अध्याय ३६।३७ मधील अपूर्व शोध -
या शोधांची किंमत कोण विद्वान अथवा श्रीमान काय ठरवील हें मला समजत नाहीं. तथापि खर्या रसिकांना ते अमूल्य वाटतील अशी माझी खात्री आहे. छत्तिसाव्या अध्यायाच्या आरंभीं कोणाच्या घरचें अन्न घ्यावें, कोणाच्या घरचं घेऊं नये याबद्दलचा विचार एका धर्मकर्मनिष्ठ ब्राह्मणास सांगितला आहे. त्याच प्रसंगानें दान कोणाचे घ्यावें, कोणाचे घेऊं नये हेंही सांगितलें आहे. त्यापुढे पराशरानें सांगितलेल्या ब्राह्मणाच्या नित्यकर्माचा विचार श्रीगुरूंनीं त्या ब्राह्मणास विस्तारपूर्वक सांगितला आहे. यांतीस ओंव्या पूर्वप्रकाशित पुस्तकांत किती विकृत रीतीनें छापल्या गेल्या आहेत हे जर मी समग्र सांगूं अथवा लिहूं लागलों तर तो एक मोठा ग्रंथच होईल! करितां तसें न करितां त्यांतील अगदी निवडक निवडक असेच शोध सांगतों. त्यायोगें वाचकांची मोठी करमणूक होईल. बाकीचे शोध मूळ ग्रंथ वाचतांनाच पाहावे अशी मी त्यांना विनंति करितों. आपला सनातन वैदिक धर्म हा सहज सुलभ स्वाभाविक धर्म नाहीं. हा धर्म म्हणजे कलमी आंब्याच्या झाडाप्रमाणें मनुष्याच्या स्वाभाविक ग्राम्य सुखाच्या वृक्षावर स्वर्गमुखाचे केलेलें कलम आहे. अभ्युदयासहित निःश्रेयस (म्हणजे प्रपंचासहित परमार्थ) साधून देतो तो धर्म, अशी धर्मांची व्याख्या शास्त्रकारांनीं केलेली आहे. शास्त्रांत पशूचा मनुष्य व मनुष्याचा देव बनविण्याची शक्ति आहे. पामर जीवानें पशुकोटीपासून देवकोटीपर्यंत पोचावें अशीच श्रुतिमाउलीची इच्छा आहे. ह्या इच्छेने प्रेरित होऊनच पुढील स्मृतिकारांनीं स्मृति लिहिल्या आहेत. ह्या सर्व स्मृतिग्रंथांत 'मनुस्मृति' ही अत्यंत श्रेष्ठ मानली जाते. ह्या स्मृतीस अनुसरूनच श्रीरामरायापासून भारतवर्षांतील पुढील राजे प्रवृत्तिधर्म पाळीत आले. वर्णाश्रमधर्मासंबंधानें तींत सांगितलेले नियम हे वैयक्तिक, सामाजिक व राष्ट्रीय कल्याणाच्या दृष्टीनेंच सांगितले आहेत. पण अलीकडील अदूरदृष्टि पुरुषांच्या स्वैरवर्तनेच्छु बुद्धीला ते जाचूं लागले. कित्येक ब्राह्मणेतर व ब्राह्मण विद्वानसुद्धां तिचा उपहास करूं लागले ! कारण त्यांच्या स्वार्थाला ते आड येऊं लागले. पण (हा स्मृतिकार मनु जातीने ब्राह्मण नव्हता, क्षत्रिय म्हणजे ब्राह्मणेतर होता, हे ब्राह्मणनिंदेच्या भरांत ते विसरले ! एका ब्राह्मणेतर विद्वानानें तर मनुस्मृति (मनुस्मृतीचें पुस्तक) जाळूनही टाकल्याचे प्रसिद्ध आहे ! अशा लोकांनीं मनुस्मृति जाळणे आणि चोरांनीं पिनलकोड जाळणे एकच आहे अशी एका विद्वान पत्रकारानें आपल्या पत्रांत त्या वेळीं मार्मिक टीका केलेलीही माझ्या वाचनांत आहे. मुसलमान किंवा ख्रिस्ती धर्मांतील सगळेच लोक कांहीं धर्मनिष्ट नाहींत. त्या धर्मांतील पुष्कळ विद्वान पुढार्यांना आपल्या धर्मांतील बंधने मान्य नाहींत तीं बंधने त्यांनीं उघड उघडपणेही झुगारून दिलीं आहेत. परंतु असे लोक देखील आपल्या धर्माच्या विरुद्ध चव्हाट्यावर एक शब्दही बोलत नाहींत आणि आमच्यांतल्याच विद्वान लोकांना अशी अवदशा कां आठवावी हे कळत नाहीं ! इतर धर्मांतील विद्वान व पुढारी लोकांचें राजकारण जर त्यांच्या धर्मावांचून अडत नाहीं, तर हिंदूधर्मांतील विद्वान व पुढारीलोकांनाच आपले राजकारण धर्मांमुळे अडतें असे का वाटावें हें समजत नाहीं ! धर्मांवर श्रद्धा असलेले आपल्या समाजांत आज लाखों लोक आहेत. त्यांचे मन दुखावेल आणि त्यायोगें आज राजकारणास अवश्य असलेल्या समाजांतील ऐक्याला धोका पोचेल एवढीसुद्धां काळजी हे शहाणे लोक घेत नाहींत, हे देशाचे मोठे दुर्दैव समजलें पाहिजे. (लिहिण्याच्या ओघांत थोडें विषयांतर झालेलें दिसल्यास वाचकांनीं क्षमा करावी.) आपला धर्म हा आचारप्रधान आहे. 'आचारः प्रथमो धर्मः' असें एक धर्माचे लक्षण सांगितले आहे आणि हा आचार शरीराच्या शुद्धीसाठीं अवश्य आहे. शरीर में अन्नावर जगत असल्यामुळे अन्नाच्या शुद्धीचा विचार आपल्या धर्मांत फार सूक्ष्मपणे केलेला आहे. “आहारशुद्धौ सच्चशुद्धिः" असे शास्त्रवचन आहे. पण शुद्धि म्हणजे केवळ स्वच्छता नव्हे ही गोष्ट लक्षांत ठेविली पाहिजे. स्वच्छतेसहित 'पवित्रता' यालाच शुद्धि म्हणतात. साबणानें शरीर स्वच्छ होईल पण पवित्र होणार नाहीं. आहारशुद्धीनें शरीराचे अणुपरमाणुही शुद्ध होतात. या शारीर द्रव्याच्या शुद्धीला प्राणायाम व उपासना यांची जोड मिळेल, तर प्राणद्रव्याची व मानस-द्रव्याची शुद्धि होऊन तें शरीर आकाशांतही तरंगूं लागेल. श्रीज्ञानेश्वरींत ६ व्या अध्यायांत (ओं. २६८- ७०) सांगितल्याप्रमाणें तशा योग्याच्या शरीरांतील पंचभूतांपैकीं पृथ्वी व आप या तत्त्वांचे अंश कमी म्हणजे सुलीन होऊन बाकीच्या तत्त्वांचे अंश राहातात. असें झाले म्हणजे त्या योग्याला आकाशगमनादि सिद्धि प्राप्त होतात. खोलींत कोंडून ठेवून बाहेरून दरवाजे बंद करून कुलूप लावले तरी त्याला बाहेर पडतां येतें. ह्या प्रयोगसिद्ध गोष्टी आहेत. काशींतील तेलंग स्वामीच्या बाबतींत हे अनुभव त्या वेळच्या युरोपियन कलेक्टरनें घेऊन लिहून ठेवलेले दाखले आहेत. नुसत्या योगाभ्यासानें हे साधते. त्यास भक्तिभावाभ्यासाची जोड मिळाली तर मग विचारूच नये. त्या देहाच्या-स्थूल व लिंग देहाच्या-सर्व परमाणूंची जडता नाहींशी होऊन ते 'चिन्मय' होऊन राहातात. श्रीतुकाराममहाराजांचा देह तसा म्ह. 'ब्रह्मरूप' झालेला होता. ते 'सदेह वैकुंठास गेले' म्हणतात यांत आश्र्चर्य किंवा अशक्यता मानण्याचे कारण नाहीं. (पुनः विषयांतराबद्दल क्षमा मागावीशी वाटते.) तात्पर्य, आहारशुद्धि ही जीवाच्या उन्नतीला अत्यंत अवश्य आहे. कोणत्याही कारणांनी 'दुष्ट' म्हणजे दूषित झालेले अन्न सेवन करूं नये अशी शाखाची आज्ञा अथवा सूचना आहे. १ आश्रयदुष्ट, २ कालदुष्ट, ३ भावदुष्ट ४ स्वभावदुष्ट, ५ वाग्दुष्ट व ६ संसर्गदुष्ट असे त्या दुष्टतेचे प्रकार आहेत.* परदेशी साखर, हॉटेलांतील पदार्थ इत्यादि खाण्याचा प्रघात वाढत चालल्यामुळे लोकांची बुद्धिही भ्रष्ट होत चालली आहे. तशा पदार्थांपासून बनलेल्या वीर्याचे पिंड जन्माला येत चालल्यामुळे समाजांत धर्मभ्रष्टता व आसुरी संपत्ति वाढत चालली आहे आणि त्यायोगे सुख व शांति लोपत चालली आहे, असें विचारवान लोकांचें मत आहे. करितां ज्याला विशिष्ट उन्नतीची इच्छा असेल, त्यानें आहारशुद्धीकडे अवश्य लक्ष दिलें पाहिजे आहे. कांहीं विशिष्ट लोकांच्या घरचें ('आश्रयदुष्ट') अन्न सेवन करूं नये असे सांगतांना (ओं. ६७) “वीणावाद्य ज्याचे घरीं । न घ्यावें अन्न ब्राह्मणानें॥" असें (पूर्वीच्या प्रतींत) म्हटलें आहे. संशोधनाचे वेळीं ही ओंवी वाचतांना बहुतेक छापी व लेखी प्रतींत 'वीणावाद्य' असाच पाठ मिळाला; पण एक दोन प्रतींत मात्र वीणाविद्या असा पाठ आढळला. त्याबरोबर डोकींत एक खिळा मारल्यासारखा झाला. अनेक प्रतींत 'वीणावाद्य' आहे व एकदोन प्रतींतच 'वीणाविद्या' आहे हें काय! यांत कांहीं तरी विशेष असावें असें वाटलें व या शास्त्राचाराला मूलाधारभूत असलेली 'स्मृतिचंद्रिका' पुस्तक काढून पाहिले. ("अन्नवर्जित घरें ऐसीं । अपार असे स्मृतिचंद्रिकेसी । ऋषिसंमतें सांगेन ॥५३॥" असे श्रीगुरूंनीं म्हणून पुढें तो आचार सांगण्यास आरंभ केला आहे.) गुरुचरित्रसंशोधनाकरितां स्मृतिचंद्रिका, शुक्र-कृष्ण-यजुर्वेदसंहिता वगैरे ज्या ज्या ग्रंथांची आवश्यकता वाटली ते ते ग्रंथ आम्हीं संपादन करून ठेवलेले आहेत. शास्त्रीबुवांच्या घरच्या ग्रंथसंग्रहाबद्दल तर मागें लिहिलेच आहे. तात्पर्य, स्मृतिचंद्रिका ग्रंथांत "वैणाभिशस्तवाप्यगणिकागणदीक्षिणां... एषामन्नंनभोक्तव्यम्०" हा श्लोक सांपडला; याचा अर्थ--'वैणो-वीणावादनजीवी' असा आहे. त्याबरोबर जो आनंद झाला तो सांगतां येत नाहीं. 'वीणावादनजीवी' म्हणजे वीणा वाजविणेस शिकवून त्यावर उपजीविका करणारा. 'वीणा' म्हणजे सरस्वतीदेवीच्या हातांत दोन्हीकडे दोन भोपळे असलेले वाद्य चित्रकार दाखवितात तें. याला महाराष्ट्रांत 'बीन' म्हणतात असें वाटतें. महाराष्ट्रांत हल्लीं प्रत्येकाच्या घरीं मुलीला ज्याप्रमाणें पेटी वाजविणेस शिकवितात, त्याप्रमाणं मद्रास इलाख्यांत मुलींना 'वीणा' वाजविणेस शिकवितात. तिकडे 'ही वीणा' पा अशा स्त्रीलिंगानें हें उच्चारलें जातें, सतारीप्रमाणें ह्या वीणेस पडदे असतात. पण सतारीसारखी ही वीणा उभी न धरतां मांडीवर आडवी ठेवून वाजवितात. आपल्या महाराष्ट्रांत तंबोर्यास वीणा (विणा) म्हणण्याची चाल असून 'तो विणा' असें पुल्लिंगांत त्यास संबोधितात. आणि हा विणा (तंबुरा) तर प्रत्येक हरिदासपुराणिकाकडे व वारकरी भजनी मनुष्याकडे असतोच. त्यांच्या घरीं अन्न घेऊं नये म्हटले म्हणजे हें मोठें चमत्कारिक झाले. पण हें चमत्कारिक केव्हां वाटलें ? तर वरील अर्थ 'वीणावादनजीवी' असा सांपडला तेव्हांच. आणि तेव्हांच 'वीणावाद्य' हा पाठ चुकीचा असून 'वीणाविद्या' हाच पाठ खरा आहे, असा बुद्धीचा निश्चय झाला, त्या आनंदाचे वर्णन शब्दानें कसें करावें?