आत्मज्ञानी भजनी पदे - पद २
महाराष्ट्रात, विशेषतः ग्रामीण भागात एकतारी भजनी परंपरा आहे.
पद २
कोणी पायाळू मिळेल उतरुन जा पहिल्या स्थीरी । कवि गणपति म्हणे चुकवा चौर्यांशींची फेरी ॥धृ०॥
कल्प पर्जन्य फुटला सुटला भ्रांतीचा वारा । चित्तचैतन्याविजा अहंभाव ढंग बसला सारा ॥
मायानदी अगोचर प्रपंच पूर आला दरारा । भुलीवासना लाटा उसळे मन फिरे भंवरा ॥
अष्ट मगरीने तोंड वासलें बारा सोळा सुसरी । दहा सहा सर्प धांवले जबर विषारी ॥१॥
सद्गुरु पायाळू सांगडया भला गुणि गंभीर । सत्त्वाचा भोपळा पंचतत्त्वाचा लावूनि दोर ।
छत्तिस गुण दोरीने गुंफूनि केली तयार । शांति दया क्षमा बळकट धरा कंबर ।
भावभक्तिची सांगड नाम ठसा तयावरी । इडा पिंगळा सुषुम्ना गर्जना करि दशव्या द्वारी ॥२॥
ज्यांनी काम सोडिली बुडाला महासागरी । काळदंड यमाची जाचणि होई नानापरी ।
म्हणून कंबर कधिं सोडू नये उमजा अंतरी । रामनाम जप करुन सांगड न्या पहिल्या तीरी ॥
व्यक्ताव्यक्तासि भेटतां तिथे गवसला हरि । अवघें ब्रह्मरुप तो नर होईल बिनघोरी ॥३॥
दत्त सावतळ प्रसन्न गुरु भीमराव अर्थ दावी । आत्मज्ञानाचे बिकट बोलणें जाणेल अनुभवी ॥
सहा चार अठरा सांगत आले धरा काही सोयी । रामनाम तारक मंत्र हरिचे गुण गाई ॥
आत्मज्ञानी गणपति कवि नित्य भजे हरि । संतांचा कैवारी तुजविण कोण आम्हां तारी ॥
कोणी पायाळू० ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : March 27, 2024
TOP