मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत एकनाथांचे अभंग|

शिवमाहात्म्य

संत एकनाथांनी सामान्यजनांना तसेच भक्तजनांना परमार्थाच्या सहजसुलभ वाटा दाखवून मार्गदर्शन केले आहे.




आरोहण ज्याचे नंदीवरी । वामांकीं शोभे गिरिजा नारी ॥१॥
त्रिशुळ डमरू शंख कपाल । मस्तकीं गंगा चंद्रमाळ ॥२॥
अंकीं षडानन गजवदन । सदा प्रसन्न ज्याचे ध्यान ॥३॥
भूतें वेताळ शोभती । हर्षयुक्त उमापती ॥४॥
अंगीं विभूति लेपन । सदा समाधी तल्लीन ५॥
मुखीं रामनाम छंद ।एका जनार्दनीं । परमानंद ॥६॥

भावार्थ

जो नंदीवर आरूढ झाला असून डाव्या मांडीवर हिमालय कन्या गिरिजा विराजमान आहे. मस्तकावर चंद्रकोर आणि गंगेचा प्रवाह शोभून दिसत आहे. मांडीवर कार्ति केय आणि गजानन असून या उमापती शिवशंकराचे ध्यान अत्यंत प्रसन्न दिसत आहे. सर्वांगावर चिताभस्माचा लेप लावला आहे. मुखी अखंड रामनामाचा जप चालू असून मन सतत समाधींत तल्लीन झालेले आहे. सभोवतालीं भूतें आणि वेताळांचा समूह असलेला गिरिजापती शंकराला पाहून परमानंद दाटून येतो असे एका जनार्दनीं म्हणतात.



पांच पांचाचा मिळोनि मेळु । सदाशिव म्हणती अमंगळु ॥१॥
कवणा न कळे याचा भावो । शिव साचार देवाधिदेवो ॥२॥
विरूपाक्ष म्हणती भेकणा । परी हा सर्वांग देखणा ॥३॥
एका जनार्दनीं प्रबोधु । शिव नित्य नवा आणि वृध्दी ॥४॥

भावार्थ

पृथ्वी, आकाश जल, वायू आणि अग्नीं ही पंचमहाभूते आणि प्रत्येकाचे पांच गुण असे पंचवीस तत्वें मिळून सदाशिव हा अमंगल आहे असे म्हणतात परंतू या देवाधिपती शिवशंकराचे महात्म्य कोणालाच कळत नाही. देवराज इंद्र या सर्वांगसुंदर महादेवाला भेकणा म्हणतात. असे कथन करून शिव हा नित्य नवा असून सतत नविन रचना करणारा आहे असे एका जनार्दनीं म्हणतात.



निर्गुण निराकार अवयवरहित । जो शब्दरुपातीत शिव जाण ॥१॥
चहूं वाचांवेगळा पांचांसी निराळा । तो असे व्यापला सर्वांघटीं ॥२॥
ध्यानीं मनीं नये समाधी साधनीं । तो भक्तांचे ध्यानीं तिष्ठतसे ॥३॥
एका जनार्दनीं नामरूपा वेगळा । परब्रह्म पुतळा शिव जाणा ॥४॥

भावार्थ

जो सत्व, रज, तम या गुणांविरहित, अवयवरहित, निराकार असून ज्याच्या रुपाचे वर्णन शब्दांनी करतां येत नाही. वैखरी, मध्यमा, परा, पश्यंती या चारही वाणीने ज्याचे यथार्थ वर्णन करणे अशक्य आहे. तो पंचमहाभुतांहुन वेगळा असून सर्व सृष्टीत व्यापून राहिला आहे. ध्यान, धारणा, समाधी या ध्यान मार्गाने त्याचे आकलन होत नाही. भक्तीमार्गाने मात्र तो सहजसुलभ आहे. असे वर्णन करून एका जनार्दनीं म्हणतात, नामरुपावेगळा हा परब्रह्म परमेश्वर शिवशंकर आहे हे जाणून घ्यावे.



हृदयीं परमात्मा नांदे परिपूर्ण । तो शिव सनातन पूर्णब्रह्म ॥१॥
जीव तो गुंतला विषयाचे लक्षीं । शिव सर्वसाक्षीं परब्रह्म ॥२॥
भाव अभावना जया जैसी पाही । एका जनार्दनीं देहीं परब्रह्म ॥३॥

भावार्थ

प्रत्येक जीवाच्या हृदयांत परमात्मा नांदत असतो परंतू जीवात्मा ईंद्रिय विषयांचा आनंद घेण्यात गुंतलेला असतो. शिव हा सनातन, सर्वसाक्षी, परिपूर्ण परब्रह्म असून प्रत्येक जीवाच्या भावभावना जाणतो. एका जनार्दनीं म्हणतात, देहीं परब्रह्म आहे हे जाणून घ्यावे.



अकार उकार मकारां वेगळां । परब्रह्म पुतळा शिव एक ॥१॥
अंडज जारज, स्वेदज, उद्भीजा वेगळा । परब्रह्म पुतळा शिव एक ॥२॥
प्राण अपान व्यान उदान समान । यांवेगळा जाण शिव एक ॥३॥
पृथ्वी आप तेज वायु आकाश । यांवेगळा भास शिव एक ॥४॥
द्वैता अद्वैता वेगळाचि जाण । एका जनार्दनीं पूर्ण शिव एक ॥५॥

भावार्थ

ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवतां पेक्षा वेगळा असा परब्रह्म परमेश हाच शिव होय. पक्षी, मनुष्यप्राणी, घामापासून जन्म घेणारे ढेकणा सारखे जीव किंवा पाण्यांत जन्मणारे यापेक्षा निराळा असलेला, देहांत असणार्‍या पंच प्राणापेक्षा तसेच पंच महाभूतांहून वेगळा भासणारा द्वैत आणि अद्वैत या दोन्ही तत्वांहून वेगळे परमात्म तत्व हाच शिवशंकर होय असे एका जनार्दनीं या अभंगात सुचवतात.



वेदशास्त्री गाईला पुराणीं वर्णिला । तो शिव पाहिला डोळेभरी ॥१॥
तेणें माझ्या मना होय समाधान । आठवितां चरण वेळोवेळां ॥२॥
सकळ इंद्रिया झाली पैं विश्रांती ।पाहतां ती मूर्ति शंकराची ॥३॥
एका जनार्दनीं शिव हा भजावा । संसार करावा सुखरूप ॥४॥

भावार्थ

चारी वेद आणि साही शास्त्रें यांनी ज्याचा महिमा गाईला असून पुराणे ज्याच्या चरित्राचे वर्णन करतात तो शिवशंकर आपण डोळे भरून पाहिला असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, या शिवदर्शनाने मनाचे समाधान झाले. सर्व इंद्रियांना विश्रांती मिळाली. परत परत या शिवचरणांची आठवण येऊन मन शांत होते. एका जनार्दनीं म्हणतात, सुखरूप पणे संसार करतांना शिवाचे भजन नित्यनियमाने करावें.



शिव भोळा चक्रवर्ती । त्याचे पाय माझे चित्तीं ॥१॥
वाचे वदतां शिवनाम । तया न बाधी क्रोधकाम ॥२॥
धर्म अर्थ काम मोक्ष । शिवा देखतां प्रत्यक्ष ॥३॥
एका जनार्दनीं शिव । निवारी कळीकाळाचा भेव ॥४॥

भावार्थ

भोळ्या चक्रवर्ती शिवाचे चरणकमल आपण चित्तांत धारण केले असून वाचेनें शिवाच्या परमपवित्र नामाचा जप करणार्या साधकाला काम क्रोधाचा उपद्रव होत नाही. शिव-दर्शनानें धर्म, अर्थ, काम मोक्ष हे चारी पुरूषार्थ साधले जातात. एका जनार्दनीं म्हणतात, शिवशंकर मनातील कळीकाळाच्या भयाचे निवारण करतात.



स्वरुप सुंदर अति विशाल । नेत्रीं निघती अग्निज्वाळ ।
हृदयावरी सर्पाची माळ । दुष्ट दुर्जना प्रत्यक्ष काळ ॥१॥
वाचे वदे हरहर शब्द । तेणें निरसे भवबंध ॥धृ०॥
माथां जटा शोभे पिंगटवर्ण । मध्ये गंगा वाहे परिपूर्ण ।
हृदयीं सदा समाधान । तयासी पाहतां निवे मन ॥२॥
शिव शिव नाम हें तारक । जया ध्याती ब्रह्मादिक ।
सिध्द साधक वानिती अनेक । तया ध्यांता सुख अलौकिक ॥३॥
वामांगी गौरी सुंदर । तेजे लोपतसे दिनकर ।
हृदयीं ध्यातां परात्पर । एका जनार्दनीं तुटे येरझार ॥४॥

भावार्थ

अत्यंत सुंदर विशाल नयनांमधून अग्निच्या ज्वाळा निघत आहेत. वक्षस्थळीं सर्पाची माळ रूळत आहे. मुखानें हरिनामाचा जप सुरू आहे असा शिवशंकर दुष्ट आणि दुर्जनांचा नाश करणारा प्रत्यक्ष काळ असून तो साधकांची संसार बंधने तोडून टाकतो. मस्तकावर पिंगट रंगाच्या जटा शोभत असून त्या जटांमधून परमपवित्र गंगेचा प्रवाह वहात आहे. या देवाधिदेवाचे हृदय समाधानाने अखंडपणे भरलेलें आहे. या शिवदर्शनाने मनाच्या सर्व व्यथा नाहिशा होतात. या शिवशंकराचे ब्रह्मादिक देव ध्यान करतात. अनेक सिध्द साधक या देवाची स्तुतीसुमने गाऊन पूजा करतात. या शिवाचे ध्यान करण्यांत असामान्य आनंद आहे. या गौरीहराच्या डाव्या बाजूस गौरी आसनस्थ असून यां उभयतांच्या तेजापुढे सूर्यतेज फिके वाटत आहे. एका जनार्दनीं म्हणतात, भक्तीभावानें या परात्पर परब्रह्म स्वरूपाचे ध्यान केल्यास साधकांचे जन्म-मरणाचे फेरे चुकतात.



उत्तम अथवा चांडाळ । न पाहेचि खळाखळ ॥१॥
शरण आलिया तत्वतां । तया नुपेक्षी सर्वथा ॥२॥
न म्हणे शुचि अथवा चांडाळ । स्मरणेंचि मुक्तीफळ ॥३॥
ऐसा पतित पावन । शरण एका जनार्दन ॥४॥

भावार्थ

दुष्टबुध्दी चांडाळ असो किंवा शुध्दबुध्दी सज्जन असो शरण आलेल्या शरणागताची उपेक्षा शिवशंकर कधीहि करीत नाही. केवळ स्मरण करणार्या साधकाला मुक्तीफळाचे वरदान देतात. या पतितांना पावन करणार्या शिवशंकराला एका जनार्दनीं शरण जातात.

१०

त्रिभुवनीं उदार । भोळा राजा श्रीशंकर ॥१॥
जे चित्तीं जया वासना । पुरवणें त्याचि क्षणा ॥२॥
याती कुळ न पाहे कांहीं । वास कैलासीं त्या देई ॥३॥
एका जनार्दनीं सोपें । शिवनाम पवित्र जपें ॥४॥

भावार्थ

स्वर्ग पृथ्वीं पाताळ या तिन्ही भुवनांत औदार्यासाठीं सर्वोत्तम असलेला भोळा शिवशंकर प्रत्येक भक्ताच्या मनातिल वासना त्याच क्षणीं पूर्ण करतो. जाती कुळाचा विचार न करतां भक्ताला कैलासांत निवास देतो. असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, शिवनाम अत्यंत पवित्र असून वाचेला अतिशय सुलभ आहे.

११

नाम उत्तम पावन । शिव शिव वरिष्ठ जाण ॥१॥
ऐसा पुराणीं महिमा ।न कळे वेदशास्त्रा सीमा ॥२॥
जयासाठीं वेवादती । तो शिव स्वयंज्योती ॥३॥
रूपा अरूपावेगळा । एका जनार्दनीं पाहे डोळां ॥४॥

भावार्थ

शिव शिव हे नाम उत्तम पावन असून सर्वश्रेष्ठ आहे असा या नामाचा महिमा पुराणांत वर्णन केला आहे. वेदशात्रांना सुध्दां ज्याचे स्वरूप पूर्णपणे आकलन होत नाही. ज्या स्वरूपिविषयी सतत वादविवाद होतात तो शिव ज्योती स्वरूप आहे. या शिवाचे रूप आगळेवेगळे असून ते प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहावे असे एका जनार्दनीं म्हणतात.

१२

सोमवार व्रत एकादशी करी । त्याचें चरण शिरीं वंदीन मी ॥१॥
शिव विष्णु दोन्हीं एकचि प्रतिमा । ऐसा जया प्रेमा वंदीन त्यासी ॥२॥
सदा सर्वकाळ शिवाचें कीर्तन । आनंदे नर्तन भेदरहित ॥३॥
ऐसा जया भाव सदोदित मनीं । तयाचे चरणीं मिठी घाली ॥४॥
एका जनार्दनीं व्रताचा महिमा । नकळेचि ब्रह्मा उपरमला ॥५॥

भावार्थ

सोमवार आणि एकादशीचे व्रत करणार्‍या भक्तांच्या चरणांना आदराने वंदन करावे. शिव व विष्णु या दोन्ही देवांची एकच प्रतिमा आहे असा ज्यांचा दृढ विश्वास आहे त्यांना प्रेमाने वंदावें. जो भक्त सदोदित शिवाचे कीर्तन करतो, ज्याचे चित्त भेदभावरहित आहे त्यांच्या चरणांना मिठी घालावी असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, एकादशी आणि सोमवार या व्रताचा महिमा न समजल्याने ब्रह्मदेव उपरमला.

१३

देखोनियां हरलिंग । जो न करी तया साष्टांग ॥१॥
मुख्य तोचि वैरी । स्वमुखें म्हणतसे हरी ॥२॥
व्रत न करी शिवरात्र । कासयानें होती पवित्र ॥३॥
ऐशियासी यमपुरी । एका जनार्दनीं निर्धारीं ॥४॥

भावार्थ

शिवलिंग पाहूनही जो साष्टांग नमस्कार करीत नाही तो भक्त मुखाने हरीनामाचा जप करीत असला तरी तो वैरी समजावा. सर्वांना पापमुक्ती देणारे शिवरात्रीचे व्रत जो करीत नाही तो पावन होणार नाही, अशा पाखंडी लोकांना खात्रीने यमपुरींत पडावें लागते असे एका जनार्दनीं म्हणतात.

१४

शिवरात्र व्रत करी यथाविधी । भावें पूजी आधीं शिवलिंग ॥१॥
चुकलें चुकलें जन्मांचें बंधन ।पुनरागमन नये तेणें ॥२॥
एक बिल्वदळ चंदन अक्षता । पूजन तत्वतां सोपें बहु ॥३॥
एका जनार्दनीं पूजितां साचार । इच्छिलें हरिहर पूर्ण करिती ॥४॥

भावार्थ

यथासांग शिवरात्रीचे व्रत जो करतो, भक्तिभावाने आधीं शिवलिंगाची पूजा करतो त्याच्या जन्माचे बंधन तुटते त्या शिवभक्ताला परत जन्माला यावे लागत नाही. एक बेलाचे पान, चंदन आणि अक्षता एव्हढीच सामुग्री लागणारे हे व्रत अतिशय सोपे आहे. एका जनार्दनीं सुचवतात शिवरात्रीचे दिवशी शिवलिंगाचे पूजन भक्तीभावाने केल्यास शिवशंकर आणि विष्णु मनोकामना पूर्ण करतात.

१५

सकळ देवांचा जनिता । त्रिगुण सत्ता चाळवितां ॥१॥
शरण जाता त्याच्या पायां । सर्व हारपली माया ॥२॥
भेदाभेद निवारिले । सर्व स्वरूप कोंदलें ॥३॥
एका जनार्दनीं शिवें । जीवपणा मुकलों जीवे ॥४॥

भावार्थ

सत्व, रज, तम या तिन्ही गुणांवर सत्ता चालवणारा, सर्व देवांचा निर्माता अशा देवाधिदेव शिवशंकराला शरण गेल्यास मायारुप असलेला संसार विलयास जातो. सर्व भेदाभेद संपून जातात, मनातला द्वैतभाव विरून जातो. सर्व विश्वांत एकच शिवरूप कोंदून राहिले आहे याची जाणीव होते. जीवाची देहबुध्दी नाहिशी होते, म्हणजेच देह जीवपणाला मुकतो असे एका जनार्दनीं म्हणतात.


References : N/A
Last Updated : April 02, 2025

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP