१
जेथें वाजविला वेणु शुध्द ।म्हणोनि म्हणतीं वेणुनाद ॥१॥
सकळिक देव आले । तें भांवतीं राहीले ॥२॥
जोडिलें जेथें समपद । तया म्हणती विष्णुपद ॥३॥
भोवताली पदे उमटती । तेथें गोपाळ नाचती ॥४॥
जेथें उभे गाईंचे भार । ते अद्यापि दिसत खूर॥५॥
गोपाळांचीं पदें समग्र । ठाईं शोभत सर्वत्र ॥६॥
एका जनार्दनीं हरी शोभलें । कर कटावरीं ठेऊनि भले ॥७॥
भावार्थ
श्रीहरी जेथे उभा राहून वेणु वाजवित असे त्या स्थळाला वेणुनाद असे म्हणता. जेथें गोपाळ समचरण ठेवून उभे राहिलें, तेथे सकळ देव येऊन सभोवतालीं उभे राहिलें त्याला विष्णुपद म्हणतात. जेथें गाईंचे कळप उभे असून सभोवती गोपाळ नाचतात तेथे अजुनही गाईंचे खूर उमटलेलें दिसतात अशी भक्तांची श्रध्दा आहे. एका जनार्दनीं म्हणतात, पंढरींत दोन्ही कर कटावर ठेवून उभा असलेला पांडुरंग शोभून दिसतो.
२
द्वारका समुद्रांत बुडविली । परी पंढरी रक्षिली अद्यापि॥१॥
द्वारकेहूनि बहुत सुख । पंढरिये अधिक एक आहे ॥२॥
भीमातीरीं दिगंबर । करूणाकर. विठ्ठल ॥३ ॥
भक्तांसाठीं निरंतर । एका जनार्दनीं कटीं धरिले कर॥४॥
भावार्थ
द्वापार युगाच्या अंती श्रीकृष्णाने यादव कुळाचा नाश करून द्वारका समुद्रांत बुडविली असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, द्वारकेपेक्षां पंढरीचे सुख अपार आहे म्हणून पंढरीचे रक्षण करून करूणाकर विठ्ठल भीमातीरीं भक्तांसाठी कटीवर कर ठेवून निरंतर उभा आहे.
३
जाश्वनीळ सदां ध्याये ध्यानौं । बैसोनि स्मशानीं निवांतपणे ॥१॥
तें हें उघडें रुप विठ्ठल साचार । निगमाचे माहेर पंढरी हे ॥२॥
न बुडे कल्पांती. आहे ते संचले । म्हणोनी म्हणती भले वैकुंठ ॥३॥
एका जनार्दनीं कल्पपचे. निर्धारी । निर्विकल्प पंढरी. उरतसे ॥४॥
भावार्थ
नीळकंठ शिवशंकर स्मशानांत निवांतपणे ध्यानस्थ बसून विठ्ठलाचे पंढरपूरांत उभे ठाकलेले सगुण रुपआठवतात. असे कथन करुन एका जनार्दनीं म्हणतात, पंढरी हे वेदांचे माहेरघर असल्याने ते चारी युगांचे अंती (कल्पांती) देखील बुडणार नाही. म्हणुनच पंढरी पृथ्वीवरील वैकुंठ म्हणून ओळखले जाते.
४
जो हा उद्गार प्रसवे ओंकार । तें रुप सुंदर विटेवरी॥२॥
ध्याता ध्यान ध्येय जेथें पैं खुंटलें । तें रुप प्रगटलें पंढरीये॥२॥
ज्ञेय ज्ञाता ज्ञान प्रेमाचे आथिलें । तें रुप सानुलें पंढरिये॥३॥
एका जनार्दनीं रुपाचे रुपस । वैकुंठनिवास पंढरिये ॥४॥
भावार्थ
ज्या परब्रह्म रुपातून ओंकाराचा उगम झाला ते सुंदर रुप पंढरीत प्रगटरुपाने कर कटीवर ठेवून उभे आहे असे वर्णन करून एका जनार्दनीं म्हणतात, त्यां रुपाचे दर्श़न घेत असताना भाविकांचे चित्त त्या रुपाशी एकरुप होऊन जाते आणि पांडुरंग, (ध्येय) ध्यान करणारा भाविक आणि ध्यानाची क्रिया ही त्रिपुटी लयास जाते आणि तो पंढरीनाथ सारी पंढरी व्यापून उभा आहे अशी प्रचिती येते. हे सानुले रुप ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान हे द्वैत संपवून परमात्म्याच्या भक्तीप्रेमाचा अवीट आनंद देते.
५
जाश्वनीळ सदां ध्याये ध्यानीं मनीं । बैसोनि स्मशानीं निवांतपणें ॥१॥
तें हें उघडें रुप विठ्ठल साचार । निगमाचें माहेर पंढरी हे ॥२॥
न बुडे कल्पांती आहे ते संचले । म्हणोनी म्हणती भले. भूवैकुंठ ॥३॥
एका जनार्दनीं कल्पाचें निर्धारी । निर्विकल्प पंढरी उरतसे ॥४॥
भावार्थ
समुद्रमंथनातून निघालेले विष प्राशन केल्याने जे जाश्वनीळ या नावाने ओळखले जातात ते शिवशंकर निवांतपणे स्मशानांत ध्यानस्थ बसून विठ्ठलरुपाचे ध्यान लावतात, त्यां वेदरुपी पांडुरंगाचे पंढरी हे माहेरघर असल्याने ते कल्पांती देखील बुडणार नाही. असा विश्वास व्यक्त करून एका जनार्दनीं म्हणतात, पंढरी हे भुतलावरील वैकुंठ असून कल्पाचे अंती केवळ निर्विकल्प पंढरी उरणार आहे.
६
रमा रमेश मस्तकीं हर । पुढें तीर चंद्रभागा ॥१॥
मध्यभागीं पुंडलिक । सुख अलोलिक न वर्णवे ॥२॥
बहुता वैष्णवांचा मेळ । गदारोळ नामाचा ॥३॥
वामभागीं रुक्मिणी राही । जनार्दन तेथे पाही ॥४॥
भावार्थ
चंद्रभागेच्या तीरावर लक्ष्मीसह विष्णु मध्यभागीं भक्त पुंडलिका समवेत उभे ठाकले आहेत. या पंढरीचे सुख असामान्य असून वर्णंन करणे शब्दातीत आहे. अगणित वैष्णवजन जमले असून नामाचा अखंड जयघोष सुरु आहे. विठ्ठलाच्या डाव्या बाजूला रुक्मिणी विराजित आहे. एका जनार्दनीं हे विलोभनीय दृष्य अवीट गोडीने अवलोकन करतात.
७
सारांचें सार गुह्याचें निजगुह्य । तें हें उभें आहे पंढरीये॥१॥
चहूं वाचांपरते वेदां जे आरुतें । तें उभे आहे सरते पंढरीये ॥२॥
शास्त्रांचें निज सार निगमा न. कळे पार । तोचि हा. परात्पर पंढरीये ॥३॥
एका जनार्दनीं भरूनि उरला । तोचि हा देखिला पंढरीये ॥४॥
भावार्थ
विश्र्वातील सर्व चिरंतन तत्वाचे जे आत्मतत्व, गुढरम्य तत्वातील गहन तत्व पांडुरंग रुपाने पंढरींत उभे असून वैखरी, मध्यमा, परा, पश्यंती या चारी वाणी या रुपाचे यथार्थ वर्णन करु शकत नाही. साही शास्त्रांचे सार असून जे वेदांना देखिल अनाकलनीय आहे. एका जनार्दनीं म्हणतात, सर्व विश्व व्यापून जो उरला त्या परात्पर विठ्ठलाचे दर्श़न पंढरींत घडते.
८
गाई गोपांसमवेत गोकुळींहून आला । पाहूनि भक्तीं भुलला वैष्णवाला ॥१॥
मुगुटमणी धन्य पुंडलिक निका । तयालागीं देखा उभा गे माय ॥२॥
युगें अठ्ठावीस झालीं परी न बैसे खालीं । मर्यादा धरली प्रेमाची गे माय ॥३॥
ऐसा व्यापक जगाचा जीवन । एका जनार्दनीं शरण गे माय ॥४॥
भावार्थ
गाई आणि गोपाळांचे सवंगडी यांच्या समवेत गोकुळाहून श्रीहरी पंढरींत आले. भक्तशिरोमणी पुंडलिकाच्या भक्तीला भुलून त्याच्यासाठी विटेवरी कर कटीवर ठेवून निरंतर अठ्ठाविस युगे उभा आहे. एका जनार्दनीं म्हणतात, प्रेम भक्तीचा आदर करणार्या या विश्वव्यापी जगज्जीवन परब्रह्माला शरण जातो.
९
जयाकारणें श्रमले भांडती । वेदादिकां न कळे मती ।
वोळला सगुण मूर्ती । पुंडलिका कारणें ॥१॥
धन्य धन्य पावन देखे । पुण्यभूमि पावन सुरेख ।
तया गातां होतसै हर्ष । प्रेमानंदें डुल्लती ॥२॥
एका जनार्दनीं. शरण । पाहतां पाहतां वेधलें मन ।
मोक्ष मुक्ति कर जोडून । उभे तिष्ठती सर्वदा ॥३ ॥
भावार्थ
निर्गुण निराकार परमात्मा भक्त पुंडलिकालाच्या भावभक्तीला भुलून सगुण साकार रुप धारण करतो याचे रहस्य जाणून घेण्यासाठी साहीशास्त्रे वादविवाद करून थकून जातात, वेदांची मती कुंठित होते. तो भक्तराज पुंडलिक धन्य होय असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, पंढरीची ही पुण्यपावन भूमी अतिशय सुंदर असून या भूमीचे वर्णन करतांना मन प्रेमानंदाने डोलू लागते. भाविकांना मोक्ष आणि मुक्ती प्रदान करण्यासाठी परमात्मा कर जोडून उभे ठाकले आहेत.
१०
उदंड भक्त भाग्यवंत देखिले । परी निधान दाविलें पुंडलिकें ॥१॥
धन्य धन्य केला जगाचा उध्दार । नाहीं लहानथोर निवडिले. ॥२॥
एका जनार्दनीं. दावियेला तारू । सुखाचा. आगरू. विठ्ठल देव ॥३॥
भावार्थ
भगवंताचे अनेक भाग्यवंत भक्त होवून गेले परंतु पुंडलिक सर्वश्रेष्ठ भक्त मानले जातात कारण पुंडलिकांनी लहान थोर असा भेदाभेद न करता, परब्रह्म परमात्म्याचे विठ्ठलाचे दर्शंन सर्व भक्तांना घडवून जगाचा उध्दार केला. संसार सागर पार करून मोक्षाची प्राप्ती करून देणारा तारु, केवळ सुखाचे आगर असा पांडुरंग नजरेसमोर आणून उभा केला या शब्दांत एका जनार्दनीं आपली कृतज्ञता आदरपूर्वक. व्यक्त करतात.
११
पंढरीचें सुख. पुंडलिक जाणें । येर सोय नेणें तेथील पैं ॥१॥
उत्तम हें स्थळ तीर्थ चंद्रभागा । स्नाने पावन. जगा करितसे ॥२॥
मध्यभागीं शोभे पुंडलीक मुनी । पैल ते जघनीं कटीं कर ॥३॥
एका जनार्दनीं विठ्ठल बाळरुप । दरूशनें ताप हरे जगा ॥४॥
भावार्थ
पंढरी हे उत्तम तीर्थक्षेत्र असून चंद्रभागेच्या पाण्याने स्नान करून भक्त पावन होतात. जगातील सर्व लहान थोरांची पापे धुतली जातात पंढरीचे सुख भक्तराज पुंडलिक पुर्णाशाने जाणू शकतो मध्यभागीं पुंडलिक मुनी उभे असून समोर विठ्ठल कमरेवर कर ठेवून सान रुपांत तिष्ठत उभे राहिले आहेत. केवळ दर्शनाने जगाचा संसार ताप हरण करीत आहेत असे एका जनार्दनीं सांगतात.
१२
वैकुंठीचें वैभव पंढरीसी आलें । भक्तें सांठविलें पुंडलिके ॥१॥
बहुतांसी लाभ देतां घेतां जाहला । विसावा वोळला. पांडुरंग ॥२॥
योग याग साधनें करिती जयालागीं । तो उभाचि भक्तालागीं तिष्ठतसे ॥३॥
हीन दीन पापी होतुका भलते याती । पाहतां विठ्ठलमूर्ती मुक्त होती ॥४॥
एका जनार्दनीं सुखाचें माहेर । बरवें भीमातीर उत्तम तें ॥५॥
भावार्थ
वैकुंठाचे स्वामी भक्तीप्रेमाने पंढरींत आले आणि भक्तराज पुंडलिकासाठी अठ्ठविस युगे कर कटावर ठेवून विटेवर उभे आहेत असा भाविकांचा विश्वास आहे. पांडुरंग दर्शनाचा लाभ होऊन मोक्षाचा मार्ग सोपा होतो अशी भक्तांची श्रध्दा आहे. पाप, पुण्य, गरीब, श्रीमंत, उच्च-नीचता असा भेदाभेद न मानता सर्वसमावेशक असा हा भागवत धर्म सुखाचे माहेर आहे असे एका जनार्दनीं म्हणतात.
१३
तीन अक्षरीं जप पंढरी म्हणे वाचा । कोटी या जन्माचा शीण जाय ॥१॥
युगायुगीं महात्म्य व्यासे कथियेलें । कलियुगींकेलें सोपें पुंडलिकें ॥२॥
महा पापराशी त्यांची होय होळी । विठ्ठलनामें टाळी वाजवितां ॥३॥
एका जनार्दनीं घेतां पै दर्शन । जड जीवा उध्दरण कलियुगीं ॥४॥
भावार्थ
पंढरी या तीन अक्षरी नामाचा जप केला असतां जन्म-मरणाच्या फेर्यातून सुटका होते असा पंढरीचा महिमा महाभारतकार महर्षी व्यासांनी सांगितला आहे. कलियुगांत भक्त पुंडलिकाच्या पुण्याईने हा मार्ग सोपा झाला आहे. विठ्ठल नामाचा टाळी वाजवत गजर केला असतां महा पापराशी लयास जातात असा पंढरीचा महिमा वर्णन करून एका जनार्दनीं म्हणतात, कलियुगांत पांडुरंगाच्या दर्शनाने जड जीवांचा उध्दार होतो.
१४
अनुपम्य सप्तपुय्रा त्या असती । अनुपम्य त्या वरती पंढरीये ॥१॥
अनुपम्य तीर्थ सागरादि असती । अनुपम्य सरती पंढरिये ॥२॥
देव उदंडे असती । अनुपम्य विठ्ठलमूर्ति पंढररिये ॥३॥
अनुपम्य संत वैष्णवांचा. मेळ । अनुपम्य गदारोळ पंढरिये ॥४॥
अनुपम्य शरण एका जनार्दनीं । अनुपम्य चिंतनीं डुल्लतसे ॥५॥
भावार्थ
अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका आणि द्वारका या सात नगरी मोक्षदायिका मानल्या जातात. तसेच कन्याकुमारी सारखी अनेक अनुपम तीर्थक्षेत्रे भारतात आहेत परंतु पंढरीचे तीर्थस्थान सर्वांत वरती आहे. या अध्यात्मिक देशांत अनेक देव देवतांची भव्य दिव्य मंदिरे आहेत पण पंढरीची विठ्ठलमुर्ती अनुपम आहे. आषाढी कार्तिकेला येथे भरणारा वैष्णवांचा मेळावा, हरीनामाचा गदारोळ, काळ- चिपळ्यांचा गजर यांना इतर कशाची उपमा देता येत नाही. असे वर्णन करुन एका जनार्दनीं म्हणतात, हरीचरणांशी शरणागत होऊन या नामगजरांत तल्लीन होऊन जाण्यासारखे दुसरे सुख नाही.
१५
अनुपम्य वास पंढरीस ज्याचा । धन्य तो दैवाचा अनुपम्य ॥१॥
अनुपम्य घडे चंद्रभागे स्नान ।अनुपम्य दान नाम वाचे ॥२॥
अनुपम्य घडे क्षेत्र प्रदक्षिणा । अनुपम्य जाणा नारीनर ॥३॥
अनुपम्य सोहळा नित्य दिवाळी । अनुपम्य. वोवाळी विठोबासी ॥४॥
अनुपम्य शरण एका जनार्दनी । अनुपम्य ध्यानीं एक नाम ॥५॥
भावार्थ
पंढरीचा निवास आणि चंद्रभागेचे स्नान हे केवळ दैवयोगाने लाभणार्या गोष्टी आहेत. या तीर्थक्षेत्राची प्रदक्षिणा विठ्ठलाच्या नामघोषांत तल्लीन होऊन नाचण्यातला आनंद ज्या स्त्री- पुरुषांना मिळतो ते भाग्यवान समजले जातात. आषाढी कार्तिकी एकादशीचा सोहळा म्हणजे वारकर्यांसाठी नित्य आनंदाची दिवाळी असते. त्यांच्या ध्यानीमनीं विठ्ठल मुर्तीशिवाय आणि वाणींत विठ्ठल नामाशिवाय अन्य कांहीच नसते. विठ्ठल चरणांशी अनन्य भक्तीने शरणागत होतात. असे एका जनार्दनीं म्हणतात.
२६
अनुपम्य पुराणें सांगती सर्वथा । अनुपम्य तत्वतां पंढरिये ॥१॥
अनुपम्य योग. अनुपम्य याग । अनुपम्य अनुराग पंढरिये ॥२॥
अनुपम्य ध्यान अनुपम्य धारणा ।अनुपम्य पंढरीराणा विटेवरी ॥३॥
अनुपम्य क्षेत्र तीर्थ तें पवित्र । अनुपम्य गोत्र उध्दरती ॥४॥
अनुपम्य शरण एका जनार्दनीं । अनुपम्य. भुवनीं नांदतसे ॥५॥
भावार्थ
पंढरीचे परब्रह्म तत्व केवळ अनुपम असे वर्णन पुराणे करतात. पंढरीत होणारे योग, याग, भक्ती रसातील अनुराग हे कल्पनातीत पुण्यफल देणारे आहेत. विटेवर उभे असलेल्या पांडुरंगाची ध्यान-धारणा अनुपम शांती प्रदान करणारी आहे. पंढरी हे भुतलावरील अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र भक्तांच्या संपूर्ण गोत्राचा उद्धार करणारे आहे. असे वर्णन करुन एका जनार्दनीं या पुण्यक्षेत्राला अनन्यभावें शरण जातात.
१७
अनुपम्य ज्ञान अनुपम्य मतें । अनुपम्य सरतें पंढरिये ॥१॥
अनुपम्य वेद अनुपम्य शास्त्र । अनुपम्य पवित्र पंढरिये ॥२॥
अनुपम्य भक्ति अनुपम्य मुक्ति । अनुपम्य वेदोक्ती पंढरिये॥३॥
अनुपम्य कळा अनुपम्य सोहळा । अनुपम्य जिव्हाळा पंढरिये ॥४॥
अनुपम्य दया अनुपम्य शांती ।अनुपम्य विरक्ती एका जनार्दनीं ॥५॥
भावार्थ
चारी वेद आणि साही शास्त्रे यांच्यातून मिळणार्या प्रगाढ ज्ञानाच्या तुलनेत भेदाभैद न मानता सर्वांना आपुलकीने जवळ करणार्या भागवत धर्माचे ज्ञान अनुपमेय आहे. पंढरींत पहावयास मिळणारी भोळी भाबडी भक्ति, आपपर भाव न ठेवता एकमेकांविषयी वाटणारा जिव्हाळा, विठ्ठलभक्तिचा सोहळा अतुलनीय आनंद देणारा आहे. मनामध्यें दया, शांती, निर्माण करुन, चित्तशुध्दी करुन विरक्तीच्या मार्गाने मुक्ति मिळवून देणार्या पंढरीचा महिमा अनुपमेय असे एका जनार्दनीं या अभंगात म्हणतात.
१८
पंचक्रोशीचें आंत । पावन तीर्थ हें समस्त ॥१ । ।
धन्य पंढरीचा महिमा । नाहीं द्यावया उपमा ॥२॥
तीर्थ क्षेत्र देव । ऐसा नाहीं कोठें ठाव ॥३॥
नगर प्रदक्षिणा । शरण एका जनार्दनी ॥४॥
भावार्थ
गुरू पदाला शरणागत होऊन एका जनार्दनीं म्हणतात, पैठणच्या जवळपास वसलेले. पंढरपुर हे पावन तीर्थ आहे. वेदमूर्ती पांडुरंग, पुंडलिका सारखा श्रेष्ठ भक्तराज आणि चंद्राकृती भीमेचे पावन तीर्थ हे तिन्ही एका ठिकाणीं एकवटलेले असे हे एकमेव अद्वितीय तीर्थस्थान आहे.
१८
प्रयागादि क्षेत्रें आहेत कल्पकोडी । तया आहे खोडी एक एक ॥१॥
मुंडन ती काया निराहार. राहणें । येथें न मुंडणें काया कांहीं ॥२॥
म्हणोंनी सर्व तीर्थामाजीं उत्तम ठाव ।एका जनार्दनीं जीव ठसावला ॥३॥
भावार्थ
प्रयाग, वाराणसी, हरिद्वार या सारखी कोट्यावधी तीर्थक्षेत्रे या भूतलावर आहेत. परंतु प्रत्येकांत कांहीतरी उणीव आहे. काशीला जाऊन डोक्यावरील केसांचे मुंडन करावे लागते असा रिवाज आहे तर दुसरीकडे केवळ गंगाजल प्राशन करून निराहार राहावे लागते. पण पंढरीला असे कोणतेही बंधन नाही. केवळ भक्तिप्रेमांत बुडून आनंदाने विठ्ठलाच्या नामघोषांत तल्लीन होऊन नाचणे हे च अपेक्षित असते. म्हणुन एका जनार्दनीं म्हणतात, पंढरी सर्व तीर्थात उत्तम स्थळ असून तेथे जीव अडकून पडतो. पंढरीच्या वारीचे वेध लागतात.
१९
बहुत तीर्थ क्षेत्रें बहुतापरी । न पावती सरी पंढरीची॥१॥
वाहे दक्षिणभाग भीमा । पैल परमात्मा विटेवरी ॥२॥
मध्य स्थळीं पुंडलिक । दरूशनें देख उध्दार ॥३॥
वाहे तीर्थ चंद्रभागा ।देखतां भंग पातकां ॥४॥
एका जनार्दनीं सार । क्षराक्षर पंढरी हे ॥५॥
भावार्थ
अनेक देवस्थाने, अनेक तीर्थस्थाने आहेत पण त्यांना पंढरीची सर नाही. उजवीकडे अर्धचंद्राकृती भीमेचे पात्र आणि पलिकडे विटेवर उभा असलेला परमात्मा, मध्यभागीं भक्त पुंडलिक. यांच्या दर्शनाने सर्व पातके समूळ नाहीशी होतात. भाविकांचा उध्दार होतो असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, पंढरी हे अविनाशी तीर्थक्षेत्र असून पांडुरंग दर्शन हे जीवनाचे सार आहे.
१९
उदंड तीर्थे क्षेत्रें पाहतां दिठीं । नाही सृष्टीं तारक ॥१॥
स्नानें पावती मुक्ति जगा । ऐशी चंद्रभागा समर्थ ॥२॥
पुंडलिका नमस्कार । सकळ पूर्वजां ऊध्दार ॥३ ॥
पाहतां. राऊळाची. ध्वजा । मुक्ती सहजा. राबती ॥४॥
एका जनार्दनीं विठ्ठल भेटी । मग लाभा. नये तुटी ॥५ ॥
भावार्थ
अनेक तीर्थै आणि अनेक क्षेत्रांचे दर्शन घेतले पण पंढरीसारखे चराचर सृष्टीला तारक असे दुसरे क्षेत्र अनुभवास आले नाही. चंद्रभागेचे सामर्थ्य असे कीं, ती केवळ जल-स्नाने मुक्ति प्रदान करते. भक्त पुंडलिकाला साधा नमस्कार केला असतां सकळ पूर्वजांचा उध्दार होतो. पंढरीनाथाच्या मंदिरावरील ध्वजा भाविकांना संसार-तापातून मुक्त करते. असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, विठ्ठभेटी पासून केव्हढां लाभ होत असेल याची कल्पना च करतां येणे शक्य नाहीं.
२०
सकळिक तीर्थे पाहतां डोळां । निवांत नोहे हृदयकमळा॥१॥
पाहतां तीर्थ चंद्रभागा । सकळ दोष गेले भंगा ॥२॥
पाहतां विठ्ठल सांवळा । परब्रह्म डोळां देखियेलें ॥३॥
एका जनार्दनीं पाहोनि ध्यान । भुललें मन त्या ठायीं ॥४॥
भावार्थ
सकळ तीर्थे पाहून झाली पण अंत:करणाला निवांतपणा लाभला नाही. चंद्रभागा तीर्थ पहातांच सगळ्या दोषांचे निराकरण झाले. सावळ्या विठ्ठलाचे रूपाने प्रत्यक्ष परब्रह्म डोळयांना दिसलें. पांडुरंगाचे ध्यान लागले, मन तेथेच गुंतून गेले. असा दर्शन सुखाचा अनुभव एका जनार्दनीं या अभंगात वर्णन करतात.
२१
अवघें परब्रह्म क्षेत्र । अवघें तेथें तें पवित्र ॥१॥
अवघा पर्वकाळ । अवघे दैवाचे सकळ ।२॥
अवघीयां दु:ख नाहीं । अवघें सुखचि. तया ठायीं ॥३॥
अवघें आनंदभरित । एका जनार्दनीं सदोदित ॥४॥
भावार्थ
पंढरी हे परब्रह्म क्षेत्र असून येथे सदैव पर्वकाळ पर्वणी असून पवित्र वातावरणाने परिसर भरून गेलेला असतो. सगळेच पंढरीवासी अत्यंत भाग्यवान असून येथे दु:खाचा लवलेश नसलेले निरामय सुख नांदते. पंढरीच्या आनंदभरित वातावरणाचे वर्ण़न एका जनार्दनीं या अभंगात करतात.
२२
नाभीकमळीं जन्मला ब्रह्मा । तया न कळे महिमा ॥१॥
पंढरी क्षेत्र हें जुनाट । भूवैकुंठ साजिरीं ॥२॥
भोळे भाळे येती आधीं । तुटली उपाधी तयांची ॥३॥
एकपणे रिगतां शरण । एका जनार्दनी तुटे बंधन ॥४॥
भावार्थ
श्री भगवान विष्णूंच्या नाभीकमळातून ब्रह्मदेव उत्पन्न झाले परंतू त्यांना देखील या परब्रम्ह परमात्म्याचा महिमा आकलन होत नाही, असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, पंढरी क्षेत्र पुरातन असून अत्यंत पवित्र असे पृथ्वीवरील दुसरे वैकुंठच आहे. परमार्थाचे विशेष ज्ञान नसलेले पण भोळ्याभाबड्या भक्तीरसांत तल्लीन होऊन विठ्ठलनामाचा गजर करणार्या भाविकांच्या सगळ्या उपाधी तुटून जातात. पंढरीनाथाशी एकरुप होऊन शरणागत झाल्याने जन्म-मरणाची सारी बंधने लयास जातात.
२३
बहुत काळाचे हें क्षेत्र । सकळ देवांचे माहेर ।
सकळ संतांचे निजमंदीर । तें हें पंढरपूर जाणावें ॥१॥
धन्य पंढरीचा महिमा । नाहीं आणिक. उपमा ।
जेथें वास पुरषोत्तमा । रुक्मिणी सहित सर्वदा ॥२॥
धन्य भक्त पुंडलिक । सकळ संतांचा नायक ।
एका जनार्दनीं देख । श्री विठ्ठल आवडी ॥३॥
भावार्थ
सर्व देवांचे माहेर (विश्रांतीचे स्थान )संतांच्या उपासनेचे मंदीर म्हणुन नावाजलेले पंढरपूर हे पुरातन तीर्थ क्षेत्र आहे. पुरषोत्तम भगवान श्रीकृष्ण येथे माता रुक्मिणी सहित सर्वदा निवास करुन आहेत. सर्व संतांचा शिरोमणी असा भक्त पुंडलिक धन्य आहे. पंढरीला केवळ पंढरीचीच उपमा शोभून दिसते , अन्य नाही. असे एका जनार्दनीं म्हणतात.
२४
ज्या सुखा कारणें योगाभ्यास । शरीर दंड काया क्लेश ।
तें उभें आहे अपेस । भीमातीरीं वाळुवंटीं ॥१॥
न लगे दंडन मुंडनीं आंटी । योगायोगाची कसवटी ।
मोकळी राहाटी । कुंथाकुंथी नाही येथें ॥२॥
न लगे अष्टांग धूम्रपान । वायु आहार पंचाग्नि साधन ।
नग्न मौन एकांत स्थान आटाआटी न करणें ॥३ ॥
धरूनियां संतसंग । पाहें पाहें पांडुरंग ।
देईल सुख अव्यंग । एका जनार्दनीं निर्धारें ॥४ ॥
भावार्थ
परब्रह्म परमेशाच्या दर्शनसुखाचा लाभ होण्यासाठी योगी अष्टांग योगाची साधना करतात. देहाला क्लेश देवून उग्र तपश्चर्या करून देह झिजवतात. केवळ वायु भक्षण करुन निराहार पंचांग्नि साधन करतात. एकांत ठिकाणी केवळ वल्कले परिधान करून एका पायावर उभे राहून तप करतात. तो परमात्मा पुंडलिकाच्या प्रेमभक्तिसाठी वैकुठाचा त्याग करून भीमातीरीं वाळवंटी येऊन भक्तिसुखांत दंग होतो. येथे दंडमुंडन , योग याग , यांचा अट्टाहास नाही. एका जनार्दनीं म्हणतात, केवळ संत- सहवासांत पांडुरंगाच्या दर्शंन सुखाचा लाभ हे च पंढरीचे अमाप वैभव आहे. मोकळे जीवन दर्शन आहे.
२५
जप तपें तपतां कोटी । होती हिंपुटी भाग्यहीन ॥१॥
तया विश्रांतिसी स्थान । पंढरी जाण भूमंडळीं ॥२॥
योगायोग धूम्रपान करिती । नोहे प्राप्ति तयासी ॥३॥
तो उभा कटीं कर ठेवुनी । समचरणीं विटेवरी ॥४॥
एका जनार्दनीं पाहतां दिठीं । कंदर्प कोटी वोवाळिजे ॥५॥
भावार्थ
अनेक कोटींचा विठ्ठल नामाचा जप करुन, अष्टांग योगाची साधना करुन, यज्ञ, धुम्रपान अशी कडक तपश्चर्या करुनही कांहीं भाग्यहीनांना परमेश्वर प्राप्ति होत नाही. तो परमात्मा पुंडलिकाच्या भक्तीला भुलून विटेवरी कर कटी ठेवून निरंतर समचरणी उभा आहे. एका जनार्दनीं म्हणतात, केवळ एका दर्शनानेच भाविकांची कोटी जन्माची पातके समूळ नाहीशी होतात.
२६
जें देवा दुर्लभ स्थान । मनुष्यासी तें सोपें जाण ॥१॥
या ब्रंह्मांडामाझारीं । सृष्टी जाणावी पंढरी ॥२॥
एक एक पाऊल तत्वतां । घडे अश्वमेध पुण्यता ॥३॥
एका जनार्दना साठी । विठ्ठल उभाचि सरसा ॥४॥
भावार्थ
एका जनार्दनीं म्हणतात, या ब्रह्मांडामध्यें जे स्थान देवांनाही मिळणे कठीण , ते सामान्य माणसाला अत्यंत सुलभ आहे असे तीर्थक्षेत्र म्हणजे पंढरी . पंढरीच्या वाटेवरील एक एक पाऊल वारकर्यांना अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य मिळवून देते यांत शंका नाहीं. संतासाठी आणि भक्तांसाठीं विठ्ठल निरंतर समचरणी उभा आहे.
२७
व्यास वाल्मिक नारद मुनी । नित्य चिंतिति चिंतनीं ।
येती पंढरपुरभुवनीं । श्रीविठ्ठल दरुशना ॥१॥
मिळोनि सर्वांचा मेळ । गायी नाचती कल्लोळ ।
विठ्ठल स्नेहाळ । तयालागीं पहाती ॥२॥
करिती भिवरेचे स्नान ।पुंडलिका अभिवंदन ।
एका जनार्दनीं स्तवन । करिती विठ्ठलाचे॥३॥
भावार्थ
रामायणकर्ते ब्रह्मर्षी वाल्मिक, महाभारतकार व्यासमुनी, नारद मुनी आपल्या चिंतनांत पंढरपुर भुवनीं येऊन विठ्ठल दर्शनाची अभिलाषा करतात. पंढरीला जमलेले वैष्णव आणि गाईंचे कळप वाळवंटी नाचत हरिनामाचा गजर करतात , भक्तिप्रेमांत रंगलेल्या श्रीहरीचे दर्शन घेतात. भिमा नदीत स्नान करतात, भक्त पुंडलिकाला नमस्कार करतात, विठ्ठलाची स्तवने , संतांचे अभंग गातात. पंढरीच्या वारीचे असे वर्णन संत एकनाथांनी या अभंगात केले आहे.
२८
देखोनिया देवभक्त । सनकादिक आनंदात ॥१॥
म्हणती जावें पंढरपुरा । पाहूं दीनांचा सोयरा ॥२॥
आनंदें सनकादिक । पाहूं येती तेथें देख ॥३॥
विठ्ठलचरणीं शरण एका जनार्दनीं ॥४॥
भावार्थ
देवभक्तांचा आनंदमेळा अवलोकन करून सनकादिक मुनी हर्षभरित होतात. दीन-दुबळ्या भाविकांचा सखा श्रीहरीला पाहण्यासाठी पंढरीला येतात. पंढरीचा तो सोहळा पाहून विठृठलचरणीं लीन होतात. एका जनार्दनीं विठ्ठलचरणांशी शरणागत होतात.
२९
देव भक्त एके ठायीं । संतमेळ तया गावीं ॥१॥
तें हें जाणा पंढरपूर । देव उभा विटेवर ॥२॥
भक्त येती लोटांगणीं । देव पुरवी मनोरथ मनीं ॥३॥
धांवे सामोरा तयासी । आलिंगून क्षेम पुसी ॥४॥
ऐशी आवडी मानी मोठी । एका जनार्दनीं घाली मिठी॥५॥
भावार्थ
देव, भक्त आणि संतांचा मेळावा जेथे एका ठिकाणी बघायला मिळतो असे एकमेव क्षेत्र म्हणजे पंढरी हे जाणून घ्यावे असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, विटेवर उभा असलेल्या देवापुढे नतमस्तक होण्यासाठी भाविक लोटांगणे घालित येतात. देव भक्तांना सामोरे जाऊन प्रेमभराने आलिंगन देतो, त्यांचे क्षेमकुशल विचारतो. भक्तांच्या मनोकामना जाणून त्या पूर्ण करतो. देव भक्तांचे हे प्रेम पाहून आनंदाने मिठी माराविशी वाटते.
३०
उभारूनी बाह्या पाहतसे वाट । पीतांबर नीट सांवरूनी॥१॥
आलीयासी इच्छा मिळतसे दान । जया जें कारण पाहिजे तें॥२॥
भुक्ति मुक्ति तेथें लोळती अंगणीं । कोण तेथें मनीं वास नाहीं ॥३॥
कामधेनू कल्पतरू चिंतामणी । लोळती अंगणीं पंढरीये ॥४॥
एका जनार्दनीं महालाभ आहे । जो नित्य न्हाये चंद्रभागे ॥५॥
भावार्थ
भाविकांच्या सर्व कामना पूर्ण करणारे कल्पतरू (सर्व ईच्छा पूर्ण करणारा वृक्ष), ईच्छिले फळ देणारा चिंतामणी , मनाच्या कामना पूर्ण करणारी कामधेनू ज्या पंढरीत सहजसुलभ आहेत तेथे प्रत्यक्ष पांडुरंग पीतांबर सावरून आणि बाहु उभारून ईच्छादान देण्यास उभा आहे. पंढरीस आलेल्या प्रत्येक भक्ताला , त्याच्या मनाप्रमाणे दान देण्याचा भगवंतांच्या संकल्प आहे असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, चंद्रभागेच्या पात्रात नेहमी स्नान करणार्या भक्तांसाठी हा महालाभ आहे.
३१
जो परात्पर परेपरता । आदि मध्य अंत नाही पाहतां ।
आगमानिगमां न कळे सर्वथा । तो पंढरिये उभा राहिला॥१॥
धन्य धन्य पांडुरंग । भोवतां शोभें संतसंग ।
धन्य भाग्याचे जे सभाग्य । तेचि पंढरी पाहती ॥२॥
निरा भिवरापुढे वाहे । मध्यें पुंडलिक उभा आहे ।
समद्ष्टी चराचरी विठ्ठला पाहे । तेचि भाग्याचे नारीनर ॥३॥
नित्य दिवाळी दसरा । सदा आनंद पंढरपुरा ।
एका जनार्दनीं निर्धार । धन्य भाग्याचे नारीनर ॥४॥
भावार्थ
जो परात्पर परमात्मा वैखरी, मध्यमा, पश्यंती या सह परा वाणीच्या पलिकडे ब्रह्मलोकांत निवास करतो, ज्याचा आदि, मध्य आणि अंत वेदशास्त्रांना आकलन होत नाही तो भक्तिप्रेमाने पंढरींत उभा आहे. संतांच्या मेळाव्यात उभा असलेला पांडुरंग धन्य होय. ज्या भक्तांचे भाग्य थोर त्यांनाच पंढरीचे दर्शन घडते. असे वर्णन करुन एका जनार्दनीं म्हणतात, निरा आणि भीमा नदीच्या प्रवाहासमोर भक्तराज पुंडलिक उभा असून चराचर सृष्टींत भरुन राहिलेल्या विठ्ठलाचे समदृष्टीने अवलोकन करीत आहे. पंढरीत नित्यानंद देणारा दिवाळी दसरा साजरा होतो. येथील रहिवासी भाग्यवान आहेत.
३२
तया ठायीं अभिमान नुरे । कोड अंतरीचें पुरे ॥१॥
तें हें जाणा पंढरपुर । उभा देव विटेवरी ॥२॥
आलिंगनें काया । होतसे तया ठाया ॥३॥
चंद्रभागे स्नान । तेणें पूर्वजा उध्दरण ॥४॥
एका जनार्दनीं शरण । पंढरी भूवैकुंठ जाण॥५॥
भावार्थ
जेथे देहबुध्दी, मनातिल अहंकार लयास जाऊन अंतरीच्या ईच्छा पूर्ण होतात असे तीर्थक्षेत्र म्हणजे पंढरी! येथे भक्त पुंडलिकासह सर्व भक्तांना आलिंगन देण्यासाठी देव विटेवरी उभा आहे. चंद्रभागेच्या स्नानाच्या पुण्याईने भक्तांच्या पूर्वजांचा उध्दार होतो. एका जनार्दनीं विठ्ठलचरणी शरणागत होतांना पंढरी हे भुतलावरील वैकुंठ आहे हे जाणून घ्यावे असे सुचवतात.
३३
पंढरीये अन्नदान । तिळभरीं घडतां जाण ॥१॥
तेणें घडती अश्वमेध । पातकापासोंनी होती शुध्द ॥२॥
अठरा वर्ण याती । भेद नाहीं तेथें जाती ॥३॥
अवघे रंगले चिंतनीं । मुखीं नाम गाती कीर्तनीं ॥४॥
शुध्द अशुध्दाची बाधा ।एका जनार्दनीं नोहे कदा ॥५॥
भावार्थ
पंढरीच्या तीर्थक्षेत्रात तिळाभरा इतक्या अन्नदानाने अश्वमेधाचे पुण्य प्राप्त होते . भाविक पातकांपासून मुक्त होतात. अठरापगड जाती आणि कोणताही वर्णभेद न मानता सर्वजण विठ्ठल चिंतनांत मग्न होतात. मुखाने पांडुरंगाचे नाम घेत कीर्तनांत दंग होतात. एका जनार्दनीं म्हणतात, येथे मनाला शुध्द, अशुध्द, सोवळे, ओवळे या भ्रामक कल्पनांची बाधा होत नाही.
३४
वसती सदा पंढरीसी । नित्य नेमें हरी दरूशनासी ।
तयां सारखे पुण्यराशी । त्रिभुवनीं दूजें नाहीत ॥१॥
धन्य क्षेत्र भीवरातीर । पुढें पुंडलिक समोर ।
तेथें स्नान करती नर । तया जन्म नाहीं सर्वथा ॥२॥
करती क्षेत्र प्रदक्षिणा । त्यांच्या पार नाहीं पुण्या ।
जगीं धन्य ते मान्य । एका जनार्दनीं म्हणतसे ॥३॥
भावार्थ
पंढरीचे निवासी नित्यनेमाने हरी दर्शन चा लाभ घेतात त्याच्या सारखे पुण्यवान लोक त्रिभुवनांत शोधून सापडणार नाहीत असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, भीमातीरावरील हे तीर्थक्षेत्र धन्य होय. चंद्रभागेच्या पुण्य जलांत स्नान करणार्या भाविकांची जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते, जे या क्षेत्राला प्रदक्षिणा घालतात त्यांचे पदरी अपार पुण्यराशी पडतात, ते भक्त धन्य होत.
३५
नित्य घडे चंद्रभागे स्नान । श्रीविठ्ठल दरूशन ॥१॥
त्यांच्या पुण्या नोहे लेखा । पहा दृष्टी पुंडलिका ॥२॥
उजवें घेतां राउळासी । जळती पातकांच्या रासी ॥३॥
संतांसवें कीर्तंन करितां । आनंदे टाळी वाजवितां ॥४ ॥
मोक्ष जोडोनियां हात । तयाची तो वाट पहात ॥५॥
धन्य पंढरीचा संग एका जनार्दनीं अभंग ॥६ ॥
भावार्थ
ज्या भाविकांना नेहमी चंद्रभागाचे स्नान व विठ्ठलाचे दर्शन घडते , भक्त पुंडलिक डोळ्यांना दिसतो त्यांच्या पुण्याला गणती नाही. मंदिराला उजव्या बाजूने प्रदक्षणा घातल्यास पातकांच्या रासी जळून जातात. संतांच्या मेळाव्यात आनंदाने टाळी वाजवून किर्तन करीत असतांना मोक्ष हात जोडून पुढें उभा राहतो. एका जनार्दनीं म्हणतात, पंढरीचा हा सोहळा धन्य होय.
३६
भागीरथी आणि भीमरथी वदतां । समान तत्वतां कलीमाजीं ॥१॥
प्रात:काळीं नामस्मरण जो गाय । तीर्थी सदा न्हाये पुण्य जोडे ॥२॥
वदतां वाचें नाम घडतां एक स्नान । पुनरपि आगमन मृत्यूलोकीं ॥३॥
एका जनार्दनीं भीमरथीं वदतां । प्रयागीं समता सरी न पवे ॥४॥
भावार्थ
एका जनार्दनीं म्हणतात, या कलीयुगांत भागीरथी (गंगा) आणि भिमा समान पुण्यदायी आहेत. प्रात:काळीं विठ्ठल नामाचा जप करीत तीर्थात स्नान केले असतां जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होऊन मृत्यूलोकांत आगमन होत नाही. गंगा, यमुना, सरस्वती यांच्या प्रयाग तीर्थांत स्नान केल्याने मिळणारे मोक्षफल प्राप्त होते.
३७
चंद्र पौर्णमेचा दिसे पां सोज्वळ । तैसा श्रीविठ्ठल पंढरिये॥१॥
क्षीरसिंधुसम भीवरा ती वाहे । स्नान करितां जाय महापाप ॥२॥
सनकसनंदनसम पुंडलीक । शोभा अलोलिक वर्णूं काय ॥३॥
लक्ष्मी प्रत्यक्ष रखुमाई राही । एका जनार्दनीं पायीं लीन जाला ॥४॥
भावार्थ
पौर्णिमेच्या चंद्राची उपमा पंढरीच्या विठ्ठलाला देऊन एका जनार्दनीं भीमा नदीला क्षीरसिंधुची उपमा देतात. तर भक्त पुंडलिक सनकादिक ऋषीं प्रमाणे थोर आहे असे सांगतात विष्णूपत्नी लक्ष्मी रुक्मिणी च्या रूपांत विराजित आहे. पंढरीची शोभा अलौकिक असून एका जनार्दनीं विठ्ठलचरणीं लीन होतात.
३८
जयां आहे मुक्ती चाड । तयांसी गोड पंढरी ॥१ ॥
देव तीर्थ क्षेत्र संत । चहूंचा होत मेळा जेथ ॥२॥
कृष्णरामादि नामगजर । करिती उच्चार अट्टाहासे ॥३॥
स्त्रिया आदि नर बाळें । कौतुकलीळे नाचती ॥४॥
एका जनार्दनीं तयासंगीं । विठ्ठलरंगी नाचतुसे ॥५॥
भावार्थ
ज्या भाविकांना मुक्तीची लालसा त्यांना पंढरीचे विशेष आकर्षण आहे कारण देव , भक्त , संत आणि तीर्थक्षेत्र यांचा अद्वितीय मेळ पहावयास मिळतो. स्त्री-पुरुष, लहान थोर नामगजरांत कौतुकाने नाचतात. एका जनार्दनीं या नामघोषांत तल्लीन होऊन नाचतात.
३९
त्रिविधतापें तापले भारी । तया पंढरी विश्रांती ॥१॥
आणीक सुख नाहीं कोठें । पाहतां नेटें कोटि जन्म ॥२॥
काळाचेंहि न चले बळ । भूमंडळ पंढरिये ॥३॥
भूवैकुंठ पंढरी देखा । ऐसा लेखा वेदशास्त्री ॥४ ॥
एका जनार्दनीं धरुनि कास । पंढरीचा दास वारकरी । ।५॥
भावार्थ
आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक या तीन प्रकारच्या तापांनी पोळून निघालेल्या लोकांसाठी पंढरी हे विश्रामधाम असून पंढरीसारखे सुख अनेक जन्म घेऊनही लाभणार नाही. प्रत्यक्ष कळीकाळाचेही सामर्थ्य येथे चालत नाही. पंढरी भूतलावरील वैकुंठ आहे असे वेदशास्त्रात सांगितले आहे. एका जनार्दनीं म्हणतात, असा दृढ विश्वास. धरून वारकरी पंढरीची वारी करतात.
४०
पतित पातकी खळ दुराचारी । पाहतां पंढरी मोक्ष तयां ॥१॥
स्वमुखें सांगतो आपण । नका अनुमान धरुं कोणी ॥२॥
चंद्रभागा दृष्टीं पाहतां नरनारी । मोक्ष त्यांचे घरीं मुक्तीसहित ॥३॥
चतुष्पाद पक्ष कीटकें अपार । वृक्ष पाषाण निर्धार उध्दरती ॥४॥
एका जनार्दनीं न घ्यावा संशय । दरुशनें जाय पापताप ॥५॥
भावार्थ
दुष्ट प्रवृत्तीने निरपराधी लोकांवर अन्याय करणारे, पाप करणारे पतित, दुष्ट या सर्वांसाठी पंढरी ही मोक्षभूमी आहे. हे आपण स्वमुखाने सांगत असून या विषयीं कोणी संशय घेऊं नये. वृक्ष पाषाण या सारखे अचरांपासून चार पायांचे प्राणी, पक्षी, कीटक यां सारखे चर प्राण्यांपर्यंत सर्वांचा उध्दार पंढरींत होतो. असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, विठुरायाच्या केवळ दर्शनाने सर्वांचे पापताप विलयास जातात. या विषयीं कोणी संशय धरुं नये.
४१
राहुनी पंढरिये जाण । जो न घे विठ्ठलदरुशन ॥१॥
महापातकी चांडाळ । त्याचा न व्हावा विटाळ ॥२॥
जिताची भोगी नर्क जो विठ्ठला विन्मुख ॥३॥
न करी स्नान चंद्रभागे तो कुष्ठी सर्वागें ॥४॥
नेघे पुंडलिकदरुशन । एका जनार्दनीं तया बंधन ॥५॥
भावार्थ
जो अभक्त पंढरीस राहून विठ्ठलाचे दर्शन घेत नाही तो महापातकी चांडाळ समजावा तो जिवंतपणी नरकयातना भोगतो. भाविक या पातक्याचे दर्शन अभद्र समजतात. जो चंद्रभागेंत स्नान करण्याचे टाळतो त्याच्या सर्वांगावर कोड (कुष्ठरोग) येते. जो पंढरींत भक्त पुंडलिकाचे दर्शन घेत नाही तो संसार बंधनांत अडकतो. असे एका जनार्दनीं म्हणतात.
४२
पूर्व सुकृताची गांठोडी पदरीं । तरीच पंढरीं वास घडे ॥१॥
कोटी यज्ञफळ भीमरथी पाहतां । मोक्ष सायुज्यता तत्क्षणीं ॥२॥
पृर्थ्वीचें दान असंख्य गोदानें । पुंडलिक दरुशनें न तुळती ॥३॥
एका जनार्दनीं विठ्ठलाचे भेटी । वेरझारा तुटी जन्मोजन्मीं ॥४॥
भावार्थ
अनेक जन्म जन्मांतरीच्या सत्कृत्यांचे पुण्य पदरीं असेल तरच पंढरींत निवास घडतो. कोटी यज्ञांचे पुण्य-फळाने चंद्रभागेचे स्नान घडते, त्याच क्षणीं सायुज्यता मुक्ती लाभते. असंख्य गाईंचे दान किंवा भूदानाने मिळणार्या पुण्याची तुलना पुंडलिक दर्शनाने मिळणार्या पुण्यराशींशी होऊ शकत नाही. असे खात्रीपूर्वक सांगून एका जनार्दनीं म्हणतात, विठ्ठलाच्या भेटीने जन्ममृत्युच्या चक्रातून कायमची सुटका होते.
४३
अविनाश क्षेत्र पंढरी सर्वथा । आणीक ती वार्ता न ये मना ॥१॥
सर्व तीर्थ मार्ग विधियुक्त आहे । येथें उभा पाहे पांडुरंग ॥२॥
आटणी दाटणी मुंडणी सर्वथा । नाहीं पै तत्वतां यया तीर्था ॥३॥
करावें तें स्नान पुंडलिके वंदन । देखावे चरण विठोबाचे ॥४॥
जनार्दनाचा एका पंढरी सांडुनी । न जाय अवनीं कवण तीर्थीं ॥५॥
भावार्थ
पंढरी हे भुतलावरील चिरंतन टिकणारे शाश्वत क्षेत्र असून अद्वितीय आहे. येथे पांडुरंग भक्तांची वाट पहात उभा आहे. इतर क्षेत्रीं विधी-निषेधांची बंधन आहेत. पंढरींत केवळ भोळ्या भाबड्या मनाचा भक्तिभाव पुरेसा आहे. तीर्थांत स्नान करून भक्त पुंडलिकाचे दर्शन घ्यावें आणि विठोबाच्या चरणी नतमस्तक व्हावे . एका जनार्दनीं म्हणतात, पंढरी सोडून पृथ्वीवरील कोणत्याही तीर्थक्षेत्रीं जाण्याची ओढ वाटत नाही.
४४
भाविकांसी नित्य नवें हे सोपारें । पंढरी उच्चार करितां वाचें ॥१॥
हो कां अनामिक अथवा शुध्द वर्ण । ज्ञातीसी कारण नाहीं देवा ॥२॥
एका जनार्दनीं भलती ज्ञाती असो । परी पांडुरंग वसो हृदयामाजीं ॥३॥
भावार्थ
भाविकाचे नाव, गांव, जातपात, वर्ण कोणताही असो पवित्र तीर्थक्षेत्र पंढरी या नामाच्या वाचेने केलेला उच्चार देवाला पोचतो. असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, अंतकरणात वसत असलेला पांडुरंग आणि शुद्ध, सात्विक भक्तिभाव देवाला प्रिय आहे.
४५
सप्तपुर्यांमाजीं पंढरी पावन । नामघोष जाण वैष्णव करिती ॥१॥
देव तो विठ्ठल देव तो विठ्ठल । आहे सोपा बोल वाचें म्हणतां ॥२॥
आणिक कांहीं नको यापरतें साधन । विठ्ठल निधान. टाकूनियां ॥३॥
एका जनार्दनीं विठ्ठलावांचुनी । आण नेणें दुजें कांहीं ॥४॥
भावार्थ
मथुरा, मायावती, वाराणसी , कांची , अवंतिका, अयोध्या, आणि द्वारका या सात नगरी मोक्षदायिका मानल्या जातात. यापेक्षां पंढरी पावन नगरी आहे हे जाणून वैष्णव पंढरीचा नित्य नामघोष करतात. पंढरीचा विठ्ठल केवळ वाचेने नाम घेताच भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतो. या शिवाय वेगळी कांहीं साधना करावी लागत नाही. असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, विठ्ठलावाचुन अन्य दैवत नाही.
४६
तयाचे संगतीं अपार । विश्रांती घर पंढरी ॥१॥
म्हणोनि वारकरी भावें । जाती हावे पंढरीसी ॥२॥
योगयागीं जो न संपडे । तो पुंडलिका पुढें उभा असें ॥३॥
शोभे चंद्रभागा उत्तम । धन्य जन्म जाती तेथें ॥४॥
घेऊनि आवडी माळ बुका । वाहती फुका विठ्ठला ॥५॥
एका जनार्दनीं भावें । हेंचि मागणें मज द्यावें ॥६॥
भावार्थ
पंढरी हे तीर्थक्षेत्र संताचे माहेर मानले जाते. अनेक वारकरी संतांच्या संगतीने भक्तिभावाने पंढरीची वारी करतात. अष्टांगयोग आणि यज्ञयाग करुनही जो परमात्मा प्राप्त होत नाही तो पंढरीत भक्त पुंडलिका साठी उभा आहे. तेथील चंद्रभागेच्या प्रवाहाची शोभा रमणीय आहे. जे भाविक पंढरीस जातात त्यांचा जन्म धन्य होय. हे भक्त अत्यंत आनंदाने फुलांची माळ व बुका देवाला अर्पण करतात. असे वर्णन करून एका जनार्दनीं गुरुचरणीं विनंती करतात कीं, आपणास हे भाग्य लाभावे.
४७
घडती पुण्याचिया रासी । जे पंढरीसी जाती नेमें ॥१॥
घडतां चंद्रभागे स्नान । आणि दरूशन पुंडलिक ॥२॥
पाहतां विटेवरी जगदीश । पुराणपुरूष व्यापक ॥३॥
वारकरी गायी सदा । प्रेमे गौविंदा आळविती ॥४॥
तया स्थळीं मज ठेवा. । आठवा जनीं जनार्दन ॥५॥
शरण एका जनार्दन । करा माझी आठवण ॥६॥
भावार्थ
जे भाविक नित्यनेमाने पंढरीची वारी करतात त्यांच्या पुण्याचा राशींनी संचय होतो . या भाविकांना चंद्रभागेचे स्नान घडते, भक्त पुंडलिकाचे दर्शन घडते. चराचरात व्यापलेल्या पुराणपुरुष जगदीशाचे ध्यान याच देही याचडोळां बघावयास मिळतें. वारकरी सतत विठुनामाचा घोष करुन देवाला आळवतात . त्यां पवित्र स्थळीं निवास लाभावा अशी इच्छा व्यक्त करुन एका जनार्दनीं सद्गुरु जनार्दन स्वामींना शरण जातात.
४८
पंढरीस ज्याचा नेम । तो न करी अन्य कर्म ॥१॥
सांडूनियां विठ्ठल राजा । आणिक देव नाहीं दुजा ॥२॥
सांडूनियां चंद्रभागा । कोण जाय आणिके गंगा ॥३॥
सांडूनियां पुंडलिका । कोण आहे आणीक सखा ॥४॥
सांडोनियां वेणूनाद । कोण आहे थोर पद ॥५॥
एका जनार्दनीं भाव ।अवघा विठ्ठलचि देव ॥६॥
भावार्थ
जो पंढरीची नेमाने वारी करतो त्या भक्ताला अन्य साधनेची गरज नसते. विठ्ठला सारखा परम देव दुसरा नाही. चंद्रभागे सारखी पवित्र गंगा नाही. पुंडलिका सारखा दुसरा सखा नाही. वेणूनादा सारखा अन्य नाद नाही. असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, मन भक्तिभावाने भरलेलें असेल तर सारे देव विठ्ठच आहेत. एकाच विठोबाची सारी रुपे आहेत.
४९
देव वसे पंढरीसी ।येती सनकादिक ऋषीं ।
वंदोनी पुंडलिकासी । चरण वंदिती विठ्ठलाचे ॥१॥
करिती कीर्तन गजर । नाना वाद्यें परिकर ।
नाचती निर्धार । बाळें भोळे आवडी ॥२॥
दिंडी जागरण एकादशी । क्षीरापती द्वादशी करिताती आवडीसी ।
भक्त मिळोनी सकळ ॥३॥
मिळताना क्षीरापती शेष तेणें सुख सुरवरास ।
एका जनार्दनीं दास ।वैष्णवांचा निर्धारें ॥४॥
भावार्थ
पांडुरंग पंढरीत वसत असल्याने सनकादिक ऋषीं पंढरीस येतात, भक्त पुंडलिकाला नमस्कार करून विठ्ठलाचे चरण- वंदन करून कीर्तनरंगी रंगून जातात. नाना वाद्यांच्या गजरांत आनंदाने नाचतात. एकादशीला दिंडी निघते. रात्रीचे जागरण करतात. द्वादशीला आवडीनें दुधाच्या खीरीचा नैवेद्य दाखवला जातो खीरीच्या शेष भागाने देवदेवताप्रसन्न होतात. एका जनार्दनीं म्हणतात, स्वर्गीच्या या देवदेवता वैष्णवांच्या दास बनतात.
५०
पंढरीये पांडुरंग । भोवतां संग संतांचा ॥१॥
चंद्रभागा वाळुवंट । आहे देव नीट उभा ॥२॥
पुंडलिक वेणुनाद । होतो आनंद अखंड ॥३॥
पद्मतळें गोपाळपूर । संत भार आहे तेथें ॥४॥
वैष्णवांचा गजर मोठा । आषाढी चोहटा नाचती ॥५॥
जाऊं तैथें लोटांगणी । फिटेल आयणी गर्भवास ॥६॥
भाळे भोळे येती भक्त । आनंदें नाचत वाळुवंटीं ॥७॥
लोटांगणीं. घालूं चरणीं । शरण एका जनार्दनीं ॥८॥
भावार्थ
पांडुरंग पंढरीत समचरणी उभा आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात संतांचा मेळा वेणुनादांत तल्लीन होऊन नाचत आहेत. गोपाळपूर , पद्मतळे येथे संतासवे भक्तांची अपार गर्दी असून वैष्णव नामघोषाच्या मोठ्या गजरांत नाचतात. एकमेकांना आलिंगन देवून लोटांगणे घालतात. एका जनार्दनीं या सर्व भक्तांच्या आणि सतांच्या चरणीं शरणागत होतात.
५१
हरीचे ते दास । ज्यांचा पंढरीसी वास ॥१॥
येती नेमें पंढरीसी । दरूशन घेती विठ्ठलासी ॥२॥
करिती चंद्रभागे स्नान । पूर्वजा उध्दरतीं जाण ॥३॥
करिती गोपाळकाला । गोपाळपुरी मिळोनि मेळा ॥४॥
ऐसा जया घडे नेम । एका जनार्दनीं निष्काम ॥५॥
भावार्थ
हरीचे दास पंढरीस नित्यनेमाने येऊन विठ्ठलाचे दर्श़न घेतात. चंद्रभागेचे स्नान करुन लाभलेल्या पुण्यफलाने पूर्वजांचा उध्दार होतो. गोपाळपुरीं एकत्र जमून गोपाळकाला करतात. असा नेम ज्यांना घडतो ते भक्त निष्काम कर्मयोगी आहेत असे एका जनार्दनीं म्हणतात.
५२
तुम्ही पंढरिये जातां । तरी मी पायां लागेन आतां ।
चरणरजें जाली साम्यतां । तुमचे पाऊल माझे माथां ॥१॥
तेथें जेथें पाऊल बैसे । एका एकपणेंविण असे ॥ध्रृ०॥
पंढरीचे वाटे । पसरिलें ते मीं गोटे ।
पाया लागेन अवचटे । तें सुख आहे न मज मोठें ॥२॥
जेथें पाउलांचा माग । तेथें माझें अखंड अंग ।
चरणरज आम्हां भोग । काय करशील वैकुंठ चांग ॥३॥
संत भेटतील वाडेकोडें । तरी मी आहे पायांपुढें ।
हे हि आठवण. न घडे । तरी मी वाळवंटींचे खडे ॥४॥
यात्रा दाटेल घसणीं । लागेन अवचितां चरणीं ।
एका जनार्दनीं कीर्तनीं । आठवा आसनी शयनीं ॥५॥
भावार्थ
या अभंगात एका जनार्दनीं पंढरीच्या वारकर्यांना विनंती करीत आहेत. विठ्ठलाच्या भक्तांच्या पायावर डोके टेकवून त्यांची चरणधूल मस्तकी धारण करतात. पंढरीच्या वाटेवरील गोटे बनून भक्तांच्या चरण-स्पर्शाचे सुख लाभावे अशी ईच्छा व्यक्त करुन एका जनार्दनी म्हणतात, भक्तांचे चरणरज हे आनंदाचे भोग असून वैकुंठीचे सुख सुध्दा त्यां पेक्षा कमी च आहे. संतांच्या भेटीसाठी चंद्रभागेच्या वाळवंटीचे खडे बनून संतांच्या चरणी लीन होण्याची कामना करतात. संताची बसतां , उठतां कीर्तन करतांना, विश्रांती घेतांना नित्य आठवण करतात.
५३
मूर्ति अनुपम्य विटेवरी साजिरी । पाऊलें गोजिरीं कोंवळी तीं ॥१॥
तेथें माझें मन वेडावलें भारी । परत माघारीं परतेना ॥२॥
वेधलासे जीव सुखा नाही पार । माहेरा माहेर पंढरी लेखा ॥३॥
एका जनार्दनीं सुखाची वसती । भाविका विश्रांति पंढरीराव ॥४॥
भावार्थ
पंढरीला विटेवरील अनुपम सुंदर मूर्ति, गोजिरे, कोमल समचरण पाहून वेडावलेंले मन माघारीं परतेना . मन वेधून घेणार्या ते दर्श़न सुख अपार आनंददायी अनुभव आहे असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, पंढरी ही सुखाचे, विश्रांतीचे वसतीस्थान आहे पंढरी हे संताचे माहेर असून भाविकांचे विश्रांती स्थान आहे म्हणजे वारकर्यांसाठी पंढरी माहेराचे माहेर आहे .
५४
आशा धरूनी आलों येथवरीं । पाहतां पंढरी पावन झालों ॥१॥
आलीया जन्माचें सुफळ झालें काज । दृष्टी गरूडध्वज पाहतांचि ॥२॥
एका जनार्दनीं पावलों विश्रांती । पाहतां विठ्ठलमूर्ती भीमातटीं ॥३॥
भावार्थ
सर्व पापांचे परिमार्जन व्हावे या अपेक्षेने पंढरीस आलो आणि पावन झालो. मंदीरावरील गरूडध्वज पाहताच मानवी जन्माचे सार्थक झाले. भीमेच्या तीरावरील पांडुरंगाची मूर्ती पाहून सर्व श्रमाचा परिहार होऊन मन विश्रांत. झाले. असा पंढरीचा महिमा या अभंगात एका जनार्दनीं वर्णन करतात.
५५
ऐसे संतभार ऐसें भीमातीर । ऐसा जयजयकार सांगा कोठें ॥१॥
समुद्रवलयांकित तीर्थे असतीं पावन ।परी ऐसें महिमान नाहीं कोठें ॥२॥
ऐसा नामघोष आनंद सोहळा । न देखे आणिके स्थळां माझे नेत्रीं ॥३॥
एका जनार्दनीं पंढरीवाचुनी । आनंद माझे मनीं नाही कोठें ॥४॥
भावार्थ
सागरतीरावरील अनेक पवित्र तीर्थक्षेत्रे या भरत खंडांत आहेत. परंतू भीमातीरी जमणारा असा संतमेळावा, विठ्ठ नामाचा असा जयघोष, असा आनंदसोहळा इतर क्षेत्रीं पहावयास मिळत नाही. असा पंढरीचा. महिमा एका जनार्दनीं या अभंगात वर्णन करतात.
५६
सारूनी दृष्य देखतां जालीसे ऐक्यता । पाहे कृष्णनाथा पंढरिये ॥१॥
कर ठेउनी कटीं बुंथी वाळुवंटीं । वैजयंती कंठीं आती माझी ॥२॥
एका जनार्दनीं शरण त्याची कृपा पूर्ण । पाहतां पाहतां मन. हारपलें ॥३॥
भावार्थ
सभोवतालचे सारे दृष्य विश्र्व बाजूला सारून भीमेच्या वाळवंटी कर कटीवर ठेवून उभा असलेला, कंठी वैजयंती माळ परिधान केलेला कृष्णनाथ पाहिला आणि त्याच्याशी मन एकरुप झाले. मनाचे मनपण हरपून गेले. पूर्ण कृपा झाली. असा विलक्षण अनुभव या अभंगात एका जनार्दनीं सांगतात.
५७
देव भक्त उभे दोन्ही एके ठायीं । चला जाऊं पायीं तया गावा ॥१॥
आवडीचा हेत पुरेल मनाचा । उच्चरितां वाचा विठ्ठल नाम ॥२॥
करूनियां स्नान पुंडलिकाची भेटी । नाचूं वाळवंटीं वाहूं टाळी ॥३॥
जाऊं महाद्वारीं पाहूं तो सांवळा । वोवाळूं गोपाळा निंबलोण ॥४॥
एका जनार्दनीं मनोरथ पुरे । वासना न नुरे मागे कांहीं ॥५॥
भावार्थ
देव आणि भक्त जेथें एके ठिकाणी उभे आहेत त्या पंढरीला पायीं चालत जावे, चंद्रभागेत स्नान करून भक्त पुंडलिकाचे दर्शन घ्यावें, महाद्वारी उभ्या असलेल्या सांवळ्या श्रीकृष्णाला निंबलोण उतरावे. विठ्ठल नामाचा गजर करुन वाळवंटी नाचावे. विठ्ठलाच्या नामाचा वाचेने उच्चार करतांच मनीचे सर्व हेतू पूर्ण होतील. एका जनार्दनीं म्हणतात, भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण होऊन कोणतिही वासना उरणार नाही.
५८
निंबलोण करूं पंढरीच्या सुखा । आणि पुंडलिका भक्तराया ॥१॥
परलोकींचे येती परतोनी मागुती । सर्व सुख येथें पहावया ॥२॥
अष्ट महासिध्दी जयाचिये द्वारीं । होऊनि कामारी वोळंगती ॥३॥
मुक्तिपद देतां न घे फुकासाठी । ते हिंडे वाळुवंटी दीनरूप ॥४॥
एका जनार्दनीं करी निंबलोण । विटेसहित चरण ओवाळावें ॥५॥
भावार्थ
पंढरीचे सुख, भक्तराज पुंडलिक यांना कुणाची नजर लागू नये म्हणून त्यांच्या वरुन लिंबू ओवाळून टाकावे. परलोकीचे देवदेवता हे सुख पहाण्यासाठीं पंढरीला येतात. अष्ट महासिध्दी पंढरीच्या महाद्वारीं लोळण घेतात. विठ्ठलभक्तांना पंढरीच्या सुखापुढे मुक्तीच्या वरदानाची चाड नाही. मोक्ष-मुक्ती चंद्रभागेच्या वाळवंटात दीनरुप होऊन हिंडतात. असे सांगून एका जनार्दनीं विठ्ठलाचे विटेसहित चरण ओवाळून लिंबलोण करतात.
५९
दक्षिण द्वारका पंढरी । शोभतसे भीमातीरीं ॥१॥
चला जाऊं तयां ठायां । वंदूं संतांचिया पायां ॥२॥
नाचूं हरूषे वाळुवंटीं । पुंडलिक पाहुनी दृष्टीं ॥३॥
पद्मतळें पाहतां डोळां । सुखसोहळा आनंद ॥४॥
एका जनार्दनीं विठ्ठल भेटी । लाभे लाभ दुणावें पोटीं ॥५॥
भावार्थ
भीमातीरी वसलेली अत्यंत शोभायमान पंढरीं नगरी दक्षिण द्वारका म्हणून ओळखली जाते. तेथें जाऊन संतांचे चरण वंदावे, भक्त पुंडलिकाला पाहून आनंदाने नाचावे. अशी ईच्छा व्यक्त करुन एका जनार्दनीं म्हणतात, पद्मतळें पाहताना सूखसोहळा पाहिल्याचा आनंद मिळतो. विठ्ठल दर्शनाने हा आनंद द्विगुणित होऊन पोटांत मावेनासा होतो.
६०
आम्ही मागतो फुकाचें । तुम्हां देतां काय वेंचे ॥१॥
संतसंग देई देवा । दुजा नको कांहीं गोवा ॥२॥
पंढरीसी ठाव द्यावा । हेंचि मागतसें देवा ॥३॥
एका जनार्दनीं मागत । तेवढा पुरवी मनींचा हेत ॥४॥
भावार्थ
या अभंगात एका जनार्दनीं संतसंग द्यावा आणि पंढरीत निवासासाठी ठिकाण द्यावे अशी मागणी पांडुरंगाच्या चरणी शरणागत भावाने करीत आहेत. ही मागणी अत्यंत अल्पमोलाची असून ती पुरवण्यात कांही मोल खर्च करावे लागणार नाही तरी विठुरायाने मनीचा हा हट्ट पुरवावा असे ते आर्ततेने सांगतात.
६१
तुमचे देणे तुमचे देणें । नको वैकुंठ हें पेणे ॥१॥
नानामतें मतांतर । अंतर गोवूं नये तेथ ॥२॥
पेणें ठेवा पंढरीसी । अहर्निशीं नाम गाऊं ॥३॥
भाळे भोळे येती संत । बोलूं मात तयांसी ॥४॥
चरणवंदीन साचें । एका जनार्दनीं म्हणे त्यांचे ॥५॥
भावार्थ
श्रीहरीचे निवासस्थान वैकुंठ असून ते आवडत्या भक्तांना वैकुंठनिवास देवून सायुज्यमुक्ती प्रदान करतात. वैकुंठात नाना मते आणि मतभिन्नता आढळते. भोळ्या भाबड्या भक्तांची एकनिष्ठ भगवद् भक्ती वैकुंठात नाही, तेथे मन गुंतून पडत नाही. असे मत व्यक्त करुन एका जनार्दनीं म्हणतात, श्रीहरीने पंढरीस निवास केल्यास अखंड नामजप, संतांचे चरणवंदन आणि हितगुज होईल.
६२
पाहतां विश्राम सुखवस्ती धाम । पंढरीं पुण्यग्राम भूमीवरी ॥१॥
जावया उद्वेग धरिला माझ्या मनें । उदंड शहाणें तये ठायीं ॥२॥
एका जनार्दनीं मानिला विश्वास । नाहीं दुजी आस पायांविण ॥३॥
भावार्थ
पंढरी ही सुखाची वस्ती असून मनाचे विश्रांती स्थान आहे. भुतलावरील पुण्यक्षेत्र असून अनेक शास्त्री, पंडित , संत पंढरींत निवास करतात. या वचनांवर विश्वास ठेवून पंढरीस जाण्याचा हट्ट घेतला, असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, पांडुरंगाच्या चरणांशिवाय मनाला कोणतिही आस नाही.
६३
येणें पुरतें सर्व काज । विश्वास हा जाहला मज
सांपडलें तें निज । बहुकाळाचें ठेवणें ॥१॥
केला पुंडलिकें उपकार । दाविला सोपा मार्ग निर्धार
जडजीवां उध्दार । नाममात्रे एकाची ॥२॥
तुटलीं बंधने । मागा पाहा अनुभवणें एका
जनार्दनीं म्हणे । धन्य वास पंढरिये ॥३॥
भावार्थ
भक्त पुंडलिकाने सर्व भक्तांना भगवंत भक्तिचा सोपा मार्ग दाखवला. विठ्ठलाच्या नामाचा जप करून जड जीवांचा उध्दार होतो, जन्म-मरणाची बंधने तुटून जातात. हे पटवून देऊन भाविकांवर मोठे उपकार केले आहेत. पंढरीत बहुकाळाचा ठेवा सापडला, जीवनाचे सार्थक झाले, असा विश्वास निर्माण झाला. पांडुरंगाचे दर्शन घ्यावें, मनातिल ईच्छा सांगावी आणि मनोकामना पूर्ण झाल्याचा अनुभव घ्यावा असे एका जनार्दनीं म्हणतात.
६४
आशा धरुनि आलों येथवरी
पाहतां पंढरी पावन झालों ॥१॥
आलीया जन्माचें सुफळ झालें काज ।
दृष्टी गरूडध्वज पहातांचि ॥२॥
एका जनार्दनीं पावलों विश्रांती ।
पाहतां विठ्ठलमूर्ती भीमातटीं ॥३॥
भावार्थ
पंढरींत विठ्ठल मंदिरावरील गरूडध्वज पाहतांच आशा धरुन पंढरीला आल्याने पावन झालो, जन्म सुफळ झाल्याचे समाधान वाटले. भीमा तटावरील पांडुरंगाची मूर्ती पाहून मनाला अपूर्व शांतीचा अनुभव आला असे एका जनार्दनीं या अभंगात वर्णन करतात.
६५
श्रीमुखाचें सुख पाहतां पाहतां ।
नयन तत्वतां वेधलें माझें ॥१॥
सांवळा सुंदर कटीं ठेवुनी कर ।
रूप तें नागर भीमातीरीं ॥२॥
नित्य परमानंद आनंद सोहळा ।
सनकादिक या स्थळां येती जाती ॥३॥
वैष्णवांचा थाट टाळ घोळ नाद ।
दिंड्या मकरंद हर्ष बहु ॥४॥
सन्मुख ती भीमा वाहे अमृतमय नीर ।
जडजीवां उध्दार स्नानमात्रें ॥५॥
एका जनार्दनीं मुक्तीचें माहेर ।
क्षेत्र तें साचार पंढरपूर ॥६॥
भावार्थ
पंढरपूर या धार्मिक क्षेत्राचे वर्णंन करतांना. एका जनार्दनीं म्हणतात, भीमा तटावरील सावळ्या सुंदर हरीचे श्रीमुख पाहतांना डोळे तेथे खिळून राहातात. परमानंदाचा अनुभव येतो. पंढरीचा नित्य आनंदाचा सोहळा पाहण्यासाठी सनकादिक ऋषी या क्षेत्रीं येतात. वैष्णवांचा मेळा टाळांच्या निनादांत विठ्ठलनामाचा जयघोष करतात. दिंड्या पताकांची शोभा रमणीय असते. भीमेच्या अमृतमय प्रवाहात स्नान करून जडजीवांचा उध्दार होतो. पंढरपूर हे मुक्तिचे माहेरघर आहे.
६६
जन्मासी येऊनि पहा रे पंढरी ।
विठ्ठल भीमातीरीं उभा असे ॥१॥
ठेविले चरण दोन्ही विटेवरी ।
आलियांसी तारी दरूशनें औएका ॥२॥
पंचक्रोशी प्राणी पुनीत पैं सदा ।
ऐशी ही मर्यादा पंढरीची ॥३॥
एका जनार्दनीं कीर्तनगजर ।
ऐकतां उध्दार सर्व जीवा ॥४॥
भावार्थ
भीमातीरावर सम चरण विटेवर ठेवून उभा असलेला परमात्मा पांडुरंग केवळ दर्शनाने भाविकांना संसार सागरातून तारुन नेतो. पंढरीच्या पंचक्रोशीचे सर्व भक्त पावन होतात असे या तीर्थक्षेत्राचे महात्म्य सांगितले आहे. एका जनार्दनीं म्हणतात, पंढरीतील कीर्तनाचा गजर श्रवण केला तरी जीवांचा उध्दार होतो.
६७
निर्धारितां सुख पंढरीसी आहे ।
म्हणोनि उभारिती बाह्या वेदशास्त्रें ॥१॥
साधन पसारा न करी सैरावैरा ।
जाय तूं निर्धारा पंढरिये ॥२॥
एका जनार्दनीं धरुन विश्वास ।
विठोबाचा दास होय वेगें ॥३॥
भावार्थ
वेदशास्त्रे दोन्ही हात उभारून घोषणा करतात की, भावभक्ती आणि श्रध्देने मिळणारे अमाप सुख पंढरींत आहे. कोणत्याही वैदिक उपचारांचे स्तोम पंढरींत नाही. केवळ भागवत धर्मावर विश्वास ठेवून विठोबाचा अनन्य भक्त व्हावे असे एका जनार्दनीं या अभंगातून सुचवतात.
६८
स्वहित हित विचारीं मानसीं । कां रे नागविसी देहासी या ॥१॥
सावधान होई पाहे बा पंढरी । धरीं तूं अंतरीं संतसंग ॥२॥
नको पडूं फेरी चौर्यांयशी आवृत्ती । गाय तूं कीर्ती वैषणवांची ॥३॥
तरले बहुत तरती भरंवसा । विश्वास हा बापा धरीं ऐसा ॥४॥
सुगम सोपा चुकती तेणें खेपा । एका जनार्दनीं जपा विठ्ठलनाम ॥५॥
भावार्थ
मनांत स्वहिताचा विचार करुन देहाला क्लेश न देतां सावधान होऊन, संतसंगतीची ईच्छा चित्तात धारण करुन पंढरीची वाट धरावी. वैष्णवांचे गुणगान करुन त्यांची किर्ति वाढवावी. संतसंगतीने अनेक भक्त मोक्षपदास पोचले याचा विश्वास धरुन विठ्ठल भक्तीचा सोपा सुगम मार्ग स्विकारावा. असा उपदेश करून एका जनार्दनीं म्हणतात, विठ्ठलनामाच्या जपाने चौर्यांशी लक्ष योनीच्या फेर्यातून सुटका होते.
६९
करा करा लागपाठ । धरा पंढरीची वाट ।
पुंडलिकाची पेठ । सोपी आहे सर्वांसी ॥१॥
नाहीं कोठें गोवा गुंती । दुजा नको रे सांगाती ।
एक चित्तवृत्ति । दृढ करी मानसीं ॥२॥
नको माझें आणि तुझें । टाकी परतें कीं रे वोझैं ।
संतचरण रज । सेवीं कां रे आदरें ॥३॥
तुटतीं भक्तीजाळ गुंती । सहज होतसे विरक्ति ।
एका जनार्दनीं प्रीती । धरा संतचरणीं ॥४॥
भावार्थ
पंढरी ही भक्त पुंडलिकाची पेठ सर्वांसाठीं अत्यंत सुगम, सोपी आहे. येथें जातांना कोणी सांगाती, सखासोबती यांची गरज नाहीं. मनाचा पूर्ण निश्चय करुन, सगळ्या चित्तवृत्ती दृढ करुन आणि मी तूं पणाचे ओझे बाजूला सारून संतचरणांची माती आदराने मस्तकीं धारण करावी. त्या मुळे संसारातिल गुंता सुटून सहज विरक्ती येते. असे एका जनार्दनीं म्हणतात.
७०
श्री पांडुरंगाचें दरूशन । वास पंढरीसी जाण ।
कोटी यागांचे पुण्य । तया घडे नित्याची ॥१॥
हाचि माना रे विश्वास । धरा संतचरणीं निजध्यास ।
मोक्षाचा सायास । न लगे कांहीं अणुमात्र ॥२॥
न रिघा तयांचे हव्यासें । साधनाचे नको फांसे ।
कीर्तन सौरसें । प्रेमें नाचा रंगणीं ॥३॥
नका माझें आणि तुझें । टाका परतें उतरूनी वोझें ।
एका जनार्दनीं सहजे । विठ्ठलनामें मुक्त व्हां ॥४॥
भावार्थ
पंढरीचा निवास आणि पांडुरंगाचे दर्शन या मुळे कोटी यागांचे पुण्य लाभते असा विश्वास धरुन संतसहवासाचा ध्यास धरल्यास मोक्ष मिळवण्यासाठी वेगळे सायास करण्याची गरज नाही. मोक्षमुक्तीचा हव्यास धरुन योग याग तप यांच्या फासांत गुंतून जाण्यापेक्षां मी तूं पणाचे ओझे फेकून कीर्तनरंगी रंगून भक्तीप्रेमाने विठ्ठलनामाच्या गजरांत आनंदाने नाचावें आणि मुक्त व्हावे असे एका जनार्दनीं सांगतात.
७१
देशविरहीत काळासी अतीत । ते देवभक्त पंढरिये ॥१॥
जाऊनियां कोणी पहा । देवाधिदेवा विठोबासी ॥२॥
जन्ममरणाचे तुटतील फांसे । पाहतां उल्हासें देवभक्तां ॥३॥
एका जनार्दनीं विटेवरी निधान । लेवुनी अंजन उघडे पहा हो ॥४॥
भावार्थ
देश कालाच्या मर्यादा ज्यांना नाहीत असे देव-भक्त पंढरीत उभे आहेत. देवाधिदेव विठोबा कोणीही पाहूं शकतो. उल्हसित अंत;करणाने दर्श़न घेतल्यास जन्ममरणाची बंधने तुटून पडतात. प्रेमभक्तीचे अंजन घालून विटेवरील पांडुरंग रुपी निधान डोळ्यांत साठवावें असे एका जनार्दनीं या अभंगात सुचवतात.
७२
भाव धरूनी शरण येती । तयां मोक्ष सायुज्यप्राप्ती ।
ऐसी वेद आणि श्रुती । गर्जतसे सादर ॥१॥
म्हणोनी न करा आळस । सुखे जा रे पंढरीस ।
प्रेम कीर्तनाचा रस । सुखें आदरें सेविजे ॥२॥
पाहतां नीरा भीवरा दृष्टीं । स्नानें वास त्यां वैकुंठीं ।
पूर्वजही कोटी । उध्दरती सर्वथा ॥३॥
एका जनार्दनीं सांगे । भाक दिधली पांडुरंगे ।
धन्य संचित जें भाग्य । तेंचि योग्य अधिकारी ॥४॥
भावार्थ
भक्तिभाव धरुन जे परमेश्वराला शरण येतात त्यां भाविकांना मोक्ष प्राप्त होऊन सायुज्यमुक्ती मिळते. पुनरपि जन्म घ्यावा लागत नाही. असे वेद, श्रुती आदराने गर्जून सांगतात. नीरा भीमेचा पावन संगमांत स्नान केल्याने वैकुंठ पदाची प्राप्ती होते, पूर्वजांचा उध्दार होतो. एका जनार्दनी म्हणतात, ज्या भाग्यवंताचे पुण्य संचित असेल ते पंढरीच्या सुखाचे अधिकारी होतात, ते धन्य होत असे प्रत्यक्ष पांडुरंगाचे वचन आहे तेव्हां आळस झटकून सुखाने पंढरीस जावे.
७३
मार्ग ते बहुतां आहेत । सोपा पंथ पंढरीचा ॥१॥
येचि मार्गे सुखें जातां । हरे संसारिची चिंता ॥२॥
मार्गी नाही गोवा -गुंती । पाहतां निवृत्ती क्रोधकामां ॥३॥
एका जनार्दनीं सोपें वर्म । आहे ते सुधर्म सर्वांसीं ॥४॥
भावार्थ
परमात्म प्राप्तीचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत परंतू पंढरीचा भगवद्भक्तीचा पंथ सुगम असून या मार्गाने संसार चिंतेचे हरण होते, कामक्रोध पळून जातात. मनातिल संशयाचे जाळे नाहिसे होते. सर्वांसाठी भागवत धर्म आचरणास सहजसुलभ आहे असे एका जनार्दनीं प्रतिपादन करतात.
७४
करूनी निर्धारा । जाय जाय पंढरपुरा ॥१॥
उणें पडो नेदी कांहीं । धांवे देव लवलाहीं ॥२॥
संकट कांहीं व्यथा । होऊं नेदी सर्वथा ॥३॥
शंख चक्र घेऊनी करीं । एका जनार्दनीं घरटी करी ॥४॥
भावार्थ
भाविकांनी मनाचा निर्धार करुन पंढरीस जावें, तेथें कशाचीच कमतरतां नाही. भक्तांची संकटे, व्यथा दूर करण्यासाठी देव शंख, चक्र घेउन त्वरेने धावत येऊन रक्षण करतो असे एका जनार्दनीं सांगतात.
७५
पुंडलीक म्हणतां वाचें । पाप जातें रे जन्माचं ।
जिहीं देखिलें पद याचें । धन्य भाग्याचे नर ते ॥१॥
जाती पंढरीसी आधी । तुटे तयांची उपाधी ।
ऋध्दि सिध्दी मांदी । तिष्ठतसे सर्वदा ॥२॥
भुक्ति मुक्ति धांवती मागें । आम्हां अनुसरा वेगें ।
ऐसे म्हणोनि वेगें । चरणीं मिठी घालिती ॥३॥
शरण एका जनार्दनीं । विटे उभा मोक्षदानीं ।
लागतां तयाचे चरणीं । पुनरावृत्ती न येतीं ॥४॥
भावार्थ
भक्त पुंडलिकाच्या नामाच्या उच्चाराने जन्माच्या पापाचे परिमार्जन होते, भाग्यवान भाविकांनाच पुंडलिकाचे चरणदर्शन घडते. जे भक्त पंढरीची नित्यनेमाने वारी करतात त्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण होते , त्यांना ऋध्दि सिध्दी प्राप्त होतात. भुक्ति मुक्ति चरण वंदन करुन त्यांचा अंगिकार करण्याची विनंती करतात असा पंढरीचा महिमा सांगून एका जनार्दनीं म्हणतात, मोक्ष देणारा परात्पर परमात्मा विटेवर उभा आहे , त्याच्या चरण-स्पर्शाने पुनरपि जन्मास यावे लागत नाही.
७६
विठ्ठल देवाधिदेवो । भक्तजनांचे निवारी बिहो ।
तो पंढरीचा रावो । विटे उभा ठाकला ॥१॥
मना लागो त्याचा छंद । निरसोनि भेदाभेद ।
अवघाचि गोविंद । ठसावें हदयीं ॥२॥
स्नान केल्या चंद्रभागे । पातकें नासतील वेगें ।
संकल्प विकल्प त्याग । दरुशन घेतांचीच॥३॥
ऐसा घडतां हा नेम । तयापाशीं पुरुषोत्तम ।
एका जनार्दनीं काम । देव करी स्वयें अंगें ॥४॥
भावार्थ
भक्तजनांचा निर्वाह चालविणारा देवाधिदेव विठुराणा पंढरींत विटेवर उभा आहे. मी तूं पणाचे, उच्च-नीचतेचे जाती-पातीचे सारे भेदाभेद विसरुन या गोविंदाला हदयांत धारण करावा, मनाला त्याचा छंद लागावा . चंद्रभागेच्या पाण्यांत स्नान करतांच सर्व पातके समूळ नाहीशी होतील. भक्त पुंडलिका सह पांडुरंगाचे दर्शन घेतांच मनातील सर्व संशय, संकल्प, विकल्प विलयास जातील. तीर्थस्नान व चरणदर्शन हा नित्यनेम केल्यास पुरुषोत्तम श्रीहरीचा निरंतर सहवास लाभेल, त्या भक्तांचे सर्व मनोरथ देव पूर्ण करील अशी ग्वाही एका जनार्दनीं या अभंगात देतात.
७७
जाणत्या नेणत्या एकचि ठाव । तेणेंही भजावा पंढरीरावच्च ॥१॥
नका पडूं आणिका भरी । तणें फेरी चौय्रांशीची ॥२॥
लागा पंढरीच्या वाटे । तेणे तुटे बंधन ॥३॥
अनुभवें अनुभव पाहां । येच देहीं प्रत्क्षच्॥४॥
एका जनार्दनीं प्रचीत । विठ्ठल नामें. मुक्त सत्य ॥५॥
भावार्थ
वेद शास्त्रे जाणणारे पंडित आणि भोळी भाबडी भक्ति करणारे भाविक यांनी एका पंढरीनाथाचे भजन कीर्तन करावे योग, याग, तप या सारख्या साधनांच्या भरीस पडू नये. पंढरीची वाट धरुन संसार बंधनातून मुक्त व्हावे. याच देहीं या भगवद्भक्तीचा प्रत्यक्ष अनुभव घेउन पहावा. विठ्ठल नामाच्या सत्यतेची प्रचिती घ्यावी. असे एका जनार्दनीं या अभंगातून सुचवतात.
७८
रमेसह पंढरी आला । येऊनि भेटला पुंडलिका ॥१॥
म्हणे उभारूनि हात । तरतील नामें महापतित ॥२॥
नका कांहीं आटाआटी । योग यागांची कसवटी ॥३॥
ब्रह्मज्ञान न साधे लोकां । मुखीं धोका विठ्ठला ॥४॥
शरण एका जनार्दनीं । सांगे वचनीं पुंडलिक ॥५॥
भावार्थ
लक्ष्मी सह विष्णु पंढरींत आले आणि भक्तराज पुंडलिकाला भेटलें. दोन्ही कर उभारून भक्तांना ईच्छादान दिले. योगयाग, दानधर्म, तप या साधनांचा खटाटोप न करता केवळ नामजपाने महापतित तरुन जातील. सामान्य जनांना ब्रह्मज्ञान साधत नाही. वेदांच्या ऋचा गाताना उच्चरांत चुकांमुळे धोका संभवतो. असे एका जनार्दनीं म्हणतात.
७९
प्रेमळांसी विश्रांतिस्थान । महा मुक्ति कर जोडोन ।
ऋध्दी सिध्दी वोळंगण । तिष्ठती जाण पंढरिये ॥१॥
धन्य धन्य विठ्ठलराव । उभा देवांचा तो देव ।
दरूशनें निरसे भेव । यम काळ दूताचे ॥२॥
नाम न विटेचि रसना । सुलभ हा पंढरीराणा ।
एका शरण जनार्दना । सदा वाचे उच्चारी ॥३॥
भावार्थ
पंढरी ही प्रेमळ भाविकांचे विश्रांतिस्थान असून मोक्ष मुक्ति येथे दोन्ही कर जोडून उभ्या राहतात. ऋध्दी सिध्दी पंढरीच्या दारी लोटांगणी येतात. देवांचा देव विठ्ठल येथे यमदूतांपासून अभयदान देत उभा आहे. पंढरीच्या विठ्ठल नामरसाला भाविकांची रसना कधीच कंटाळत नाही एका जनार्दनीं म्हणतात, वाचेने नामजप करणार्या भाविकांना हा पंढरीराणा सहजसुलभ आहे.