गुरूचरित्र - आभार व प्रार्थना
श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे.
Shri GuruCharitra is the most influential book written in Marathi.
संशोधनकार्यांत असा 'प्रत्यक्ष' भाग घेऊन साह्य करणारांचा नामनिर्देश मागे अनेक ठिकाणीं केलेला आहे, त्याप्रमाणें 'अप्रत्यक्ष’ साहाय्य झालेल्यांचाही नामनिर्देश करणें ही कृतज्ञता आहे. श्रीयुत जनार्दन सखाराम करंदीकर, संपादक 'केसरी' यांनी 'श्रीगुरुचरित्रांतर्गतगुरुगीता’ पुस्तकावर अभिप्राय देतांना “गुरुगीताऽध्यायासह समग्र गुरुचरित्राची शुद्ध प्रत लवकर प्रसिद्ध करावी म्हणजे गुरुचरित्राचे पारायण करणारांवर त्यांचे महदुषकार होतील" असें मोठ्या प्रेमानें म्हटलें आहे. तसेच श्रीयुत शंकर श्रीकृष्ण देव, संपादक 'रामदास व रामदासी’ यांनीही त्या पुस्तकावर अभिप्राय देतांना संशोधनकृतीची प्रेमानें तारीफ करून "हें संशोधित गुरुचरित्र लवकर प्रसिद्ध करून गु. च. भक्तांवर कायमचे उपकार करून ठेवावे, " अशा तऱ्हेची कळकळीनें सूचना केली आहे. या उभयतां विद्वानांच्या प्रेमोद्गाराने अनेक महाराष्ट्रीय विद्वानांचे लक्ष या संशोधित गु. च. कडे वेधलें गेले, तसेंच हंस व धर्मवीर यांच्या अभिप्रायानेंही काम केलें आहे. आमचे मित्र वै. श्रीमुकुंदराज कृष्ण बांदकर यांनी गुरुगीता पुस्तकाची प्रस्तावना व त्यांत दिलेले गुरुचरित्राचें शुद्धिपत्र पाहून अत्यंत कळकळीचें पत्र पाठवून कांहीं सूचना केल्या. दुसरे आमचे प्रसिद्ध कवि-मित्र व ग्रंथकार श्री. विष्णु रंगाजी शेळडेकर यांनी गुरुगीता पुस्तक पाहून अत्यंत प्रेमानें उत्तेजनपर सुंदर आर्याबद्ध पत्र पाठविलें. (ह्या त्यांच्या आर्या म्हणजे अगदी मोरोपंतांच्या तोडीच्या आहेत.) तिसरे आमचे मित्र श्रीयुत कृष्ण जगन्नाथ थळी, चर्नीरोड-मुंबई यांनीं आपल्या 'श्रीसंतसंघ- पुस्तकमाला' भाग ५ वा, या पुस्तकांत आमच्या 'गुरुचरित्र शुद्ध प्रत’ पुस्तकाची विस्तृत जाहिरात अत्यंत प्रेमाने व आत्मीय भावानें प्रसिद्ध केली आहे. श्री. कन्नडकरशास्त्री यांनी “आदौ ब्रह्मा०" या संस्कृत अष्टकाचें मराठीत समवृत्त भाषांतर करून पाठविल्याबद्दल व श्री. सोमणशास्त्री यांनी अग्निपुराणोक्त हविष्यान्नाचे पदार्थ लिहून पाठविल्याबद्दल सर्व वाचकांतर्फे त्यांचे आभार मानतों. याप्रमाणें अनेक मित्रांचें साह्य या कार्यास निरनिराळ्या प्रकारें झालेलें आहे. याबद्दल या सर्वांचे मी आभार मानितों व त्यांच्या अखंड कल्याणाबद्दल परमेश्वराकडे प्रार्थना करितों.
श्रीगुरुचरणांकित नम्र बालक
रामचंद्र कृष्ण कामत चंदगडकर
N/A
References : N/A
Last Updated : June 27, 2023
TOP