१
भावाचेनि भक्ती थोर । भावें तुटे येरझार ॥१॥
भावें अंकित देव भक्ताचा । वेदशास्त्र बोले वाचा ॥२॥
भावें गुरूशिष्य दोन्ही । भावयुक्त सर्व गुणीं ॥३॥
भावें जालें भक्तिपंथ । भावें पुरे मनोरथ ॥४॥
एका जनार्दनीं भाव । भावें दिसे देहीं देव ॥५॥
भावार्थ
भक्ताच्या अंतरातिल परमेश्वरा विषयी असलेल्या पुज्यभावाने निर्माण झालेली भक्ती थोर असते. या भावभक्तीने देव भक्ताचा अंकित होतो. वेदशास्त्रातिल ज्ञान भक्ताला अवगत होते. गुरूशिष्य दोघेही एकाच भक्तिभावाने समरस होतात. भक्ताचे सर्व मनोरथ पूर्ण होतात. भक्तिपंथाचा उत्कर्ष वाढीस लागतो. भक्ताच्या अंतरात देव प्रकट होतो. जन्म-मरणाच्या येरझारा थांबतात. असा पारमार्थिक अनुभव या अभंगात एका जनार्दनीं वर्णन करतात.
२
देव भुलला भावासी । सांडोनिया वैकुंठासी ॥१॥
उघडा आला पंढरपुरा । तो परात्पर सोइरा ॥२॥
पाहुनियां पुंडलीका । भुलला तयाच्या कौतुका ॥३॥
उभा राहिला विटेवरी । एका जनार्दनीं हरी ॥४॥
भावार्थ
परात्पर परमेश्वर भक्तांचा जिवाभावाचा सोइरा असून भक्तांसाठी वैकुंठ सोडून पंढरीला आला. भक्तराज पुंडलिकाच्या प्रेमळ भक्तिभावाला भुलून विटेवर समचरणीं उभा आहे असे एका जनार्दनीं म्हणतात.
३
प्रमें भक्तांची आवडी । म्हणोनियां धुतो घोडी ॥१॥
ऐसा प्रेमाचा भुकेला । सेवक जाहला बळीद्वारीं ॥२॥
उच्छिष्ट फळें भाल्लणीची । खाये साची आवडीनें ॥३॥
एका जनार्दनीं उदार । तो हा सर्वेश्वर विटेवरीं ॥४॥
भावार्थ
विटेवर उभा असलेला सर्वेश्वर भावभक्तिचा भुकेला आहे या प्रेमापोटी तो अर्जुनाचा सारथी होऊन त्याच्या रथाची घोडी धुतो. दैत्यराजा बळी याचा द्वारपाल होतो. शबरीची उष्टी बोरे आवडीनें चाखतो. भक्तिप्रेमाची ही उदाहरणे देऊन एका जनार्दनीं म्हणतात, हा विश्वेश्वर उदार हृदयीं आहे.
४
एका भावें कार्यसिद्धी । एका भावें तुटे उपाधी ।
एका भावें आधिव्याधी । जन्मजरा पाश तुटे ॥१॥
एका भावें करी भजन । एका भावें संतसेवन ।
एका भावें वेदवचन । पाळितां तुटे भवपीडा ॥२॥
एका भावें योगयाग । एका भावें तप अष्टांग ।
एका भावें द्वैत तें सांग । तेथें द्वैत नको बापा ॥३॥
एका भावें रिघे शरण । एका भावें एका जनार्दन ।
एका भावें धरीं चरण । कायावाचामनेंशीं ॥४॥
भावार्थ
भावभक्तिने संसारातिल सर्व संकटांचे निवारण होऊन कार्यसिद्धी होते. नामजपानें मन आणि देहाच्या आधिव्याधि, लयास जातात. जन्म आणि वार्धक्य ही बंधने तुटून पडतात. भावभक्तिने भजन केल्यास, संतांची सेवा केल्यास, वेदवचनांचे पालन केल्यास संसारातिल सर्व दु:खांचा निरास होतो. अष्टांग योग, याग, तप यामुळे चित्तातिल द्वैत भावना विलयास जाते. काया वाचा मनाने सद्गुरु चरणीं संपूर्ण शरणागत व्हावे असे एका जनार्दनीं अभंगाच्या अंतिम चरणांत सुचवतात.
५
योगी रिगाले कपाटीं । हटयोग साधिती आटी ॥१॥
परी तयांसी दुर्लभ । तो गोकुळीं जाहला सुलभ ॥२॥
यज्ञादिकीं अवदाना नये । तो गोपाळांचे उच्छिष्ट खाये ॥३॥
सदा ध्याती जपी तपी ज्यासी । तो नाचे कीर्तनीं उल्हासी ॥४॥
एका जनार्दनीं प्रेमळ । भोळ्या भाविकां निर्मळ ॥५॥
भावार्थ
अनेक हटयोगी गिरीकंदरी वास करून अटीतटीनें ध्यान साधनेने ज्याचे दर्शन घेण्याचा अट्टाहास करताना त्यांना हा श्रीहरी दुर्लभ असतो. तोच श्रीहरी गोकुळातिल निरागस गोपाळांना मात्र अत्यंत सुलभ होतो. यज्ञातिल अविर्भाग स्विकारण्यास जो नकार देतो तो गोपाळांचे उष्टे घास आननंदाने स्विकारतो. भक्तांच्या ध्यान साधनेचा, जपतप साधनेचा विषय असलेला भगवान कीर्तनांत आनंदाने नाचतो. एका जनार्दनीं म्हणतात, प्रेमळ, निर्मळ, भोळ्या भाविकांसाठी हा जगजेठी सदैव तत्पर असतो.
६
समसाम्य सर्वाभूतीं । ज्यांसी घडे भगवद्भक्ति ॥१॥
जालिया सद्गुरु कृपा । सर्व मार्ग होय सोपा ॥२॥
हृदयीं ठसतांचि भावो । प्रगटे देवाधिदेवो ॥३॥
भक्ता भावार्थ विकला । एका जनार्दनीं देखिला ॥४॥
भावार्थ
जो साधक सर्व व्यापक सृष्टींत एकच आत्मतत्त्व पहातो त्यालाच भगवंताची भक्ति घडते. सद्गुरुंची कृपा होतांच हा भक्तिमार्ग सोपा होतो. हृदयांत हा भक्तिभाव ठसला कीं, तेथें देवाधिदेव श्रीहरी प्रगट होतो. भक्त या भक्तिभावाने देवाला आपलासा करतो. असे या अभंगात एका जनार्दनीं सुचवतात.
७
झालिया गुरूकृपा सुगम । सर्वत्र ठावें परब्रह्म ॥१॥
तेथें नाहीं जन्ममरण । भवबंधन असेना ॥२॥
ऐसा धरितां विश्वास । काय उणें मग तयास ॥३॥
एका जनार्दनीं भाव । स्वये आपणचि होय देव ॥४॥
भावार्थ
जेव्हां साधकाला गुरूकृपेचा लाभ होतो तेव्हां त्याला सर्वत्र परब्रह्ममाचे अस्तित्व प्रत्ययास येऊ लागते. जेथे भवबंधन तुटून पडतात. जन्म -मरणाचे भय संपून जाते. साधक पूर्ण समाधानी, नि:शंक होतो. तो देवरूप होतो. असा विश्वास एका जनार्दनीं या अभंगात व्यक्त करतात.
८
भावेविण देव नयेचि पैं हातां । वाऊगें फिरता रानोरान १॥
मुख्य तें स्वरूप पाहिजे तो भाव । तेणें आकळे देह निसंदेह ॥२॥
संत समागम नाम तें पावन । वाचे नारायण हाचि भाव ॥३॥
एका जनार्दनीं सोपा मंत्र राम । गातां जोडे धाम वैकुंठाचे ॥४॥
भावार्थ
या अभंगात एका जनार्दनीं म्हणतात, उत्कट भावभक्ती शिवाय देव प्रसन्न होत नाही. त्यामुळे देह नि:संदेह होतो. संतांच्या सहवासांत मन पावन होते. वाचेने अखंड हरी नारायणाचा ध्यास लागतो. भाव हेंच भक्तिचे मुख्य स्वरूप आहे. राम हा दोन अक्षरांचा सोपा मंत्र असून या मंत्राच्या जपाने सायुज्यता मुक्तिचा लाभ होतो.
९
देवासी तों पुरे । एक तुळसीपान बरें ॥१॥
नाहीं आणिक आवडी । भावासाठीं घाली उडी ॥२॥
कण्या भाजी पान फळें खाय । न पाहे यातिकुळ स्वयें ॥३॥
प्रितीने दहीभात । उच्छिष्ट गोवळ्यांचे खात ॥४॥
भक्तिसुखे भुलला हरी । एकाजनार्दनीं निर्धारीं ॥५॥
भावार्थ
देव भावाचा भुकेला असून भावभक्तिने दिलेल्या एका तुळशी पत्राने सुध्दां तो प्रसन्न होतो. विदुरा घरच्या कण्या, द्रौपदीच्या थाळीतिल भाजीचे एक पान, गोपाळांच्या ताटातिल उष्टा दहीभात, शबरीची उष्टी बोरे, तो श्रीहरी जातीकुळाचा विचार न करता प्रेमाने खातो. एका जनार्दनीं सांगतात, भक्तिसुखाने भुलून हरी भक्तांचा अंकित होऊन राहतो.
१०
भावे करा रे भजन । भावें करा नामस्मरण ॥१॥
भावें जावें पंढरीसी । भावें नाहावें भीमरथीसी ॥२॥
भावें करा प्रदक्षिणा । भावे करा जागरणा ॥३॥
भावें व्रत एकादशी । एका शरण जनार्दनासी ॥४॥
भावार्थ
भावभक्तीने पंढरपूरला जावे, भीमेच्या पात्रांत स्नान करावे, विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घालावी. विठ्ठलाच्या भजनांत रंगून जावे. श्री हरीच्या नामस्मरणांत जागरण करून एकादशीचे व्रत करावे. असे एका जनार्दनीं या अभंगात सुचवतात.
११
पाउला पाउली चिंतावी माऊली । विठाई साऊली आदि अंतीं ॥१॥
नोहे परता भाव । नोहे परता भाव । आतुडेचि देव । हातीं मग ॥२॥
बैसलासे दृढ ह्रदयमंदिरीं । सबाह्याभ्यंतरीं कोंडोनिया ॥३॥
एका जनार्दनीं जडला विठ्ठल । नोहे तो निर्बळ आतां कधीं ॥४॥
भावार्थ
जीवनांत प्रत्येक पाऊल टाकतांना (कोणताही छोटा भोठा निर्णय घेताना) विठुमाऊलीचे चिंतन करावे. या शिवाय अन्य मार्ग नाही. या भावभक्तिने विठुमाऊली हृदयमंदिरांत स्थिर झाली कीं, अंतरांत आणि बाह्य सृष्टींत सर्वत्र हे आत्मतत्त्व भरून राहिले आहे याचा प्रत्यय येऊं लागतो. असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, विठ्ठल असा जिवाभावाशी जडला कीं, भक्त कधी हताश, निराधार होत नाही.
१२
भक्त देवातें भजती । देवे भक्ती धरी प्रीती ॥१॥
ऐसा एकमेकांचा ठावो । भक्ता अंगी देव पहा हो ॥२॥
अलंकार एक सुवर्ण । तैंसे नाही दुजेपण ॥३॥
एक आधीं एक पाठीं । एका जनार्दनीं राहाटी ॥४॥
भावार्थ
भक्त देवाचे भजन करतात, देव भक्तावर प्रेम करतो. देव आणि भक्त यात आपुलकीचे नाते निर्माण होते. देव आणि भक्त एकरूप होतात. जसे अलंकारातून सोने वेगळे करता येत नाही. एक आधी आणि एक पाठी, नाण्याच्या दोन बाजू! हीच जग रहाटी आहे असे एका जनार्दनीं सुचवतात.
१३
एक एकाच्या भावा । गुंतुनी ठेले अनुभवा ॥१॥
प्रेम न समाये गगनीं । धन्य धन्य चक्रपाणी ॥२॥
उध्दरी पतिता । मोक्ष देतो सायुज्यता ॥३॥
एका शरण जनार्दनीं । उदार हा जगदानी ॥४॥
भावार्थ
देव आणि भक्त एकमेकांच्या भावबंधनात गुंतून पडतात. देव भक्तामधील प्रेमभाव गगनांत मावेनासा होतो. पतितांचा उध्दार करणारा चक्रपाणी धन्य होय. तो पतितांना सायुज्यता मोक्ष देतो. सर्व जगाचा स्वामी असलेला हा चक्रपाणी अतिशय उदार आहे. असे जनार्दन स्वामींना शरणागत झालेले एका जनार्दनीं या अभंगात सांगतात.
१४
आधीं देव पाठीं भक्त । ऐसें मागें आले चालत ॥१॥
हेहि बोलणेंचि वाव । मक्ता आधीं कैचा देव ॥२॥
भक्त शिरोमणी भावाचा देव लंपट झाला साचा ॥३॥
भक्तांसाठी अवतार । ऐसा आहे निर्धार ॥४॥
वडील भक्त धाकुला देव । एकाजनार्दनीं नाहीं संदेह ॥५॥
१५
जो जो कोणी भजनी बैसे । तेथे मी दिसे तैसाची ॥१॥
उपासनेचा निर्वाहो । सर्वांभूर्ती देवाधिदेवो ॥२॥
हो कां माझी प्रतिमा मूर्ति । अंतर्ज्योति मी वसे ॥३॥
तेथें करितां भावे भक्ति । एका जनार्दनीं मुक्ति तयासी ॥४॥
भावार्थ
जो साधक परमेश्वराच्या भजन साधनेंत रममाण होतो तेथे देव स्वता: प्रकट होतो. असा एकाग्र साधक सर्व भूतमात्रांत देवाचे अस्तित्व आहे हे जाणून घेण्याची कला आत्मसात करू शकतो. देवाच्या प्रतिमेंत त्या साधकाला अंतरंगातिल प्रकाशज्योतीचे दर्शन होते. एका जनार्दनीं म्हणतात, या उत्कट भावभक्तीने हा भक्त मोक्षपदाचा अधिकारी बनतो.
१६
जे भजती मज जैसे । मीही तया तैसा असे ॥१॥
जयां जैशी पैं वासना । मीहि तैसा होय जाणा ॥२॥
हो कां माझी प्रतिमा मूर्ति । आदरें करितां माझी भक्ति ॥३॥
शा मी जनीं असोनी निराळा । एकाजनार्दनीं अवलीला ॥४॥
भावार्थ
एका जनार्दनीं या अभंगात सुचवतात कीं, भक्त देवाचे जे स्वरूप मनांत धरून भजन साधना करतात, त्याच्या अंत:करणांत तो परमात्मा त्याच स्वरूपांत प्रथकट होतो व त्या साधकाला त्याच्या मनातील वासनेप्रमाणे फल प्राप्त होते. देवाच्या प्रतिमेची आदराने भक्ती करणार्या साधकास देवाच्या अवतार लीला अनुभवता येतात.
१७
मज जे अनुसरले काया वाचा मर्ने । त्यांचे चालवणे सर्व मज ॥१॥
ऋणवई त्यांचा अनंत जन्माचा । जे गाती वाचा कीर्ति माझी ॥२॥
तयांचियां द्वारी लक्ष्मीसहित । उभा मी तिष्ठत याचकपणे ॥३॥
सर्व जडभारी जाणे योगक्षेम । एकाजनार्दनी नेम जाणा माझा ॥४॥
भावार्थ
जे भक्त काया वाचा मनाने परमेश्वराची अखंडित भक्ती करतात त्यांचा चरितार्थ चालवण्याची काळजी प्रत्यक्ष परमेश्वर करतो. असे भक्त वाचेने सतत परमेश्वराची कीर्ति गात असतात त्यांचे ऋण हा परमात्मा कधीच विसरत नाही. याचक होऊन लक्ष्मी सह तो या भक्तांच्या दारांत तिष्ठत उभा राहतो. या भक्तांचा योगक्षेम चालवणे हा परमात्मा परमेश्वराचा नेम आहे असे एका जनार्दनीं सांगतात.
१८
मजसि जेणें विकिलें शरीर । जाणे मी निरंतर अंकित त्याचा ॥१॥
त्याचे सर्व काम करीन मी अंगें । पड़ों नेदी व्यंगें सहसा कोठे ॥२॥
एका जनार्दनीं त्याचा मी अंकित । राहे पैं तिष्ठत त्याचे द्वारी ॥३॥
भावार्थ
जे भक्त आपला देह झिजवून परमात्म परमेश्वराची अखंड सेवा करतात, त्यांची सर्व कामे परमेश्वर या भक्तांचा अंकित होऊन स्वता: पूर्ण करतो. या कार्यात देव कोणत्याही प्रकारची उणीव राहू देत नाही. एका जनार्दनीं नि:शंकपणे सुचवतात कीं, देव या भक्तांचा अंकित होऊन त्यांच्या दारी तिष्ठत उभा राहतो.
१९
सर्व कर्म मदर्पण । करितां मन शुद्ध होय ॥१॥
न्यून ते चढते जाण । करी संपूर्ण मी एक ॥२॥
माझ्या ठायी ठेवुनी मन । करी कीर्तन आवडी ॥३॥
मन ठेवुनी माझ्या ठायीं । बसो कोठे भलते ठायीं ॥४॥
एका जनार्दनीं मन । करा मजसि अर्पण ॥५॥
भावार्थ
कोणतेहि कर्म करून ते जर परमेश्वराला सद्भावनेने अर्पण केले तरी त्या साधकाचे मन शुद्ध होते. या कामांत जर कांही कमतरता राहिली तरी परमेश्वरी कृपेने ती दूर होऊन कार्यसिद्धी होते. देवाच्या चरणीं चित्त एकाग्र करून मन परमात्म चरणीं अर्पण करावे असे आवाहन एका जनार्दनीं या अभंगात भक्तांना करतात.
२०
साक्षात्कार होतां । साच बद्धता नुरे तत्वतां ॥१॥
माझा होतां अनुभवा कल्पनेसी नुरेठाव ॥२॥
माझे देखतां चरण । संसारचि नुरे जाण ॥३॥
माझी भक्ति करितां । दोष नुरेचि सर्वथा ॥४॥
सर्वाठार्थी मी वसे । एकाजनार्दनीं भेद नासे ॥५॥
भावार्थ
भक्ताला भगवंताचा साक्षात्कार झाला असतां त्याची संसारविषयीची सारी बंधने तुटून पडतात. परमेश्वर स्वरूपाचा प्रत्यक्ष अनुभव आल्यावर भ्रामक कल्पनांना मनांत जागा उरत नाही. किंबहुना देवाच्या चरणीं लीन झाल्यावर क्षणभंगूर संसाराचा निरास होतो. भक्तीमार्गाची वाटचाल करतांना मनोदेहाचे सारे दोष लयास जातात. सर्व चराचर सृष्टींत केवळ आत्मतत्त्व भरून राहिले आहे याची प्रचिती येऊन सारे भेदाभेद संपून जातात असे एका जनार्दनीं अभंगाच्या शेवटीं सांगतात.
२१
भाविकांच्या उदकासाठीं । रमा नावडे गोमटी ॥१॥
भाविकांचे उदक घेतां । मज समाधान चित्ता ॥२॥
भाविकांचे उदकापुढें । मज वैकुंठही नावडे ॥३॥
ऐशी भाविकांची गोडी । एकाजनार्दनीं घाली उडी ॥४॥
भावार्थ
भाविकांनी अर्पण केलेल्या उदकाची माधुरी इतकीं अवीट असते कीं, देवाधिदेव श्री विष्णुंना सौंदर्यशालिनी रमा सुध्दां आवडेनासी होते. वैकुंठाची अपूर्वाई वाटत नाही. भक्तांचे प्रेम मनाला समाधान देते. भाविकांच्या या भक्तिभावासाठीं देव वैकुंठ सोडून पंढरीला येतो असे एका जनार्दनीं सांगतात.
२२
स्वर्ग नरक इहलोक । यांची प्रीति सांडोनी देख ॥१॥
भावें करितां माझी भक्ति । भाविक आपोआप उद्धरती ॥२॥
गव्हांची राशी जोडिल्या हाती । सकळ पक्वान येती त्याच्या होती ॥३॥
द्रव्य जाहले आपुले हाती । सकळ पदार्थ घरां येती ॥४॥
एका जनार्दनीं बोध । सहज घड़े एकविध ॥५॥
भावार्थ
स्वर्गसुखाची प्राप्ती, नरकवासाची भिती, आणि इहलोकाची आसक्ती सोडून जे साधक केवळ देवाची अनन्यभावे भक्ति करतात ते आपोआप उध्दरून जातात. उदाहरणार्थ एका जनार्दनीं सुचवतात, ज्या पदार्थापासून सर्व पक्वाने बनवता येतात येतात त्या गव्हाच्या राशी घरी आणल्यावर कार्यभाग साधण्याचा वेगळा खटाटोप करावा लागत नाही. उत्कट भक्तिभाव हा परमात्मा प्राप्तीचा एकमेव सहजसुलभ पर्याय आहे.
२३
माझा शरणागत न दिसे केविलवाणा । ही तो लाज जाणा माझी मज ॥१॥
एकविधभावें आलिया शरण । कर्म धर्म जाण पूर्ण त्याचे ॥२॥
समर्थाचे मुला काय खावयाची चिंता ।तैसे मी त्या तत्त्वतां न विसंवें ॥३॥
एकाजनार्दनी हा माझा नेम । आणीक नाहीं वर्म भावेंविण ॥४॥
भावार्थ
संपूर्ण शरणागत झालेला साधक परमेश्वर कृपेपासून वंचित होऊन केविलवाणा दिसत असेल तर ही गोष्ट परमेश्वरी शक्तिला बाधा आणणारी आहे. उत्कट भक्तीभावाने शरणागत झालेल्या अनन्य भक्ताचे कर्म, धर्म आणि चरितार्थ यांची जबाबदारी प्रत्यक्ष परमेश्वर स्विकारतो. समर्थ पित्याच्या मुलाला उदरनिर्वाहाची चिंता नसते. एका जनार्दनीं म्हणतात, परमेश्वरी कृपा संपादनाचे भावपूर्ण भक्तिशिवाय अन्य कोणतेही रहस्य नाही.
२४
माझा भक्त मज भीतरी । मी स्वयें असे तया माझारी ॥१॥
बहु बोलाचें नाहीं कारण । मी देह तो आत्मा जाण ॥२॥
माझिया भक्तीसी जे लागले । ते मीच होउनी ठेले ॥३॥
एका जनार्दनी अभेद । तया हदयी मी गोविंद ॥४॥
भावार्थ
अनन्य भक्तिभावाने भक्त देवाच्या अंत:करणांत स्थान मिळवतो आणि देव प्रेमळ भक्ताच्या अंतकरणासी एकरूप होतो. भक्त देवाच्या देहातिल आत्मतत्व बनतो. भक्तिमार्ग अनुसरणारे साधक समाजाकडून देवरूप मानले जातात. सद्गुरु जनार्दन स्वामी आणि एका जनार्दनीं हे भेदातित गुरू शिष्याचे नाते आहे. त्यांच्या अंत:करणांत गोविंद (ईंद्रियांना आनंद देणारा ) नांदतो. देव-भक्तातिल हा अभेद एका जनार्दनीं या अभंगात स्पष्ट करतात.
२५
देवपूजी माझिया भक्तांते । तेणें संतोष होत मातें ॥१॥
भक्त माझा मी भक्ताचा । ऐसी परंपरा साचा ॥२॥
देवभक्तपण । वेगळीक नाही जाण ॥३॥
भक्त जेवितांची धालो । एका जनार्दनीं लाधलों ॥४॥
भावार्थ
देव भक्तांचे रक्षण करतो आणि भक्त अनन्यभावे भगवंताचे सतत चिंतन करतो. या भक्तिभावाने देव भक्ताशी आणि भक्त देवाशी एकरूप होतो ही परंपरा अनादी काळापासून चालत आलेली आहे. भक्ताचे भोजन होतांच देव समाधानाचा ढेकर देतो. सद्गुरु जनार्दन स्वामींच्या कृपेने आपणास हे सर्व ज्ञान प्राप्त झाले असे एका जनार्दनीं कृतज्ञतेने स्पष्ट करतात.
२६
वभिल्या मिष्टान्ना । परतोनी श्रद्धा न धरी रसना ॥१॥
ऐसे आठविता माझे गुण ।मिथ्या ठायीं नसे ज्ञान ॥२॥
जेथें कर्माचे परिपाठीं । हैं तो पुन्हां नये गोष्टी ॥३॥
येव्हढे कथेचे महिमान । एका जनार्दनी शरण ॥४॥
भावार्थ
कथा किर्तनांतून परमेश्वराच्या गुणांचे श्रवण करून नित्य त्या गुणांचे स्मरण केले असतां जे ज्ञान आत्मसात केले जाते ते कधिही विफल होत नाही. कथेचा महिमा असा आहे कीं, त्यानंतर कोणत्याही कर्मकांडांची गरज राहत नाही. ज्याप्रमाणे एकदां प्राशन केलेल्या गोड अन्नाचा त्याग (ओकारी) केल्यानंतर परत रसना त्याचा स्वीकार करीत नाही. हे एका जनार्दनीं या अभंगात सुचवतात.
२७
भावें करितां माझी भक्ति । विषय वासना जळोनि जाती ॥१॥
चालतां माझेभक्तिपंथी । सकळ साधनें जळोनि जाती ॥२॥
माझिया निजभक्ता । बाधेची संसारव्यथा ॥३॥
प्रल्हादा गांजिता जगजेठी । मी प्रगटलों कोरडे काष्टीं ॥४॥
द्रौपदी गाजितां तात्काळीं । कौरवांची तोंडे केली काळी ॥५॥
गोकुळी गांजितां सुरपती । गोर्वधन धरिला हाती ॥६॥
अर्जुन प्रतिज्ञेचेवेळी । म्या लपविला हेळी ॥७॥
अंबऋषीचे गर्भवास । म्या सोशिले सावकाश ॥८॥
भक्तचरणींची माती । एकाजनार्दनीं वंदिती ॥९॥
भावार्थ
भावपूर्ण भक्तीने भक्तांच्या मनांतिल सर्व विषयवासना जळून जातात. भक्तीपंथाचे अनुसरण केल्यास बाकी सर्व साधने यज्ञयाग, कर्मकांडे निरुपयोगी ठरतात. भक्तांच्या सर्व संसारिक दु:खांचे निवारण होते. भक्त प्रल्हादाचे दु:ख निवारण करण्यासाठी श्रीहरी नरसिंहरूपाने खांबातून प्रगट झाले. द्रौपदीचे सत्व राखण्यासाठी कौरवांचा विनाश श्रीकृष्णाने घडवून आणला. अर्जुनाची प्रतिज्ञा खरी करण्यासाठी सुदर्शन चक्राने सूर्याला लपविले आणि जयद्रथाचा वध घडवून आणला. अंब ऋषींना शापाने मिळालेले गर्भवास परमेश्वराने सोसून त्यांची मुक्तता केली. असे कथन करून एका जनार्दनीं म्हणतात, अशा थोर भक्तांच्या पायधूळ मस्तकीं धारण करावी.
भक्तवत्सलता
२८
जी जी भक्त बोलती वचनें । ती ती प्रमाण करणे देवा ॥१॥
याजसाठी अवतार ।धरी मत्स्य कांसव सुकर ॥२॥
भक्तवचना उणेपण । येऊ नेदी जाण निधरिं ॥३॥
स्वयें गर्भवास सोशी । अंबऋषीकारणे ॥४॥
एका जनार्दनीं ब्रीद साचा । वागवी भक्ताचा अभिमान ॥५॥
भावार्थ
भक्तांना दिलेल्या वचनांची पूर्तता करणे हे भगवंताचे ब्रीद असून ते सार्थ करण्यासाठी परमेश्वर मासा, कासव , सुकर असे दशावतार धारण करतो. अंबऋषींची शापातून मुक्तता करण्यासाठी परमात्म परमेश्वर स्वता: गर्भवास सोसतो. एका जनार्दनीं सांगतात, भक्तांचा अभिमान जपण्यांत भगवंत कधीच उणीव भासू देत नाही.
२९
अंबत्राषिराया पडिले सायास । सोसी गर्भवास स्वयें देव ॥१॥
उच्छिष्टही खाता प्रायश्चित्त असे । गोपाळांचें ग्रास खाय हरी ॥२॥
शा एका जनार्दनीं भक्ताचा अंकित । म्हणोनी तिष्ठत विटेवरी ॥३॥
भावार्थ
कोणाचेही उच्छिष्ट सेवन करणे हे परमार्थांत पाप समजले जाते. असे असूनही श्रीहरी गोपाळांनी भरवलेले उष्टे घास आवडीने स्वीकारतो. अंब ऋषीचे गर्भवास सोसतो. असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात. देव हा भक्ताचा अंकित असून भक्त पुंडलिकासारख्या प्रेमळ भक्तांसाठी अठ्ठावीस युगे विटेवर उभा तिष्ठत उभा राहतो.
३०
भक्तालार्गी अणुमात्र व्यथा । ते न साहवे भगवंता ॥१॥
करूनी सर्वांगाचा वोदा ।निवारीतसे भक्तपीडा ॥२॥
होउनी भक्ताचा अंकितु । सारथीपण तो करीतु ॥३॥
प्रल्हादासी दुःख मोठे । होतांची काष्ठी प्रगटे ४॥
ऐसा अंकित चक्रपाणी । एका शरण जनार्दनीं ॥५॥
भावार्थ
करुणामय भगवंताला भक्तांचे अगदी क्षुल्लक दु:ख सुध्दां सहन होत नाही. आपल्या सर्व शक्ति एकवटून तो भक्तांचे रक्षण करतो. भक्तांचा जिवाभावाचा सखा होऊन तो अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करतो. नरसिंह रुपाने भक्त प्रल्हादाचे रक्षण करतो. जगन्नाथ स्वामींना शरणागत असलेले एका जनार्दनीं म्हणतात, भक्तांच्या रक्षणासाठी भगवंत हातांत चक्र घेऊन सदैव तत्पर असतो.
३१
भक्तपणा सान नव्हे रे भाई । भक्तीचे पाय देवाचे हृदयीं ॥१॥
भक्त तोचि देव भक्त तोचि देव । जाणती हा भाव अनुभवी ॥२॥
दान सर्वस्वं उदार बळी । त्याचे द्वार राखे सदा वनमाळी ३॥
एका जनार्दनी मिती नाही भावा । देवचि करितो भक्ताची सेवा ॥४॥
भावार्थ
भक्तांची थोरवी एव्हढी महान आहे की, भक्ताचे पाय भगवंत आपल्या हृदयात धारण करतो. अनुभवी भक्तभाविक हे जाणतात कीं, देव आणि भक्त एकरूप आहेत. दानधर्म हे सर्वस्व मानणार्या उदार दैत्यराजा बळी याचा श्रीहरी द्वारपाल होऊन सेवा करतो. एका जनार्दनीं म्हणतात, देव-भक्तांतिल प्रेमळ भावाला मर्यादा नाही.
३२
वाहे भक्तांचे उपकार । न संडी भार त्यांचा तो ॥१॥
म्हणे इही थोरपण आम्हां ।ऐसा वाढवी महिमा भक्तांचा ॥२॥
एका जनार्दनी कृपाळु । दीनाचा दयाळू विठ्ठलु ॥३॥
भावार्थ
एका जनार्दनीं या अभंगातून सुचवतात कीं पंढरीचा पांडुरंग भक्तांवर कृपा करणारा असून दिनांवर दया करणारा आहे. भक्तांमुळेच देवाला थोरपण प्राप्त होते असे मानून देव भक्तांचा महिमा वाढवतात. भक्तांचे उपकार देव कधीच विसरत नाही.
३३
मिठी धालूनिया भक्तां । म्हणे सिणलेती आतां ॥१॥
धांवे चुरावया चरण । ऐसा लाघवी आपण ॥२॥
योगियासी भेटी घाली तो आवडीनें कवळी बाहीं ॥३॥
एका जनार्दनीं भोळा । भक्तां आलिंगी सांवळा ॥४॥
भावार्थ
भक्ताची भेट होतांच देव त्याला प्रेमाने आलिंगन देतो. श्रम परिहार करण्यासाठी भक्ताचे पाय चेपण्यासाठी धावतो. योगी जनांना आपुलकीने जवळ घेतो. एका जनार्दनीं म्हणतात, सांवळा श्रीहरी भोळ्या भाविकांना आपलासा करतो.
३४
आपणा आपण पाहे विचारूनी । विचारतां मनी देव तूंर्ची ॥१॥
तूंचि देव असतां फिरशी वनोवनीं । प्रगटती काहाणी बोलायासी ॥२॥
देहींच देवळी आत्माराम नांदे । भांबावला भक्त हिंडे सदा रानें ॥३॥
एका जनार्दनीं भ्रमाची गोष्टी । वायांचि शिणती होती कष्टी ॥४॥
भावार्थ
मानवी देह देवाचे मंदिर असून परमात्मा परमेश्वर या देहांत आत्मरुपाने वास करतो. भक्त भाविकांना या गोष्टीची प्रत्यक्ष प्रचिती येत नसल्याने भक्त देवाचा शोध घेत रानींवनीं गिरीकंदरी भटकत फिरतो. एका जनार्दनीं सुचवतात, भक्ताची ही भावना केवळ भ्रम असून या भ्रामक कल्पनेने तो भ्रमंती करून कष्टी होतो. भक्ताने भगवंताशी एकचित्त होऊन विचार केला तर त्याला आपणच देव आहोत ह्या सत्याची जाणीव होईल.
३५
श्रमोनी वाउग्या बोलती चावटी । परी हातवटी नये कोणा ॥१॥
ब्रह्मज्ञानी ऐसे मिरविती वरी । क्रोध तो अंतरीं वसतसे ॥२॥
सर्वरूप देखे समचि सारिखें । द्वैत अद्वैत पारखें टाकूनियां ॥३॥
एका जनार्दनीं ब्रह्मज्ञान बोली । सहजचि आली मज अंगी ॥४॥
भावार्थ
परमेश्वर प्राप्तीसाठी कित्येक साधक संसाराचा त्याग करून निर्जन ठिकाणी भ्रमंती करतात. परंतू त्यातून स्वार्थ अथवा परमार्थ साधला जात नाही. अंतरंगातील काम, क्रोध या वरही विजय मिळविला जात नाही. ब्रह्मज्ञान प्राप्त झाले असे सांगून स्वता:ची व इतरांची फसवणूक करतात. द्वैत व अद्वैत या पैकी कोणत्याही मार्गाने साधना घडत नाही. असे सांगून एका जनार्दनीं विनयाने म्हणतात, केवळ गुरुप्रसादाने त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झाले.
३६
सूर्य अंधारातें नासी । परी तो सन्मुख नये त्यासी ॥१॥
माझें जिणे देखणेपण । तेंचि मायेचें लक्षण ॥२॥
देहीं देहअभिमान । जीवी मायेचे ते ध्यान ॥३॥
एका जनार्दनीं माया । देहाधीन देवराया ॥४॥
भावार्थ
आपणास जे विश्वदर्शन होते तो मायेचाच परिणाम आहे. नश्वर देहाचा अभिमान बाळगणे हे सुध्दा मायाजालच आहे. सूर्याचा उदय होताच अंधाराचे जाळे नाहिसे होते. सूर्य आणि अंधार कधीच समोरासमोर दिसत नाही. ज्ञान आणि विपरित ज्ञान (माया) कधीहि एकत्र दिसत नाही असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, माया देहाधीन असून ब्रह्मज्ञानाला परमेश्वराचे अधिष्ठान आहे.
३७
नित्य नूतन दीपज्वाळा । हाती जाती देखती डोळा ॥१॥
जागृती आणि देखती स्वप्न । दोहींसी देखतां भिन्न भिन्न ॥२॥
भिन्नपणे नका पाहूं । एका जनार्दनीं पाहूं ॥३॥
भावार्थ
निरांजनांत प्रकाशणारी ज्योत नित्य नविन भासते. एकाच्या हातातून दुसरीकडे गेली तरी ती डोळ्यांना समानच दिसते. जागृत असताना मनाने पाहिलेले देखावे आणि स्वप्नतिल देखावे मात्र भिन्न दिसतात. असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, सद्गुरु जनार्दन स्वामी आणि एका जनार्दनीं यांना भिन्नत्वाने पाहू नका. गुरु शिष्य एकरूपच असतात.
३८
जानर्दनें मज केला उपकार । पाडिला विसर प्रपंचाचा ॥१॥
प्रपंच पारखा जाहला दुराचारी । केलीसे बोहरी कामक्रोधा ॥
आशा तृष्णा यांचे तोडियेलें जाळं । कामनेंचे काळें केलें तोंड ॥३॥
एका जनार्दनीं तोडियले लिगाड । परमार्थ गोड दाखविला ॥४॥
भावार्थ
या अभंगात एका जनार्दनीं म्हणतात, सद्गुरु जनार्दन स्वामींनी मोठे उपकार केले. ज्या प्रपंचामुळे अनेक दुराचार (अयोग्य कृत्ये) करावी त्या प्रपंचाची आसक्ती कमी झाल्याने मन प्रपंचाला पारखे झाले. काम क्रोधाने घर रिकामे केले. आशा आणि अभिलाषा यांचे जाळे तुटून मन कामना रहित झाले. सद्गुरू कृपेने संसाराचे लचांड तुटून पडले आणि परमारार्थाचा आनंदमय मार्ग दाखवला.
३९
जनार्दनें केलें अभिनव देवा । तोडियेले शाखा अद्वैताची ॥१॥
केला उपकार केला उपकार मोडियेलें घर प्रपंचाचें ॥२॥
एका जनार्दनीं एकपणे देव । दाविला नवलाव अभेदाचा ॥३॥
भावार्थ
सद्गुरू जनार्दन स्वामींची कृपा झाली आणि चित्ताला पडलेले अद्वैताचे बंधन तुटून पडले. परमात्म परमेश्वराचे दर्शन घडवले. मनातिल सारे भेदाभेद लयास गेले. प्रपंचाचे सारे कष्ट निमाले. असे सांगून एका जनार्दनीं सद्गुरूंचा महिमा वर्णन करतात.
४०
कामक्रोध वैरीयांचे तोडियेले पांसे । जनार्दने सरसें केलें मज ॥१॥
देहाची वासना खंडून टाकिली । भ्रांतीची उडाली मूळ दोरी ॥२॥
कल्पनेचा कंद समूळ उपडिला । हृदयीं दाविला आरसा मज ॥३॥
एका जनार्दनीं सहज आटले । स्वदेहीं भेटले गुरूकृपें ॥४॥
भावार्थ
सद्गुरू जनार्दन स्वमींच्या कृपेने मी देह आहे ही भावना समूळ नाहिशी झाली. मनाचे जे वैरी काम क्रोध यांचे फासे तुटून पडले. देहाचे ममत्व संपून गेले. आपण देह नसून परमात्म तत्वाचा अंश आहोत अशी खात्री पटली. ह़दयातिल परमेश्वराचे प्रतिबिंब दाखवून भ्रामक कल्पनेचा चित्तातिल कंद समूळ उपटून काढला. असे एका जनार्दनीं या अभंगात गुरुकृपेचे यथार्थ वर्णन करतात.
४१
खुर्पू लागे सावत्यासी । न पाहे यातीसी कारण ॥१॥
घडी मडकें कुंभाराचे । चोख्यामेळ्याचीं ढ़ोरें वोढी ॥२॥
सजन कसयाचें विकी मांस । दामाजीचा दास स्वयें होय ॥३॥
एका जनार्दनीं जनीसंगे । दळूं कांडू लागे आपण ॥४॥
भावार्थ
जातीपातीचा कोणताही विधीनिषेध न मानता परब्रह्म परमात्मा सावत्या माळ्याबरोबर शेतातील गवत खुरपण्याचे काम करतो. गोरा कुंभाराची मडकी घडवतो. चोखा मेळ्याला ढोरे ( मृत जनावरे) ओढून र्नेण्याच्या कामांत मदत करतो. सजन कसया बरोबर मांस विकतो. दामाजीचा दास बनतो. एका जनार्दनीं सांगतात, जनाबाईस धान्याचे दळण कांडण करण्यांत हातभार लावतो.
४२
देखावया भक्तगण । रूप धरिलें सगुण ॥१॥
तो हां पंढरीचा राणा । वेदा अनुमाना नये तो ॥२॥
भाविकांचे पाठीमागें । धांवें लागे लावलाही ॥३॥
खायें तुळशीपत्र पान । न म्हणे सान थोडे ते ॥४॥
एका जनार्दनीं हरी । आपुली थोरी विसरे ॥५॥
भावार्थ
भक्तांच्या प्रेमळ भक्तीभावाचा आनंद घेण्यासाठी देवाने सगुण रूप धारण केले. वेदांना ज्याच्या स्वरुपाचे वर्णन करता येत नाही तो हा पंढरीचा राणा भाविकांच्या पाठीमागे धावतो. त्या साधकांनी अर्पण केलेले तुळशीचे पान लाखमोलाचे मानून त्याचा आवडीने अस्वाद घेतो. एका जनार्दनीं म्हणतात, श्री हरी आपला थोरपणा विसरून भक्तांशी समरस होतो.
४३
एका घरी द्वारपाल । एका घरीं होय बाळ ॥१॥
एका घरी करी चोरी । एका घरी होय भिकारी ॥२॥
एका घरी युध्द करी । एका घरी पूजा बरी ॥३॥
एका घरी खाय फळें । एका घरी लोणी बरें ॥४॥
एका एकपणे एकला । एका जनार्दनीं प्रकाशला ॥५॥
भावार्थ
सद्गुरु जनार्दन स्वामींकडून लाभलेल्या ज्ञान प्रकाशाने पावन झालेले एका जनार्दनीं या अभंगात श्री हरीच्या लिलांचे वर्णन करतात. गोकुळांत नंदाच्या घरी बालक्रीडा करतो तर गोपींच्या घरांतिल शिंक्यावरचे लोणी चोरून खातो. शबरीच्या घरीच्या उष्टावलेल्या बोरांचा आस्वाद घेतो. दुर्योधनाच्या राजवाड्यांत जाऊन युध्द करतो. भिकारी बनून द्रौपदीच्या घरी जाऊन चिंधी मागतो. बळीराज्याच्या घरी जाऊन त्याचा द्वारपाल बनतो.
४४
भक्ताच्या उपकारासाठीं । नोहे पालट उतराई ॥१॥
ज्ञानोबांची भिंत वोढी । उच्छिष्ट पात्रे काढी धर्माघरीं ॥२॥
जेवी नामदेवासंगे साचें । सुदाम्याचे पोहे भक्षी ॥३॥
विष पितो मीराबाईसाठी । विदुराच्या हाटी कण्याविकी स्वयें ॥४॥
एका जनार्दनीं अंकितपणें । द्वार राखणे बळीचें ॥५॥
भावार्थ
भक्तांच्या उपकाराची फेड करण्यासाठी, त्यांचे उतराई होण्यासाठी परब्रह्म परमात्मा ज्ञानेश्वरासाठी भिंत चालवतो. जेष्ठ पांडव धर्मराजाच्या राजसूय यज्ञांत उष्टी पात्रे काढतो. नामदेवाच्या हट्टासाठीं जेवण करतो. सुदाम्याचे पोहे खाऊन तृप्तीचा ढेकर देतो. मीराबाईचे सत्व राखण्यासाठी विषाचा पेला प्राशन करतो. विदुराच्या कण्या बाजारांत नेऊन विकतो. बळीराजाचा द्वारपाल होतो. एका जनार्दनीं म्हणतात, देव एकनिष्ठ भक्तांचा अंकित होऊन त्यांच्यासाठी कष्टाची कामे करतो.
४६
दासासी संकट पडतां जडभारी । धांवे नानापरी रक्षणार्थ ॥१॥
पडतां संकटीं द्रौपदी बहीण । धांवे नारायण लवलाहें ॥२॥
सुदामियाचें दरिद्र निवटिले ।द्वारकेतुल्य दिलें ग्राम त्यासी ॥३॥
अंबरूषीसाठी गर्भवास सोसी । परीक्षितीसी रक्षी गर्भामाजीं ॥४॥
अर्जुनाचे रक्षी होउनी सारथी । उच्छिष्ट भक्षिती गोवळ्याचें ॥५॥
राखितां गोधनें मेघ वरूषला । गोवर्धन उचलिला निजबळें ॥६॥
मारूनी कंसासुर सोडिले पितर । रक्षिले निर्धारें भक्तजन ॥७॥
एकाजनार्दनीं आपुलें म्हणवितां । धांव हरी सर्वथा तयालागीं ॥८॥
भावार्थ
कौरवांच्या सभेंत द्रौपदी पणाला लावली गेली, तिच्यावर दारूण संकट कोसळले तेव्हां नारायणाने त्वरेने धावून त्या संकटाचे निवारण केले. द्वारके सारखी सुंदर सुदाम नगरी वसवून सुदाम्याचे दरिद्र कायमचे नष्ट केले. अंबरूषी साठी गर्भवास सोसला. सारथी बनून अर्जुनाचे घोडे राखले. गर्भातिल परिक्षिताचे रक्षण केले. गोपांळांसाठी गोवर्धन पर्वत उचलला. कंसासुराचा वध करून पितरांचे रक्षण केलें. एका जनार्दनीं म्हणतात, आपल्या भक्तांसाठी भगवंत क्षणाचाही विलंब न करता धांव घेतो.
४६
उत्तम अन्न देखतां दिठी । ठेवी पोटीं जतन तें ॥१॥
तान्हुल्याची वाहे चिंता । जेवीं माता बाळातें ॥२॥
न कळे तया उत्तम कडु । परी परवडू माता दावी ॥३॥
एका जनार्दनीं तैसा देव । घेत धांव भक्ताघरीं ॥४॥
भावार्थ
उत्तम पक्वान नजरेला पडतांच आई ते बाळासाठीं सांभाळून ठेवते. आपल्या तान्हुल्याची ती सतत चिंता वाहते. बाळाला गोड कडु समजत नाही. माता जशी बाळाची काळजी घेते तसा देव भक्ताची काळजी घेऊन त्याच्या घरीं धांव घेतो. देव-भक्तामधील जिव्हाळा एका जनार्दनीं या अभंगात व्यक्त करतात.
४७
वत्साचिये लळे जैसी । धेनु अपेशी येत घरां ॥१॥
तैसा भक्तांघरीं नारायण । धांवे आपण वोढीनें ॥२॥
मुंगियांच्या घरां मूळ । धाडी समूळ कोण तो ॥३॥
एका जनार्दनीं देव । घेत धांव आपणचि ॥४॥
भावार्थ
रानांत चरावयास गेलेली गाय जशी वासराच्या ओढीने आपोआप घराकडे धांव घेते तसा नारायण भक्ताघरी धांव घेतो. हाच कृपाळू भगवान मुंग्यांना साखरेसाठी मूळ धाडतो. या चराचर सृष्टीची भगवंत प्रेमाने काळजी घेतात असे एका जनार्दनीं या अभंगात सांगतात.
४८
भक्तिभावार्थ अर्पिला देव सर्वांगीं धरिला ॥१॥
रानींच रानट वनमाला । भक्ति आणुनी घातली गळां ॥२॥
भक्त अर्पितां आवडी । देव जाणे त्याची गोडी ॥३॥
भक्तभाव जाणोनि पाही । एका जनार्दनीं राहे देही ॥४॥
भावार्थ
भक्तिभावाने भक्त आपला देह देवाला अर्पण करतो. रानांतिल रानटी वनमाला आणून भक्त देवाच्या गळ्यांत घालतो. भक्ताच्या या प्रेमळ भक्तिभावाची गोडी भगवंत पूर्णपणे जाणतो. या च भक्तिभावाने वेडा होऊन देव भक्ताच्या अंतरांत वास करतो असे एका जनार्दनीं या अभंगात स्पष्ट करतात.
४९
भक्ता जैसा मनोरथ । पुरवी समर्थ गुरूराव ॥१॥
नित्य ध्यातां तयाचे चरण । करी संसारा खंडन ॥२॥
वानूं चरणांची पवित्रता । उध्दार जडजीवां तत्वतां ॥३॥
अवचट लागतांचि कर । एका जनार्दनीं उद्धार ॥४॥
भावार्थ
या अभंगात एका जनार्दनीं समर्थ गुरूंचे महात्म्य सांगत आहेत. नित्य निरंतर गुरुचरणांची सेवा केल्यास संसारातिल विविध तापांचे खंडन होते. गुरूचरणांची पवित्रता जडजीवांचा उध्दार करते. नकळत गुरूचरणांना हस्तस्पर्श झाला तरी सामान्य जनांचे त्रिविध ताप दूर होतात.
५०
भक्त अर्पितां सुमनमाळा । घाली आवडीने गळा ॥१॥
ऐसा आवडीचा भूकाळु । श्रीविठ्ठल दीनदयाळु ॥२॥
भक्तेभावार्थें अर्पितां । तें आवडे पंढरीनाथा ३॥
भक्तासाठीं विटेवर । समपद कटीं कर ॥४॥
ऐशी कृपेची कोंवळी । एका जनार्दनीं माउली ॥५॥
भावार्थ
पंढरीनाथ भक्तांच्या प्रेमासाठी आसुसलेला असून दीनदयाळु आहे. भक्तांनी अर्पण केलेली वनमाला सुध्दां तो अत्यंत आवडीने स्विकारतो. एकनिष्ठ भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्रीविठ्ठल विटेवर समपद आणि कटीवर कर ठेवून अठ्ठावीस युगे उभा राहतो. एका जनार्दनीं म्हणतात, पंढरीनाथ भक्तांची माउली असून कृपेची कोवळी साउली आहे.
५१
भक्तदरूशनें देव ते तोषती । तेणें आनंद चित्तीं देवाचिये ॥१॥
भक्ताची स्तुति देवासी आनंद । भक्तनिंदा होतां देवा येतसे क्रोध ॥२॥
भक्त संतोषतां देवासी सुख । एका जनार्दनीं देवा भक्तांचा संतोष ॥३॥
भावार्थ
भक्तांच्या दर्शनाने देवाला मनापासून आनंद होतो. भक्ताची स्तुती ऐकून देवाला संतोष वाटतो. भगवंताच्या एकनिष्ठ भक्तांची कोणी निंदा केल्यास भगवंताला क्रोध येतो. भक्तांचा संतोष हेच देवाचे सुख असे सांगून एका जनार्दनीं देव भक्तांचा जिवाभावाच्या संबंधाचे वर्णन या अभंगात कथन करतात.
५२
देव पूजिती आपुले भक्ता । मज वाढविलें म्हणे उचिता ॥१॥
ऐसा मानी उपकार । देव भक्तीं केला थोर ॥२॥
देवाअंगीं नाही बळ । भक्त भक्तीनें सबळ ॥३॥
देव एक देशीं वसे । भक्त नांदती समरसे ॥४॥
भक्ताची देवा आवडी । उणें पडों नेदी अर्ध घडी ॥५॥
नाहीं लाज अभिमान देवा । एका जनार्दनीं करी सेवा ॥६॥
भावार्थ
भक्त आपल्या एकनिष्ठ भक्तिभावाने देवाचा महिमा वाढवतात. भक्त आपल्या भक्तीबळाने समर्थ आहेत, देवाच्या अंगी हे सामर्थ्य नाही. देव एकदेशी असून भक्त परस्परांशी समरस होऊन एकत्र नांदतात. अशा प्रकारे देव भक्तांचे उपकार मानतात. भक्तांना काही कमी पडू नये याची काळजी भगवंत घेतो. एका जनार्दनीं म्हणतात, भक्तांची सेवा करण्यात देवाला लाज वाटत नाही.
५३
भक्त नीच म्हणोनि उपहासिती । त्यांचे पुर्वज नरका जाती ॥१॥
भक्त समर्थ समर्थ । स्वयें बोले वैकुंठनाथ ॥२॥
भक्तासाठीं अवतार । मत्स्य कूर्मादि सुकर ॥३॥
यातिकुळ न पाहे मनीं । एका शरण जनार्दनीं ॥४॥
भावार्थ
भक्तांचा नीच म्हणून जे उपहास करतात त्यांचे पूर्वजांना नरकयातना भोगाव्या लागतिल असे वैकुंठनाथ स्वता: सांगतात. भक्त अतिशय समर्थ असून त्यांच्यासाठी भगवंत मासा, कासव, सुकर यांचे अवतार धारण करतो. जनार्दन स्वामींना शरणागत असलेले संत एकनाथ म्हणतात, भक्तांची जात कुळ यांचा विचार न करता भगवंत भक्तांचे रक्षण करतो.
५४
भक्ताची अणुमात्र व्यथा न सहावे भगवंता ॥१॥
अंबर्षिसाठी गर्भवास येत पोटीं ॥२॥
प्रल्हादाकारणें सहस्त्र स्तंभीं गुरगुरणें ॥३॥
गोपळ राहिले वनांतरीं । तेथें उचलिला गिरी ॥४॥
राखिले पांडव जोहरीं । काढिलें बाहेरी विवरद्वारें ॥५॥
ऐसा भक्तांचा अंकित । एका जनार्दनीं तया ध्यात ॥६॥
भावार्थ
भक्तांचे कणभरही दु:ख भगवंताला सहन होत नाही. परमेश्वर अंबर्षिसाठी गर्भवास सोसतो. प्रल्हादासाठी खांबातून नरसिंह रूपाने प्रगट होऊन हिरण्यकश्यपूचा वध करतो. गोपाळांसाठी बोटाच्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून धरतो. वनवासांत पांडवांचे रक्षण करण्यासाठी त्यांना भुयारीमार्गाने सुखरूप बाहेर काढतो. अशा प्रकारे भक्तांचा अंकित होऊन त्यांचे रक्षण करणार्या भगवंताचे एका जनार्दनीं ध्यान करतात.
५५
शरणांगता नुपेक्षी हरी । ऐसी चराचरीं कीर्ति ज्याची ॥१॥
बिभीषणें नमस्कार केला । राज्यधर केला श्रीरामें ॥२॥
उपमन्या दुधाचा पैं छंद । क्षीरसागर गोविंद त्या देतु ॥३॥
ध्रुव बैसविला अढळपदीं । गणिका बैसली मोक्षपदीं ॥४॥
ऐसी कृपेची साउली । एका जनार्दनीं माउली ॥५॥
भावार्थ
जे अनन्य भक्त श्री हरीला शरणागत होतात त्यांची उपेक्षा भगवंत करीत नाही अशी त्यांची कीर्ती चराचरात दुमदुमत आहे. राक्षसराज रावणाचा पक्ष सोडून रावणबंधू बिभिषण रामाकडे येऊन त्यांना नमस्कार करतो तेव्हां श्रीराम बिभिषणाला लंकेचे राज्य देवून सन्मानित करतात. द्रोणाचार्यांचा पुत्र उपमन्यु दुधासाठी हट्ट करतो तेव्हां त्याला क्षीरसागर देवून बालहट्ट पुरवतात. कठोर तप करणार्या ध्रुव बाळाला अढळपद देवून अजरामर करतात. नामजप करणार्या गणिकेला मोक्षपद देऊन कृतार्थ करतात. पुराणातील उदाहरणे देऊन एका जनार्दनीं म्हणतात, भक्तीभावानें शरणागत झालेल्या भक्तांवर श्रीहरी कृपेची सावली प्रदान करतात.
५६
देहाचे देऊल देवळींच देव । जनार्दन स्वयमेव उभा असे ॥१॥
पूजन तें पुज्य पूजकु आपण । स्वयें जनार्दन मागेपुढे ॥२॥
ध्यान तें ध्येय धारणा स्वयमेव । जनार्दनीं ठाव रेखियेला ॥३॥
एका जनार्दनीं समाधी समाधान । पडिलें मौन देही देहा ॥४॥
भावार्थ
भक्ताचा देह हेच देवाचे मंदिर असून या मंदिराच्या द्वारी सद्गुरु जनार्दन स्वामी स्वता:उभे आहेत. देवाचे पूजन ज्याची पूजा करायची तो परमात्मा आणि पूजा करणारा ही त्रिपुटी संपून केवळ परमात्म्याचे अस्तित्वच कायम राहते. ध्यान धारणा आणि ध्याता एकरूप होतो. देहाचे भान विसरून ध्यात्याची समाधी लागते. वाचेचे मौन पडते आणि भक्ताला अपूर्व समाधानाची प्राप्ती होते. हा पारमार्थिक अनुभव एका जनार्दनीं या अभंगात व्यक्त करतात.
५७
आतां यजन कैशापरी । संसारा नोहे उरी ॥१॥
सद्गुरूवचन मंत्र अरणी । तेथोनि प्रगटला निर्धूम अग्नी ॥२॥
सकळी सकळांच्या मुखें । अर्पितसे यज्ञ पुरूषे ॥३॥
एका जनार्दनीं यज्ञे अपी । अपी त्यामाजीं समपी ॥४॥
भावार्थ
सद्गुरू वचन रूपी अरणीने मंथन करताना अंतकरणरूपी यज्ञकुंडातून धूरविरहित अग्नी प्रगट झाला. तो साधकांच्या सकळ मुखांनी यज्ञ पुरूषाला अर्पण केला. वरून तुपाचे यजन केले. संसाराची वार्ता उरली नाही असे एका जनार्दनीं या अभंगाच्या शेवटच्या चरणांत स्षष्ट करतात.
५८
शांतीचेनि मंत्र मंत्रुनी विभूती लाविली देहाप्रती सर्व अंगा ॥१॥
तेणें तळमळ हारपली व्यथा । गेली सर्व चिंता पुडिलाची ॥२॥
लिगाडाची मोट बांधोनि टाकिली । वासना भाजली क्रोध अमी ॥३॥
एका जनार्दनीं शांत जाहला देह । कामना देव प्रगटला ॥४॥
भावार्थ
शांती मंत्राने मंत्रुन विभूती देहाच्या सर्व अवयवांना लावली. या विभुतीमुळे मनाची तळमळ आणि देहाच्या सर्व व्यथा चिंता हारपून गेल्या. संसारेचे जे लचांड मागे लागले होते त्याची मोट बांधून टाकली. क्रोधरूपी वासना भाजून टाकली. एका जनार्दनीं म्हणतात, कामना रूपी देव प्रगट झाला आणि देह शांत झाला.
५९
अहं सोहं कोहं सर्व आटलें । दृश्य द्रष्टत्व सर्व फिटलें ॥१॥
ऐसी कृपेची साउली । माझी जनार्दन माउली ॥२॥
द्वैत अद्वैताचे जाळें । उगविलें कृपाबळे ॥३॥
अवघे एकरूप जाहलें ।दुजेपणाचे ठाव पुसिले ॥४॥
शरण एका जनार्दनीं । एकपणे भरला अवनीं ॥५॥
भावार्थ
जनार्दन स्वामींच्या कृपेने दृष्य विश्वाचा पसारा, तो पाहणारा आणि पाहण्याची क्रिया सर्व एकरूप झाले. द्वैत आणि अद्वैत यांचा मनांत निर्माण झालेला गुंता सुटला. भेदाभेद संपून आपपर भाव नाहिसा झाला. सद्गुरू जनार्दन स्वामी कृपेची साउली धरणारी माउली असून एका जनार्दनीं स्वामींना सर्वभावे शरण जातात.
६०
पहा कैसी नवलाची ठेव । स्वयमेव देहीं देखिला देव ॥१॥
नाहीं जप तप अनुष्ठान । नाही केले इंद्रियाचे दमन ॥२॥
नाहीं दान धर्म व्रत तप । अवघा देहीं जालों निष्पाप ॥३॥
पापपुण्याची नाहीं आटणी । चौदेहासहित शरण एका जनार्दनीं ॥४॥
भावार्थ
कोणत्याही प्रकारे इंद्रियांचे दमन न करतां, कोणताही जप, तप, अनुष्ठान किंवा दानधर्म, कठिण व्रत किंवा खडतर तप यांचा अंगिकार न करतां स्वता:च्या अंतकरणांत परमेश्वराचे दर्शन सद्गुरू जनार्दन स्वामींनी घडवले ही अतिशय नवलाची गोष्ट आहे. त्यामुळे सर्व पापांचे परिमार्जन होऊन देह निष्पाप झाला. पापपुण्यापासून मन मुक्त झाले. असे सांगून एका जनार्दनीं विनयाने म्हणतात, सूक्ष्म, स्थूल, कारण आणि महाकारण या चारी देहापासून आपण जनार्दन स्वामींच्या चरणीं शरणागत आहोत.
६१
त्रिभुवनींचा दीप प्रकाशु देखिला । हृदयस्थ पाहिला जनार्दन ॥१॥
दीपाची ती वाती वातीचा प्रकाश । कळिकामय दीप देहीं दिसे ॥२॥
चिन्मय प्रकाश स्वयं आत्मज्योती । एका जनार्दनीं भ्रांति निरसली ॥३॥
भावार्थ
त्रिभुवनाला प्रकाशित करणारा जनार्दन रूपी दीप हृदयांत तेवत असलेला दिसला. दीपाची ती तेजस्वी ज्योत, या दीपकळिकेचा चैतन्यमय प्रकाश स्वता:च्या आत्मज्योतीसारखा भासला आणि मनातिल सर्व भ्रामक कल्पनांचा निरास झाला. असा पारमार्थिक स्वानुभव एका जनार्दनीं या अभंगात कथन करतात.
६२
उदारपणे उदार सर्वज्ञ । श्रीजनार्दन उभा असे ॥१॥
तयाचे चरणी घातली मिठी ।जाहली उठाउठी भेटी मज ॥२॥
अज्ञान हारविलें ज्ञान प्रगटलें । हृदयी बिंबलें पूर्ण ब्रह्म ॥३॥
एका जनार्दनीं नित्यता समाधी । वाउग्या उपाधी तोडियेल्या ॥४॥
भावार्थ
उदार मनाचे सर्वज्ञ श्री जनार्दन स्वामी सामोरे दिसतांच त्यांच्या चरणांना मिठी घातली. स्वामींनी उठवून प्रेमभराने आलिंगन देतांच अज्ञानाचा लोप होऊन चित्ताच्या गाभार्यात ज्ञान प्रगट झाले. ह़दयांत पूर्ण ब्रह्म एकवटून आले. निरर्थक उपाधींची बंधने तुटून पडली. नित्य समाधीची अवस्था प्राप्त झाली. हा उच्च प्रतीचा पारमार्थिक अनुभव या अभंगात एका जनार्दनीं वर्णन करतात.
६३
माजें मीपण देहीच मुरालें । प्रत्यक्ष देखिलें परब्रह्म ॥१॥
परब्रह्म सुखाचा सोहळा । पाहिलासे डोळां भरूनियां ॥२॥
ब्रह्मज्ञानाची ते उघडली पेटी । जाहलों असे पोटी शीतल जाणा ॥३॥
एका जनार्दनीं ज्ञानाचें तें ज्ञान । उघड समाधान जाहलें जीवा ॥४॥
भावार्थ
परब्रह्म सुखाचा सोहळा जेव्हां प्रत्यक्ष डोळे भरून पाहिला तेव्हां मनातील अहंकार ठायींच विरून गेला. मन शांत सुखाने भरून आले. एका जनार्दनीं सांगतात, ज्ञानाचे ज्ञान अशा ब्रह्मज्ञानाचे भांडार खुले झाले. चित्ताला निखळ समाधानाचा लाभ झाला.
६४
दीपाचें तें तेज कळिकें ग्रासिले । उदय अस्त ठेले प्रभेविण ॥१॥
लोपलीसे प्रभा तेजाचे तेजस । जाहली समरस दीपज्योती ॥२॥
फुकल्यावाचुनी तेज ते निघालें । त्रिभुवनी प्रकाशिले नवल देख ॥३॥
एका जनार्दनीं ज्योतीचा प्रकाश । जाहला समरस देहीं देव ॥४॥
भावार्थ
दीपाचे तेज दीपज्योतीने गिळून टाकले. प्रकाशाच्या अभावाने विश्वाच्या उदय अस्ताची जाणिव लोपून गेली. दीपज्योती दीपाच्या स्वरूपाशी एकरूप झाली. वायुने फुंकर घालण्या आधीच दीपाचे तेज त्रिभुवनीं पसरून सारे त्रिभुवन प्रकाशित झाले. एका जनार्दनीं सांगतात, देहांत देव समरस व्हावा तसा ब्रह्मज्ञानाचा प्रकाश अंतरंग व्यापून राहिला.
६५
जेथें परापश्यन्तीची मावळली भाष । तो स्वयंप्रकाश दावी गुरू ॥१॥
तेणें माझें मना जाहलें समाधान । निरसला शीण जन्मोजन्मीं ॥२॥
उपाधी तुटली शांति हे भेटली । सर्व तेथे आटली तळमळ ॥३॥
एका जनार्दनीं प्रेमाचे ते प्रेम । दाविले सप्रेम हृदयांत ॥४॥
भावार्थ
जेथे परा आणि पश्यंती वाणीची भाषा मावळते (कुंठित होते ) तेथे सद्गुरू स्वज्ञानाचा प्रकाशदीप प्रकाशित करतात. या गुरूकृपेने जन्मोजन्मीचा अज्ञान अंधकार नाहीसा होऊन मनाला अतीव समाधानाचा लाभ झाला. सर्व उपाधींचे निरसन होऊन चित्त शांत-निवांत झाले. अंतकरणांतिल तळमळ समूळ नाहिसी झाली. एका जनार्दनीं म्हणतात, सद्गुरूंच्या अपार प्रेमाचा साक्षात्कार ह़दयांत झाला.
६६
उदार विश्वाचा दीपकु तेजाचा । प्रकाशु कृपेचा दावियेला ॥१॥
हारपले विश्व विश्वंभरपणे । दाविले जनार्दर्ने स्वयमेव ॥२॥
अकार उकार मकार शषबट । घेतिलासे पोट परब्रह्मीं ॥३॥
एका जनार्दनीं विदेह दाविला । सभराभरी दाटला हदयामाजीं ॥४॥
भावार्थ
एका जनार्दनीं या अभंगात सांगतात, जनार्दन स्वामींच्या कृपेने देहबुध्दी लयास जाऊन आत्मबुध्दी उदयास आली. विश्वंभर परब्रह्म स्वरूपाने विश्व व्यापले आहे याची प्रचिती आली. अकार (ब्रह्मा) उकार ( विष्णू) मकार (महेश) ही सर्व एका परब्रह्माची रूपे आहेत याची खात्री पटली. जनार्दन स्वामी उदार अंत:करणाचे असून ज्ञानदीप आहेत. या पारमार्थिक सत्याच्या दर्शनाने विदेहीपणाची भावना ह़दयांत दाटून आली.
६७
देहाची आशा टाकिली परती । केलीसे आरती प्रपंचाची ॥१॥
स्थूल सूक्ष्म यांची रचूनियां होळी । दावामि पाजळी भक्तिमंत्रे ॥२॥
एका जनार्दनीं देहासी परण । विदेही तो जाण जनार्दन ॥३॥
भावार्थ
देहाची आसक्ती सोडून स्थूल, सूक्ष्म , कारण, महाकारण या चारी देहाची होळी ( देहबुध्दीचा त्याग केला ) केली. प्रपंचाची सांगता केली. मनाने प्रपंचाचा त्याग केला. एका जनार्दनीं अभंगाच्या शेवटच्या कडव्यांत देहबुध्दीचा त्याग करून विदेही बनल्याची ग्वाही देतात.
६८
फिरलों मी दशदिशा । वायां सोसा हाव भरी ॥१॥
नाहीं जाहले समाधान । वाउगा शीण जाहला पोटीं २॥
उरला हेत पंढरीसी । सुखरासी लाधली ॥३॥
एका जनार्दनी सुखाचे भांडार । जोडिले निर्धार न सरेची ॥४॥
भावार्थ
परमेश्वर दर्शनाची अभिलाषा धरून दाही दिशा फिरूनही मनाचे समाधान झाले नाही. निरर्थक शीण झाला या भावनेने निराश झालो. पंढरीस जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेण्याचा हेतू मनांत धरून पंढरीस आलो आणि सुखाचे भांडार लाभल्याचा परमानंद मिळाला. असा स्वानुभव एका जनार्दनीं या अभंगात सांगतात.
६९
आणिकांची धरितां आस । होतो नाश जीवित्वा ॥१॥
म्हणोनि निर्धारिलें मन । धरिलें ठाणे रामकृष्ण ॥२॥
न धांवें आतां कोठे मन । हृदयीं ध्यान धरिलें तें ॥३॥
एका जनार्दनी प्राण । ठेविला जाण समूळ चरणीं ॥४॥
भावार्थ
कोणत्याही एका गोष्टीवर मन स्थिर न करता अनेक गोष्टींची अभिलाषा धरल्याने जीवनांत कोणतेही यश मिळत नाही. असा विश्वास धरून मनाचा निश्चय केला. ह़दयांत रामकृष्ण या देवतांची स्थापना करून त्यांचे ध्यान धरण्याची मनाला आज्ञा दिली. आतां चंचल मनाची धाव संपली. असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, रामकृष्ण चरणीं काया वाचा मनाने प्राण अर्पण केला.
७०
मागें बहुतांसी सांभाळिलें । ऐसें वरदान ऐकिलें ॥१॥
म्हणवोनी धरिला लाहो ।मनींचा संदेहो टाकुनी ॥२॥
अजामेळ पापराशी । नेला निज नित्य वैकुंठासी ॥३॥
तारिले उदकी पाषाण । ऐसें महिमान नामाचें ॥४॥
एका जनार्दनीं जाहलों दास । नाहीं आस दुसर्याची ॥५॥
भावार्थ
नामाचा अगाध महिमा असा आहे कीं, सेतू बंधनाचे वेळी केवळ रामनामाने पाषाण पाण्यावर तरंगले. पापराशी असा अजामेळ सुध्दां रामनामाने उध्दरला. त्याला वैकुंठ पदाची प्राप्ती झाली. अशा प्रकारे अनेकांना वरदान देवून त्यांचा सांभाळ केला. अशा अनेक कथा ऐकून मनातिल संदेह दूर झाला. ईतर कुणाचिही आशा न धरतां केवळ जनार्दन स्वामींच्या चरणीं शरणागत झालो असे एका जनार्दनीं म्हणतात.
७१
उपाधीच्या नांवें घातियेलें शून्य । आणिका दैन्यवाणे काय बोलूं ॥१॥
टाकूनियां संग धरियेला देव । आतां तो उपाय दुजा नाहीं ॥२॥
सर्व वैभव सत्ता जयाचे पदरीं । जालों अधिकारी आम्ही बळें ॥३॥
एका जनार्दनीं तोडियेला संग । जालो आम्ही नि:संग हरिभजनीं ॥४॥
भावार्थ
अनेक उपाधींचा त्याग केला. संसाराचा संग सोडून देवाची संगती जोडली. दुसरा कोणताही उपाय न करता सर्व प्रकारच्या वैभवाचा जो अधिपती आहे त्या परमेश चरणी लीन झालो. एका जनार्दनीं सांगतात, सर्वांचा संग सोडून नि:संग होऊन हरिभजनीं मग्न झालो.
७२
सकळ प्रपंचाचे भान । ते तंव मृगजळासमान ॥१॥
जन्ममरणापरता । त्रिगुणातें नातळता ॥२॥
प्रपंचाची अलिप्त युक्ति । ऐसी आहे देहस्थिती ॥३॥
प्रपंर्ची न दिसे भान । एका शरण जनार्दन ॥४॥
भावार्थ
प्रपंचातिल सुखदुःखाचे भान मृगजळ सारखे फसवे आहे. कौटुबिक नातीगोती, सगेसोयरे कांही दिवसांचे सोबती असून त्यांच्या पासून अलिप्त वृत्ती ठेवल्यास प्रपंचाचे भान नाहिसे होते. अन्यथा सत्व, रज, तमो गुणांसह जन्म मरणाचे चक्र चालू राहते. असे एका जनार्दनीं या अभंगात स्पष्ट करतात.
७३
उघड दाखविलें देवा । नाहीं सेवा घेतली ॥१॥
ऐसी प्रेमाची माउली । जगी व्यापक व्यापलीं ॥२॥
नाहीं घालीत भार कांहीं । आठव देही रामकृष्ण ॥३॥
एका जनार्दनी शरण । माझे नेलें चोरून मन ॥४॥
भावार्थ
सद्गुरू जनार्दन स्वामी हे नि:स्वार्थ प्रेम करणार्या माऊली समान असून कोणत्याही प्रकारची सेवा न घेता स्वामींच्या कृपेने परमात्म्याचे प्रत्यक्ष साक्षात्कार झाला. रामकृष्णांचे सतत स्मरण करावे हा उपदेश दिला. एका जनार्दनीं म्हणतात, स्वामींनी मनाची चोरी केली आहे.
७४
मनाचे माथां घातिला धोंडा । वासना कापुनी केला लांडा ॥१॥
जनी लांडा वनी लांडा । वासना रांडा सांडियलें ॥२॥
वासना सांडोनी जालों सांड्या । कामना कामिक म्हणतो गांड्या ॥३॥
कामना सांडे विषयीं लाताडे । एका जनार्दनीं तयाची चाड ॥४॥
भावार्थ
सद्गुरु जनार्दन स्वामींनी मनाच्या सर्व वासनांवर धोंडा घालून त्या समूळ नाहिशा केल्या. जनीं, वनीं सर्वत्र परब्रह्म परमेशाचे रूप दाखवले. संसाराला पारखा झालो. इंद्रिय सुखाच्या कामने पासून मुक्त झालो. एका जनार्दनीं सुचवतात, स्वमींनी ईच्छे प्रमाणे सगळे घडवून आणले.
७५
मनाचें तें मन ठेविलें चरणीं । कुर्वडी करूनी जनार्दनीं ॥१॥
ध्यानाचें तें ध्यान ठेविलें चरणीं । कुर्वडी करूनी जनार्दनीं ॥२॥
ज्ञानाचे ते ज्ञान ठेविले चरणी । कुर्वडी करून जनार्दनीं ॥३॥
शांतीची शांती ठेविले चरणीं । कुर्वडी करूनी जनार्दनीं ॥४॥
दयेची ती दया ठेविली चरणीं । कुर्वंडी करूनी जनार्दनीं ॥५॥
उन्मनी समाधी ठेविली चरणीं । कुर्वंडी करूनी जनार्दनीं ॥६॥
एका जनार्दनीं देहाची कुर्वंडी । वोवाळोनि सांडी जनार्दनीं ॥७॥
भावार्थ
मन, ध्यान, ज्ञान, शांती, दया, उन्मनी, समाधी ही सर्व भाववाचक नामे असून ती आपल्या कृतीतून, बोलण्यातून, वर्तनातून जगापुढे येतात. या भावनांच्या निर्मितीमागे आंतरिक प्रेरणा असते. या सर्व एका जनार्दनीं गुरूचरणीं अर्पण करतात. मनांत भावना, विचार निर्माण करणारे अंत:करण, देवाच्या मूर्तीसमोर ध्यानमग्न असलेल्या भक्ताच्या अंतरातिल देवदर्शनाचा ध्यास, ज्ञान संपादन करण्यामागची जी प्रेरणा किंवा जिज्ञासू वृत्ती, चंचल मनावर ताब्यांत ठेवणारी अंतरिक शांतता. प्राणिमात्रांवर, दीन दुबळ्यावर दया करणारी अंतरिक सहानुभूती, व्यवहारिक पातळीवरून मनाचे उन्नयन करणारी सद्भावना, सद् विचारास प्रवृत्त करणारी अंतरिक प्रेरणा गुरूचरणांना अर्पून एका जनार्दनीं कृतकृत्य होतात.
७६
एक भाव दुजा न राहो मनीं । श्रीरंगावांचुनी दुजें नाही ॥१॥
मनासी ते छंद आदर आवड । नामामृत चाड़ गोविंदाची ॥२॥
एका जनार्दनीं नाम वाचे गाऊं । आणीक न ध्याऊं दुर्जे काही ॥३॥
भावार्थ
या अभंगात एका जनार्दनीं सद्गुरु जनार्दन स्वामींना विनंती करतात कीं, गोविंदाच्या अमृतसमान नामाची मनाला अशी गोडी लागावी कीं, त्याशिवाय दुसरी कोणतीही भावना मनांत येऊ नये. इतर कशाविषयीची आवड निर्माण होऊ नये. वाचेने श्रीरंगाचे अखंड नाम घेत नाचावे असा छंद जडावा. नामस्मरण शिवाय आणखी कशाचाही ध्यास चित्ताला नसावा.
७७
अवघे देवा तुजसमान । मज नाहीं भिन्न भिन्न ॥१॥
नाम वाचे सदा गाऊं । आवडी ध्याऊं विठ्ठल ॥२॥
वारंवार संतसंग । कीर्तनरंग उल्हास ॥३॥
एका जनार्दनीं सार । विठ्ठल उच्चार करूं आम्ही ॥४॥
भावार्थ
संतांच्या संगतीने वाचेने सदैव विठ्ठलाचे नाम घ्यावे. आवडीने विठ्ठलाचे ध्यान करावे. विठ्ठलाच्या कीर्तनांत संताबरोबर रममाण होऊन उल्हासाने नाचावे. अवघ्या भूतमात्रांत केवळ देवाचे रूप पहावे. सारे भेदाभेद नाहिसे व्हावेत. विठठल हेच जीवनाचे अंतिम सार असावे अशी प्रार्थना एका जनार्दनीं सद्गुरू जनार्दन स्वामींचे चरणी शरणागत होऊन करतात.
७८
भुक्ति मुक्तिचे कारण । नाहीं नाहीं आम्हां जाण ॥१॥
एक गाऊं तुमचें नाम । तेणें होय सर्व काम ॥२॥
धरलिया मूळ । सहज हाती लागे फळ ॥३॥
बीजाची आवडी । एका जनार्दनीं गोडी ॥४॥
भावार्थ
भगवंताच्या नामाचे सतत गायन करण्यात जो आनंद मिळतो त्यामुळे मानवी जीवनाचे सार्थक होते. सर्व कामना पूर्ण होतात. भुक्ती मुक्तिची लालसा उरत नाही. वृक्षाचे मूळास पाणी घातल्यास आपोआपच फळ हातीं लागते. परमेश्वराचे नाम हे बीज असून त्याची गोडी अवीट आहे असे एका जनार्दनीं या अभंगात सुचवतात.
७९
लौकिकापुरता नोहे हा विभाग । साधलें अव्यंग सुखसार ॥१॥
अविट विटेना बैसले वदनीं नाम ।संजीवनी ध्यानीं मनीं ॥२॥
बहुता काळांचें ठेवणे शिवाचें । सनकसनंदाचे कुळदैवत ॥३॥
एका जनार्दनीं भाग्य ते चांगले । म्हणोनि मुखा आले रामनाम ॥४॥
भावार्थ
वाचेला परमेश्वराच्या नामाची अविट गोडी निर्माण झाली. सुखाचे भांडार उघडले. ध्यानी मनीं एकच छंद लागला. जीवनाला नविन संजीवनी लाभली. नामसाधना हा केवळ लौकिकाचा भाग उरला नाही. रामनाम हे सनकनंदांचे कुळदैवत असून पुरातन काळापासून शिवशंकराचा जपमंत्र आहे. रामनामाची अशी थोरवी वर्णन करून एका जनार्दनीं म्हणतात, केवळ भाग्य फळाला आले म्हणून रामनामाचा छंद मनाला लागला.
८०
वेदाचा वेदार्थ शास्त्राचा शास्त्रार्थ । आमुचा परमार्थ वेगळाची ॥१॥
श्रुतीचें निज-वाक्य पुराणींचे गुज । आमुचें आहे निज वेगळेंची ॥२॥
तत्त्वांचे परमतत्त्व महत्त्वासी आलें । आमुचे सोनुले नंदाघरीं ॥३॥
एका जनार्दनीं ब्रह्मांडाचा जीव । आमुचा वासुदेव विटेवरी ॥४॥
भावार्थ
वेदांचा शब्दश: अर्थ काढून वादविवाद करणे किंवा शास्त्रार्थ जाणून घेण्याची नस्ती उठाठेव करण्यापेक्षा परमार्थ साधणे सोपे आहे. श्रुतींचे रहस्य किंवा पौराणिक कथांचे सत्य उलगडून दाखवणे या ज्ञानमार्गा पेक्षा भक्तिमार्ग अधिक सोपा आणि आनंद देणारा आहे. नंदाघरी लिला करणारा गोपाळकृष्ण हा सर्व तत्वांचे परम तत्व असून (सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी असलेले आत्मतत्व ) असून तोच भीमेच्या तीरावर भक्तांसाठी विटेवर समचरणीं उभा आहे. असे एका जनार्दनीं या अभंगात स्पष्ट करतात.
८१
गाढवा सांगाती सुकाळ लाथांचा । श्रम जाणिवेचा वायां जाय ॥१॥
आम्हांसी तों एक प्रेमांचे कारण । नामाचे चिंतन विठोबाच्या ॥२॥
एका जनार्दनीं आवडी हे माझी । संतचरण पूर्जी सर्वकाळ ॥३॥
भावार्थ
गाढवाची संगत धरल्यास केवळ लाथा खाव्या लागतात. तसेच मूर्खांशी वादविवाद केल्याने जाणत्या माणसाचे ज्ञान वाया जाते. असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, विठोबाचे नामस्मरण हेच प्रेमाचे मुख्य कारण आहे. सदासर्वकाळ संत चरणांचे पूजन आणि विठोबाच्या नामाचे चिंतन ही मनाची अवीट गोडी आहे.
८२
दास्यत्वें चोखट । रामनामें सोपी वाट ॥१॥
करितां लाधले चरण । मना जाहलें समाधान ॥२॥
होतों जन्मोजन्मी तापलों । तुमचे दरूशनें निवांत ठेलों ॥३॥
शरण एका जनार्दनीं । जनार्दन एकपर्णी ॥४॥
भावार्थ
श्री रामाचे दास्यत्व स्विकारून रामनामाची सोपी वाट अंगिकारली आणि श्रीरामाचा चरणस्पर्श होऊन मनाचे समाधान झाले. जन्म मृत्युच्या फेर्यात अडकून मन अशांत झाले असताना श्री राम दर्शनाने मनाला विश्रांती लाभली. असे सांगून एका जनार्दनीं सद्गुरू जनार्दन स्वामींना भक्तीभावाने शरण जातात.
८३
रामकृष्णनाम । कथा करूं कीर्तन ॥१॥
हाचि आम्हां मंत्र । सोपा दिसे सर्वत्र ॥२॥
संतांचे संगी । मुखीं नामामृत तृप्ती ॥३॥
बसो कीर्तनी सदा । माझी मति गोविंदा ॥४॥
जनार्दनाचा एका म्हणे माझी कीव भाका ॥५॥
भावार्थ
रामकृष्णांच्या गुणांचे कथा कीर्तन करावे हा सर्वांत सोपा मंत्र वाटतो. संतांच्या संगतीने नामसंकिर्तन केल्याने नामरूपी अमृताने वाणी तृप्त होते. असे सांगून एका जनार्दनीं विनयाने म्हणतात, सतत नामसंकीर्तन करण्याची मती सद्गुरु जनार्दन स्वामींनी कृपा करून प्रदान करावी. अशी विनवणी गुरूचरणी करतात.
८४
चरणाची सेवा आवडी करीन । कायावाचामन धरूनी जीवीं ॥१॥
यापरतें साधन न करी तुझी आण । हाचि परिपूर्ण नेम माझा ॥२॥
एका जनार्दनीं एकत्वे पाहीन । हृदयीं ध्याईन जनार्दन ॥३॥
भावार्थ
काया, वाचा मन एकाग्र करून सद्गुरू चरणाची सेवा आवडीने करीन, यापेक्षा वेगळी साधना करणार नाही. हाच नेम परिपूर्णतेने तडीस नेईन असा निर्धार करून एका जनार्दनीं म्हणतात, केवळ सद्गुरू जनार्दन स्वामींना ह़दयांत धारण करून त्यांचे ध्यान करीन असे एका जनार्दनीं अभंगाच्या शेवटीं म्हणतात.
८५
मागें बहतजनांनी मानिला विश्वास । म्हणोनि मी दास सत्य जाहलों १॥
कायावाचामन विकिलें चरणीं । राहिलो धरूनी कंठी नाम ॥२॥
एका जनार्दनीं नामाचा प्रताप । भक्त आपोआप तरताती ॥३॥
भावार्थ
सद्गुरु जनार्दन स्वामींनी नामाचा असा प्रताप सांगितला आहे कीं, नामसाधना करणारे साधक संसार सागर सहज पार करून जातात. या वचनावर अनेकांचा विश्वास असल्याने जनार्दन स्वामींचे दास्यत्व स्विकारले. काया वाचा मनाने स्वामींना शरणागत झालो आणि रामकृष्ण नाम कंठी धारण केले. असे एका जनार्दनीं या अभंगात सांगतात.
८६
वायांविण करूं नये बोभाट । सांपडली वाट सरळ आम्हां ॥१॥
आतां नाहीं भय तत्त्वतां । ठेविला माथा चरणावरी ॥२॥
धरिल्या जन्माचे सार्थक । निवारला थोर धाक ॥३॥
गेला मागील तो शीण । तुमचे दरूशन होतांची ॥४॥
पूर्णपणे पूर्ण जाहलों । एका जनार्दनीं धालो ॥५॥
भावार्थ
कोणत्याही गोष्टीची प्रचिती आल्याशिवाय तिचा लोकांमध्ये उच्चार (बोभाट) करू नये हा विचार केला आणि भक्ति मार्गाची सरळ वाट सापडली तेव्हां सद्गुरू चरणावर माथा टेकवून शरणागत झालो. जन्माला आल्याचे सार्थक झाले. मनातील सारे भय संपून गेले. सगळा शीण नाहिसा झाला. सद्गुरू जनार्दनस्वामींचे दर्शन होतांच जीवनाला परिपूर्णता लाभली. मनाचे पूर्ण समाधान झाले. हा स्वानुभव एका जनार्दनीं या अभंगात वर्णन करतात.
८७
अवघा व्यापक दाविला । माझा संदेह फिटला ॥१॥
मन होतें गुंडाळलें । आपुले चरणी पैं ठेविलें ॥२॥
केलें देहाचे सार्थक । तुटला जन्ममरण धाक ॥३॥
नाहीं पहावया दृष्टी । अवघा जनार्दन सृष्टी ॥४॥
कार्यकारण हारपले द्वैत अवघे निरसलें ॥५॥
उडालें वैरियाचे ठाणे । आतां एकचि जहाले एकपणे ॥६॥
दुजा हेत हारपला । एका जनार्दनीं एकला ॥७॥
भावार्थ
सर्व चराचर सृष्टींत व्यापून राहिलेल्या परब्रह्म परमात्म्याचे दर्शन झाले आणि मनातिल संदेह संपून सारे भेदाभेद नाहिसे झाले. जन्ममरणाचे भय संपून गेले. मनुष्य देह धारण केल्याचे सार्थक झाले. कार्य आणि कारण यातिल द्वैत संपून गेले. वैरभावनेचा संपूर्ण निरास झाला. आपपर भाव लयास गेला. सारी सृष्टी सद्गुरू कृपेने भरून गेली. जीवनाचा दुसरा कोणताही हेतू शिल्लक राहिला नाही. मनाने एका जनार्दनीं सद्गुरु चरणांसी एकरूप झाले.
८८
अश्रु अंगी स्वेद रोमांच जीवीं जीव मूर्छित वो ॥१॥
माझें मजमाजी गुरूकृपा मन तें जालें उन्मन वो ।
देहीं देह कैसा विदेह जाते क्रिया चैतन्यघन वो ॥२॥
माझें मीपण पहातां चित्तीं चित्त अचिंत वो ।
वृत्तिनिवृत्ति तेथें चिद्रूप जाली परमानंदें तृप्त वो ॥३॥
एका जनार्दनीं एकत्वें जन वन समसमान एक ।
एकपणे परिपूर्ण जाला त्रैलोक्य आनंदघन वो ॥४॥
भावार्थ
गुरूकृपेने मनाचे उन्मन झाले, मन व्यवहारिक पातळीवरून उच्चतम पातळीवर पोचले. चित्ताची देहबुध्दी नाहिसी होऊन देह विदेही झाला. मनाचे मीपण (अहंकार )लयास गेला. वृत्तीची निवृत्ती झाली. मन चैतन्यघन होऊन परम आनंदाने तृप्त झाले. सर्वत्र चैतन्यमय परमेश्वराची अनुभूती येऊन जन आणि वन समान भासू लागले. अनुतापाने संसाराविषयी वैराग्य निर्माण झाले. डोळ्यांत अश्रु दाटून आले. अंगावर रोमांच उभे राहिले. सर्वांगाला घाम सुटला. सारे त्रैलोक्य आनंदाने भरून गेले. एका जनार्दनीं म्हणतात, गुरूकृपेने जीवन परिपूर्ण झाल्याची अनुभूती देणारा हा विस्मयकारक अनुभव होता.
८९
असोनी देही आम्ही विदेही भाई । नातळों कर्म अकर्माचे ठायी ॥१॥
माझें नवल म्यांच पाहिले डोळां । शब्द निःशब्द राहिलों वेगळा ॥२॥
काय सांगू नवलाची कहाणी । पाहते पाहणे बुडाले दोन्ही ॥३॥
न पहावें न देखवें नायकावें कानीं । कायावाचामनें शरण एका जनार्दनीं ॥४॥
भावार्थ
देहाने जगांत वावरत असूनही देहभावना नष्ट झाल्याने मन विदेही झाले. कर्म करीत असूनही मी करतो हा कर्तेपणाचा अहंकार गेल्याने ते अकर्म झाले. शब्दांचे प्रयोजन संपल्याने वाचा कुंठीत झाली. पाहणारा, पाहण्याची क्रिया आणि देखावा एकरूप झाला. पहाणे, ऐकणे, बोलणे या क्रिया शुन्यवत झाल्या. गुरूकृपेने हे नवल घडून आले. हे पाहून काया, वाचा, मनाने सद्गुरु जनार्दन स्वामींच्या चरणी शरणागत झालो.
९०
जाहली गेली तुटली खुंटली हाव । पहातां पाहणे एकचि जाहला देव ॥१॥
जंगम स्थावर अचळ चळाचळ । अवघा व्यापुनी राहिला अकळ ॥२॥
न कळे लाघव खेळ खेळे करूणादानी । कायावाचामने शरण एका जनार्दनीं ॥३॥
भावार्थ
देव भक्त आणि दर्शन या क्रिया एकरूप होऊन सगळ्या चराचर सृष्टींत केवळ परमात्म तत्व व्यापून राहिले आहे असा अनुभव आल्याने मनाचा हव्यास लयास गेला. करूणामय परमेश्वराचे हे लाघव कळेनासे झाले. असा अनुभव सांगून एका जनार्दनीं काया वाचा मनाने सद्गुरु जनार्दन स्वामींना शरण जातात.
९१
देव पाहतां मजमाजीं भेटला । संदेह फिटला सर्व माझा ॥१॥
माझा मीच देव माझा मीच देव । सांगितला भाव श्रीगुरूनें ॥२॥
एका जनार्दनी पाहिलासे देव । फिटला संदेह आता माझा ॥३॥
भावार्थ
सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी परमेश्वराचे आत्मरूपाने अस्तित्व आहे हे ज्ञान जनार्दन स्वामींच्या कृपेने प्राप्त झाले असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, आपल्याच अंत:करणांत परमात्म्याचा साक्षात्कार झाला. मनाचा संदेह फिटला.
९२
पहावया गेलों देव । तो मीची स्वयमेव ॥१॥
आतां पाहणेंचि नाहीं । देव भरला हृदयीं ॥२॥
पाहता पाहतां खुंटलें । देवपण मजमाजी आटलें ॥३॥
परतले दृष्टीचे देखणें । अवघा देव ध्यानेमनें ॥४॥
एका जनार्दनीं देव । नुरे रिता कोठे ठाव ॥५॥
भावार्थ
देवाचे दर्शन घेण्यासाठी देवालयांत गेलो असता आपण स्वता:च देव आहोत या सद्गुरू वचनाची प्रचिती आली आणि अंत:करण परमात्म स्वरूपाने भरून गेले. पाहाण्याची क्रियाच खुंटून गेली. मी पण परमेश्वर स्वरूपांत विरून गेले. एकाच परमात्म स्वरूपाने मन व्यापून टाकले. परमात्मा तत्वाने सारे विश्व भरून टाकल्याची जाणीव झाली. मन परमेश्वराच्या ध्यांनांत मग्न झाले. हा अलौकिक अनुभव एका जनार्दनीं या अभंगात व्यक्त करतात.
९३
कायावाचामनें । कृपाळू दीनाकारणें ॥१॥
ऐसा समर्थ तो कोण । माझ्या जनार्दना-वाचून ॥२॥
माझें मज दाखविलें । उघड वाचे बोलविलें ॥३॥
जनी जनार्दन । एका तयासी शरण ॥४॥
भावार्थ
या अभंगात सद्गुरू जनार्दन स्वामींची थोरवी गातांना एका जनार्दनीं म्हणतात, काया वाचा मनाने दीनांवर कृपा करणार्या जनार्दन स्वामींसारखे समर्थ या जगांत दुसरे कोणी नाही. सद्गुरू कृपेने आराध्य दैवताचे दर्शन झाले. यासाठी जन्मभर त्यांचा शरणागत होऊन ऋणी राहीन.
९४
सर्व देवांचा हा देव । उभा राहे विटेवरी ॥१॥
त्याचे ठायीं भाव माझा । न दिसे दुजा पालटू ॥२॥
वारंवार ठेवीन डोई । उगेच पायीं सर्वदा ॥३॥
न मागें भुक्ति आणि मुक्ति । संतसंगति मज गोड ॥४॥
त्याचे वेड माझे मनीं । शरण एका जनार्दनीं ॥५॥
भावार्थ
जनार्दन स्वामींना शरणागत असलेले एका जनार्दनीं म्हणतात, सर्व देवांचा देवाधिदेव भक्तराज पुंडलिकासाठी पंढरीला विटेवर उभा आहे त्याच्या ठिकाणी भक्तीभाव अर्पण करून चरणांवर वारंवार नतमस्तक व्हावे. भक्ती आणि मुक्तिची लालसा न धरता केवळ संतांच्या संगतीचा लाभ व्हावा, एव्हढा एकच हेतू ह़दयीं बाळगून एका जनार्दनीं सद्गुरूंना शरण जातात.
९५
आजी देखिली पाउलें । तेणें डोळे धन्य जाहले ॥१॥
मागील शीणभारू । पाहतां न दिसे निर्धारू ॥२॥
जन्माचें तें फळ ।आजी जाहले सुफळ ॥३॥
एका जनार्दनी डोळा । विठ्ठल देखिला सांवळा ॥४॥
भावार्थ
विटेवर उभ्या असलेल्या विठोबाच्या पाउलांचे दर्शन झाले आणि डोळ्यांचे पारणे फिटले. जन्मोजन्मीचा शीणभार उतरला. जन्माला येऊन केलेल्या अनन्य भावभक्तीचे फळ पदरीं पडले. एका जनार्दनीं म्हणतात, सावळ्या विठ्ठलाच्या चरणांचे दर्शन हा अलभ्य लाभ झाला.
९६
सायासाचे बळ । ते आजी जाहलें अनुकूळ ॥१॥
धन्य जाहलें धन्य जाहलें । देवा देखिले हदयीं ॥२॥
एका जनार्दनीं संशय फिटला । देव तो देखिला चतुर्भुज ॥३॥
भावार्थ
चार भुजा असलेल्या देवाचे मनोहारी रूप डोळ्यांना दिसले आणि जीवन धन्य झाले. अनेक जन्मींचे भाग्य उदयास आले. परब्रम्ह परमात्मा ह़दयांत साठवला. मनांतले सारे संशय लयास गेले. ही कृतार्थतेची भावना एका जनार्दनीं या अभंगात व्यक्त करतात.
९७
मज करू दिली नाही सेवा । दाविलें देवा देहींच ॥१॥
जग व्यापक जनार्दन । सदा वसे परिपूर्ण ॥२॥
भिन्न भिन्न नाहीं मनीं । भरलासे जनीं बनीं ॥३॥
एका जनार्दनीं शरण । सर्वाठायीं व्यापक जाण ॥४॥
भावार्थ
विश्वाच्या जनांत आणि वनांत अभिन्नपणे सर्वत्र व्यापक भरून राहिलेल्या परब्रह्म परमात्म्याचे देही दर्शन घडवून आणण्याची किमया जनार्दन स्वामींचा कृपेने घडून आली कोणतिही सेवा न घेता त्यांनी हे उपकार केले अशी कृतज्ञतेची भावना या अभंगात एका जनार्दनीं व्यक्त करतात.
९८
मानसींच ध्यान मानसींच मान । मानसींच अर्चन करूं आम्ही ॥१॥
न करूं साधन लौकिकापुरते । न पुजू दैवत आन वायां ॥२॥
मानसींच तप मानसींच जप । मानसीं पुण्यपाप नाही आम्हां ॥३॥
मानसीं तीर्थयात्रा मानसीं अनुष्ठान । मानसीं धरूं ध्यान जनार्दन ॥४॥
एका जनार्दनीं मानसीं समाधी । सहज तेणें उपाधी निरसली ॥५॥
भावार्थ
मनानेच परमात्म्याचे मानस पूजन करणे, मनातच ध्यान मग्न होऊन मूर्तीचे अवलोकन करणे, मनानेच तप, आणि वाणीने जप करणे या मानसिक क्रियांयोगे पापपुण्याच्या भ्रामक कल्पना आणि लौकिकाची अभिलाषा मनांत येत नाही. एका जनार्दनीं सुचवतात, मनाने केलेले अनुष्ठान, तीर्थयात्रा, ध्यान, धारणा आणि समाधी यामुळे जीवनातिल सर्व उपाधी निरसून मनास अपूर्व शांतता लाभेल.
९९
मानसींच अर्थ मानसींच स्वार्थ । मानसीं परमार्थ दृढ असे ॥१॥
मानसींच देव मानसींच भक्त । मानसींच अव्यक्त दिसतसे ॥२॥
मानसींच संध्या मानसीं मार्जन । मानसी ब्रहायज्ञ केला आम्हीं ॥३॥
मानसीं आसन मानसी जनार्दन । एका जनार्दनीं शरण मानसींच ॥४॥
भावार्थ
मनातच देवाच्या अव्यक्त मूर्तीची स्थापना करून तिची यथासांग स्नान, संध्या आणि पूजा केल्याने मनांत द्रुढ भक्तिभाव निर्माण होतो. हाच मानसिक ब्रह्मयज्ञ साकार होतो. मनातच सद्गुरुंसाठी आसन तयार करून त्या वर मनानेच जनार्दन स्वामींची स्थापना करून मनानेच त्यांना पूर्ण शरणागत व्हावे असे आवाहन एका जनार्दनीं या अभंगात करतात.
१००
बहुत पुराणें बहुत मतांतरें । तयांच्या आदरें बोल नोहे ॥१॥
शाब्दिक संवाद नोहे हा विवाद । सबाह्य परमानंद हृदयामार्जी ॥२॥
नोहे हैं कवित्व प्रेमरस काढा । भवरोग पीडा दुरी होय ॥३॥
नोहे हे कामनिक आहे निष्कामनिक । स्मरतां नासे दुःख जन्मांतरीचें ॥४॥
एका जनार्दनी माझा तो निर्धार । आणिक विचार दुजा नाहीं ॥५॥
भावार्थ
चारी वेद, साही शास्त्रे, अठरा पुराणे याविषयीं कितीही मतभेद निर्माण झाले असले तरी हे वादविवाद नसून शाब्दिक संवाद आहे. त्यामुळे हृदयात अंतरबाह्य परमानंद दाटून येतो. हे केवळ कवित्व नसून संसार दु:खाची पीडा दूर करणारा प्रेमरसाचा काढा (रसायन) आहे. हे वासना निर्माण करणारे नसून मनाला निष्काम करणारे रसायन आहे. याचे स्मरण होतांच जन्मोजन्मीचे दु:ख निवारण होते. असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, हे केवळ मत नसून मनाचा निर्धार आहे यापेक्षा वेगळा विचार नाही.
१०१
जो काळासी शासनकर्ता । तोचि आमुचा मातापिता ॥१॥
ऐसा उदार जगदानी । जनार्दन त्रिभुवनीं ॥२॥
आघात घात निवारी । कृपादृष्टी छाया करी ॥३॥
जन तोचि जनार्दन एका जनार्दनी भजन ॥४॥
भावार्थ
प्रत्यक्ष काळाचा जो शासनकर्ता तोच सर्व प्राणिमात्रांचे पालनपोषण करणारा मातापिता असून हा जनार्दन अतिशय उदार आहे. तो सर्वांची संकटे दूर करून आपल्या कृपादृष्टीने सर्वांवर प्रेमाची पाखर घालतो. असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, जन हे जनार्दनाचे रूप असून जनसेवा हेच जनार्दनाचे भजन आहे.
१०२
आम्हां काळाचे भय ते काय । जनार्दन बापमाय ॥१॥
पाजी प्रेमाचा तो पान्हा । नये मना आन दुजें ॥२॥
दिशाद्रुम भरला पाहीं । जनार्दन सर्वाठायीं ॥३॥
एका जनार्दनीं ध्यात । जनार्दन तो ध्यानाआतं ॥४॥
भावार्थ
जनार्दन विश्वांत दाही दिशांमध्ये भरला आहे. सर्वच प्राणिमात्रांत तो आत्मरूपाने वसत आहे. मायबापा होऊन प्रेमाने संगोपन करणारा जनार्दन असतांना काळाचे भय वाटण्याचे कारण नाही. एका जनार्दनीं सांगतात, या परमात्म्याचे निरंतर ध्यान करावे.
१०३
स्वर्ग मृत्यु पाताळ सर्वावरी सत्ता । नाहीं पराधिनता जिणे आमुचें ॥१॥
नाही त्या यमाचे यातनेचे भय । पाणी सदा वाहे आमुचे घरीं ॥२॥
नाहीं जरामरण व्याधीचा तो धाक । सुखरूप देख सदा असों ॥३॥
एका जनार्दनीं नामाच्या परिपाठीं । सुखदुःख गोष्टी स्वप्नी नाहीं ॥४॥
भावार्थ
स्वर्ग, मृत्यु, पाताळ या त्रिभुवनांवर ज्याची सत्ता चालते तो पाठिराखा असतांना यम यातनेचे भय बाळगण्याचे कारण नाही. वार्धक्य, मृत्यु, शारिरीक आणि मानसिक व्याधी यांना घाबरण्याची गरज नाही. सदैव सुखासमाधांत, जनार्दनाच्या नामसंकिर्तनांत काल व्यतित करावा. सुखदु:खाच्या गोष्टींचा स्वप्नांत देखिल विचार करू नये असा उपदेश एका जनार्दनीं या अभंगात करतात.
१०४
जन्मोजन्मीं आम्ही बहु पुण्य केलें । मग या विठ्ठलें कृपा केली ॥१॥
जन्मोनी संसारी झालों याचा दास । माझा तो विश्वास पांडुरंगीं ॥२॥
भ्रमर सुवासी मधावरी माशी । तैसे या देवासी मन माझें ॥३॥
आणिका देवासी नेघे माझें चित्त । गोड गातां गीत विठोबाचें ॥४॥
एका जनार्दनीं मज तेथें न्यावें । हाडसोनी द्यावें संतांपार्शी ॥५॥
भावार्थ
या संसारांत जन्माला येऊन विठ्ठलाचे दास्यत्व स्विकारले. पूर्व जन्मांत केलेल्या पुण्याने हा योग जुळून आला. पांडुरंगावर अनन्य विश्वास निर्माण झाला. सुगंधी फुलावर जसा भ्रमर किंवा मधाच्या पोळ्यावर जशी मधमाशी आसक्त होते तसे मन विठ्ठल चरणीं गुंतून पडले. विठोबाच्या गुणांचे गोड गीत गातांना इतके सुख होते कीं, इतर देव देवतांकडे चित्त वळतच नाही. एका जनार्दनीं सद्गुरू जनार्दन स्वामींनी कृपा करावी आणि अखंड संत-संगतिचा लाभ घडावा. अशी मनोकामना अभंगाच्या शेवटी व्यक्त करतात.
१०५
अगाध तुझी लीला आकळ कैसेनी कळे । ब्रह्मा मुंगी धरूनी तुझें स्वरूप सांवळे ॥१॥
तुज कैसें भजावें आपणां काय देखावें । तुजपाशीं राहुनी तुजला कैसे सेवार्वे ॥२॥
अगा देव तूं आम्हां म्हणसी मानवी । हेम अलंकार वेगळे निवडावे केवी ॥३॥
एका जनार्दनी सबाह्यभ्यंतरी नांदे । मिथ्या स्वप्नजात जेवीं जाय ते बोधे ॥४॥
भावार्थ
परमेश्वराची अगाध लीला कशी समजून घ्यावी, परमेश्वराची भक्ती, भजन कसे करावे, परमेश्वर चरणीं लीन होऊन त्याची सेवा कशी करावी हे कळत असूनही त्याचे आकलन होत नाही. परमात्म्याचे दृष्टीने मानव रूप असलो तरी त्यापासून वेगळे नाही, सोने आणि सोन्याचा अलंकार वेगळे करता येत नाही. एका जनार्दनीं म्हणतात हे आत्मतत्त्व विश्वाला आंतून बाहेरून व्यापून राहिले आहे. हा बोध झाला कीं, द्वैताचे हे बंधन स्वप्नासारखे विरून जाईल.
१०६
विटाळेंविण पोटा आला । अवघा संसार मिधा केला ॥
शा लग्न लागतां आला पोटा । मग सोडिले अंतरपाटा ॥२॥
ॐकारेसी बुडाली घडी । लग्न लाविलें औटावे घडीं॥३॥
एका जनार्दनीं लग्न समरसें । पाहों गेलिया त्या लाविलें पिसें ॥४॥
१०७
बोलू नये तें आलें बोला । आमुचा बाप गरवार जाला ॥१॥
नवलही ऐकिलें ऐका जो तुम्ही चोज । ऐकू जातां तोचि नाचे भोजें ॥२॥
प्रौढ जाली आमुची आई । बापासी नावे त्या टेविली पाही ॥३॥
लेकीने बापासी केले सावेव । एका जनार्दनीं पहा नवलाव ॥४॥
१०८
अवघ्या संसाराचा कळस जाला । आमुलाची कैसा पोटा आला ॥१॥
पाठी बैसला तोचि पोटीं । उघड्या दिठी देखतसे ॥२॥
अमोल्याचे कुळ न सांगवे तोंडें । सोय धरी तरी सखी भावंडे ॥३॥
पाठी पोर्टी बैसला पाठीं । सोयरीक गोष्टी एका जनार्दनीं ॥४॥
१०९
बोलणे बोलतां हेंचि दुर्घट । नुपजत लेकासी लाविला पाट ॥१॥
बोलू नये याचे सत्त भण । मौनची राहणे हेचि शहाणपण ॥२॥
तेथील संतति म्हणाल पवित्र । न म्हणतां तरी घात कुळगोत्र ॥३॥
काही एक वेद वॉलं गेला वोली । चवंढाई चिरूनी तीन कांडे गेली ॥४॥
श्वापोनी भक्ती बोलू गेली तोडें । बोल बोले तंव नवखंडें ॥५॥
लडिवाड भक्त बोलोनी हांसे । बोल बोलें तंव लावियेलें पिसें ॥६॥
बोलावला येतो चढला अभिमाना । बोल बोलें तंव दवडिलें राना ॥७॥
एका जनार्दनीं मौनची घोटी । एकपणे तेंही घातले पोर्टी ॥८॥
११०
बाप तोचि पाय होउनी आला पोर्टी । जातक वर्णितां गुंती पडली भेटी॥१॥
बाप की माय म्हणावा पुत्र । भुललीया श्रुति करितां वृत्तान्त ॥२॥
मी बापापोर्टी की बापु माझ्या पोटी । वर्णितां ज्योतिषी विसरले त्रिपुटी ॥३॥
एका जनार्दनीं जातक मौनी । जन्मनाम ठेविलें नि:शब्द देउनी ॥४॥
१११
एकाची दिठी एकाचे डोळे । एक चाले कैसें एकाचिये खोळे ॥१॥
सबाह्य अभ्यंतरी सारिखा चांग । दोघे मिळोनियां एकचि अंग ॥२॥
यापरि रिगाली अभिन्न अंगी । दोघे सामावले अंगीच्या अंगी ॥३॥
ऐसें लेकीने बापासी बांधिले कांकण । एका जनार्दनीं केलें पाणिग्रहण ॥४॥
११२
माये आधी लेक जन्मली । दोघींच्या लग्राची आयती केली ॥१॥
शा कोण नोवरा कोण नोवरी । अर्थ पाहतां न कळे निर्धारीं ॥२॥
बापा आधी लेक जन्मला । लग्नाचा सोहळा बापाचा केला ॥३॥
वरात निघाली नोवरा नोवरी । एका जनार्दनी जाहली नवलपरी ॥४॥
११३
स्वामीसेवका अबोला । ऐसा जन्मचि अवघा गेला ॥१॥
जन्मवरी जुनें भातें । साधन शिऊं नेदी हातें ॥२॥
काम करूं नेदी हातीं । उसंत नाही अहोराती ॥३॥
श्रद्धेविण अचाट सांगें । ढळो नेदी पुढे मागें ॥४॥
न गणी दिवस मास वरुषी । भागों जातां वहीच पुसी ॥५॥
चावा चावीं करूं नेदी । सगळे गिळवी त्रिशुद्धी ॥६॥
जो कां ग्लानी साधन मागें । तेंचि बंधन त्यासी लागे ॥७॥
जो सेवा करी नेटका । त्यासी करूनी सांडी सुडका ॥८॥
झोप लागों नेदी काहीं । निजे निज निजवी पाही ॥१॥
एका जनार्दनीं निज सेवा । जीवें ऊरूं नेदी जीवा ॥१०॥
११४
गो गोरसातीत स्वानंद माखरेसी । प्रेमें पेहें पाजीन सख्या सोयर्यासी ॥१॥
घेई घेई बाळा घोट एक । झणी पायरव होईल कुशली पडे तर्क ॥२॥
दृश्य न दिसे तें काळी अवघे लावी होटी । सद्युक्तीचे शिंपीवरी गिळी तैसें पोटीं ॥३॥
अंतर तृप्त जालें सबाह्य कोंदलें । निज गोडिये गोडपणे तन्मय जालें ॥४॥
सद्गुरू माउली पेहे पाजी अंगी भरला योग । तेणें देह बुद्धी समूळ केला त्याग ॥५॥
पंचभूतांचें अंगुले सुवर्ण हारपलें । माझें माझें म्हणत होते त्या गुणा विसरलें ॥६॥
आतीची हारली भूक जालें सुख । निजानंदी पालीं पहुडले स्वात्मसुख ॥७॥
पेहे पाजायाचें मिसें देतसे पुष्टी तुष्टी । एका सामावला जनार्दना पोटी ॥८॥
११५
नयन तान्हेलें पाजावें काई । मना खत झाले फाडू कवण ठायीं ॥१॥
शा ऐसा कोणीहि वैद्य मिळता का परता । सुखरूप काढी मनाची का व्यथा ॥२॥
डोळ्याची बाहुली पाहता झडपली । तिसी रक्षा भली केवि करूं ॥३॥
निढळींची अक्षरे चुकी कानामात्रे । शुद्ध त्याहावें कैसे लिहिणारें ॥४॥
जीवाचीया डोळा पडळ आलें । अंजन सुदले केविं जाय ॥५॥
एका जनार्दनीं जाणे हातवटी । पुण्य घेऊनी कोणी करा भेटी ॥६॥
११६
धरा अधर जाली वोटंगणे काई । जळे मळे तें ध्यायें कवणे ठायी ॥१॥
ऐसा कोण्हीही गुणीया मिळों का निरूता । भूतें धरे धरी आपुलिया सत्ता ॥२॥
अनि हिवेला तापात्र कोठे । पवना प्राणु नाही कवण लावी वाटे ॥३॥
गगन हारपले पाहावें कवणे ठायी । मन मुखर्जी लागलें शांतीक ते पाही ॥४॥
स्वादें जेवणार गिळिला ४ जाणा । चयी सांगावया सांगते कवणा ॥५॥
एका जनार्दनीं जाणे एक खुणे । त्यासी भेटी कोणी घ्या एकपणें ॥६॥
११७
हे सहजचि थोरावले । पृथ्वी आप तेज झालें ।
वायु आकाश संचलें । आनंदले सकलही ॥१॥
तें मोहरी येव चक्र । गगनी हा निर्धार ।
याचा पाहे पां विचार । चैतन्यामाजी ॥२॥
श तेथें वेदासी बोबडी । अनुभवी पैलथडी ।
एका जनार्दनीं गोडी । नित्य घेतसे ॥३॥
११८
आता आम्ही सहजचि थोर । ब्रह्मा विष्णु महेश्वर ।
परब्रह्म स्वयें ॐकार । परात्मा जगदात्मा ॥१॥
आम्ही सहजचि स्वत:सिद्ध । जागृति सुषुप्ति साध्य ।
तूर्या त्रिसाक्षीणी बोध । अपि अगाध उन्मनीं ॥२॥
ते उन्मनी परात्पर । निर्गुण हो निराकार ।
तूर्या तिचा आकार । एका जनार्द सगुणाकार देह झाला ॥३॥
११९
उन्मनीचा हेलावा । तूर्या त्रिनयनीं दावावा ।
त्रिगुण तूर्या साठवावा । तें कारण उन्मनीं ॥१॥
हार्ती देऊनि बावन कस । भूमंडळी फिरवा भलत्यास ।
नाहीं लांछन हीनकसास । बाळकांत तेवीं तें ॥२॥
एका जनार्दनीं हा बोध । उघड बोलिलों सुबोध ।
अनुभवोनि हा बोध संतचरण धरावे ॥३॥
१२०
नाभिस्थानी ठेवा हृदयकमळी पहावा । द्विदळी अनुभवा एकभाव ॥१॥
अर्थमा बिंदु पाहतां प्रकार । होउनी साचार सुखी राहे ॥२॥
प्रणव ओंकारू विचार करितां । बिंदूप तत्त्वतां सर्वगत ॥३॥
कुंडलिनी गति सहजचि राहे । सहस्त्रदळी पाहे आत्मरूप ॥४॥
भिन्नभिन्न नाई अवचि स्वरूप । पाहतां निजरूप रूप होय ॥५॥
तेथें कैंचा विचारू कैंचा पां अनाचारू । एक जनार्दनीं साचारू सवा घर्टी ॥६॥
१२१
रात्रंदिवस जप होती साठ घटिका । संख्या त्याची ऐका निरनिराळी ॥१॥
दो घटिका पळे दहा निमिष दोन । प्रथम तें स्थान आधारचक्र ॥२॥
साडेसोळा घटिका दहा पर्ने लेखा । निमिर्षे तीन देखा स्वाधिष्ठानी ॥३॥
दहा पळें देखा घटिका सोडेसोळा असती । मणिन गणती निमिष चार ॥४॥
आणिक घटि पळे तितुकींची पाही । अनुहत ठायीं निमिष पांच ॥५॥
पावणेतीन घटिका दहा पळे जाणा । विशुद्धींची गणना निमिष एक ॥६॥
अग्निचक्रावरी पावणे तीन घटिका । दीड पळ देखा निमिष एक ॥७॥
पळ आठ घटिका अडिचाची गणती । निमि चवदा असती सहस्त्रदळीं ॥८॥
सहाशे ते सहस्त्र एकवीस होती । जनार्दनप्राप्ति एका उपायें ॥९॥
१२२
आंगुलीवरी आंगुली खेळतसे तान्हुली ।
पडली तिची साउली । भिन्न माध्यान्ही ॥१॥
दिवसांचे पाहणे । पाहतां दिसे लाजिरवाणे ।
खेळ मांडिला विंदानें । नवल ऐका ॥२॥
बारा सोड घागरी । पाणी नाही थेंबवरी ।
नाहायासी बैसली नारी । मुक्त केशें ॥३॥
घरधनी उभा ठेला । ते रांजण उचलिला ।
जाउनी समुद्री बुडाला नवल ऐका ॥४॥
नाहतां नारी उठली । परपरुष भेटली
आनंदाने बैसली । निजस्थानी ॥५॥
काळे निळे नेसली । जाउनी दारवंटा बैसली
एका जनार्दनी देखिला । नवल ऐका ॥६॥
१२३
जगामध्ये काय हालत । ते दृष्टीसी नाहीं भरत ।
अचळ असोनि चळस । चंचळ म्हणत आहे मुठीत ॥१॥
कैसे बोटाने दाखवू तुला । सावध होई गुरुच्या मुला ।
हा शब्द अयोज वेगळा अर्थ जाणे सहस्त्रांत विरळा ॥२॥
शा काही नसोनि ते दिसत । नाही म्हणतां सत्य भासत ।
आकारी आकार लपत । वाउगे जाणत्यासी भासत ॥३॥
अहं सोहं कोहं लपाला । उघड दृष्टीरूपा आला ।
जगी व्यापक नसोनि व्यापला । एका जनार्दनीं गुरूपुत्र भला ॥४॥
१२४
चक्षुदर्पणी जग हे पहा । जगजीवनी मुरूनी रहा ।
तूर्या कालिंदि तीथी नाहा । पापपुण्यासी तिळांजुळी वहा ॥१॥
डोळ्यांनो सत्य ही गुरूची खूण । आपुलें स्वरूप घ्या ओळखून ॥धृ०॥
तिन्ही अवस्था सांडुनी मागें । अर्ध चंद्राच्या चांदण्यांत वागे ।
चांदणे ग्रासूनि त्या ठायी जागे । गड उन्मनी झडकरी वेगें॥२॥
एवढे ब्रह्मांडफळ ज्या देठी । ते आटले देखण्यांचे पोर्टी ।
त्यासी पहातां पाठी ना पोर्टी । मीतूंपणाची पडली तुटी ॥३॥
चहूं शून्याचा निरसी जेणें । शून्य नाहीं तें शून्यपणे ।
शून्यातीतचि स्वयंभ होणें । शून्य गाळूनि निःशून्यपणे ॥४॥
चार सहा दहा बारा सोळा । हा तो आटल्या देखण्याच्या कळा ।
कळातीत स्वयंभ निराळा । एका जनार्दनी सर्वाग डोळा ॥५॥
१२५
एक पंच तीन नवांचे शेवटीं । अठरा हिंपुर्टी जयासाठीं ॥१॥
सात तेरा चौदा घोकितां श्रमले । पंचवीस शिणले परोपरी ॥२॥
तेहतिसां आटणी चाळिसां दाटणी । एकुणपन्नासांची कहाणी काय तेथें ॥३॥
एका जनार्दनीं एकपणे एक । बावन्नाचा तर्क न चालेचि ॥४॥
१२६
कान्होबा नवल सांगतों गोष्टी । एक वृक्ष दृष्टी देखिला तयावरी सृष्टी ॥१॥
कोडें रे कोडे कान्होबा तुझे कोडें । जाणती जाणती अर्थ पाहतां उघडे ॥धृ०॥
वृक्षारी नाही मूळ वर शेंडा नाही सरळ । बावन शाखा पल्लव पन्न पुष्प भरलें सकळ ॥२॥
एका जनार्दनीं वृक्ष सुढाळ । तयांवरी खेळे एक एकुलते बाळ ॥३॥
१२७
पंचभूते नव्हती जई । तै वृक्ष देखिला भाई ।
अधोभार्गी शेंडा मूळ पाहो । बरी वेंधली तिसी पाय नाहीं ॥१॥
सांगें तूं आमुचे कोडें कान्होबा सांग तूं आमुचे कोडे ।
नाहीं तरी जाऊं नको पुढे ॥धृ०॥
नवलक्ष जया शाखा । पत्रपुष्पें तेचि रेखा ।
पंचभूते कोण लेखा । ऐसा वृक्ष देखिला देखा ॥२॥
तयावरी एक सीण । तिने खादले त्रिभुवन ।
शरण एका जनार्दन । हें योगियांचे लक्षण रे ॥३॥
१२८
सगुण निर्गुण नोहे वृक्ष । पाहतां नेत्रीं न भासे सादृश्य ।
देखतां देखत होतो अदृश्य ॥१॥
सांग रे कान्होबा हे कोडें । तुझे तुजपाशी केले उघडे ।
आम्हां न कळे वाडेंकोडें ॥२॥
एक मुळी वृक्ष देखिला । द्विशाखां तो शोभला ।
पाहतां पेंत्र पुष्पें न देखिला ॥३॥
ऐसे वृक्ष अपरंपार । एकाजनार्दनीं करा विचार ।
मग चुकेल वेरझार ॥४॥
१२९
अलक्ष अगोचर म्हणती वृक्ष । तो दृष्टी न दिसे साक्ष ।
योगी म्हणती पाहिलालक्ष ॥१॥
कान्होबा तुझें कोडें । तुजपुढे केलें उपर्डे ।
सांगता वेद जाहले वेडे रे ॥२॥
सहा असा मिळणी । छत्तिसांचे घातले पाणी ।
तो वृक्ष देखिला नयनी रे ॥३॥
पंचाण्णवाची एक शाख । एका जनार्दनीं वृक्ष देखा ।
अर्थ पाहतां मोक्ष रेखा रे ॥४॥
१३०
अहं सोहं वृक्षा तो निघाला वोहं ।
याचा शेंडा नाहीं पा कोठे कोहं ॥१॥
कानोग उघड माझें कोडे
बोल बोलतो साबडे । अर्थ करी कां रे निवाडे ॥२॥
शा वृक्ष जाहला मन पवन । तो सहजचि हवन ।
वृधे वेधलें चराचर गहन रे ॥३॥
वृधे भेदिले आकाश । एका जनार्दय निरवकाश ।
वृक्षचि जाहला अलक्ष रे ॥४॥
१३१
नीळवर्ण वृक्ष तो अति दृश्य । पाहतां सावकाश दृष्टी न पडे ॥१॥
मलें में कान्होबा हैं तुझे । लय लक्षा न कळे म्हणती माड़ों आणि तुझें ॥२॥
हो वृक्षाची योळख धरा वरी निवृत्ति ज्ञानदेव सोपान अधिकारी ॥३॥
एका जनार्दनीं वृक्ष सगुण निर्गुण । जाहला पुंडलिक कारणें ब्रह्म सनातन ॥४॥
१३२
वृक्ष व्याला आकाश पाताळ । वृक्षी प्रसवले लोकपाळ ।
अठ्यांशी सा ऋषिमंडळें ॥१॥
कान्होबा बोलों तुझें कोडें । अर्थ ऐकतां ब्रह्म जोडे ।
अभक्त होती केवळ रे ॥२॥
वृक्षाअंगी पंचभूतें । प्रसवला तत्त्वे निरूतें ।
अहं सोहं पाहतां तें होतें ॥३॥
एका जना पाहिला वृक्ष । गुरूकृपें वोळखिला साक्ष ।
भेदभाव गेला प्रत्यक्ष रे ॥४॥
१३३
निर्गुण निराकार वृक्ष आकारला । पंचतत्वें व्यापक जाहला ॥१॥
कान्होबा हे बोल माझें कोडें । पंचविसांचे ध्यानीं नातुडे रे ॥२॥
साठ ऐशी शोभती शाखा । नवलक्ष पल्लव भाग रे ॥३॥
चौर्यांयशी लक्षांची मिळणी । वृक्षरूपी एका जनार्दनीं देखा रे ॥४॥
१३४
ॐकार हा वृक्ष विस्तारिला । चतुःशाखें थोर जाहला ।
पुढें षडंतर शाखें विस्तारअठरांचा तया मोहोर आला ॥१॥
उघडे माझें कोडें । जाणती न जाणती ते वेडे ।
पडलें विषया सांकडें । तया न कळे हे कोडे रे ॥२॥
चौांयशी लक्ष पत्रे असती । सहस्त्र अठ्यायशी पुष्पे शोभती ।
तेहतीस कोटी फळे लोंबती । ऐशी वृक्षाची अनुपम्य स्थिती रे ॥३॥
आदि मध्य पाहतां न लगे मूळ । एकवीस स्वर्ग सप्त पाताळ ।
एका जनार्दनीं वृक्ष तो सबळ । उभा विटे समूळ वो ॥४॥
भावार्थ
ॐकार वृक्ष बहरला तो चार शाखांमध्ये विस्तार पावला. नंतर सहा शास्त्रे निर्माण झाली. अठरा पुराणांचा मोहर फुटला. चौर्यांशी लक्ष प्राण्यांच्या योनींची पालवी फुटली. एक हजार अठ्यांशी पुष्पांचा बहर येऊन वृक्ष शोभायमान झाला. कालांतराने तेहतीस कोटी फळे लोंबू लागली. या अश्वस्थ वृक्षाचे अनुपम स्वरूप नजरेंत भरत होते पण त्याचे मूळ मात्र अगम्य वाटत होते. एकवीस स्वर्ग आणि सात पाताळ यांना व्यापून राहिलेला हा वृक्ष अतिशय सबळ असून पंढरीला विटेवर समचरणीं उभा आहे असे एका जनार्दनीं या अभंगात वर्णन करतात.
१३५
वृक्ष पहातां परतला आगम । निगमा न कळे दुर्गम ।
वेदशास्त्रांसी निरूते वर्म ।'वृक्ष देखिला विट्ठलनाम ॥१॥
माझे सोपें कोडें । कान्होबा करी तूं निवाडे ।
अर्थ सखोल ब्रह्मा भक्तिभाव तयासि उघडे रे ॥२॥
साहांची येथे न चाले मती । चार गुंतले न कळे गती ।
अभाटीव वर्णिती । ऐशियासी न कळे स्थिती रे ॥३॥
चौर्यांशी लक्ष भुलले वायां । अयांशी सा भोगिती छाया ।
तेहतीस कोटी न कळे आयतया । एका जनार्दनीं लागे पायां रे ॥४॥
भावार्थ
या वृक्षाचे स्वरुप जाणून घेणे आगमा-निगमास दुर्गम (कठिण) वाटले. वेदशास्त्रांना त्याचे रहस्य उलगडून दाखवता येईना. चारी वेद आणि साही शास्त्रे यांची मती कुंठित झाली. चौर्यांशी लक्ष योनितून फिरणारे तेहतीस कोटी मानव या विठ्ठलनाम वृक्षाला पाहून स्तंभित झाले असे वर्णन करुन एका जनार्दनीं या वृक्षाला आदराने वंदन करतात.
१३६
सोपा वृक्ष फळासी आला । विठ्ठलनामें विस्तारला ॥१॥
वेदां न कळे मूळ शास्त्रे भांडती पैं तोंडा ॥२॥
पुराणें स्तवितां व्याकुळ जाहलीं । निवांत होऊनियां ठेली ॥३॥
वृक्ष जनार्दन । एका जनार्दनीं विस्तार पूर्ण ॥४॥
भावार्थ
सहज सोपा भक्तीभावाचा हा वृक्ष फळाफुलांनी बहरून आला. विठ्ठलनामाने त्याचा विस्तार झाला. चारी वेदांना या वृक्षाचे मूळ हाती लागेना. साही शास्त्रे वादविवाद करून थकली. याच्या स्वरूपाचे वर्णन करताना अठरा पुराणे नि:शब्द झाली. असे वर्णन करुन एका जनार्दनीं म्हणतात, जनार्दन नावाचा हा वृक्ष जनमानसांत पूर्ण विस्तार पावला.
१३७
एक दोन तीन विचार करती । परि न कळे गति त्रिवति ॥१॥
त्रिरूप सर्व हा मायेचा पसार । त्रिवर्ग साचार भरले जग ॥२॥
त्रिगुणात्मक देह त्रिगुण भार आहे । त्रिमूर्ती सर्व होय कार्यकर्ता ॥३॥
एका जनार्दनीं त्रिगुणांवेगळा । आहे तो निराळा विटेवरी ॥४॥
भावार्थ
ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिमूर्ती या जगाचे निर्माते असून ते प्रमुख कार्यकर्ते आहेत. मानवी देह सत्व, रज, तम असा त्रिगुणात्मक आहे. सात्विक, राजस, तामस या तीन प्रकारच्या व्यक्तींनी जग व्यपलेले आहे असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, या त्रिगुणात्मक सृष्टीच्या पलिकडे त्रिगुणांपासून अलग असलेला परब्रह्म परमात्मा पंढरीत विटेवर समचरणी उभा आहे.
१३८
चार देह चार अवस्था समाधी । कासया उपाधि करिसी बापा ॥१॥
चार बेद जाण चार युगें प्रमाण । पाचवे विवरण न करी बापा ॥२॥
जनार्दनाचा एका चतुर्थ शोधोनी । पांचवे ते स्थानी लीन झाला ॥३॥
भावार्थ
सुक्ष्म, स्थूल, कारण आणि महाकारण हे चार देह, ध्यान, धारणा, समाधी, या अवस्था, सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद हे चार वेद या शिवाय ईतर गोष्टींचा विचार करण्याचे कारण नाही. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग या चार युगांशिवाय पाचव्या युगाचे स्पष्टीकरण करणे अवघड आहे. जनार्दन स्वामींचा शरणागत एका जनार्दनीं ही चारी युगे शोडून पांचवे स्थानी (विठ्ठलपायीं) लीन झाला.
१३९
पंचक पंचकाचा पसारा पांचांचा । खेळ बहुरूपियां पांचापासोनी ॥१॥
पृथ्वी आप तेज वायु आकाश जाण । पंचकप्राण मन पांचांमार्जी ॥२॥
इंद्रियपंचक जाण ते पंचक । कर्म ते पंचक जाणे बापा ॥३॥
धर्म तो पंचक सान ते पंचक । ध्यान ते पंचक जाणे बापा ॥४॥
एका एकार्दनीं पंचका वेगळा । पाहे उघडा डोळा विटेवरी ॥५॥
भावार्थ
पृथ्वी, जल, अग्नी, वायु, ही पंचमहाभूते एकवटून या सृष्टीची निर्मिती झाली असे आपले धर्मग्रंथ वर्णन करतात. मानवी देहातिल पंच प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे मनाने व्यापले आहे. पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिये असून धर्म, सान, ध्यान ही पंचके मानली जातात. असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, या पंचका पासून वेगळा असा पंढरीचा विठोबा भक्तांसाठी अठ्ठावीस युगे विटेवर समचरण ठेवून उभा आहे.
१४०
सहा ते भागले वेवादती सदा । सहांची आपदा होती जगीं ॥१॥
सहांचे संगती घडतसे कर्म । सहा तो अधर्म करिताती ॥२॥
सहांचे संगती नोहे योगप्राप्ती । होतसे फजिती सहायोगें ॥३॥
एका जनार्दनीं सहांच्या वेगळा । सातवा तो आठवो मज वेळोवेळां ॥४॥
भावार्थ
सहा शास्त्रांत मतमतांतरे आहेत, हरविशेष हरी गौण (शिवशंकर आणि विष्णु यामध्ये श्रेष्ठ कोण) यासारखे वादविवाद होतात आणि ते थकून जातात. काम, क्रोध, मद, मत्स, दंभ आणि अहंकार हे सहा सड् रिपू असून त्यांच्या संगतीने अनुचित कर्मे केली जातात. अधर्म घडून येतो. योगप्राप्तीची संधी मिळत नाही. समाजात अपकिर्ती होते. एका जनार्दनीं सांगतात, या सहा शत्रुंपासून वेगळा असा सातवा जो आहे त्याचे सदैव स्मरण करावे.
१४१
सातवा तो सर्वांठायीं वसे । शंकरादिक ध्याती तया ॥१॥
तो सातवा हृदयींआठवा । आठवितां तुटे जन्ममरण ठेवा ॥२॥
सातवा हृदयीं घ्यावा जनीं वनीं पहावा । पाहूनियां ध्यावा भनामाजीं ॥३॥
एका जनार्दनीं सातवा वसे मनौं । धन्य तो जनीं पुरूष जाणा ॥४॥
भावार्थ
शिवशंकर सदोदित ध्यानमग्न होऊन ज्याचे नामस्मरण करतात तो सातवा पुरुषोत्तम ह़दयांत धारण करून त्याचे नित्य स्मरण करावे. त्याच्या पुण्यस्मरणाने जन्ममरणाचे बंधन तुटून पडते. जनीवनी सर्वत्र व्यापून राहिलेल्या या परमेश्वराचे सतत ध्यान करावे. एका जनार्दनीं सांगतात, या सातव्या पुरुषोत्तमाचा ज्याला ध्यास लागतो तो पुरूष धन्य होय.
१४२
आठवा आठवा वेळोवेळ आठवा । श्रीकृष्ण आठवा वेळोवेळां ॥१॥
कलीमार्जी सोपें आठवा आठवण । पावन तो जन्म आठव्याने ॥२॥
आठवा नामें तरी पांडवा सहाकारी । दुराचारियां मारी आठवा तो॥३॥
एका जनार्दनी आठव्याची आठवण । हृदयी सांठवण करा वेगीं ॥४॥
भावार्थ
श्रीकृष्ण हा परमात्म्याचा आठवा अवतार असून त्याचे सदोदित स्मरण करावे. कलियुगात जन्म सार्थक करण्याचे सहज सोपे साधन आहे. सदाचारी पांडवांचा सहाय्यक होऊन दुराचारी कौरवांचा विनाश करणार्या या श्रीहरीची ह़दयांत साठवण करावी. त्यामुळे हा मानवी जन्म पावन होतो. असे एका जनार्दनीं या अभंगात सुचवतात.
१४३
नववा वसे स्थिररूप । तया नाम बौद्धरूप ॥१॥
संत तया दारी । तिष्ठताती निरंतरीं ॥२॥
पुंडलिकासाठी उभा । धन्य धन्य विठ्ठल शोभा ॥३॥
शोभे चंद्रभागा तीर । गरूड हनुमंत समोर ॥४॥
ऐसा विठ्ठल मनी ध्याऊं । एका जनार्दनीं त्याला पाहूं ॥५॥
भावार्थ
बोधी वृक्षाखाली स्थिर आसन घालून ज्याने मानवी जीवनातील दु:खाचा परिहार करणारे ज्ञान संपादन करून बौध्द धर्माची स्थापना केली तो परमात्म्याचा नववा अवतार मानला जातो. भक्तराज पुंडलिकासाठी समचरण विटेवर ठेवून उभा असलेल्या विठ्ठलाची शोभा अवर्णनीय आहे. चंद्रभागेच्या तीरावर विठ्ठलासमोर गरूड हनुमंत उभे ठाकले आहेत. अशी मनमोहक विठ्ठल मूर्ती मनामध्ये धारण करून त्याचे दर्शन घेण्यासाठी सारे संत तेथे तिष्ठत उभे राहतात असे एका जनार्दनी म्हणतात.
१४४
मूळची एक सांगतों खूण । एक आधी मग दोन ।
तयापासब चार तीन । व्यापिलें पांचे परिपूर्ण ॥१॥
तें भरूनी असे उरलें । सर्वां ठायीं व्यापियेलें ।
जी स्थळी सर्व भरलें । शेखीं पाहवां नाहीं उरलें ॥२॥
निवृत्ति ज्ञानदेव सोपान । हेचि जाणती प्रेमखूण ।
समाधी पावले समाधान । नाहीं उरले भिन्नाभिन्न ॥३॥
शरण एका जनार्दनीं । खूण बाणली निजमनीं ।
व्यापक दिसे तिहीं निभुवनीं । गेला देहभाव विसरूनी ॥४॥
भावार्थ
सर्वांआधी आत्मतत्त्व निर्माण झाले, त्यानंतर परमात्म शक्ती माया रूपाने उदयास आली. पृथ्वी, आकाश, वायू, आप, अग्नी ह्या पंचमहाभूतांनी सर्व व्यापून टाकले. ही पंचभूतात्मक सृष्टी निर्माण झाली. निवृत्ती, ज्ञानेश्व, सोपानदेव यांना बोध झाला. ज्ञानेश्वरी सारखा काव्यत्मक ग्रंथ निर्माण झाला. आणि ते कृतकृत्य होऊन समाधींत लीन झाले. एका जनार्दनीं म्हणतात, जनार्दन स्वामींच्या कृपेने हे व्यापक तत्व मनांत ठसले आणि सारा देहभाव नाहीसा झाला.
१४५
एक एक म्हणती सकळ लोक । पाहतां एका एक हरपलें ॥१॥
एकाविण एक गणीत नाहीं देख । ते नित्य वोळख निजी आत्मीया रे ॥२॥
त्वंपद असिपद नाहीं । ठायींच्या ठायीं निवोनि पाही ॥३॥
सच्चिदानंद तिन्ही नाम माया । सूक्ष्म कारण तेथें भुलू नको वायां ॥४॥
अहं तें मी पण सोहं तें तूंपण । अहं सोहं सांडोनि पाहें निजकानन ॥५॥
एका जनार्दनीं सांडी एकपण । सहज चैतन्य तेथे नाही जन्ममरण ॥६॥
भावार्थ
एकच आत्मतत्त्व सर्व विश्व व्यापून उरले आहे हे सर्व लोक जाणतात. या आत्मतत्त्वा शिवाय बाकी सर्व केवळ शून्य भासते हे ओळखून या नित्य निज आत्म स्वरूपाची ओळख करून घ्यावी. या आत्मतत्वांत मी तू पणाचा भाव नाही. सत्, चित्, आनंद ही तिन्ही नामे आत्मतत्वा शिवाय केवळ माया समजावी. अहं ही केवळ मीपणाची जाणिव असून सोहं हे तूं पण सुचवते. या मी तू पणाचा त्याग करून परमात्म स्वरुप जाणून घेण्यासाठी अरण्यवास स्विकारावा असे सांगून एका जनार्दनीं सांगतात, चैतन्यमय आत्मतत्वांत जन्ममरणाची वार्ता नसते.
१४६
लक्ष गांवे तरणी । पृथ्वी व्यापी निज किरणी ।
तो साक्षी अलिमपणीं । मेबांच्या तेथें ॥१॥
तैसा आत्मा देहीं । म्हणती त्यासी ज्ञान नाहीं ।
तो व्यापूनी सर्वा ठायीं राहिला असे ॥२॥
सदगुरूमुखींचा विचार । जयासी माला साक्षात्कार ।
उदेला ज्ञानभास्कर । अहार-तिमिरौं ॥३॥
हिरवा पिवळा । संगे रंग जाला निळा स्फटिक या वेगळा ।
आत्मा तैसा । तैसी ज्ञानकिल्ली ॥४॥
जयाचे हातां आली । तयाने उगविली अज्ञान कुलुपें ॥५॥
एका जनार्दनाचा रंका त्याचे बोधे कळला विवेक ।
पूर्ण बोधाचा अर्क उदया आला ॥६॥
भावार्थ
पृथ्वीवरील असंख्य गांवे आपल्या प्रकाश किरणांनी व्यापून टाकणारा सूर्य जसा सर्वसाक्षी आहे तसा आत्मा सर्व सृष्टी व्यापून राहिला आहे. सद्गुरू कृपेने या ज्ञानाचा साक्षात्कार होऊन अज्ञानाचा अंध:कार लयास जातो. हिरवा आणि पिवळा रंग एकत्र मिसळून निळा रंग दिसतो. स्फटिक मात्र दोन रंगाचे मिश्रण नसून तो स्वयंभू आहे तसा आत्मा. अज्ञानाची कुलपें उघडण्यासाठी सद्गुरु कृपा रुपी ज्ञानकिल्ली हाती लागावी लागते असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, सद्गुरू जनार्दन स्वामींच्या ज्ञान बोधाने विवेकरूपी पूर्ण बोधाचा सूर्य उदयास आला.
१४७
परेहूनी कैसें पश्यंती वोळलें । मध्यमी पणावले सोहंबीज ॥१॥
वैखरियेसी कैसे प्रगट पैं जालें । न वचे ते बोल एकविध ॥२॥
साक्षात्कारें कैसे निजध्यासा आलें । मननासी फावलें श्रवणद्वारें ॥३॥
सुखासुख तेथें जालीसे आटणी । एका जनार्दनी निजमुद्रा ॥४॥
भावार्थ
मानवी देहातील आत्मतत्व परमात्म्याचे अंशरूप आहे हे सोहंबीज ( मी परमात्म्याचे अंशरूप आहे हे ज्ञान ) परावाणीतून पश्यंती वाणीत स्फुरले, तेथून मध्यमेत (कंठात) उतरले ) आणि सद्गुरू मुखातून वैखरीवाटे प्रगट झाले. श्रवणाने या गुरुबोधाचा निजध्यास लागला. मननाची अवीट गोडी लागली, सुख दुःखाचा विसर पडला. परमार्थाचे हे रहस्य एका जनार्दनीं या अभंगात सुचवतात.
१४८
स्वयंप्रकाशामार्जी केले असें स्नान । द्वैतार्थ त्यागून निर्मळ जाहलों ॥१॥
सुविरोई वस्त्र गुंडोनि बैसलों । भूतदया ल्यालो विभूती अंगीं ॥२॥
चोविसापरतें एक वोळखिले । तेवि उच्चारिलें मूळारंभी ॥३॥
आकार हारपला उकार विसरला । मकरातीत केला प्रणव तो ॥
अकर्म सर्व सांडियेल्या चेष्टा । तोचि अपोहिष्ठा केलें कर्म ॥५॥
संसारासी तीन ओंजळी घातले पाणी । आत्मत्वालागुनी अर्घ्य दिलें ॥६॥
सोहं तो गायत्री जप तो अखंड । बुद्धिज्ञान प्राप्त सर्वकाळ ॥७॥
एका भावें नमन भूतां एकपणीं । एका जनार्दनीं संध्या जाहली ॥८॥
भावार्थ
स्वयंप्रज्ञेच्या प्रकांशात शुचिर्भूत होऊन द्वैताचा त्याग केला आणि मनाची मलीनता धुवून टाकली. भूतदयेची विभूती अंगाला लावून वैराग्याचे वस्त्र परिधान केले. चोविस तत्वा-पलिकडील पंचविसावे तत्व ओळखून प्रारंभीच त्या नामाचा उच्चार केला. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार तो महेश्वर हे द्वैत हरपले. कर्म आणि अकर्म यांचे सायास सोडून संसाराला तिलांजली दिली. आत्मतत्वाला अर्घ्य देवून सोहंम् या गायत्री मंत्राचा अखंड जप सुरू केल्याने बुध्दीज्ञान प्राप्त झाले. विश्वातील सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी एक आत्मभाव निर्माण झाला. असा पारमार्थिक अनुभव एका जनार्दनीं या अभंगात व्यक्त करतात.
१४९
झाली संध्या संदेह माझा गेला । आत्माराम हृदयीं शेजें आला ॥धृ०॥
गुरूकृपा निर्मळ भागीरथी । शांति क्षमा यमुना सरस्वती ।
असीपदें एकत्र जेथें होती । स्वानुभव स्नान मुक्तस्थिती ॥१॥
सद्बुद्धीचे घालूनि शुद्धासन । बरी सद्गुरूची दया परिपूर्ण ।
शमदम विभूती चर्चुनी जाण । वाचे उच्चारी केशव नारायण ॥२॥
बोध पुत्र निर्माण झाला जेव्हां । ममता म्हातारी मरोनि गेली तेव्हां ।
भक्ति बहीण धाऊनि आली गांवा । आतां संध्या कैशी मी करूं केव्हां ॥३॥
सहज कर्मे झाली ती ब्रह्मार्पण । जन नोहे अवघा हा जनार्दन ।
ऐसें ऐकतां निवती साधुजन । एका जनार्दनीं बाणिली निज खूण ॥४॥
भावार्थ
सद्गुरुंची कृपा देह-मनाची मलीनता धुवून टाकणारी निर्मळ भागीरथी आहे. शांति ही मनाला गोपाल कृष्णाच्या रासक्रीडेचा आनंद देणारी यमुना असून क्षमा ही अंतरांत गुप्तपणे वास करणारी सरस्वती आहे. गंगा, यमुना, सरस्वती यांच्या संगमात मनाचा आप-पर भाव विरून जातो. सारे भेदाभेद संपून जातात आणि मन मुक्त झाल्याचा अनुभव येतो. सद्गुरू कृपेने प्राप्त झालेल्या सद्बुद्धीचे आसन घालून, शम-दमाची विभूती (राख) फासून वाचेने केशव नारायणाचा नामजप सुरू केला. त्यायोगे ज्ञानबोध पुत्ररूपाने उदयास आला. ममतेची बंधने तुटून पडली. प्रेमळ भक्तीभाव भगिनी रुपाने भेटीस आला. या भक्तिभावाने मन ईतके आनंदून गेले कीं, नित्यकर्म सहजपणे विरून गेली. जन हाच जनार्दन या सत्याची प्रचिती आली. मनाचा संदेह नाहीसा झाला आणि हृदयांत आत्माराम प्रगटला. हा पारमार्थिक अनुभव या अभंगात एका जनार्दनीं वर्णन करतात.
१५०
स्थूल देहाचा विचार । हातां आलिया साचार ।
तेथें देहें अहंकार । विरोनी जाये ॥१॥
स्थूल ब्रह्मज्ञान नेत्रीं । स्थूलभोग जागृति वैखरी ।
हे नव्हे मी ऐसा अंतरीं । बोध झाला ॥२॥
मग देहें मारितां तोडितां । पूजितां कां गांजितां ।
नसे हर्षे खेदवार्ता । तया पुरूषा ॥३॥
एका जनार्दनीं । लीन झाला संतचरणीं ।
दर्पणामाजी बिंबोनि । दर्पणातीत ॥४॥
भावार्थ
स्थळ, काळाने मर्यादित असलेल्या, डोळ्यांना दिसणार्या या स्थूल देहाचा आणि त्यामुळे लाभणार्या नश्वर भोगांचा विचार केला तर या क्षणभंगूर देहाविषयीं वाटणारा अहंकार गळून पडतो. हा स्थूल देह म्हणजे मी नव्हे याचा बोध अंत:करणाला होतो. असा बोध झाला कीं, या देहाची पूजा केली काय किंवा मारले किंवा तोडले काय त्याचा आनंद किंवा खेद करण्याचे कारण नाही. या संत-वचनाचा बोध झाल्याने एका जनार्दनीं संतचरणीं शरणागत होतात. आत्मस्वरूपाचे ज्ञान होऊन देहातीत होतात.
१५१
ऐसी बाढलिया सद्वासना । तेथें जिराली मनाची कल्पना ।
इंद्रिये विषय प्राणा । बोध जाला ॥१॥
लिंग विष्णु स्वप्न कंठस्नान । काल्पनिक भोग जाण ।
वाचा मध्यमा ऐसी खूण । मिळोनी ठेली त्या पदा ॥२॥
तेथें इंद्रिया ऊर्वसी । आलीया सेजेसी ।
जयाचिया मानसीं । काम नुठी ॥३॥
एका जनार्दनीं बोध ।अवघा झाला ब्रह्मानंद ।
लिंग देहाचा खेद । वस्तु जाला ॥४॥
भावार्थ
जेव्हां साधकाला आत्मबोध होतो तेव्हां सद्वासना वाढतात आणि मनातील तर्क-वितर्क, कल्पना लयास जाऊन इंद्रिये, त्यांचे विषय, यांचा बोध होतो. देहाचे सारे भोग काल्पनिक वाटू लागतात. सद्गुरू वचनाची खूण मनाला पटते. ऊर्वशी सारख्या अप्सरेच्या कामविलासाने सुध्दां मनांत कामवासनेचा उद्भव होत नाही. एका जनार्दनीं म्हणतात, सद्गुरू वचनाचा असा बोध झाला कीं, लिंग देहाचा खेद होत नाही आणि ब्रह्मानंदाचा अनुभव येतो.
१५२
आतां कारण जें अज्ञान । तेंही गेलें घोसरोन ।
बोधाचे आसन । बैसलें तेथें ॥१॥
कारण रूप सुषुप्ति । आनंद भास हृदयीं प्राप्ती ।
या समस्ताची वस्ती । वस्तु झाली ॥२॥
ऐसा असोन वोहोट झाला । ज्ञानरसे भरला ।
मग सर्वाठायी देखिला । आत्मबोध ॥३॥
एका जनार्दनीं आत्म्याची भेटी । तेथें उडाली त्रिगुण त्रिपुटी ।
मग बोधासी राहटी । जेथें तेथें ॥४॥
भावार्थ
साधकाला आत्मबोध होऊन त्याची देहबुध्दी (अज्ञान) नाहिसे होते. बोधाचे आसनावर सुषुप्तिची प्राप्ती होवून अंतरांत ज्ञानरसाचा आनंद दाटून येतो. सर्व चराचरांत हेच आत्मतत्व व्यापून राहिले आहे याची खात्री पटते. एका जनार्दनीं म्हणतात, या आत्मबोधाची सत्यता प्रत्ययास आली कीं, सत्व, रज, तमोगुणाची त्रिपुटी लोप पावते आणि एकच परमात्मा सगुण आणि निर्गुण स्वरुपांत प्रगट होतो.
================================================================================================================================
===============================================================================================================
महाकारण देह
१५३
महाकारण जे देहज्ञान । त्याचाही साक्षी आत्मा आपण ।
जैसा सेजे ये आंबा मुरोन । तैसा तो जाण ॥१॥
ऐशी मुराली तुर्या अवस्था । मग साक्षी जाला परीता ।
तो मुरोनि वस्तुता । वस्तु जाला ॥२॥
ऐशी विवेकाची राबणूक । विवेक आत्मा वोळख ।
एका जनार्दनीं परम सुख । प्राप्त जालें ॥३॥
भावार्थ
महाकारण देहज्ञान साधकाला तुर्या अवस्थेत प्राप्त होते. पाडाला आलेला अंबा अढींत घालून मुरवला कीं, जसा रसरशीत मधूर होतो तसा साधक तुर्या अवस्थेत आत्मरुपाने सर्वसाक्षी होतो. एका जनार्दनीं सुचवतात, ही विवेकाची जाण आली कीं, परमोच्च आत्मसुख अनुभवास येते.