१
चंद्रहुनी शीतळ रवीहुनी सोज्वळ । तेणे मज केवळ वेधियेलें ॥१॥
वेध कैसा मज लागला वो बाई ॥ध्रु०॥
अमृताहुनी स्वादू गगनाहुनी मृदु । रुपेविण आनंदु देखिला बाई ॥२॥
एका जनार्दनी आनंदु परिपूर्ण । काया वाचा मने वेधिलें वो बाई ॥३॥
भावार्थ
चंद्र किरणापेक्षा शीतळ, सूर्यनारायणाच्या तेजापेक्षा निर्मळ अशा श्रीहरीच्या रूपाने चित्त वेधले जाते, अमृतापेक्षा गोड, आकाशापेक्षा तरल, इंद्रियजन्य सुखाशिवाय निरागस आनंद अनुभवास आला असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, श्रीहरीचे दर्शन म्हणजे काया वाचा मनाला भरून टाकणारा परिपूर्ण आनंद!
२
गौळणींचा थाट निघाला मथुरेला हाटालागीं । तें दखोनि जगदीश धांवला गोप घेऊनी वेगीं ॥१॥
कान्हया सरसर परता नको आरुता येऊन । तुझा संग झालिया मग मी घरा कैसी जाऊं ॥ध्रु०॥
सासुरवासिनी आम्ही गौळणी जाऊं दे रहे हरी । बहु वेळ लागतां सासु सासरे कोपतील घरी ॥२॥
आम्ही बहुजणी येकला तूं शारंगपाणी दिससी येथें । हृदयमंदिरीं ठेऊनी तूंतें जाऊं मथुरापंथें ॥३॥
एका जनार्दनी ब्रह्मवदिनी गोपिया वरवंटा । कृष्णपदीं त्या लीन झाल्या पूर्णपणें तन्निष्ठा ॥४॥
भावार्थ
सर्व मिळून गौळणी मथुरेच्या बाजारीं जाण्यासाठीं निघाल्या हे पाहून जगदीश श्रीकृष्ण आपले गोप सवंगड्यांना गोळा करून वेगानें निघाला. त्या सासुरवासिनी गौळणी कान्हाला परत मागे फिरण्याची , वाट न अडविण्याची विनंती करतात. घरी सासुसासरे प्रतिक्षा करीत असून विलंब झाल्यास क्रोध करतील असे त्या गौळणी परोपरीने सांगतात. शारंगपाणीला हृदयमंदिरी ठेवून मथुरेची वाट चालू लागतात असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, कृष्णपदी शरणागत झालेल्या त्या गोपिका एकनिष्ठपणे भक्तिभावाने समरस झाल्या आहेत.
३
ऐक ऐक सखये बाई नवल मी सांगून काई । त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेसी म्हणतो आई ॥१॥
देवकीनें वाईला यशोदेने पाळिला । पांडवांचा बंदीजन होऊनियां राहिला ॥२॥
ब्रह्मांडाची सांठवण योगीयाचें निजधन । चोरी केली म्हण्ऊनी उखळासी बंधन॥३॥
सकळ तीर्थें जया चरणीं सुलभ हा शूलपाणी ।राधिकेसी म्हणे तुझी करीन वेणीफणी ॥४॥
शरण एका जनार्दनी कैंवल्याचा मोक्षदानीं । गाई गोप गोपीबाळां मेळवीले आपुलेपणी॥५॥
भावार्थ
एक गौळण आपल्या सखीला नवलाची गोष्ट सांगते कीं, तिन्ही लोकांचा स्वामी श्रीहरी यशोदेला आई म्हणतो. देवकीने नऊ महिने गर्भांत जतन केला, यशोदेने गोकुळात पालनपोषण केले. पांडवांच्या प्रेमभक्ती बंधनांत बंदी बनून राहिला. तिन्ही ब्रह्मांड ज्याच्या रुपांत साठवलेली आहेत, जो योगीजनांचे परम भाग्य आहे अशा बाल कृष्णाला चोरीच्या निमित्ताने उखळाला बांधून ठेवलें. सगळी तीर्थे ज्याच्या चरण स्पर्शाने पावन होतात तो शूलपाणी आवडीनें राधिकेची वेणीफणी करतो. जनार्दन स्वामींच्या पायी शरणागत असलेले एका जनार्दनी म्हणतात, कैवल्याचे दान देवून जो जन्म बंधनातून मुक्त करतो तो श्रीहरी गोकुळातील गोप गोपिकांना आपलेपणाने हृदयाशी कवटाळतो.
४
कृष्णमूर्ती होय गे कळों आली सोय गे । प्राणाचाही प्राण पाहतां सुख सांगू काय गे ॥१॥
तुळशी माळ गळां गे कस्तुरीचा टिळा गे । अर्धांगी रुक्मिणी विंझणें वारित गोपी बाळा गे ॥२॥
पीतांबराची कास गे कसिली सावकाश गे । नारद तुंबर गायन करती पुढें निजदास गे ॥३॥
भक्त कृपेची माय गे वोळखिली विठाई गे । एका जनार्दनी विटे जोडियेले पाय गे ॥४॥
भावार्थ
एकनिष्ठ भक्तांना प्राणाहून प्रिय असलेली कृष्णाची मूर्ती पाहून जीवनाचे सार्थक झाले असे वाटते, सारे सुख दाटून येते. राणी रुक्मिणी सह विराजमान असलेल्या श्री कृष्णाच्या कपाळावर कस्तुरीचा टिळा आणि गळ्यांत तुळशीची माळ शोभून दिसते आहे . कमरेला पिवळा पीतांबर कसला आहे. गोपी पंख्याने वारा घालीत आहेत तर नारद तुंबर पुढे उभे असून गायन करीत आहेत. भक्तांवर कृपेची सावली धरणारी विठाई पाहून एका जनार्दनी विटेवरील कृष्णमूर्ती पुढे नतमस्तक होतात.
५
देखिला अवचिता डोळां सुखाचा सागरु । मन बुध्दी हारपली झाले एकाकारु ।
न दिसे काया माया कृष्णीं लागला मोहर ॥१॥
अद्वया आनंदा रे अद्वया आनंदा रे । वेधियेल्या कामिनी अद्वया आनंदा रे ॥२॥
खुंटलें येणे जाणें घर सासुर । नाठवे आपपर वेधियेलें सुंदर ।
आंत सबाह्य व्यापिलें कृष्ण परात्पर नागर वो ॥३॥
सावजी कळलें आतां लोधलें निर्गुणा ।, एका जनार्दनी कृपा केली परिपूर्णा ।
गगनीं गिळियेलें उणें उरी नुरेचि आपणा ॥४॥
भावार्थ
श्री कृष्णरुपाने सुखाचा सागर अचानक सामोरा आला. मन, बुध्दी हरपून केवळ एकाकार कृष्णरुप सगळीकडे भरून राहिले. देहाचे, संसाराचे भान विलयास गेले. कृष्ण रुप पाहून मन मोहरून आलें. अनुपमेय आनंदाने मन वेधले. आपपर भाव नाहीसा झाला, घर, संसाराचा विसर पडला. आंतबाहेर सर्व विश्व कृष्णरुप व्यापून राहिलें. सद्गुरू कृपेने निर्गुण स्वरुपाचा साक्षात्कार झाला. एका जनार्दनी या अनुभवाचे साक्षात दर्शन या अभंगात कथन करतात.
६
दिव्य तेज झळकती रत्नकीळा फांकती । अगणित लावण्य तेज प्रभा दिसती गे माये ॥१॥
कानडा वो सुंदर रुपडा गे । अंतरीं बाहेरीं पाहतां दिसे उघडा गे ॥२॥
आलिंगनालागीं मन उताविळ होय । क्षेम देतां माझें मीपण जाय ॥३॥
मागें पुढें चहूंकडे उघडें पाही । पाहावयासी गेलें मजला ठक पडले बाई ॥४॥
बाहेरी पाहूं जातां अंतरीं भासे । जे जें भासें तें तें येकींयेक समरसें ॥५॥
एका जनार्दनी जिवीचा जिव्हाळा । एकपणें पाहतां न दिसे दृष्टीवेगळा ॥६॥
भावार्थ
या अभंगात एका जनार्दनी कृष्ण रुपाचे वर्णन करतांना म्हणतात, कृष्ण मुखावर दिव्य तेज झळकत आहे ते अगणित रत्नांच्या तेजाप्रमाणे दैदिप्यमान आहे. त्याचा कानडा सुंदर रूपडा मन मोहून टाकतो आणि आलिंगन देण्यासाठी जीव उताविळ होतो. प्रेमभराने मिठी घालतांच माणसाचे मीपण संपून जाते. आंत बाहेर सगळीकडं ते च कृष्णरुप भरून राहिले आहे असे वाटते. बाहेर पाहू गेल्यास तो अंतरांत प्रगट झाल्याचा भास होतो, मन कोड्यांत पडते. मागे, पुढें चहूकडे ते रुप नजरेसमोर दिसते, मन तेथे समरस बनते. जीवाला वेड लावते. चित्त एकाग्र बनते.
७
गोकुळी लाघव दावितो चक्रपाणी । भोवत्यां वेष्टित बैसल्या गौळणी ।
मध्यें सुकुमार सावळा शारंगपाणी । चिमणा पितांबर पिवळा ।
गळां वैजयंती माळा । घवघवित घनसांवळा पाहे नंदाराणी ॥१॥
नाच रे कृष्णा मज पाहूं दे नयनी ॥ध्रु०॥
नाचतो सांवळा सुंदर निमासुर वदन । वाळे घोळ घागरियांचा झणत्कार पूर्ण ।
आकर्ण नयन सुहास्य वदन पाहुनी भुले मदन । हातीच्या मुद्रिका झळकती ।
क्षुद्र किंकिणी सुस्वर गाती । वाकी नेपुरे ढाळ देती ।
पहाती गौळणी ॥२॥
सप्तही पाताळें नाचती हरिचिया छंदे । आकाश धरणी स्वर्गी देव नाचती आनंदे ।
गण गंधर्व देव सर्व हरिपदें । वैकुंठ कैलास नाचती ।
चंद्र सूर्य रसनायक दीप्ती । ऋषीमंडळ धाक तोडिती ।
अद्भुत हरिकरणी ॥३॥
नाचती हरिपदें चतुर्दशलोकपाळ । शेष वासुकी नाचती सर्वही फणीपाळ ।
परिवारेसी नाचती पृथ्वीचे भूपाळ । मेरु पर्वत भोगी नायक ।
वनस्पति नाचती कौतुक । वेदशास्त्र पुराण पावक ।
नाचत शूळपाणी ॥४॥
नाचती गोपाळ गोपिका सुंदर मंदिरे । उखळे जाती मुसळे पाळी आणि देव्हारे ।
धातुमूर्ति नाचू लागल्या एकसरे । गौळणी अवघ्या विस्मित ।
देहभाव हरपला समस्त । यशोदेसी प्रेम लोटत ।
धरिला धांउनी ॥५॥
शिणलासी नाचता आता पुरे करी हरी । विश्वरूप पाहतां गोपी विस्मित अंतरी ।
यशोदेनें कृष्ण घेतला कडियेवरी । एका जनार्दनी भक्तिभाव अनन्य भक्ता दावी लाघव ।
निज भक्तांचे काज सर्व । करितां शिण न मानीं ॥६॥
भावार्थ
गोकुळामध्ये चक्रपाणी आपल्या अवतार लीला दाखवतो. सगळ्या गौळणी गोलाकार बसल्या असून मध्ये सुकुमार, सावळा शारंगपाणी शोभून दिसत आहे. मेघाप्रमाणे सावळ्या रंगाचा, पिवळ्या रंगाचा पितांबर नसलेला, गळ्यात वैजयंती माळ घातलेल्या घनश्याम हरीकडे नंदराणी कौतुकाने पाहत आहे. कृष्णाचा नाच पहाण्यासाठी यशोदा आतुर झाली आहे. पायातील वाळे, घोळ यांच्या घंटानादाच्या तालावर सावळा, सुंदर हरी नाचत आहे. श्रीहरीचे विशाल नयन, हसरा चेहरा पाहून मदनालासुध्दा भूल पडते. श्रीहरीच्या हातातील अंगठ्या, पायातील पैंजणे यांच्याकडे गौळणींचे मन वेधले गेले आहे. आकाश, धरणी, सप्तपाताळे हरीच्या छंदी नाचत आहेत. स्वर्ग, वैकुंठ, कैलासामधील देव, गण, गंधर्व हरिपदांच्या तालावर नृत्य करतात. सारे ऋषीमंडळ, चंद्र-सूर्य श्रीहरीच्या या अद्भुत नृत्यात रंगून गेले आहे. शेष, वासुकी यांसह सर्व नागदेवता, चौदा भुवनांचे लोकपाळ, पृथ्वीवरचे सर्व भूपाळ (सम्राट) कैलासपती शिवशंकर परिवारासह या नृत्यानंदात मग्न आहेत. गोपाळ, गोपिका सुंदर मंदिरात नाचत आहेत. त्यांच्याबरोबर सर्व वनस्पती, वृक्षवेली कौतुकाने हर्षभरित होऊन डुलत आहेत. सजीव सृष्टीसह जडसृष्टीसुध्दा उखळे, जाती, मुसळे, पाळी, देव्हारा, धातुमूर्ती या आनंदात सहभागी झाली आहे. आश्चर्यचकित झालेल्या गौळणी देहभान विसरून गेल्या आहेत. अलोट प्रेमाने धावत जाऊन यशोदा श्रीहरीला कडेवर उचलून घेते. हे विश्वरूप दर्शन घेऊन गोपी धन्य होतात असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, एकनिष्ठ, अनन्य भक्तांसाठी श्रीकृष्ण असे लाघव दाखवतो, आपल्या भक्तांसाठी काम करतांना तो कधी थकत नाही.
८
प्रथममत्स्यावतारी तुमचे अगाध चरित्र । न कळे ब्रह्मादिका वैष्णव गाती पवित्र ॥१॥
उठोनि प्रात:काळीं गौळणी घुसळण घुसळिती । गाती कृष्णाचे पोवाडे हृदयीं परोपरीं ध्याती ॥२॥
द्वितीय अवतारीं आपण कच्छरूप झाला ।सृष्टि धरुनी पृष्ठीं शेवटीं सांभाळ केला ॥३॥
तृतीय अवतारीं आपण वराहरूप झाला । धरणी धरुनी दाढे हिरण्याक्ष वधिला ॥४ ॥
चतुर्थ अवतारीं आपण नरहरि रूप । रक्षुनि प्रल्हाद वधिला हिरण्यकश्यप ॥५॥
पांचवें अवतारीं आपण वामन झाला । बळी घालुनि पाताळीं शेखीं द्वारपाळ ठेला ॥६॥
सहावें अवतारीं आपण परशुराम झाला । धरुनी परशु हातीं सहस्रभुजा वध केला ॥७॥
सातवे अवतारीं आपण दाशरथी राम । वधोनी रावण कुंभकर्ण सुखी देव परम ॥८॥
आठवे अवतारी आपण वसुदेवाघरीं । वधोनि कंसादिक असूर मारिले भारी ॥९॥
नववे अवतारीं आपण बौध्दरूप झाला । धरूनियां मौन भक्ताघरीं राहिला ॥१०॥
दहावे अवतारीं आपण झालासें वारूं । एका जनार्दनी वण्रिला त्याचा वडिवारूं ॥११॥
भावार्थ
या अभंगात एका जनार्दनी श्री विष्णूच्या दशावताराचा अगाध महिमा वर्णन करतात. पहिल्या मत्स्यावतारांत श्रीहरीने अगाध लीलाचरित्र दाखवले जे ब्रह्मादिक देवांनासुध्दां कळले नाही. प्रात:काळीं उठून गौळणी लोण्याचे डेरे घुसळतांना कृष्णाचे पोवाडे गातात. दुसर्या अवतारांत कासवरुप धारण करून पाठीवर पृथ्वी धारण करून तिचा सांभाळ केला. तिसर्या अवतारांत वराहरुप घेऊन दाढेवर धरणी धरून हिरण्याक्ष राक्षसाचा वध केला. चवथ्या अवतारांत नरहरी रूप घेऊन हिरण्यकश्यपुचा वध करून भक्त प्रल्हादाचे रक्षण केले. पाचव्या अवतारांत वामन झाला आणि बळीला पाताळात धाडून शेवटी बळीचा द्वारपाळ झाला. सहाव्या अवतारांत परशु हतांत धरलेला परशुराम बनून सहस्रभुजाचा वध केला. सातव्या अवतार दाशरथी रामाचा असून रावण, कुंभकर्णाचा वध करून देवांची मुक्तता केली, देवांना परम सुखी केलें. आठव्या अवतार वसुदेवाचे घरीं जन्म घेऊन कंस, चारुण जरासंघ या राक्षसांचा संहार केला. नवव्या अवतरांत बौध्दरुप घेऊन, मौनरुप धारण करून भक्ताघरी राहिला. दहाव्या अवतारीं अश्वरुप धारण केले. या दशअवतारांचा महिमा एका जनार्दनी वर्णन करतात.