मन्त्रांत शक्ति असते. विंचू सर्पादिकांचे विष मंत्रानें उतरवितात. भूतपिशाचादिक अनिष्ट शक्ति (Evil forces) मंत्रशक्तीनें दूर सारल्या जातात. मूठ चालवून एखाद्याचा प्राण घेतां येतो; ही मूठ म्ह० मंत्रशक्तिच आहे. या मंत्रशक्तीनेंच तो उलटवितांही येते. राजवशीकरण, स्त्रीवशीकरण हे सर्व मंत्रप्रयोगच आहेत. 'जारण, मारण, उच्चाटन, स्तंभन, मोहन, वशीकरण' इत्यादि सर्व 'अभिचारप्रयोग' मंत्रमय आहेत. हे मंत्र हिंदु लोकांत अथर्ववेदांत व तंत्रांत सांगितलेले संस्कृत भाषेत आहेत; तसे मुसलमानांत मुसलमानी भाषेत आहेत व चिनी लोकांत चिनी भाषेंत आहेत. प्रत्येक अक्षर हें मंत्ररूप आहे. हे मंत्रशास्त्र फार मोठें व गहन आहे. त्याचा विचार करण्याचे हें स्थळ नव्हे. मंत्रांत शक्ति असते, पण ती आपल्या हस्तगत करून घेण्यास युक्ति लागते. त्या युक्तीलाच शास्त्रांत 'विधिविधान' असें नांव आहे. हें तच्छास्त्रप्रवीण लोकांकडून म्हणजे तज्ज्ञ गुरूकडूनच जाणून घेतलें पाहिजे; व त्याप्रमाणें कृति केली पाहिजे; म्हणजे त्या शक्तीचा अनुभव येतो. (मंत्रांत असाधारण शक्ति कशानें व केव्हां उत्पन्न होते, मंत्राचे यथोक्त फळ न मिळण्याचे कारण काय, याचा थोडासा विचार आमच्या 'नामचिंतामणी' ग्रंथांत केला आहे, जिज्ञासूंनीं वाटल्यास त्यांत तो पाहून घ्यावा. विस्तार करण्याचे हे स्थळ नव्हे.) सारांश, तज्ज्ञ पुरुषांनीं अनुभव घेऊन ठरविलेले नियम कडक रीतीनें अमलांत आणले पाहिजेत. व्यासकृत संस्कृत श्रीमद्भागवताचें विध्युक्त रीतीनें सप्ताहपारायण केलें असतां जें फळ मिळतें तें भागवताच्या प्राकृत भाषांतरवाचनानें कदापि मिळणार नाहीं. कारण श्रीव्यासोनारायणाच्या मुखानें निघालेल्या अक्षरसमूहांत एक प्रकारची विशिष्ट शक्ति भरलेली असते व त्या शक्तीनें ते ते ग्रंथ भारलेले असतात, म्हणून त्यांच्या 'विध्युक्त' अनुष्ठानानें तें तें फळ प्राप्त होतें. सप्तशती ही व्यासवाणीच आहे. भगवद्गीता, विष्णुसहस्रनाम ही व्यासवाणीच आहे. तिच्यांत ही दिव्यशक्ति (Divine Power) कां असावी व भाषांतरांत ती कां नसावी हे मात्र सांगतां येणार नाहीं. पण भाषांतरांत ती नाहीं व मूळांत ती आहे ही मात्र अनुभवसिद्ध गोष्ट आहे. आतां भागवताच्या, गीतेच्या किंवा विष्णुसहस्रनामाच्या भाषांतराने त्यांतील गोष्टीचा अर्थबोध होऊन मनाला आनंद होईल. फार काय, त्याच्या मननानें पारमार्थिक उन्नतिही होईल; परंतु व्यावहारिक 'अनिष्टनिवृत्ति व इष्टप्राप्ति' हे फळ पाहिजे असल्यास मूळ संहितेचेंच 'विध्युक्त' पारायण केले पाहिजे अथवा सच्छील ब्राह्मणाकडून करविलें पाहिजे. सप्तशती-नवचंडीचे पाठ घालतांना निरनिराळ्या कामनेला निरनिराळे 'पल्लव' म्हणून लावतात, हे पुष्कळांना माहीत असेल. त्या पल्लवांमध्ये तसेंच निरनिराळ्या बीजाक्षरांमध्येही एकेक विशिष्ट शक्ति असते. अर्थज्ञानाशिवायही यथोक्त शब्दोच्चारणाने ती शक्ति उत्पन्न होते, मग अर्थज्ञानाचे त्यास साद्य मिळाल्यास ती शक्ति बळावेल यांत काय संशय ? रामरक्षा, शिवकवच, हनुमत्कवच, इत्यादि स्तोत्रांतील ‘पातु पातु, मारय मारय, उच्चाटयोच्चाटय' इत्यादि शब्दांचा अर्थ समजून त्या शब्दांचा उच्चार झाल्यास, तत्तद्भावनायुक्त शब्दोच्चार केल्यास, त्या शब्दांपासून उत्पन्न होणारे वातावरणांतील कंप अथवा लहरी (Vibrations) चिदाकाशांत इतक्या जोरानें काम करूं शकतील कीं त्याची कल्पना करता येणार नाहीं. हा अंधविश्वास नव्हे, तर आधुनिक 'विद्युन्मानसशास्त्राने' सिद्ध झालेल्या ह्या 'यथार्थ गोष्टी' (Scientific truth) आहेत. तात्पर्य, 'श्रीगुरुचरित्र' हा ग्रंथ साधा नसून दैवी शक्तीनें भारलेला मंत्रसिद्धग्रंथ आहे, हें पक्के ध्यानांत ठेवावे.
" श्रीगुरुचरित्राची एकेक ओंवी म्हणजे एक एक मोठा 'सिद्धमंत्र' आहे. त्याच्या उच्चारानें उत्पन्न होणारे चिदाकाशांतील कंप म्ह. अत्यंत कल्याणकारक असे विवक्षित रंगाचे चिदाकार किंवा विचारलहरी (Thought-forms) इतर कोणत्याही ग्रंथांच्या ओव्यांच्या उच्चाराच्या लहरींहून फारच वेगळ्या असतात, असें योगदृष्टि (क्लेअरव्हॉयन्स) असलेल्या महापुरुषांनी पाहून सिद्ध केलें आहे. एका विदुषी योगिनीनें 'सप्तशती' मंत्रग्रंथाच्या पठणाच्या लहरी व गुरुचरित्रपठणाच्या लहरी ह्या सारख्या रंगाच्या व आकाराच्या असतात" असें स्पष्ट म्हटलें आहे.
हा त्या ग्रंथांचा महिमा झाला; पण त्याचें विधान काय असा प्रश्न अथवा जिज्ञासा वाचकांच्या मनांत उत्पन्न होणें साहजिक आहे, पण ती माहिती अंशतः तरी सर्वांना असते असे म्हटल्यास चालेल. कारण श्रीगुरुचरित्राच्या शेवटच्या 'अवतरणिका' अध्यायांत ती सांगितलेली आहे आणि त्याप्रमाणे श्रद्धाळू लोक कमी अधिक प्रमाणांत त्या नियमांप्रमाणें वागून सप्ताहानुष्ठानें करीत असतात. (ज्यांना स्वतः गुरुचरित्र वाचतां येत नाहीं म्हणजे वाचण्याचा अधिकार नाहीं, असे भाविक स्त्रीशूद्रादि लोक श्रीदत्तक्षेत्रांत जाऊन तेथील पुरोहिताकडून सप्ताह वाचवितात. हें सप्ताहपारायण सात, तीन किंवा एक दिवसाचेंही करितात. पुरोहित पापभीरु असल्यास तो प्रामाणिकपणे वाचतो, नसल्यास पानांचीं पानें उलटून, वाचल्याचे ढोंग करून दक्षिणा उपटतो, हे आम्हीं स्वतः पाहिलें व ऐकलें आहे. भक्तांना त्यांच्या भावाचे फळ मिळतें, पाठकांना त्यांच्या कर्माचे फळ मिळतें. पण हा विषय येथे अप्रस्तुत आहे. ओघास आल्यामुळे किंचित् दिग्दर्शन करावेसे वाटले याबद्दल फार दिलगिरी वाटते. असो.) 'सप्ताह' याचा अर्थच मुळीं सात दिवसांचें अनुष्टान. मग हा सप्ताह श्रीगुरुचरित्राचा, भागवताचा किंवा भजनाचा असो; तीन किंवा एक दिवसाच्या अनुष्टानास 'सप्ताह' म्हणतांच येत नाहीं. गुरुचरित्रादिकांचा 'सप्ताह' करितात, या सात आंकड्यामध्येही एक प्रकारचें महत्त्व आहे. त्यांत वैज्ञानिक (सायंटिफिक) गूढ हेतु आहे. याबद्दलचा विचार व सप्ताहवाचनांत कशी शक्ति उत्पन्न होते, व्यावहारिक 'कामनेनें' सप्ताह वाचणें झाल्यास कसा वाचावा, इत्यादीबद्दलचा विचार महाराष्ट्रांतील सुप्रसिद्ध गूढशास्त्रकोविद म. आनंदघनराम, तासगांव यांच्याकडून मुद्दाम लिहून मागविलेला पुढे दिला आहे, तो वाचकांनीं वाचून पाहावा व त्यांतील शक्य असतील ते नियम पाळावे.