मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत एकनाथांचे अभंग|

विचार

संत एकनाथांनी सामान्यजनांना तसेच भक्तजनांना परमार्थाच्या सहजसुलभ वाटा दाखवून मार्गदर्शन केले आहे.




मिळती गौळणी दारवटां बैसती । धरूं आतां निश्चिती घरामध्ये ॥१॥

येतो जातो हे न कळे त्याची माव । वाउगीच हांव थरिताती ॥२॥

पांच सात बारा होऊनिया गोळा बैसती सकळां टकमक ॥३॥

एका जनार्दनी न सांपडेचि तयां । योगी ध्याती जया अहर्निशी ॥४॥

भावार्थ

पाच, सात, बारा असे गट करून गौळणी श्री हरीला पकडण्यासाठीं दाराआड लपून बसतात. एकटक नजरेने सगळीकडे बघत असतात. श्री हरीला पकडण्याची निरर्थक खटपट करु पाहतात पण श्रीहरी त्यांना चकवा देऊन येतो आणि निघून जातो. एका जनार्दनी म्हणतात, रात्रंदिवस ध्यान धारणा करूनही योग्यांना श्रीहरी सापडत नाही.



अहर्निशी योगी साधिती साधन । तयांसी महिमान न कळेची ॥१॥

तो हा श्रीहरी बाळवेषे गोकुळीं । खेळे वनमाळी गोवळियांसी ॥२॥

एका जनार्दनी न कळे महिमान । तटस्थ तें ध्यान मुनीजनीं ॥३॥

भावार्थ

एका जनार्दनी म्हणतात, रात्रंदिवस ध्यान योगाची साधना करुनही योगी जनांना ज्या श्रीहरीचा अवतार महिमा कळत नाही तो वनमाळी बाळवेष धारण करून गवळ्यांच्या सवे खेळ खेळतो.



न सांपडे हाती वाउगी तळमळ । म्हणोनि विव्हळ गोपी होती ॥१॥

बैसती समस्ता धरू म्हणोनि धावे । तंव तो नेणवें हातालागीं ॥२॥

समस्ता मिळोनी बैसती त्या द्वारें । नेणवेचि खरे येतो जातो ॥३॥

एका जनार्दनी न सांपडेचि तयां । बोभाट तो वांयां वाउगाची ॥४॥

भावार्थ

श्रीहरीला पकडण्यासाठी दारामागे लपून बसलेल्या गोपी श्रीहरी हाती लागत नसल्याने निराश झाल्या, त्यांना वेगळ्याच प्रकारची तळमळ लागून राहिली. एका जनार्दनी म्हणतात, गोपींना श्रीहरी केव्हां येतो आणि जातो हे समजत नाही त्यांचा हा खटाटोप व्यर्थ आहे.



वाउगे ते बोल बोलती अबळा । कवळ ते गोपाळा धरूं शके ॥१॥

प्रेमावीण कोण्हा न सांपडे हरी । वाउगी येरझारी घरामध्यें ॥२॥

एका जनार्दनी गोपीकांसी शीण । म्हणोनि विंदान करीतसे ॥३॥

भावार्थ

एका जनार्दनी या अभंगात म्हणतात, गोपींचे बोलणे वाउगे (अयोग्य) असून श्रीहरी प्रेम भक्ती शिवाय कोणालाही आपलासा करता येऊ शकत नाही. गोपिकांना यामुळे शीण होत असून त्या घे ते हम मी हे व्यर्थ गोंधळ घालीत आहे.



नवल ती कळा दावी गोपिकांसी । लोणी चोरायासी जातो घरा ॥१॥

धाकुले सवंगडे ठेवुनि बाहेरी । प्रवेशे भीतरीं आपणची ॥२॥

द्वार झाकोनियां बैसती गोपिका । देखियेला सखा गोपाळांचा ॥३॥

एका जनार्दनी धांवुनि धरिती । नवल ते रीती करीतसे ॥४॥

भावार्थ

लोणी चोरायला घरांत जातांना श्रीहरी बाळ सवंगड्यांना बाहेरच ठेवून आपण एकटाच घरांत प्रवेश करतो. दार बंद करून बसलेल्या गोपिकांना गोपाळांचा सखा हरी दिसतो . एका जनार्दनी म्हणतात, गोपी धावत जाऊन हरीला पकडण्याचा खटाटोप करतात. गोपिका हरीच्या मागे धावून त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात, एका जनार्दनी म्हणतात, हरी अशा प्रकारे नवलाचे खेळ खेळतो.



गोपी धावुनिया धरिती तयातें । उगा पाहे बहतें न बोले कांही ॥१॥

करीती गलबला मिळती सकळां । बोलती अबला वाईट तें ।

कां रे चोरा आतां कैसा सांपडलासी । म्हणोनी हातासी धरियेलें॥३॥

वोडोनियां नेती यशोदे जवळी । आहे वनमाळी कडेवरी ॥४॥

एका जनार्दनी यशोदेच्या करी । उभा श्रीहरी लोणी मागें ॥५॥

भावार्थ

गोपी धांवून वनमाळीला पकडतात तो कांही न बोलतां त्यांच्याकडे बघतो. गोपी एकच गलबला करुन श्रीहरीची वाईट शब्दांनी कानउघाडणी करतात. चोर बरा सांपडला असे बोलून हाताला धरुन ओढत यशोदेकडे घेऊन जातात. एका जनार्दनी म्हणतात, नवल असे कीं, यशोदेच्या कडेवर बसून श्रीहरी लोणी मागत असतो.



घरोघरीं कृष्ण धरिला बोभाटा । घेऊनि येती धीटा राजद्वारीं ॥१॥

पाहती तो उभा यशोदे जवळी । वाउगी ती कळी दिसताती ॥२॥

गोपिका धांवती घेऊनिया कृष्ण । न कळे विंदान कांही केल्या ॥३॥

घेऊनिया येती तटस्थ पाहती । विस्मित त्या होती आपुलें मनीं ॥४॥

एका जनार्दनी दावीत लाघव । न कळेंचि माव ब्रह्मादिका॥५॥

भावार्थ

गोपींनी कृष्णाला पकडलें ही बातमी घरोघरी पोचली. या धिटुकल्या हरीला राजद्वारी आणले, आणि पाहतात तर बालकृष्ण यशोदे जवळ उभा आहे. हा वेगळाच चमत्कार गोपी तटस्थपणे बघत राहिल्या. विस्मयचकित झाल्या. एका जनार्दनी म्हणतात, श्रीहरीचे लाघव, अवतार लीला ब्रह्मादी देवांना सुध्दा उमजत नव्हत्या.



मिळाल्या गोपिका यशोदे जवळा । तटस्थ सकळां पाहताती ॥१॥

यशोमती म्हणे आलेती कासया । वाऊगें तें वांयां बोलताती ॥२॥

एका जनार्दनी बोलण्याची मात । खुंटली निवांत राहिल्या त्या ॥३॥

भावार्थ

सगळ्या गोपिका एकत्र जमून यशोदेकडे गेल्या. त्यांच्याकडे आश्चर्याने बघत यशोमती माता म्हणते, येथे येऊन निरर्थक कागाळ्या करीत आहात. एका जनार्दनी म्हणतात, यापुढे बोलण्याची सोय न राहिल्याने गोपी अवाक् होऊन निवांत राहिल्या.



आपुलिया घरा जाती मुकवत । नाहीं दुजा हेत चित्ती कांहीं ॥१॥

परस्परें बोल बोलती अबला । कैसी नवल कळा देखियेली ॥२॥

धरुनिया करी जाती तेथवरी । उभा असे हरी जवळीच ॥३॥

एका जनार्दनी न कळे लाघव । तटस्थ गोपी सर्व मनामाजी ॥४॥

भावार्थ

दुसरा कोणताही हेतू मनांत न ठवता, नि:शब्द होऊन गोपी यशोदे कडून निघाल्या. एक-दुसरीला दोष देत, मनांत आश्चर्य व्यक्त करीत त्या मूकपणे घरी परतल्या. एका जनार्दनी म्हणतात, ही विस्मयकारक लीला बघून गोपी मनामध्ये कांही सुचेनासे होऊन तटस्थ झाल्या.

१०

आपुल्या मनासी करिती विचारले । न धरवे साचार कृष्ण ज्अभाविक करीं ॥१॥

योगियांचे ध्यानीं न संपडे कांहीं । तया गोपिकाही धरुं म्हणती ॥२॥

धरितां न धरणे तळमळ । वाऊगा कोल्हाळ करिती वांयां ॥३॥

एका जनार्दनी शुध्द भक्तिविण । न पवे । नारायण कवणा हातीं ॥४॥

भावार्थ

कृष्णाला हातात पकडणे अशक्य आहे, हे नि:संशयपणे सत्य आहे. अथक प्रयत्नांनंतर सुध्दां जो ध्यानांत देखील योग्यांना सापडत नाही, त्याला हातांत पकडू असे गोपी म्हणतात, त्यासाठी मनांत तळमळतात, अकारण गोंधळ करतात. एका जनार्दनी म्हणतात, नि:ष्काम भक्ती शिवाय नारायण कोणाच्याही हातीं सापडणार नाही.

११

अभाविकांसी तो जवळीचा दुरीं । दुरीचा जवळी हरी भाविकांसी ॥१॥

म्हणोनि अभावें ठकती गोपिका । त्या यदुनायका न धरती ॥२॥

वावुगे ते कष्ट मनींचा तो सोस । सायासे सायास शिणताती ॥३॥

एका जनार्दनी शीण गोपिकांसी । तेणें हृषीकेशी हांसतसे ॥४॥

भावार्थ

अभाविक लोकांना हरी जवळ अजूनही प्रेमभक्ती नसल्याने दुरावलेला असतो तर निष्काम भाविकांना तो दूर असूनही अगदी सहजसाध्य असतो. अंत:करणांत प्रेमभक्ती नसल्याने गोपिकांची फसगत होते, त्या श्रीहरीला आपलासा करु शकत नाही. मनाच्या हव्यासामुळे त्यांना कष्ट सोसावे लागतात, एका जनार्दनी म्हणतात, गोपिकांचा हा व्यर्थ शीण पाहून हृषीकेश मनांत हसत असतो.

१२

भाविका त्या गोपी येती काकुळती । तुमचेनी विश्रांती मजलागी ॥१॥

मज निराकारा आकारासी येणें । तुमचे ते ऋण फेडावया ॥२॥

दावितो लाघव भोळ्या भाविकांसी । शहाणे तयासी न संपडे ॥३॥

एका जनार्दनी भाविकांवाचून । प्राप्त नोहे जाण देव तया ॥४॥

भावार्थ

एका जनार्दनी या अभंगात सांगतात, भावनाप्रधान गोपी कृष्णासाठी काकुळतीला येतात. निराकार परमेश्वराला भाविक भक्तांसाठी अवतार धारण करावे लागतात. भाविकांच्या प्रेमभक्तीचे कर्ज फेडण्यासाठी निरनिराळ्या लीला दाखवाव्या लागतात. भाविकांशिवाय देवाला देवपण येत नाही.

१३

भोळे ते सावडे गोपिका ते भावें । चुंबन बरवें देती तया ॥१॥

यज्ञमुखी तोंड करी जो वाकुडें । तो गोपिकांचें रोकडे लोणी खाये ॥२॥

घरां नेऊनियां घालिती भोजन । पंचामृत जाण जेवविती ॥३॥

एका जनार्दनी व्यापक तो हरी । गोकुळा माझारीं खेळ खेळे ॥४॥

भावार्थ

भक्तांसाठी वेडा झालेला परमात्मा गोपिकांना सापडतो. त्या श्रीहरीचे कोडकौतुक पुरवतात. यज्ञातील हविर्भागाकडे पाठ फिरवणारा श्रीहरी गोपिकांच्या घरचे लोणी आवडीने खातो. गोपिकांनी घरी नेऊन घातलेले भोजन श्रीहरी पंचामृत समजून आवडीने खातो. एका जनार्दनी म्हणतात, विश्वाला व्यापून उरणारा परमात्मा गोकुळांत खेळ खेळतो.

१४

खेळतसे खेळ सवंगडियांसहित । गोपिकांचे हेत पुरवितसे ॥१॥

जयाचिये चित्तीं जे कांहीं वासना । तेचि नारायणा पुरविणें ॥२॥

जया जैसा हेत पुरवी तयांचा । विकला काया वाचा भाविकांचा ॥३॥

एका जनार्दनी भाविकांच्या पाठीं । धावें जगजेठी वनोवनीं ।४॥

भावार्थ

एका जनार्दनी या अभंगात म्हणतात, भक्तांच्या मनातील सर्व ईच्छा नरायण पुरवतो. श्रीहरी सवंगड्यां बरोबर खेळ खेळतो, गोपिकांच्या मनातील भावना जाणून त्यांचे हेतु पूर्ण करतो. काया, वाचा, मनाने नरायण भक्तांचा अंकित असून भक्तांच्या प्रेमामुळे तो भक्तांसाठी वनोवनी धावतो.


References : N/A
Last Updated : April 01, 2025

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP