग्रहिला चिद्रंजननाथ । अद्वुत प्रताप जयाचा ॥....
जो सच्चिदानंद चिध्दन । तो चातक उत्पत्तीस वर्षे जीवन । त्या उत्पत्तिनाथापासून । प्रवृत्तिनाथ लाभले ॥
प्रवृत्तीपासाव हंसनाथ । हंसे निरंजना केलें सनाथ । तेथूनि सिध्दनाथा निजगुह्य प्राप्त । पुढें भैरव निजगुरु ॥
( २८. २८०-२८१, ३०२, ३०९-३१० )
या ’ गुरुरत्नमाळिकास्मरणीं ’ तील रत्नमण्यांचा क्रम आदिनाथ -मस्त्येंद्रनाथ -गोरक्षनाथ - गहिनीनाथ _ प्रकाशनाथ चिद्रंजननाथ -उत्पत्तिनाथ प्रवृत्तिनाथ हंसनाथ -निरंजननाथ -सिध्दनाथ -भैरवनाथ आदिनाथ असा आहे. या ’ आदिनाथ ते आदिनाथ ’परंपरेंतील पुरुषांपैकी गहिनीनाथांपर्यंतचे महायोगी आपल्याला परिचित आहेत. गहिनीनाथांचे शिष्य प्रकाशनाथ याच्या परमार्थजागृतीची कथा आदिनाथांनी दिली आहे. जयजयपूरचा राजा सोम याचे ते पुत्र. मूळ नांव स्वप्रकाश. त्यांची पत्नी जशी रुपवती होती, तशीच पतिव्रताही. स्वप्रकाश एकदा मृगया करुन रात्रीच्या वेळीं आपल्या महालाच्या दाराशीं आले आणि त्यांनी दार वाजवलें, तो दाराचा आवाज ऐकून -
कांता पुसे आहे कोण । येरु मी म्हणोन देत प्रतिवचन । ती पुसे मी कोण । मीपणलक्षण निवेदीं ॥
पत्नीच्या या प्रश्नानें स्वप्रकाशांना अकस्मात आत्मजिज्ञासा प्राप्त झाली आणि त्यांनीं तात्काळ पत्नीला नमस्कार करुन
’ मी कोण ? ’ या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेण्यासाठीं राजगृहाचा त्याग केला. त्यांनी देवीची उत्कट आराधना करुन देवीला प्रसन्न केलें. परंतु देवीचें उत्तर दिलें की, ’ हे ज्ञान देणार सहुरु उदधि । एक गोरक्ष कलियुगीं ॥’
राजानें गोरक्षनाथांच्या दर्शनाचा उपाय विचारला असतां देवी म्हणाली कीं, " मी कपोत पक्षीण होऊन ज्या पुरुषावर छाया धरीन, तोच गोरक्षनाथ आहे असें ओळखून, त्याला तूं शरण जा. "
देवीच्या सूचनेप्रमाणें घडलें. गंगेच्या तटीं मनकर्णिका घाटावर गोरक्षनाथ स्नानाला आले असतां त्यांच्या माथ्यावर
कपोतीनें छाया धरली. स्वप्रकाशांना ओळख पटली आणि ते गोरक्षांना शरण गेले. कपोतीच्या रुपांतील देवीनें वरुन
गोरक्षांना स्वप्रकाशांचा उध्दार करण्यासाठीं विनविलें. गोरक्षनाथांनीं मस्तकावर हात ठेवतांच स्वप्रकाशांना तीन दिवसपर्यंत अखंड समाधि लागली. ते समाधिमग्न असतांनाच गोरक्षनाथांनीं गहिनीनाथांना आज्ञा केली कीं, " उपदेशदीक्षा देऊन पाहें ।
प्रकाश नाम ठेविजे ॥" त्यानुसार गहिनीनाथांनीं त्याच्यांवर अनुग्रह करुन, त्यांचे प्रकाशनाथ असें नांव ठेवलें. प्रकाशनाथांचे शिष्य चिद्रंजननाथ, त्यांनी जहसिंह नामक अश्वमेधकर्त्या राजाला प्रबोधिल्याचा निर्देश आदिनाथांनी केला आहे.
चिद्रंजननाथांचे शिष्य उत्पत्तिनाथ हे पूर्वाश्रमीचे ’ विप्रपुत्र ’ होते. बस्स ! परंपरेतील पुरुषांविषयीं एवढीच माहिती जातां जातां आदिनाथांनीं दिली आहे. स्वप्रकाशांचे जयजयपूर नाम्क नगर कोठें होतें, अथवा जयसिंह राजा कोठें राज्य करीत होता, याचा शोध घेण्यासाठीं कसलीही दिशा मिळूं शकत नाहीं.
N/A
References : N/A
Last Updated : February 06, 2020
TOP