आत्मज्ञानी भजनी पदे - पद ३
महाराष्ट्रात, विशेषतः ग्रामीण भागात एकतारी भजनी परंपरा आहे.
मी सद्गुरुची लाडकी । ब्रह्मबीज चाखुनशनी ठेवण हुडकी ॥धृ०॥
ठेवण्याचा चळ लागला । मशीं रात्रंदिवस तळमळ जिवाला ॥
ठेवण दशव्या द्वाराला । तिथे जाऊ केशी चिंता पडली मला ॥
पांचाचे बीज पंचकी । पांचाचे झाले छत्तिस मारिती मुरकी ॥१॥
बिकट मार्गी लोटले । ठेवण शोधावे असें चित्ती वाटले ।
सहा दहा पुरुष भेटले । अष्ट पाकुळका चंचळ कल्प दाटले ॥
मनपुरी पडली चुकी । कोणी कोणाचे ऐकेना द्वैतमंचकी ॥२॥
तिथे उंदिर घुशी कुरकुरी । उकरुन गेले पोकळ धांव मंदिरी ॥
विवेक बोका गुरगुरी । शांति मांजर गुरुचा मंत्र पंचाक्षरी ।
घूस उंदीर मारले पक्के । केले मंदिर निर्मळ नाम जपून विवेकी ॥३॥
गेले सहस्त्र दळावर । अमोल्य धन मिळाले लागेना पार ॥
माझे खुषी झाले अंतर । चौर्यांशी वेढा चुकवून झाले अमर ॥
गुरु भीमराव सांगे मुखी । गणपती करिं कवि पडेना चुकी ॥४॥
साकी
जन्माचे सार्थ करी हरिनामी जाशी तरुन । गुरुपासून घे वर्म ओळखून व्यर्थ काय खेद करुन ॥
सर्व ठिकाणी भरुन उरला त्या रुपांत जाय मुरुन । तिथे मनाचें काही न चाले वेदवाणि गेली हरुन ॥
आशाघट केला साधन करा अशी वेळ येईना फिरुन । अंतरदृष्टि वैकुंठी करुन हरि भजावें विश्वास धरुन ॥
मिळेल पाण्याला पाणी तत्त्वांत जाईल तत्त्व जिरुन । जीव देवाचे एकरुप जन्म येईना कधी फिरुन ॥
गुरु भीमराव म्हणे हरिरुप अंतरदृष्टीने घ्या हिरुन । गणपत आत्मज्ञानी बोलिले नामे पातक जाईल चुरुन ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : March 27, 2024
TOP