मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत एकनाथांचे अभंग|

संत महिमा

संत एकनाथांनी सामान्यजनांना तसेच भक्तजनांना परमार्थाच्या सहजसुलभ वाटा दाखवून मार्गदर्शन केले आहे.




उद्धवा स्वमुखें सांगे श्रीकृष्ण । संतसेवा जाण सर्वश्रेष्ठ ॥१॥
हाची योग जाण उद्ववा स्वीकारी । आणिक न करी भरोवरीसाधन उद्धवा ॥२॥
योगयाग तप व्रत कसवटी । न करी आन गोष्टीरे उद्धवा ॥३॥
कीर्तन भजन सर्वभावें करी । जाई संतद्वारीं शरणागत रे उद्धवा ॥४॥
मनींचें सांगितले तुज ।एका जनार्दनीं निज साधे रे उद्धवा ॥५॥

भावार्थ

या अभंगात श्रीकृष्ण उद्धवाला संतसेवेचा महिमा सर्वश्रेष्ठ आहे असे स्वमुखाने सांगत आहे. हाच खरा योग असून योगचाग तप व्रत ही साधने सोडून संतसेवेचा मार्ग धरून सर्वभावे कीर्तन व भजन करावे संतांना शरण जावे. राका जनार्दनीं म्हणतात' आपल्या मनीचे हितगुज सांगून ते उद्धवाला स्वता:चे हीत साधायला सांगतात.



उद्धवा तूं धर संतसमागम । तेणें भवश्रम हरे उद्धवा ॥१॥
सांगतसे गुज मना धरीं रे उद्धवा । आणिक श्रम वाया न करी रे तें ॥२॥
तयाची संगती उद्धवा धरावी । सेवा ते करावी काया वाचा ॥३॥
मज तयाचा वेध उद्धवा प्रसिद्ध । तूं सर्वभावें सद्गद नाम घेई ॥४॥
ज्याची आवडी मजसी उद्धवा । जाई तया ठावां ॥५॥
उच्च नीच कांहीं न म्हणें उद्धवा । एका जनार्दनी तया शरण जावें ॥६॥

भावार्थ

संतसमागमाने संसारातील श्रम नाहीसे होतात हे मनाचे हितगुज उद्धवाला सांगून श्रीकृष्ण त्याला काया वाचा मनाने संतांची सेवा करायला सांगतात. आणखी कोणत्याही प्रकारची साधना न करता लहान थोर असा भेदाभेद न करता सतांना सर्वभावे शरण जावे असे एका जनार्दनीं सांगतात.



उद्धव बोले कृष्णाप्रती । एकोनि संताची कीर्ति ।
धन्य वैष्णव होती । कलीमाजी ॥१॥
तुम्हां जयाचा निज छंद । मानीतसा परमानंद ।
अखंड तयाचा वेध । तुमचे मनीं ॥२॥
ऐशी याची संगती । मज घडो अहोराती ।
नये पुनरावृत्ती । पुन: जन्मासी ॥३॥
हर्षे देव सांगे आपण । उद्धवा तयाचें मज ध्यान ।
एका जनार्दनीं शरण । ते मज आवडती ॥४॥

भावार्थ

या अभगांत एका जनार्दनीं श्रीकृष्ण आणि उद्धवाचा संवाद कथन करीत आहे. ज्या संतांची किर्ती ऐकून कलीयुगांत वैष्णव धन्य होतात त्यांचा श्रीकृष्णाला नित्य वेध लागतो त्यांच्या छंदात मनाला परमानंद मिळतो. अशा संतांची संगती अहोरात्र मिळावी व त्यामुळे जन्ममरणाची पुनरावृत्ती कायमची टळावी असे उद्धव श्रीकृष्णाला सांगतो. यावर श्रीकृष्णाला अतिशय आनंद होतो. तो ३ध्दवाला सांगतो की, संत त्याला अतिशय आवडतात आणि त्यांचे सतत ध्यान लागते.



मज तयांची आवड । पुरवणें लागे त्याचें कोड ।
गर्भवास सांकड । तयालागी उद्धवा ॥१ ॥
घेऊनि अवतार । करी दुष्टांच संहार ।
माझा हा बडिवार । तयांचेनि उद्धवा ॥२॥
माझे जप तप अनुष्ठान । देव पूजा मंत्र पठण ।
नाना नेमादि साधन । संत माझे उद्धवा ॥३॥
मज आणिलें नामरूपा । त्याची मजवर कृपा ।
दाविला हो सोपा ।मार्ग मज उद्धवा ॥४॥
माझा योगयाग सर्व । संत माझे वैभव ।
वैकुंठादि राणीव । तयाचेनि मज उद्धवा ॥५॥
ऐसें वरिष्ठ पावन । पुनीत केलें मजलागून ।
एका जनार्दनीं शरण । तयांसीच उद्धवा ॥६॥

भावार्थ

श्रीकृष्ण उद्धवास सांगतात, संतांचे सर्व ईच्छा पूर्ण करण्यासाठी परत परत जन्म ( अवतार) घ्यावे लागतात. असे अवतार घेऊन दुष्टांचा संहार करण्याचे महान कार्य संता मुळेच घडून येते. सामान्य लोक जे जप, तप, अनुष्ठान देव पूजा, मंत्र पठण, अनेक व्रते, नेम , साधना करतात ते सर्व संता मुळेच घडून येते. संतामुळेच देव नामरूपाला येतात. त्यांचे वैभव वाढते. वैकुंठाचे राजपद संतामुळेच उदयास आले. संत हे सर्वात वरिष्ठ असून त्यांच्या मुळेच देव पावन झाले. असे कथन करून एका जनार्दनी संताना शरण जातात.



ज्या सुखाकारणे देव वेडावला । वैकुंठ सांडुनी संतसदनीं राहिला ॥१॥
धन्य धन्य संतांचे सदन । जेथें लक्ष्मीसाहित शोभे नारायण ॥२॥
सर्व सुखाची सुखराशी । संतचरणीं भुक्ति मुक्ति दासी ॥३॥
एका जनार्दनीं पार नाही सुरवा म्हणोनि देव भुलले देखा ॥४॥

भावार्थ

ज्या संतसुखाने श्री हरी वेडावला आणि वैकुंठाचे वैभव सोडून संतांच्या घरीं येऊन राहिला. जेथे लक्ष्मीसहित नारायण येऊन राहतो ते संताचे सदन धन्य होय. संताच्या चरणांशी भक्ति आणि मुक्ति दासी बनून राहतात. येथे सर्व सुखांच्या राशी असून हे सुख अपार आहे. एका जनार्दनीं म्हणतात, या सुखाला देव भुलले.



संतापोटीं देव वसे । देवा पोटीं संत असे ॥१॥
ऐसा परस्परें मेळा । देव संतांचा अंकिला ॥२॥
संताठायीं परंतू परं तदेव तिष्ठे । देव तेथें संत वसे ॥२॥
एका जनार्दनीं संत । देव तयांचा अंकित ॥४॥

भावार्थ

संतांच्या अंतरांत देव आणि देवाच्या अंतरांत संत निवास करतात. संत जेथें असतील तेथे देव तिष्ठत उभा राहतो. एका जनार्दनीं म्हणतात, देव संतांच्या अंकित आहे.



संत आधीं देव मग । हाचि उगम आणा मना ॥१॥
देव निर्गृण संत सगुण । म्हणोनि महिमान देवासी ॥२॥
नाम रूप अचिंत्य जाण । संतीं सगुण वर्णिलें ॥३॥
मुळीं अलक्ष लक्षा नये । संतीं सोय दाविली ॥४॥
एका जनार्दनीं संत थोर । देव निर्धार धाकुला ॥५॥

भावार्थ

देव निर्गृण असून संत सगुण ( सत्व, रजो, तम ) या गुणांनी युक्त्त आहेत. तर देव या गुणांच्या अतित आहे. म्हणुन देवाचा महिमा श्रेष्ठ आहे. परंतु देवाच्या नामरूपाचे चिंतन करणे भक्तांना शक्य नव्हते . जो अव्यक्त आहे त्याला दृष्टीने बघणे अशक्य होते. संतांनी या निर्गुणाचे सगुण साकार रूपात वर्णन केले. एका जनार्दनी म्हणतात, संत देवापेक्षां थोर आहेत, कारण संतांनी देवाला देवपण दिले. यासाठी संत थोर आहेत हे जाणले पाहिजे.



संतांचा महिमा देवचि जाणें । देवाची गोडी संतांसी पुसणें ॥१॥
ऐसी आवडी एकमेकां । परस्परें नोहे सुटिका ॥२॥
बहुत रंग उदक एक । यापरी देव संत दोन्ही देख ॥३॥
संताविण देवा न कंठे घडी । उभयतां गोडी एक असे ॥४॥
मागें पुढें नसे कोणी । शरण एका जनार्दनीं ॥५॥

भावार्थ

संताचा महिमा देवच जाणतो, देवाच्या रूपाची सुंदरता आणि गुणांची मधुरता संतांनीच वर्णन करावी. ज्याप्रमाणे मातीच्या रंगाप्रमाणे पाण्याचे रंग वेगवेगळे दिसतात, त्यांप्रमाणे संत आणि देव भिन्न दिसत असले तरी ते एकरूपच असतात. संताशिवाय देवाला घटकाभर देखील चैन पडत नाही. देव आणि संत सदैव समीप असतात. उभयता एकात्म वृतीने वावरतात. असे सांगून एका जनार्दनीं देव आणि संताच्या चरणी शरणागत होतास.



देवाचे सोईरे संत जाणावें यापरतें जीवें नाठवी कोणा ॥१॥
पडतां संकट आठवितसे संत । त्याहुनी वारिता नाही दुजा ॥२॥
म्हणोनि घरटी फिरे तया गांवीं । सुदर्शनादि मिरवी आयुधे हातीं ॥॥
लाडिके डिंगर वैष्णव ते साचे । एका जनार्दनीं त्यांचे वंदी पाय ॥४॥

भावार्थ

संत हे देवाचे जीवाभावाचे सोईरे असून संताईनकी दुसर्‍या कुणाचिही आठवण देवाला येत नाही. संताच्या रक्षणासाठी देव सुदर्शन चक्रासारखी आयुधे हाती धरून त्यांच्या गावीं फिरतो. संत वैष्णवांप्रमाणेच देवाला अत्यंत प्रिय आहेत. एका जनार्दनीं संताच्या चरणांना वंदन करतात.

१०

पंढरीये देव आला । संतभारें तो वेष्टिला ॥१॥
गुळासवें गोडी जैसी । देवासंगें दाटी तैसी ॥२॥
झालें दोघां एकचित्त । म्हणोनि उभाचि तिष्ठत ॥३॥
एका जनार्दनीं भाव । संतापायी ठेविला जीव ॥४॥

भावार्थ

देव पंढरीला आला आणि गुळाला जसा गोडवा वेढून टाकतो तसा देवाला संतांनी वेढून टाकले. संत आणि देव दोघे मनाने एकरूप झाले. देव भक्तासाठी अठ्ठाविस युगे तिष्ठत उभा राहिला. अशा संत चरणांशी एका जनार्दनीं आपला जीवभाव अर्पण करतात.

११

पुंडलीक संत भला । तेणें उद्धार जगाचा केला ॥१॥
तयाचे वंदावें चरण । कायावाचामने करून ॥२॥
उपाधिसंग तुटती व्याधी । एका जनार्दनी समाधी ॥३॥

भावार्थ

भक्तश्रेष्ठ पुंडलिका मुळे श्रीहरी अठ्ठाविस युगे विटेवर उभा राहिला. त्याने जगाचा उद्वार केला. काया वाचा मनाने एकरूप होऊन संत पुंडलिकाच्या चरणांना वंदन करावे असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, या परमात्म परमेश्वराच्या दर्शनानें संसारातिल सर्व व्याधी निरसून जातात, मन शांत होऊन समाधी लाभते.

१२

उघड बोलती संत । जैसा हेत पुरविती ॥१॥
मनीचें जाणती ते सदा । होऊं नेदी विषयबाधा ॥२॥
अज्ञान सज्ञान । तारिती कृपें करून ॥३॥
संतांपायी ज्याचा भाव । तेथें प्रगटेचि देव ॥४॥
एका जनार्दनीं बरा । द्यावा मज तेथें थार ॥५॥

भावार्थ

संत भाविकांच्या मनातिल सर्व भाव जाणून सर्व कामना पूर्ण करतात. भाविकांच्या मनाला इंद्रिय विषयांची बाधा होऊ देत नाहीत. अज्ञान व सज्ञान दोन्हीवर सारखीच कृपा करतात. संताच्या ठिकाणी ज्यांची श्रद्धा असते तेथें प्रत्यक्ष परमेश्वर प्रकट होतो. एका जनार्दनीं संतांनी त्यांच्या पायीं आसरा द्यावा अशी विनंती करतात.

१३

संत कृपाळु उदार । ब्रहमादिका न कळे पार ॥१॥
काय वानूं मी पामर । थकले सहा अठरा चार ॥२॥
नेति नेति शब्दें । श्रृती विरालिये आनंदे ॥३॥
एका जनार्दनीं शरण । धरा माझी आठवण ॥४॥

भावार्थ

संत अतिशय उदार व कृपाळु असतात. ब्रह्मा, विष्णु , महेश या देवाधिदेवांना देखील संतांचा महिमा यथार्थपणे वर्णन करता येत नाही साही शास्त्रे, अठरा पुराणे आणि चारी वेद सुद्धां संतमहिमा गातांना थकून गेले. व्यतिरेकाने नेति नेति या शब्दांनी संताचे वर्णन करतांना श्रृती निःशब्द होऊन स्तब्ध झाल्या. एका जनार्दनीं संतांना शरण जावून त्यांनी आपली आठवण धरावी अशी विनंती करतात.

१४

संतचरणींचा महिमा । कांहीं न कळे आगमां निगमां ॥१॥
ब्रह्मा घाली लोटांगण । विष्णु वंदितो आपण ॥२॥
शिव ध्यातो पायवणी । धन्य धन्य संतजनीं ॥३॥
तया संतांचा सांगात । एका जनार्दनीं निवांत ॥४॥

भावार्थ

संतांच्या चरणांचा महिमा वेदशास्त्रांना पूर्णवणें आकलन होत नाही, ब्रह्मदेव संतपायी लोटांगण घालतात तर विष्णु त्यांना आदराने वंदन करतात. शिवशंकर संतचरणाचे सतत ध्यान करतात. या लोकांत संत धन्य असून त्यांच्या सहवासांत एका जनार्दनीं शांतपणे निवास करतात.

१५

पहातां संतसमुदाय । भुक्ति मुक्ति तेथें देव ॥१॥
जातां लोटांगणीं भावें । ब्रह्मज्ञान अंगी पावें ॥२॥
तयाचे उच्छिष्टाचा कण । शरण एका जनार्दन ॥३॥

भावार्थ

संत समुदायाचे दर्शन होतांच भक्ति आणि मुक्ति तेथें धाव घेतात. देव तेथे तात्काळ प्रगट होतात आणि भक्ति भावाने लोटांगण घालतात. त्यामुळे ब्रह्मज्ञान प्राप्त होते असे सांगून एका जनार्दनी संतांच्या उष्ट्या अन्नाच्या एका कणासाठी त्यांना शरण जातात.

१६

सुख अपार संतसंगी । दुजे अंगीं न दिसे कोठे ॥१॥
बहु सुख बहुता परी । येथेंची सरी नसची ॥२॥
स्त्रिया पुत्र धन सुख । नाशिवंत देख शेवटीं ॥३॥
एका जनार्दनीं संतसुखा । नोहे लेखा ब्रह्मांडीं ॥४॥

भावार्थ

संत संगतीत जे अपार सुख असते तसे सुख दुसरीकडे कोठेही दिसणार नाही. अनेक प्रकारचे भरपूर सुख संत सहवासांत मिळते त्याची सर ईतर कोणत्याही सुरवाला येत नाही. स्त्रिया, पुत्र तसेच धनसंपदे पासून मिळणारे सुख नाशवंत असते. एका जनार्दनीं म्हणतात, संतसुखाची तुलना ब्रह्मांडातील कोणत्याही सुरवाशी होऊं शकत नाही.

१७

अमृता उणें आणिता संतजन । नाम अमृत खूण पाजिताती ॥१॥
नाशिवंत यासी अमृत उपकार । अनाशिवंता नामामृतसार ॥२॥
नाशिवंत देह नाशिवंत जीव । नाशिवंत ठाव जगडंबर ॥३॥
एका जनार्दनीं संतांचिये दृष्टी । नाशिवंत सृष्टि सजीव होती ॥४॥

भावार्थ

संतकृपेने जे नामामृत प्राप्त होते त्या पुढे अमृताला देखील उणेपणा येतो. मानवी जीव आणि मानवी देह दोन्हीं नाशवंत आहेत. डोळ्यांना दिसणारा हा जगाचा पसारा सुद्धां नाशवंतच आहे. संतांनी दिलेले नामामृतसार मात्र अविनाशी आहे. संतमहिमा अशाप्रकारे वर्णन करून एका जनार्दनीं म्हणतात, संतांच्या कृपा दृष्टीने सारी नाशवंत सृष्टी सजीव होते.

१८

संत ते सोयरे जिवलग सांगाती । भेटतां पुरती सर्व काम ॥१॥
कामधेनु कल्पतरू चिंतामणी । उदार चुडामणी याहुनी संत ॥२॥
देऊ परिसाची यांसी उपमा । परी ते नये समा संताचिये ॥३॥
एका जनार्दनीं संतांचा सांगात । पुरती सर्व आर्त जीवीचे जें ॥४॥

भावार्थ

संत हे भाविकाचे प्रेमळ सोबती जिवलग सोयरे आहेत. ते सर्व कामना पूर्ण करणारे कलपतरू, चिंतामणी अथवा कामधेनु प्रमाणे उदार आहेत. संतांना परिसाची उपमा दिली तरी ती पूर्णपणे यथार्थ नाही. परीस केवळ लोखंडाचे सोने करतो पण संत कोणताही भेदभाव न करता सर्वांच्या मनीचे आर्त (अंतरीक ईच्छा )पूर्ण करतात.

१९

भाग्यवंत होती संत । दीन पतीत तारिती ॥१॥
उपदेश विठ्ठल मंत्र । देती सर्वत्र सारिखा ॥२॥
स्त्रिया शुद्र अथवा बाळें । कृपाकल्लोळे एकची ॥३॥
एका जनार्दनीं शरण । पतितपावन संत होती ॥४॥

भावार्थ<brr>

दीन आणि पतितांना तारणारे संत भाग्यवंत असून ते पतीतपावन या नावाने ओळखले जातात. संत सर्वांना समभावाने मानून विठठल मंत्राचा उपदेश देतात. स्त्रिया शुद्र अथवा अज्ञानी बालके यांच्यावर सारखीच कृपा करतात. अशा कृपाळु, उदार, संतांना एका जनादनीं शरण जातात.

२०

संतांचे संगती । पाप नुरे तें कल्पांती ॥१॥
ऐसा संतांचा महिमा । नाहीं द्यावया उपमा ॥२॥
तीर्थ व्रत जप दान ।अवघें टाका वोवाळून ॥३॥
शरण एका जनार्दनीं । काया कुर्वंडी संतचरणी ॥४॥

भावार्थ

संतांच्या संगतीत पापाचा लवलेश राहात नाही. तीर्थ, व्रत, जप , दान ही सारी पुण्यकर्मे संत सहवासाच्या तुलनेत नगण्य आहेत. संत कृपेला उपमा नाही. असे स्पष्ट करून एका जनार्दनीं म्हणतात, संतांना शरण जाऊन त्यांच्यावरून देह ओवाळून टाकावा.

२१

संतचरणीचे रज;कण । तेणें तिन्हीं देव पावन ॥१॥
ऐसा महिमा ज्याची थोरी । वेद गर्जे परोपरी ॥२॥
शास्त्रे पुराणें सांगत । दरुशनें प्राणी होती मुक्त ॥३॥
शरण एका जनार्दनीं । ठाव द्यावा संतचरणीं ॥४॥

भावार्थ

संतचरणांच्या धुळीकणाने सर्व देव पावन होतात अशी संताथी थोरवी आहे असे चारी वेद परतपरत गर्जून सांगतात. संताच्या दर्शनाने प्राणी मुक्त होतात असे शास्त्रे व पुराणे मुक्त कंठाने वर्णन करतात. अशा थोर संतांनी त्यांच्या चरणांशी आपल्याला स्थान द्यावे अशी एका जनार्दनीं विनवणी करतात.

२२

संतवरणी आलिंगन । ब्रहमज्ञानी होती पावन ॥१॥
इतर सहज उद्धरती । वाचे गातां ज्याची कीर्ती ॥२॥
लाभे लाभ संतचरणीं । मोक्षसुख वंदी पायवणी ॥३॥
शरण एका जनार्दनीं । संत पावन इये जनीं ॥४॥

भावार्थ

संतचरणांना आलिगन देतांच ब्रह्म जाणणारे पावन होतात. मुखाने संतांची कीर्ती गाणार्‍या भक्तांना संत सहवासाचा लाभ होतो. असे भक्त मोक्षसुखाचे भागीदार होतात. अशा पावन संतांना एका जनार्दनीं शरण जातात.

२३

संतांचे चरण ध्यातां । हारपली जन्मव्यथा ॥१॥
पुढती मरणांचे पेणें । चुकती जन्मजरा तेणें ॥२॥
संतसमुदाय दृष्टी । पड़तां लाभ होय कोटी ॥३॥
शरण एका जनार्दनीं । काया कुर्वंडी संतचरणीं ॥४॥

भावार्थ

संतचरणांचे ध्यान केल्याने जन्म काळीच्या व्यथा हरपून जातात. जन्ममरणाचे फेरे चुकतात. वार्धक्यातिल कष्टांचे निवारण होते. संतसमुदायाचे दर्शन होतांच अनंत कोटी पुण्यफल प्राप्त होते. एका जनादेनी संतांना शरण जाऊन संतचरणी देह अर्पण करावा अशी इच्छा व्यक्त करतात.

२४

तुटर्ती बंधनें संतांच्या दरुशनें । केलें तें पावन जगीं बहु ॥१॥
महा पापराशी तारिलें अपार । न कळें त्यांचा पार वेदशास्त्रां ॥२॥
वाल्मिकादि दोषी तारिलें अनुग्रही ।पाप तेथें नाही संत जेथें ॥३॥
पापताप दैन्य गेलें देशांतरी । एका जनार्दनीं निर्धारी सत्य सत्य ॥४॥

भावार्थ

संतांच्या दर्शनाने महा पापांच्या राशी जळून जातात, संसाराची सारी बंधने तुटून पडतात. अनेकांचा उद्वार होतो. वेदशास्त्रांना सुद्धां त्याची गणना करता येत नाही. नारदमुनी सारख्या महान संतानी वाल्मिकींवर अनुग्रह करून त्यांचा उद्धार केला. एका जनार्दनीं निर्धाराने हे त्रिवार सत्य सांगतात कीं, जेथें संताची वस्ती असते तेथें पापताप, दैन्य, दुःख यांचा लवलेशही नसतो.

२५

पतितपावन केलें असें संती । पुराणी ती ख्याती वर्णियेली ॥१॥
सदोषी अदोषी तारिलें अपार । हाचि बाडिवार धन्य जगीं ॥२॥
नाना वर्ण याती उत्तम चांडाळ । उद्धरिले सकळ नाममात्रें ॥३॥
एका जनार्दनीं दयेचे सागर । संतकृपा धीर समुद्र ते ॥४॥

भावार्थ

सदोष आणि निर्दोष अशा उभय प्रकारच्या सामान्य जनांना सन्मार्गाला लावून परमेश्वर भक्ती करण्यास प्रवृत्त करणे हाच संतांचा महिमा आहे. देवाचा नाममंत्र देवून चारी वर्णाच्या तसेच उत्तम तसेच नीच जातीच्या लोकांचा उद्धार संतांनी केवळ नामभक्तीने केला. एका जनार्दनीं म्हणतात, संत धीरगंभीर समुद्राप्रमाणे दयेथे सागर आहेत.

२६

उदारपणे संत भले । पापी उध्दरिले तात्काळ ॥१॥
ऐसें भावें येतां शरण । देणे पेणें वैकुंठ ॥२॥
ऐसें उदार त्रिभुवनीं । संतांवांचुनी कोण दुजें ॥३॥
एका जनार्दनीं शरण । संत पतीतपावन ॥४॥

भावार्थ

जे महापापी, दुष्ट प्रवृतीचे असुनही जीवेभावें संतांना शरण जातात त्यांचा संत उदारपणे तात्काळ उध्दार करतात. त्यांना वैकुंठ प्राप्तीचा भक्तीमार्ग दाखवतात. त्रिभुवनांत संतासारखे उदार दुसरे कोणिही नाही. या पतीत पावन संतांना एका जनार्दनीं शरण जातात.

२७

मेघापरीस उदार संत । मनोगत पुरविती ॥१॥
आलिया शरण मनें वाचा । चालविती त्याचा भार सर्व ॥२॥
लिगाड उपाधी तोडिती । सरते करिती आपणामाजीं ॥३॥
काळाचा तो चुकवितो घाव । येउं न देती ठाव अंगासी ॥४॥
शरण एका जनार्दनीं । तारिले जनीं मूढ सर्व ॥५॥

भावार्थ

मनाने आणि वाचेने शरण आलेल्या भाविकाच्या सर्व मनोकामना मेघाप्रमाणे उदार असलेले संत पूर्ण करतात. त्याचा योगक्षेम संत स्वताः चालवतात. त्या भाविकाला सर्व उपाधी व संकटे यातून सोडवतात. त्याला अपलासा करून त्याच्या वरील काळाचे घाव चुकवितात. सर्व अज्ञानी जनांना सन्मार्गाला लावून त्यांचा उद्धार करतात. अशा कृपाळु संतांना एका जनादनीं शरण जातात.

२८

भाविक हे संत कृपेचे सागर । उतरती पार भवनदी ॥१॥
तयांचियां नामें तरताती दोषी । नासती त्या राशी पातकांच्या ॥२॥
दयेंचे भांडार शांतीचें घर । एका जनार्दनीं माहेर भाविकांचे ॥३॥

भावार्थ

भावाचे भुकेले संत कृपेचे सागर असून संसार सरीता तरून जाण्यास मदत करणारे नावाडी आहेत. त्यांनी दिलेल्या नामाने पातकांच्या राशी नाश पावतात. हे संतजन दयारूपी धनाचे भांडार असून शांतीचे निवासस्थान आहेत एका जनार्दनीं म्हणतात, असे प्रेमळ संत भाविकांसाठी माहेर घरच आहे.

२९

जन्म जरा तुटे कर्म । संतसमागम घडतांची ॥१॥
उपदेश धरिता पोटीं । दैन्यें दाही वाटी पळताती ॥२॥
खंडे फेरा चोर्‍यांऐशी । धरितां जीवेंशी पाऊलें ॥३॥
शरण एका जनार्दनीं । ते दिनमणी प्रत्यक्ष ॥४॥

भावार्थ

संतसमागम घडताच जन्म, जरा ( वार्धक्य) आणि कर्माची बंधने तुटतात. संतांचा उपदेश ऐकून त्यांप्रमाणे आचरण केल्यास मनाची आणि धनाची दैन्यें दाही दिशांनी पळतात. चौर्‍यांशी लक्ष योनीतून फिरणारे जन्म मरणाचे फेरे चुकतात. संत हे जीवन प्रकाशित करणारे दिनमणीच आहेत, त्यांचे चरणांना जीवेभावे शरण जावे असे एका जनार्दनी या अभंगात सुचवतात.

३०

सुखदुःखांचिया कोडी । संतदरुशनें तोडी बेडी ॥१॥
थोर मायेचा मायेचा खटाटोप । संसदरुशनें नुरें ताप ॥२॥
चार देहांची पैं वार्ता । संतदरुशनें तुटे तत्वतां ॥३॥
एका जनार्दनों संत । सबाह्य अभ्यंतर देहातीत ॥४॥

भावार्थ

संत दर्शनाने सुखदुःखाची बेडी तुटून जाऊन भौतिक, आध्यात्मिक आधिभौतिक ताप विलयास जातात. स्थूल, सुक्ष्म, कारण, महाकारण या चारी देहापासून जिवात्म्याची सुटका होऊन तो देहातीत होतो. एका जनार्दनी म्हणतात, संत विश्वाला आंतून बाहेरून व्यापून असुनही देहातीत असतात.

३१

वैकुंठाचे वैभव । संतापायीं वसे सर्व ॥१॥
संत उदार उदार । देतो मोक्षाचे भांडार ॥२॥
अनन्य भावें धरा चाड । मग सुरवाड सुख पुढें ॥३॥
एका जनार्दनीं ठाव । नोहे भाव पालट ॥४॥

भावार्थ

वैकुंठाचे सारे वैभव संतचरणांशी वसत असते. मोक्षाचे भांडार उघडून देणारे संत अत्यंत उदार मनाचे असून मनापासून संत संगतीची ईच्छा धरावी. त्यांमुळे सुखाच्या राशी पुढे उभ्या राहतील. एका जनार्दनीं म्हणतास, या वचनावर दृढ विश्वास ठेवावा. मनाचा भाव पालटू देऊं नये.

३२

मोक्ष मुक्तीचे ठेवणें । देती पेणें संत ते ॥१॥
नाहीं सायासाचे कोड । न लगे अवघड साधन ॥२॥
नको वनवनांतरी जाणें । संतदरुशनें लाभ होतां ॥३॥
एका जनार्दनी शरण । संतसमान देवाच्या ॥४॥

भावार्थ

संत मोक्ष मुक्तीचे वरदान देतात, त्यासाठी साधकाला कोणत्याही अवघड साधनेचे सायास करावें लागत नाही. संन्यास घेऊन अरण्यांत जाऊन तप करावे लागत नाही. संत हे देवांसमान असून त्यांच्या केवळ दर्शनाने साधकांना लाभ होतो. एका जनार्दनी यासाठीं संतांना शरण जावें असे सुचवतात.

३३

संतांचे चरणतीर्थ घेतां अनुदिनीं । पातकांची धुणी सहज होय ॥१॥
संतांचे उच्छिष्ट प्रसाद लाभतां । ब्रह्मज्ञान हातां सहज होय ॥२॥
संतांच्या दरुशनें साधती साधने ।तुटती बंधनें सहज तेथें ॥३॥
एका जनार्दनीं संत कृपादृष्टी । पाहतां सुलभ दृष्टी सहज होय ॥४॥

भावार्थ

संतांच्या चरणांचे तीर्थ रोज घेतल्याने सर्व पापे सहज धुतली जातात. संतांनी उष्टावलेला प्रसाद मिळाल्यास ब्रह्म ज्ञानाची सहज प्राप्ती होते. संतांच्या दर्शनाने साधनेत सफलता मिळते. संसारातिल कामक्रोधाची बंधने सहज तुटून जातात. एका जनार्दनीं म्हणतात, संतांनी कृपा केल्यास समदृष्टी लाभणे सुलभ होते.

३४

देवतांचे अंगीं असतां विपरीत । परी संतकृपा त्वरित करिती जगीं ॥१॥
जैसी भक्ति देखती तैसे ते पावती ।परी संतांची गती विचित्रची ॥२॥
वादक निंदक भेदक न पाहाती । एकरूप चिंती मन ज्याचें ॥३॥
भक्ति केल्या देव तुष्टे सर्वकाळ । न करितां खळ म्हणवी येर ॥४॥
संताचे तों ठायीं ही भावना नाहीं । एका जनार्दनीं पायीं विनटला ॥५॥

भावार्थ

जशी ज्याची भक्ति त्याप्रमाणे देव भक्तांवर कृपा करतात. देवतांची करणी कांहीं वेळा विपरीत वाटते. परंतू संत मात्र वादविवाद करणारे वादक, निंदा करणारे निंदक किंवा भेदाभेद करणारे भेदक अशी वर्गवारी न करता शरणागतावर तात्काळ कृपा करतात. सतत भक्ति करणार्‍या भक्तांवर देव प्रसन्न असतात पण भक्ति न करणार्‍याला दुष्ट ठरवतात. संतांच्या मनात असा दुजाभाव नाही. या कारणाने एका जनार्दनीं संतचरणीं सदैव नतमस्तक होतात.

३५

भवरोगियासी उपाय । धरावें तें संतपाय ॥१॥
तेणें तुटे जन्मजराकंद । वायां छंद मना नये ॥२॥
उपासना जे जे मार्ग । दाविती अव्यंग भाविकां ॥३॥
निवटोनी कामक्रोध । देती बोध नाममुद्रा ॥४॥
शरण एका जनार्दनीं धन्य धन्य संतजनीं ॥५॥

भावार्थ

संसार तापाने जे लोक ग्रासले आहेत त्यांनी संतांचे चरण धरावे. यापेक्षा वेगळ्या उपायांचा विचार करू नये. संत उपासनेचे जे जे मार्ग भाविकांना दाखवतात, त्यामुळे मनातिल कामक्रोधाचा निरास होतो. लोकांना उपदेश करून परमेश्वराच्या नामजपाचा सोपा मार्ग दाखवतात ते संत धन्य होत असे एका जनार्दनीं या अभंगात सुचवतात.

३६

धन्य तेचि संत भक्त भागवत । हृदयीं अनंत नित्य ज्यांच्या ॥१॥
धन्य त्यांची भक्ति धन्य त्यांचे ज्ञान ।चित्त समाधान सर्वकाळ ॥२॥
धन्य तें वैराग्य धन्य उपासना । जयाची वासना पांडुरंगीं ॥३॥
एका जनार्दनीं धन्य तेचि संत । नित्य ज्यांचे आर्त नारायणीं ॥४॥

भावार्थ

ज्यांच्या अंतरंगी नित्य अनादी अनंत परमात्मा वसत असतो ते संत धन्य होत. ते च भागवत धर्माचे भक्त समजावेत. या संतांची ज्ञान व भक्ति सर्वश्रेष्ठ असून त्यांचे मन सदैव समाधानी असते. त्यांची उपासना व वैराग्य असामान्य मानावें. त्यांची वासना पांडुरंगी रंगलेली असते. एका जनार्दनी म्हणतात, ज्याच्या मनोकामना सतत नारायण चरणाशी दृढ असतात ते संत धन्य होत.

३७

परलोकींचे सखे । संत जाणावे ते देखे ॥१॥
तोडिती दरुशनें बंधन । करिती खंडन कर्माचें ॥२॥
उत्तम जें नामामृत । पाजिती त्वरित मुखामाजी ॥३॥
एका जनार्दनीं संतपाय । निरंतर हृदयीं ध्याय ॥४॥

भावार्थ

संसाराची बंधने संतदर्शनाने तुटून जातात. कर्माचे खंडन होते. परमेश्वर नामाचे अमृत त्वरेने मुखीं घालून त्याची गोडी लावतात. असे कृपाळु संत परलोकींचे सखे आहेत असे भाविकांनी जाणावे. त्यांच्या चरणांचे हृदयांत ध्यान करावे असे एका जनार्दनीं या अभंगांत सुचवतात.

३८

आदि अंत नाहीं जयाचे रूपासी । तोचि संतांपाशी तिष्टतसे ॥१॥
गातां गीतीं सावडें भावें तें कीर्तन । तेथें नारायण नाचतसे ॥२॥
योगियांची ध्यानें कुर्ठित राहिलीं । संतनामामृतवल्ली गोड वाटे ॥३॥
एका जनार्दनीं संतसेवा जाण । घडती कोटी यज्ञ स्मरणमात्रे ॥४॥

भावार्थ

जो परमात्मा अनादी अनंत आहे तो संतासाठी तिष्टत उभा राहतो. संत जेथे आवडीने भक्तीगीते गातात त्या ठिकाणी नारायण आनंदाने नाचत असतो. संतांच्या मुखातून आलेले नामामृत देवाला गोड वाटते. राका जनादिनीं म्हणतात, संतसेवेने लाभणारे पुण्य कोटी यज्ञ केल्याने मिळणार्‍या पुण्याच्या समान आहे.

३९

संता निंदीं जो पामर । तो दुराचार जन्मोजन्मीं ॥१॥
त्यांसी करितां संभाषण । करावें सचैल तें स्नान ॥२॥
तयांसी येऊं न द्यावें घरां । आपण जाऊं नये द्वारा ॥३॥
एका जनार्दनीं शरण । त्याचें न पहावें वदन ॥४॥

भावार्थ

जो संतांची निंदा करतो तो पापी मनुष्य दुराचारी समजावा. त्याच्या बरोबर संभाषण केल्याने जे पाप लागते त्याचे परिमार्जन करण्यासाठीं डोक्यावरून स्नान करावे. आपण अशा पापी माणसाच्या घरीं जाऊं नये आणि त्याला आपल्या घरीं बोलावू नये. त्याथी संगती टाळावी. असे एका जनार्दनीं या अभंगांत परखडपणे निवेदन करतात.

४०

जया संतचरणीं नाहीं विश्वास । धिक् त्यास वास यमपुरीं ॥१॥
संतचरणीं मन ठेवा रे निश्चळ । करुणा उतावेळ भाका त्यासी ॥२॥
घाला लोटांगण वंदू पांचरण । तेणें समाधान होईल मना ॥३॥
एका जनार्दनीं सत्संगावाचुनी । तरला तो कोण्ही मज सांगा ॥४॥

भावार्थ

संत वचनावर ज्याचा विश्वास नाही त्याचा धिक्कार असो संतचरणी अढळ विश्वास ठेवावा. संतांनी कृपा करावी यासाठी त्यांची आर्ततेने विनवणी करावी. संतांच्या चरणीं लोटांगण घालून त्यांच्या चरणांना वंदन करावे. त्यामुळे मनाला समाधान वाटेल. एका जनार्दनीं म्हणतात, संत संगतीशिवाय कोणीही हा संसार सागर तरून जाऊ शकत नाही.

४१

नांदतसें नाम आकाश पाताळीं । सर्व भूमंडळीं व्याप्त असे ॥१॥
पाताळ भेदोनी व्याप्त ठेलें पुढें । नाहीं त्यासी आड कोठें कांहीं ॥२॥
चोर्‍यांयशी भोगिती दुर्मती पामर । संतांसी साचार शरण न जाती ॥३॥
एका जनार्दनीं नाम अविनाश । संतसंगें दोष सर्व जाती ॥४॥

भावार्थ

या अभंगांत एका जनार्दनीं नाममहिमा वर्णन करीत आहेत. आकाश, पाताळ आणि सर्व पृथ्वीवर हरीनाम निनादत आहे. परमेश्वराच्या नामाला कोठेही आडकाठीं नाही. हे संतांचे वचन असून संतांना शरण न जाणारे अज्ञानी लोक जन्म मरणाचे फेरे चुकवू शकत नाही. परमेशाचे नाम अविनाशी आहे असे संत सतत सांगतात. या संत संगामुळे सर्व दोषांचे निर्मूलन होते.

४२

कर्म उपासना न कळे जयांसी । तेणें संतांसी शरण जावें ॥१॥
सर्व कर्मभावें विठ्ठलनाम गावें । जाणिवे नेणिवेचे हांवे पडू नये ॥२॥
अभिमान झटा वेदाचा पसारा । शास्त्रांचा तो भारा वहातां अंगीं ॥३॥
एका जनार्दनीं सर्व कर्म पाही । विठ्ठल म्हणतां देही घडतसे ॥४॥

भावार्थ

कर्म व उपासना यांचे वर्म ज्यांना कळत नाही त्यांनी संतांना शरण जावे. जाणिव ( बोध होणे)नेणिव ( बोध न होणे ) यांचा विचार करू नये. वेद शास्त्रांच्या अभ्यासाने अंगीं अहंकार वाढतो. भक्तीभावाने हरीनामाचा जप केल्याने देहाने सत्कर्मच घडत असते. एका जनार्दनीं निःसंशयपणे आपले मत स्पष्ट करतात.

४३

हरिप्रातीसी उपाय । धरावें संतांचें ते पाय ॥१॥
तेणें साधती साधने । तुटतीं भवाची बंधने ॥२॥
संतांविण प्राप्ति नाहीं । ऐशी वेद देत ग्वाही ॥३॥
एका जनार्दनीं संत । पूर्ण करिती मनोरथ ॥४॥

भावार्थ

संतांना शरण जाणे हाच हरिकृपेचा उत्तम मार्ग आहे. त्यामुळे साधना सफल होते. संसाराची सर्व बंधने तुटून जातात. संतसंगती शिवाय हरिपदाची प्राप्ती होत नाही ही वेदवाणी आहे. संत सर्व मनोरथ पूर्ण करतात असे एका जनार्दनीं या अभंगांत सांगतात.

४४

काम क्रोध लोभ नाहीं संतां अंगीं । वर्तताती जगीं जगरूप ॥१॥
नातळोनी संसारा दाविती पसारा । भाव एक खरा विठ्ठलपायीं ॥२॥
आणिकांची स्तुति नायकती कानीं । न बोलती वचनीं वायां बोला ॥३॥
एका जनार्दनीं तेचि संत तारू । भवाचा सागरू उतरिती ॥४॥

भावार्थ

संतांच्या ठिकाणीं काम, क्रोध, लोभ यांचा लवलेशही दिसत नाही. संसाराचे सत्य स्वरूप संत साधकांना समजावून सांगतात. ते सद्भावाने विठ्ठलाची भक्ती करतात. एका परमात्म्याशिवाय ते कोणचीही स्तुती करीत नाहीत, कानांनी ऐकत नाहीत. वाचेने निरर्थक भाषण करीत नाही. एका जनार्दनीं म्हणतात, संत हे भवसागर पार करून देणारी नौका आहे.

४५

संतांचे ठायीं नाहीं द्वैतभाव । रंक आणि राव सारिखाची ॥१॥
संतांचे देणें अरिमित्रां सम । कैवल्याचे धाम उघड तें ॥२॥
संतांची थोरीव वैभव गौरव । न कळे अभिप्राय देवासी तो ॥३॥
एका जनार्दनीं करी संतसेवा । परब्रहमठेवा प्राप्त जाला ॥४॥

भावार्थ

संतांच्या मनांत श्रीमंत आणि दरिद्री असा दुजाभाव नसतो. संत शत्रु आणि मित्र असा भेदभाव न करता दोघांना समभावाने वागवतात. मोक्षाचे द्वार सर्वांना खुले करून देतात. संतांचे भक्तवत्सलेतेचे वैभव, मनाची थोरवी, साधकांकडून होणारा गौरव यांतिल रहस्य देवांना देखील कळत नाही. एका जनार्दनी संतसेवेत नित्य तत्पर असतात, म्हणून त्यांना परब्रह्म ठेवा लाभला.

४६

सम असे सुखदुःख । संत त्यासी म्हणती देख ॥१॥
पापपुण्य मावळलें । द्वैत सर्व दुरावलें ॥२॥
हर्ष शोक नाहीं देहीं । संत जाणावें विदेही ॥३॥
एका जनार्दनीं संत । जनालागीं कृपावंत ॥४॥

भावार्थ

जीवनातिल सुखदुःख जे समभावाने पाहतात त्यांना संत म्हणावें. पापपुण्य, शीत उष्ण, आपपर हे सारे द्वैतभाव मावळले असून आनंद आणि दुःख संतांच्या मनाला स्पर्श करू शकत नाहीत. असे संतजन संसारांत देहाने वावरत असले तरी ते सर्वार्थानी विदेहीच समजावे. सर्व सामान्य जनांसाठी जे कृपावंत ते संत अशी एका जनार्दनीं संतांची व्याख्या करतात.

४७

मुखीं नाही निंदा स्तुती । साधु वरीती आत्मस्थिती ॥१॥
राग द्वेष समूळ गेले । द्वैताद्वैत हारपलें ॥२॥
घेणें देणें हा पसारा । नाहीं जयासी दुसरा ॥३॥
एका जनार्दनीं संत । ज्याचे हृदयीं भगवंत ॥४॥

भावार्थ

साधु नेहमी आत्मस्थितींत असतात, ते कधीही कुणाची मुखाने निंदा किंवा स्तुती करीत नाहीत. देवघेवी चे व्यवहार करीत नाहीत. द्वैत आणि अद्वैत याविषयीचर्चा करीत नाहीत. एका जनार्दनीं म्हणतात, ज्याच्या हृदयात नेहमी भगवंत वसत असतो त्याला संत म्हणवे.

४८

मान देखोनि सहसा । संतां असंतोष होय जैसा ॥१॥
नाम ऐकुनी बागुलातें । बाळ सांडू पाहें प्राणातें ॥२॥
चंडवातें ते कर्दळी । समूळ कांपे चळचळीं ॥३॥
सन्माने नामरूप जाय । एका जनार्दनीं सत्य पाहे ॥४॥

भावार्थ

सामान्य लोक जेव्हां संतांना मान देतात, तेव्हां संतांना असंतोष वाटतो. जसा बागुलबुवा आला हे शब्द ऐकून बालक भितीने गर्भगळीत होतो. सोसाट्याचा वारा सुटाला म्हणजे कर्दळीचे झाड मुळापासून चळचळा कापते. त्याप्रमाणे संत सन्मालाला घाबरतात. असे एका जनार्दनीं संताविषयी सत्य वचन सांगतात.

४९

जागा परी निजला दिसे । कर्म करी स्फुरण नसे ॥१॥
सकळ शरीराचा गोळा । होये आळसाचा मोदळा ॥२॥
संकल्प विकल्पाची ख्याति । उपजेचिना सदा चित्तीं ॥३॥
यापरीं जनीं असोनि वेगळा । एका जनार्दनीं पाहे डोळां ॥४॥

भावार्थ

जो परमात्म तत्वाविषयी सतत जागृत असूनही सगळ्या शरीराचा गोळा करून आळशासारखा पडलेला आहे असा दिसतो. त्याच्या चित्तांत संकल्प आणि विकल्प यांच्या लाटा उसळत नाहीत. जगामध्ये असूनही जो जनांपेक्षा वेगळा असतो असे एका जनार्दनीं संतांचे वर्णन करतात.

५०

आपुलीच दारा जरी टेके व्यभिचार । क्रोधाचा थारा अंतरीं नये ॥१॥
आपुलेंच धन तस्करें नेतां जाण । जयाचें मन ३द्विग्न नव्हे ॥२॥
आपुलाची पुत्र वधोनि जाय शत्रु । परी मोहाचा पाझरू नेत्रीं नये ॥३॥
आपुलें शरीर गांजितां परनरें । परी शांतीचें घर चळो नेदी ॥४॥
एका जनार्दनीं जया पूर्ण बोधू । तोचि एक साधु जगामाजीं ॥५॥

भावार्थ

आपली पत्नी व्यभिचार करीत आहे हे कळूनही जो मनांत राग धरीत नाही, चोराने आपले धन चोरून नेले तरी ज्याच्या मनाची शांती बिघडत नाही, शत्रुने स्वपुत्राचा वध केला तरी जो पुत्रमोहाने अश्रु गाळीत नाही किंवा त्याच्या देहाला कुणी पीडा दिली तरी चित्ताची शांती ढळत नाही असा ज्याला पूर्ण बोध झालेला साधु म्हणुन जगांत मान्यता पावतो असे एका जनार्दनीं या अभंगांत सांगतात.

५१

असोनि संसारीं आपदा । वाचे वदे विठ्ठल सदा ॥१॥
नाहीं मानसीं तळमळ । सदा शांत गंगाजळ ॥२॥
असोनियां अकिंचन । जयाची वृत्ति समाधान ॥३॥
एका जनार्दनीं ऐसे थोडे । लक्षामध्यें एक निवडे ॥४॥

भावार्थ

संसारांत पुरेशी संपदा (धन ) नसतांना जो सतत हरिनामाचा जप करतो, ज्याचे मन गंगाजळाप्रमाणे सदा शांत असते, दरिद्री असूनही जो समाधानी असतो असा भक्त लाखामध्ये एखादाच सापडतो. असे एका जनादनीं या अभंगांत म्हणतात.

५२

इहलोकीं बरा तो परलोकीं वंद्य । त्यासी भेदत्व निंद्य उरलें नाहीं ॥१॥
परस्त्री देखतां नपुसक वागे । परधन पाहतां अंधापरी निघे ॥२॥
वाद वेवादा नोहे त्याची मती । हृदयीं भगवद्भक्ती सदा वाहे ॥३॥
एका जनार्दनीं ऐसे विरळे प्राणी । कोटीमाजीं जनीं एक देखी ॥४॥

भावार्थ

जो या लोकांत बरा असा मानला जातो तो परलोकांत वंदनीय ठरतो. त्याच्या मनातीले सारे भेदाभेद नाहिसे झालेले असतात. परस्त्री आणि परधन यांचा मोह त्याला पडत नाही. वादविवाद करण्यांत तो आपली बुद्धी खर्च करीत नाही तो सतत भगवंताची भक्ती मध्ये रममाण होतो. एका जनार्दनीं म्हणतात, असा साधक कोटी जनांमध्ये एखादाच सांपडतो.

५३

न मानी सन्मानाचें कोडें । नाहीं चाड विषयाची ॥१॥
ऐसे मज शरण येती । तयांचें उणें न पडे कल्पांती ॥२॥
नाहीं संसाराची चाड । नाही भीड कवणाची ॥३॥
एका त्याचा म्हणवी दास । धरूनि आस जनार्दनीं ॥४॥

भावार्थ

ज्या संतांना सन्मानाची आवड नसते, इंद्रिय विषयांची ईच्छा नाही ते श्रीहरीला अनन्य भावानें शरण जातात त्यांना चारी युगांच्या अंतापर्यंत ( कल्पांत ) कशाचीही उणीव वाटत नाही. एका जनार्दनीं म्हणतात, संसार सुखाची कामना नसलेल्या या निर्भिड संतांना सर्वभावें शरण जाऊन त्यांचा दास होऊन रहावे.

५४

संतांचा दास तो देवाथा थक्त । तरती पतीत दरुशनें त्याच्या ॥१॥
त्याचिया योगे घडती सर्व तीर्थे । तीर्थ तें पवित्र होती तीर्थे ॥२॥
तयाचियां पदें धरा धन्य म्हणे । ऐसे जे भेदरहित मनें तेचि संत ॥३॥
एका जनार्दनीं तयाच्या प्रसादे । कर्म अकर्मा दोंदे निघताती ॥४॥

भावार्थ

संतांचे दास्यत्व स्विकारणारा देवाचा आवडता भक्त असतो. त्याच्या दर्शनाने पतीतांचा उद्धार होतो आणि त्याच्या पदस्पर्शाने तीर्थे पावन होतात, पृथ्वी धन्य होते. असे समभावाने सर्वांवर कृपा करणार्‍या संतामुळे सर्व कर्म आणि अकर्म यांचा विपाक होतो. असे एका जनार्दनीं या अभंगांत स्पष्ट करतात.

५५

धन जयासी मृत्तिका । जगीं तोचि साधु देखा ॥१॥
ज्यासी नाहीं लोभ आशा । तोचि प्रिय जगदीशा ॥२॥
निवारले क्रोधकाम । तोचि जाणा आत्माराम ॥३॥
एका जनार्दनीं पाय धरी । भुक्ती मुक्ति नांदे घरीं ॥४॥

भावार्थ

ज्या साधुला कशाचाही लोभ नाही, निरपेक्ष भावनेने जो धनसंपदेला मातीसमान मानतो तो परमेश्वराला प्रिय होतो. ज्याने क्रोध कामावर विजय मिळवलेला आहे तो आत्माराम आहे हे जाणून त्याला वंदन करावे कारण त्याच्या घरी भुक्ती मुक्ति एकत्र नांदत असतात असे एका जनार्दनी म्हणतात.

५६

साधु म्हणावें तयासी । दया क्षमा ज्याच्या दासी॥१ ॥
जयापाशीं नित्य शांती । संत जाणा आत्मस्थिती ॥२॥
सिद्धी त्याच्या दासी । भुक्ति मुक्ति पायापाशी ॥३॥
एका जनार्दनीं साधु ।जयापाशी आत्मबोधु ॥४॥

भावार्थ

दया आणि क्षमा हे ज्याचे स्वाभाविक गुण आहेत त्यालाच साधु म्हणावे. जो सदैव आत्मस्थितींत असतो, मनाने शांत असतो अशा संताला सर्व सिद्धी प्राप्त होतात. भुक्ति आणि मुक्ति त्याच्या पायाशीं लोळण घेतात. एका जनार्दनीं म्हणतात, ज्याला आत्मबोध झाला आहे तोच साधु समजावा.

५७

वेधिलें ज्याचें मन सदा नामस्मरणीं । रामनाम ध्वनीं मुखीं सदा ॥१॥
प्रपंच परमार्थ त्यासी पैंसारखा । अद्वैती तो देखा भेद नाहीं ॥२॥
एका जनार्दनीं एकरूप भाव । नाहीं भेदा ठाव तये ठायीं ॥३॥

भावार्थ

ज्याचे मन सदासर्वदा नामस्मरणांत गुंतले आहे मुखांत रामनामाची धून गुंजत आहे, जो प्रपंचांत असूनही परमार्थ साधण्यासाठी तत्पर असून अद्वैत भक्त आहे. तो परमात्म तत्वाशी एकरूप झालेला परम भक्त आहे असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, त्याच्या अंत:करणांत भेदाभेदाला स्थान नाही.


५८

काम क्रोध नाहीं अंगीं । तोचि नर जन्मला जगीं ॥१॥
तयाचें होतां दरुशन । तुटे देहाचें बंधन ॥२॥
अरुणोदयीं जाण । तम निरसे सहज आपण ॥३॥
एका जनार्दनीं शरण । नोहे एकपणावांचून ॥४॥

भावार्थ

काम क्रोध यांचा विकार नसलेला नरदेह पुण्यवान समजावा. ज्याप्रमाणे सूर्योदय होताच अंधार नाहीसा होतो त्याप्रमाणे त्याचे दर्शनाने देहाची बंधने तुटून जातात. एका जनार्दनीं म्हणतात, अशा पुण्यवंताला सर्वभावे शरण जावे.

५९

जें जें बोले तैसा चाले । तोचि वहिलें निवांत ॥१॥
अंगी असोनी जाणपण । सदा सर्वदा जो लीन ॥२॥
निंदा अथवा वंदा । नाही विषम ती बाधा ॥३॥
शांतीचा मांदुस । भरला असे सदोदित ॥४॥
एका जनार्दनीं धन्य । त्याचें दरुशन जगमान्य ॥५॥

भावार्थ

जे संत नेहमी जसे बोलतात त्याचप्रमाणे वर्तन करतात, त्यांना अनेक विषयांचे ज्ञान असूनही ते अत्यंत विनयशील असतात. निंदा किंवा स्तुती यांनी त्यांच्या मनाची शांती ढळत नाही, या संतांचे मन शांतीरूप धनाने पूर्ण भरलेले असते. काम क्रोधाची बाधा त्यांना होत नाही. एका जनार्दनी म्हणतात, असे संत धन्य होत, ते सर्वांच्या आदराचे स्थान असतात.

६०

ऐशी शांती ज्यासी आहे । त्याचे घरी देव राहे॥१॥
हा अनुभव मनीं । पहा प्रत्यक्ष पुराणीं ॥२॥
धर्माघरीं वसे । अर्जुनाचे रथीं बैसे ॥३॥
अंकित दासाचा होय । एका जनार्दनीं देव ॥४॥

भावार्थ

ज्याच्या मनांत निरामय शांती वसत असते त्याच्या घरीं देव निवास करतो. हा अनुभवाचा विचार मनीं धरून त्याची प्रचिती पुराणात पहावी. श्रीकृष्ण भगवान धर्मराजाच्या घरीं निवास करीत आणि अर्जुनाच्या रथात बसून त्याचे सारथ्य करीत. एका जनार्दनीं ही उदाहरणे देवून सांगतात, की, देव भावाचा भुकेला आहे.

६१

हेचि एक खरें । सदा वाचे नाम स्मरे ॥१॥
धन्य त्याची जननी । प्रसवली त्या लागोनी ॥२॥
हरुषें नाचे कीर्तनांत । प्रेम न खंडे शुद्ध चित्त ॥३॥
एका जनार्दनीं शरण । वंदीन तयाचे चरण ॥४॥

भावार्थ

सदासर्वदा वाचेने हरीचे नामस्मरण करणारे, कीर्तनांत आनंदाने नाचणारे, ज्यांचे चित्त शुद्ध प्रेमाने भरलेले असते तेच खरे हरीचे दास असून त्यांना जन्म देणारी माता धन्य होय. एका जनार्दनीं म्हणतात, अशा हरीभक्तांना शरण जाऊन त्यांच्या चरणांना वंदन करावे.

६२

आले आले हरीचे दास । मुखीं रामनाम घोष ।
तोडोनियां भवपाश । जीवन्मुक्त ते ॥१॥
वैराग्याचें कवच अंगीं । नाचताती प्रेमरंगीं ।
ज्ञान शस्त्र तें निसंगीं । छेदिती संग ॥२॥
अनुभव तीक्ष्ण शर । सोडिताती निरंतर ।
वर्मी खोचले ते वीर । क्रोधादि असुर ॥३॥
सांडोनि देहाभिमान । तोचि जीवन्मुक्त जाण ।
एका जनार्दना शरण । रामकृष्ण जपताती ॥४॥

भावार्थ

जे हरीचे खरे भक्त असतात ते संसाराचे सारे पाश तोडून, जीवनमुक्त होऊन, वैराग्य धारण करून वाचेने रामनामाचा घोष करीत प्रेमरंगी निःसंग होऊन नाचत असतात. अनुभवाचे धारदार बाण सोडून ते कामक्रोधादि असुरांच्या वर्मी घ्याव घालतात. एका जनार्दनीं म्हणतात, देहाचा अभिमान सोडून जे रामकृष्ण नामाचा सतत जप करतात तेच खरे जीवन्मुक्त झाले आहेत असे जाणून त्यांना शरण जावें.

६३

आसनीं भोजनीं शयनीं । जो चिंती रूप मनीं ॥१॥
जागृति स्वप्न आणि सुषुप्ति । सदा ध्यान रूप चित्ती ॥२॥
नसे आणिके ठायीं मन । एका शरण जनार्दन ॥३॥

भावार्थ

जो साधक आसनावर बसला असतांना, भोजन (जेवण) घेत असतांना किंवा विश्रांती घेत असतांना सतत परमात्म रूपाचे मनांत चिंतन करीत असतो जागेपणीं, स्वप्नांत किंवा गाढ झोपेंत सुद्धां तो भक्त परमेश्वराच्या रुपाचे ध्यान करीत असतो, अन्यत्र जो कोठेही मनाने गुंतत नाही अशा अनन्य भक्तांना एका जनार्दनीं शरण जातात.

६४

न्याय मीमांसा सांख्य पांतजली । व्याकरण वेदांत बोली सर्व एक ॥१॥
ते माझे सोई रे जिवलग जीवाचे । जे अधिकारी साचें संतजन ॥२॥
एका जनार्दनीं मन तया ठायीं । होऊनिया पायीं उतराई ॥३॥

भावार्थ

संत हे आध्यात्मिक ज्ञानाचे अधिकारी असून जीवाचे जिवलग सोयरे आहेत. त्यांच्या ठिकाणी मन एकाग्र करून त्यांचे उतराई व्हावे असे सांगून एका जनादनीं म्हणतात, न्याय, मीमांसा ही शास्त्रे ज्ञान योग, पातंजलीचा अष्टांगयोग, व्याकरण आणि वेदांत हे सर्व संतमहिमा एक मुखाने मान्य करतात.

६५

भाग्य उजळलें आतां । संत सभाग्यता भेटले ॥१॥
पाप ताप दैन्य गेलें । संत पाउले देखतां ॥२॥
तुटलीं बंधनाची गांठी । पाय पोटीं आठवितां ॥३॥
एका जनार्दनीं शरण । संतचरण दुर्लभ ॥४॥

भावार्थ

साधकाचे भाग्य उदयाला आले की, संत भेटतात संतांच्या चरणांचे दर्शन होतांच कळत नकळत घडलेल पाप आध्यात्मिक, आधिभौतिक आधिदैविक हे सर्वताप आणि दैन्य नाहिसे होते. आत्मस्वरूपाला जे देहाचे बंधन पडते ते संतदर्शनाने तुटून पडते. असे सांगून एका जनार्दनीं संतांना शरण जातात.

६६

हृदयीं नांदे संदेह मूळ । तेथें फळ विरुढे केवी ॥१॥
जैसें बीज तैसा अंकुर । दिसे निर्धार जाणावा ॥२॥
योगायोग शास्त्रपाठे । वाउगी खटपटें तर्काची ॥३॥
करितां कर्म धर्म नेहटी । नोहे भेटी संतांची ॥४॥
एका जनार्दनीं त्याचा दास ।सहज आस पुरतसे ॥५॥

भावार्थ

अतरांत जर संदेह असेल तर भक्तीचे फळ वाढणार नाही. जसे बीज पेरावे तसे च फळ मिळणार हे जाणून घ्यावे. योग, याग, शास्त्रांचे अध्ययन हे सर्व तर्कशास्त्राची खटपट असून शास्त्रोक्त कर्माने संतांची भेट होणार नाही. खऱ्‍या भक्तीभावाने शरणागत झाल्याने जे संत मनोकामना पूर्ण करतात त्यांना शरण जावे असे एका जनार्दनीं या अभंगांत सोगतात.

६७

पूर्वपुण्य असतां गांठी । संतभेटी होय ॥१॥
धन्य धन्य संतसंग । फिटे तम जन्माचा ॥२॥
चार सहा वंदिती पाय । आणिकां ठाव कोठें नाही ॥३॥
एका जनार्दनीं संत । कृपावंत सुखसिंधु ॥४॥

भावार्थ

जन्मोजनीचा अज्ञान अंधकार नाहीशी करणारी संतसंगती पूर्वपुण्य गांठीशी असल्या शिवाय लाभत नाही असे मत व्यक्त करून एका जनार्दनीं म्हणतात, संत हे कृपावंत असून सुखसागर आहेत. चारी वेद आणि साही शास्त्रे संतांच्या चरणांना वंदन करतात.

६८

बहुत जन्मांचें सुकृत । तयांसी घडत संतसंग ॥१॥
धन्य वैष्णव भूमंडळी । दरूशन मेळीं जीव तरतीं ॥२॥
एका जनार्दनीं विश्राम । निजदास संतांचा ॥३॥

भावार्थ

अनेक जन्मांच्या पुण्याईने संतांचा सहवास लाभतो. हे वैष्णव जन भुलोकांसाठी वरदान आहेत कारण त्यांच्या दर्शनाने सामान्य जन संसार सागर तरून जातात. एका जनार्दनी म्हणतात, संतांचे चरणांच्या दासांना खरी विश्रांती लाभते.

६९

बहु पुण्य होय गांठी । तरीच भेटी संतांची ॥१॥
पाप ताप दैन्य गेलें । संत पाऊलें देखतां ॥२॥
मोक्ष मुक्ति साधे फुका । ऐशी देखा संतकृपा ॥३॥
नाहीं आणिकांचें भेव । संत सदैव भेटता ॥४॥
एका जनार्दनीं संत । पुरविती हेत सर्वही ॥५॥

भावार्थ

पुष्कळ पुण्य गांठी असेल तरच संतांची भेट होऊन सारे पाप नाहीसे होऊन आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक तापांपासून सुटका होते. सारे दैन्य लयास जाते. संतांच्या चरण दर्शनाने मोक्ष मुक्तीचा सहज लाभ होतो. संतकृपेने सर्व प्रकारच्या भयापासुन सुटका होते. एका जनार्दनीं म्हणतात, मनातिल सर्व हेतू संतकृपेने पूर्ण होतात.

७०

संतभेटीचा आनंदु । सुखसागर परमानंदु ।
गातां नुरेची भेदु । नामस्मरणें ॥१॥
कैवल्याचे अधिकारी । मोक्ष राबे त्याचे घरीं ।
ऋध्दी सिध्दि कामारी । कोण त्या पुसे ॥२॥
भुक्ति आणि मुक्ति । सदा तिष्ठे अहोरातीं ।
कैवल्यपद येती । सामोरी तयांसी ॥३॥
नाम गाती जे आनंद । ह्रदयीं नाही दुजा भेद ।
एका जनार्दनीं छंद । तयांचा मज ॥४॥

भावार्थ

संतभेटीचा आनंद परमसुखाचा सागर असून नामस्मरण आणि संतसंग यांत कोणताही भेद नाही. दोन्ही प्रकारचे भक्त कैवल्याचे अधिकारी असतात त्यांचे घरी मोक्ष, ऋध्दी सिध्दि हे सेवक म्हणून काम करतात. भुक्ति आणि मुक्ति रात्रंदिवस सतत कार्यरत असतात. एका जनार्दनीं म्हणतात, या अनन्य भक्तांचा मनाला छंद लागतो , आनंदाचा, परमसुखाचा लाभ होतो.

७१

वाट पिकली संतांची । अवघें स्वरूप मुद्दलची ॥१॥
उकल करा लवडसवडीं । मुद्दल देव घडोघडीं ॥२॥
द्वैताची दाटणी सोडी । वासनेची वासना फेडी ॥३॥
आळ करितां सरळ सात । मन पडेल विचारांत ॥४॥
अखिल गुरू नामाचे । स्थापिले सुरंग भक्तीचे ॥५॥
अंगळु मंगळु नंद भाषा । द्वैत दळणीं वटील घसा ॥६॥
आंत बाहेर एकचि सूत । मुद्दल देतां सुखी होत ॥७॥
एका जनार्दनीं एकचि भेटी । सरिसीसाठी संसारा ॥८॥

भावार्थ

संतांना परमेश्वर रूपी मुद्दलच हाती आले. संतांचे सारे सायास सफल झाले. आपणच देव स्वरूप आहोत अशी ओळख पटल्याने द्वैत संपून गेले. सर्व वासनांचे निर्मुलन झाले. सदगुरुंच्या वचनाने नामजपाचा भक्तीरूप मार्ग सापडला. वस्त्र विणतांना जसे आंत बाहेर एकच सूत व्यापून असते तसा परमात्मा जीवाला आतून बाहेरून व्यापून आहे हे मर्म समजले. एका जनार्दनीं म्हणतात सद्गुरुंच्या भेटीने संसाराची यातायात संपली.

७२

आला आषाढी पर्वकाळ । भक्त मिळाले सकळ ॥१॥
निवृत्तिनाथ ज्ञानदेव । मुक्ताबाई सोपानदेव ॥२॥
चांगदेव विसोबा खेचर । सांवता माळी गोरा कुंभार॥३॥
रोहिदास कबीर सूरदास । नरहरी आणि भानुदास ॥४॥
नामदेव नाचे कीर्तनीं । एका शरण जनार्दनीं ॥५॥

भावार्थ

आषाढ महिन्याचा पुण्यकाळ सुरु झाला सारे भक्त विठोबाच्या पंढरींत जमा झाले. निवृति झानदेवा सह सोपानदेव आणि मुक्ताबाई तसेच चांगदेव, विसोबा खेचर, गोरा कुंभार, सावता माळी हे सर्व विविध व्यवसाय करणारे पण एकाच भागवत धर्माची उपासना करणारे भक्त पंढरीची वाट चालू लागले. रोहिदास, सूरदास, भानुदास, नरहरी सोनार आणि कबीर ही सर्व संतांची मांदियाळीं जमली. विठ्ठलाचा लाडका भक्त नामदेव कीर्तन रंगी तल्लीन होऊन नाचू लागला. पंढरीच्या सोहळ्याचे असे सुरेख वर्णन एका जनार्दनीं या अभंगांत करतात.

७३

वारंवार जन्म घेऊं । परी पाहूं पंढरपूर ॥१॥
दुजें मागणें नाहीं देवा । करूं सेवा वैष्णवांची ॥२॥
न मागों भुक्ति आणि मुक्ति। ती फजिती कोण सोसी ॥३॥
एका जनार्दनीं मागे । कीर्तनरंगीं रंगला वेगें ॥४॥

भावार्थ

परत परत जम्म घेऊन पंढरपूरची वारी करून वैष्णव जनांची सेवा करण्याची संधी मिळावी यापेक्षा वेगळे मागणे नाही अशी प्रार्थना करून एका जनार्दनीं म्हणतात, भुक्ति आणि मुक्ती ही केवळ फसव्या मृगजळाप्रमाणे आहेत असे समजून कीर्तन रंगी रंगून जावे.

७४

दास मी होईन कामारी दासीचा । परि छंद सायासाचा नाहीं मनीं ॥१॥
गाईन तुमचें नाम संताचा सांगात । यापरती मात दुजी नाहीं ॥२॥
निर्लज्ज कीर्तनीं नाचेन मी देवा । एका जनार्दनीं भावा पालट नको ॥३॥

भावार्थ

संसार बंधनांत बद्ध असलेल्या भक्ताचे मन या सायासांत गुंतून पडत नाही. तर संतांच्या संगतींत तो परमेश्वराचे नाम संकीर्तन करण्यांत दंग असतो. सारी लोकलज्जा सोडून तो भक्त कीर्तनांत नाचत असतो. एका जनार्दनीं देवाला विनंती करतात कीं, यापेक्षा वेगळी अपेक्षा नाही. इश्वराविषयीचा हा भक्तिभाव सदैव मनांत जागतां राहावा.

७५

कोणता उपाय । जोडे जेणे संतपाय ॥१॥
हाचि आठव दिवस रात्रीं । घडो संतांची संगती ॥२॥
न करूं जप तप ध्यान । संतांपायी ठेवूं मन ॥३॥
न जाऊं तीर्थप्रदक्षिणा । आठवूं संतांचे चरणा ॥४॥
होता ऐसा निजध्यास । एका जनार्दनीं दास ॥५॥

भावार्थ

संतसहवास जडावा यासाठी कोणता उपाय करावा या विचारांत दिवस-रात्र मन व्यग्र असते, जप, तप, ध्यान यांपैकीं कोणतिही साधना न करता;तीर्थयात्रेचे सायास न करता संत चरणांशी मन एकाग्र करावे असा निजध्यास मनाला जडला आहे असे एका जनार्दनीं या अभंगांत सांगतात.

७६

आधीं घेई निरपेक्षता । त्याचे चरण वंदीन माथां ॥१॥
निरपेक्ष जेथें घडे । यमकाळ पायीं जोडे ॥२॥
निरपेक्षाची आवडी । ब्रह्मज्ञान घाली उडी ॥३॥
निरपेक्षावांचून । नाहीं नाहीं रे साधन ॥४॥
एका जनार्दनीं शरण । निरपेक्ष पाविजे ज्ञान ॥५॥

भावार्थ

या अभंगांत संत एकनाथ निरपेक्षता या सद्गुणा 'विषयी बोलत आहेत. निरपेक्ष भक्तांना प्रत्यक्ष काळाचा नियंता यमराज आदराने वंदन करतो. निरपेक्ष साधकासाठी ब्रह्मदेव तातडीने धावत येतो. निरपेक्षते वाचून कोणतिही साधना साध्य होत नाही असे सांगून एका जनार्दनी म्हणतात;अशा निरपेक्ष संतांना शरण जाऊन त्यांच्या चरणांना वंदन करावे कारण ते च खरे ज्ञानी असतात.

७७

न होता शुद्ध अंतःकरण ।संतसेवा न घडे जाण ॥१॥
शुद्ध संकल्पावांचून । संतसेवा न घडेचि जाण ॥२॥
कामक्रोध दुराचार । यांचा करूं नये अंगिकार ॥३॥
आशा मनीशांचें जाळें । छेदुनी टाकी विवेक बळें ॥४॥
एका जनार्दनीं ध्यान सहज तेणें संतपण ॥५॥

भावार्थ

निर्मल अंतःकरणातील शुद्ध संकलपाशिवाय संतसेवा घडत नाही. काम ( वासना)आणि क्रोध ( संताप) यामुळे दुराचार घडतो, यांचा कधीहि स्विकार करू नये तसेच विवेकाने मनातिल आशा-अपेक्षांचे जाळे छेदून टाकावे. असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, संतसेवा घडण्यासाठी सदैव संतचरणांचे ध्यान करावे.

७८

जाणिव नेणिवांच्या वाटा ।खटपटा पडूं नका ॥१॥
संतां शरण जा रे आधीं ।तुटे उपाधी तत्काळ ॥२॥
तेणें तुटें भवबंधन । आत्मज्ञान प्रगटे ॥३॥
एका जनार्दनीं शरण । संत परिपूर्ण उदार ॥४॥

भावार्थ

जाणिव आणि नेणिव या निरर्थक द्वंव्दांत न पडतां आधी संतांना शरण जावे. त्यांमुळे संसार बंधन तुटून जाते आणि जीवाची देहबुद्धी नाहिशी होऊन त्याला आत्मबोध होतो. एका जनार्दनीं म्हणतात, संत ज्ञानाने परिपूर्ण असून उदार अंतःकरणाचे आहेत, त्यांना शरण गेल्याने सर्व उपाधींपासून सुटका होते.

७९

धर्म अर्थ काम मोक्ष । संतचरणीं ठेवी लक्ष ॥१॥
परा पश्यंती मध्यमा वैश्वरी । चरणीं निर्धारी संतांच्या ॥२॥
योगयागादि साधने । संतचरणीं असो ध्यानें ॥३॥
आणिक नको त्या उपाधी ।तोडा देहीं आधिव्याधी ॥४॥
एका जनार्दनीं मन । एकपणे जनार्दन ॥५॥

भावार्थ

धर्म अर्थ काम मोक्ष हें चारी पुरषार्थ संतचरणीं मन गुंतवल्याने साध्य होतात. परा, पश्यंती, मध्यमा, वैरवरी या चारी वाणी संत चरणीं वास करतात. योगयागादी साधने संत कृपेने सफल होतात. देहाच्या व्याधी आणि मनाच्या चिंता संत सेवेने विलयास जातात. एका जनार्दनीं म्हणतात, मन एकाग्रपणे सद्गुरु जनार्दन स्वामींच्या मनाशी एकरूप झाले आहे.

८०

जयाचे चित्त संतांच्या चरणा । तेणें नारायणा जिंकियलें ॥१॥
भावें देव मिळे भावें देव मिळे ।संतचरणीं लोळे सर्व काळ ॥२॥
संतांची आवडी म्हणोनि अवतार धरी ।योगक्षेम भारी चालवी त्याचा ॥३॥
संतचरणीं देवा आदर उपचार । एका जनार्दनीं साचार करीतसे ॥४॥

भावार्थ

ज्याचे मन संतचरणांशी जडले आहे तोच नारायणाला आपलेसे करू शकतो. निरपेक्ष भक्ती भावानेच देव प्रसन्न होतो यासाठी सदा सर्वकाळ संतांची सेवा करावी असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, संतांच्या प्रेमासाठीच देव अनेक अवतार धारण करतो. स्वता: संताचा योगक्षेम चालवतो. संतच देवाचा महिमा वाढवतात.

८१

संतासी आवडे तो देवाचाही देव कळिकाळाचें भेव पायातळीं १॥
आणिकाची चाड नसेची वासना । संतांचिया चरणा वाचूनियां ॥२॥
ऐसे ज्यांचे प्रेम ऐशी ज्यांची भक्ती । एका जनार्दनीं मुक्ति तेथें राबें ॥३॥

भावार्थ

जो साधक संतांना आवडतो त्याला कळीकाळाचे भय नसते. या साधकाला कोणत्याही प्रकारची वासना नसते. संत चरणांशिवाय कोणतिही अपेक्षा नसते. त्याचे संताविषयीचे प्रेम आणि भक्ती भाव यामुळे मुक्ती या भक्ताच्या पायी लोळण घेतात. असे एका जनार्दनीं या अभंगात सुचवतात.

८२

संतांचे सुख जिहीं अनुभवले । ते जीवमुक्त जाहलें जन्मोजन्मी ॥१॥
संतांचा संग जयासी हो जाहला । प्रत्यक्ष घडला सत्यलोक ॥२॥
एका जनार्दनीं संतांचा अनुभव । धाला माझा जीव परमानंदे ॥३॥

भावार्थ

संतसहवासाचे सुख ज्यांनी अनुभवले ते अनेक जन्मांतरी जीवमुक्त झाले. या भक्तांना सत्यलोकाची प्राप्ती होते असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, संतसेवेचा हा अनुभव आल्याने परमानंदाने मन भरून गेले.

८३

संतचरणीं सावधान । ज्याचें जडलेसें मन ॥१॥
तया नाहीं जन्ममरण । मुक्ती उभ्या कर जोडोन ॥२॥
ब्रह्मज्ञान हात जोडी । संताघरी घाली उडी ॥३॥
शरण एका जनार्दनीं । वंदितसे अनुदिनी ॥४॥

भावार्थ

सावधान चित्ताने जो संतचरणी एकरूप झाला त्याचे जन्म-मरणाचे फेरे चुकतात. मुक्ती दासी बनून कर जोडून सेवेसाठी उभ्या राहतात. ब्रह्मज्ञान प्राप्त होते. जनार्दन स्वामींचा शरणागत एका जनार्दनीं अशा साधकांना सदैव वंदन करतात.

८४

संतसेवा केल्यापाठीं । कैंची संसाराची गोष्टी ॥१॥
तेथें कैंचे कर्माकर्म । अवघा देव परब्रह्म ॥२॥
कैंचे ध्येय ध्याता ध्यान । एक संतचरणीं मन ॥३॥
कैंचा भेद कैंचें भान । एका जनार्दनीं ध्यान ॥४॥

भावार्थ

एकदा संतसेवची गोडी लागली कीं, तेथें संसारिक गोष्टींना महत्व राहात नाही. परब्रह्म आंत बाहेर व्यापून आहे याची प्रचिती येऊन कर्म आणि अकर्म यांची बंधने तुटून पडतात. संतचरणीं मन निमग्न झाले कीं, ध्येय, ध्याता (ध्यान करणारा) आणि ध्यानाची क्रिया ही त्रिपुटी लोप पावते. सारे भेदाभेद नाहिसे होतात. असे एका जनार्दनीं या अभंगात सांगतात.

८५

जयाचे चित्त संतांच्या चरणा । तेणें नारायणा जिंकियेलें ॥१॥
भावे देव मिळे भावें देव मिळे । संतचरणीं लोळे सर्व काळ ॥२॥
संतांची आवडी म्हणोनी अवतार धरी । योगक्षेम भारी चालवी त्याचा ॥३॥
वासंतचरणीं देवा आदर उपचार । एका जनार्दनीं साचार करीतसे ॥४॥

भावार्थ

संतांच्या चरणीं ज्या साधकांचे चित्त जडलेले असते त्यांच्यावर नारायण प्रसन्न होतो. निरपेक्ष भक्तीनेच देवाला आपलासा करता येतो. संतांच्या प्रेमामुळे देव विविध अवतार धारण करतो आणि संतांचा योगक्षेम स्वत: चालवतात. संत जगांत देवाविषयी आदरभाव वाढवून त्यांचा महिमा वाढवतात. असे एका जनार्दनीं या अभंगात सुचवतात.

८६

सुख अनुपम्य संतसमागमें । अखंड दुणावतें नामे ।
दहन होती सकळ कर्मे । आणिक वर्म दुजे नाहीं ॥१॥
वाचे म्हणे कृष्णहरी । तेणें पापा होय बोहरी ।
संसारासी नुरे उरी । हा महिमा सत्संगाचा ॥२॥
काशी प्रयागादि तीर्थे बरी । बहुत असती महीवरी ।
परी संतसमागमाची थोरी । तीर्थे न पावती सर्वदा॥३॥
असती दैवतें अनंत कोटी । परी संतसमागम भेटी ।
दैवती सामर्थ्य हिंपुटी । हा महिमा संतांचा ॥४॥
एका जनार्दनीं मन । संतचरणीं दृढ ध्यान ।
तेणें प्राप्त सच्चिदानंद । विठ्ठल देव विसंबे ॥५॥

भावार्थ

संतसहवासाच्या सुखाला कशाचिही उपमा देता येत नाही कारण नामाने ते सतत द्विगुणीत होत असते. सर्व कर्मफळांचे दहन करण्याचे सामर्थ्य संतसेवेंत सामावलेले आहे हेच यांतील मुख्य रहस्य आहे. वाणीने केवळ कृष्णहरी या नामाचा जप केल्याने सर्व पापांचे परिमार्जन होते. हा सत्संगाचा महिमा जाणावा. काशी, प्रयाग अशी अनेक तीर्थक्षेत्रे या भूतलावर आहेत पण संतसंगतीचे थोरवी या तीर्थक्षेत्रांना नाही. कारण तेथील दैवतांना संत समागमाचे सामर्थ्य नाही. एका जनार्दनीं या अभंगात सांगतात की, संतचरणांचे दृढ ध्यान केल्यास सत् चिद् आनंद असा विठ्ठल देव क्षणभरही भक्तांना विसंबणार नाही.

८७

तीर्थाटन गुहावास । शरीरा नाश न करणे ॥१॥
समागम संतसेवा । हेंचि देवा आवडतें ॥२॥
करितां रामनाम लाहो । घडती पहाहो धर्म त्या ॥३॥
सकळ कर्मे जाती वायां । संतपाया देखतां ॥४॥
एका जनार्दनीं होतां दास । पुरे आस सर्वही ॥५॥

भावार्थ

तीर्थयात्रा करणे, पर्वतांच्या गुहेमध्ये निवास करणे, शरीराचा विनाश न करता संतांच्या सहवासांत राहून त्यांची सेवा करणे हेच देवाला विशेष प्रिय आहे. रामनाम जप केल्याने सर्व धर्म आपोआप साध्य होतात. संतचरणांच्या दर्शनाने सर्व कर्मफळांचा नाश होतो असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, सद्गुरू कृपेने मनातिल सर्व अपेक्षा सफल होतात.

८८

सकळ तीर्थे । घडती करितां नामस्मरण ।
देवाधि देव उत्तम । तोही धांवे सामोरा ॥१॥
पहाहो वैष्णवांचे घरीं । सकळ तीर्थे कामारी ।
ऋध्दिसिध्दी मोक्ष चारी । दास्यत्व करिती सर्वदा २॥
शरण एका जनार्दनीं । तीर्थाचा तो अधिष्ठानी ।
नामस्मरण अनुदिनी । तथा तीर्थे वंदिती ॥३॥

भावार्थ

सद्गुरू जनार्दन स्वामींना शरणागत असलेले संत एकनाथ म्हणतात, भक्तीभावानें सकळ तीर्थांचा अधिष्ठाता, देवांचा देव अशा विठ्ठलाचे सतत नामस्मरण केल्याने सर्व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य पदरी पडते. वैष्णवांचे घरीं सगळी तीर्थे, ऋध्दिसिध्दी आणि चारी मुक्ती सर्वदा दास्यत्व करतात. सारी तीर्थे या वैष्णवांना आदराने वंदन करतात.

८९

भुक्तिमुक्तिचे सांकडें नाही विष्णुदासा ।
प्रपंचाची आशा मग तेथें कैंची ॥१॥
वैकुंठ कैलास अमरपदें तिन्हीं ।
तुच्छवत मनीं मानिताती ॥२॥
राज्य भोग संतती संपत्ति धन मान ।
विष्ठे तें समान श्वान सुकर ॥३॥
मा ब्रह्मज्ञान तेथें कोण पुसे तत्वतां ।
घर रिघोनि सायुज्यता येत असे ॥४॥
एका जनार्दनीं नामाची प्रौढी ।
ऋध्दिसिध्दि दडी घरी देती ॥५॥

भावार्थ

विष्णु दासांना मोक्षमुक्तीची अभिलाषा नाहीतर प्रपंचाची ओढ असूच शकत नाही. वैकुंठ(विष्णलोक)कैलास (शिवलोक)आणि अमरपदे हे तुच्छ मानतात. संतती(मुलेबाळे), संपत्ती , धनामुळे मिळणारा सन्मान हे सर्व वैष्णवांना कुत्रा आणि डुक्कर यांच्या विष्ठेप्रमाणे टाकावू वाटतात. सायुज्यता मुक्तीचे भागिदार असलेले हे वैष्णव ब्रह्मज्ञान मिळवण्याचा अट्टाहास करीत नाहीत. एका जनार्दनीं म्हणतात, गुरूकडून लाभलेल्या नामाचा महिमा इतका अगाध आहे कीं, ऋध्दिसिध्दि आपण होऊन घरांत दासी होऊन राबतात.

९०

कळिकाळाचें न चले बळ । ऐसे सबळ हरिदास ॥१॥
सेवेचें तो कवच अंगी । धीर प्रसंगी कामक्रोधा ॥२॥
रामनाम हाचि बाण । शस्त्र निर्वाण सांगाती ॥३॥
एका जनार्दनीं याचे भार । देखतां समोर पळती ते ॥४॥

भावार्थ

हरिदासांच्या अंगावर हरीसेवेचे संरक्षक कवच असल्याने त्यांना कळीकाळाचे भय नाहीं. त्यांच्या हातात वैराग्याचे शस्त्र असून रामनामाचा बाण जोडून ते धनुष्य सुसज्ज असते. अत्यंत धीरगंभीरपणे ते कामक्रोधाला जिंकतात. एका जनार्दनीं म्हणतात, या हरिदासांना समोर पाहून कळिकाळ वेगाने पलायन करतात.

९१

जाईल तरी जावो प्राण ।परी न सोडा चरण संतांचे ॥१॥
होणार तें हो कां सुखे परी मुखें रामनाम न सोडा ॥२॥
कर्म धर्म होतु कां हानी । परी प्रेम कीर्तनीं न सोडा ॥३॥
एका जनार्दनीं वर्म । सोपा धर्म सर्वांसी ॥४॥

भावार्थ

या अभंगात एका जनार्दनीं सहजसुलभ धर्म आचरणाचे सोपे नियम सांगत आहेत. प्राण गेला तरी संतांचे चरण सोडू नयेत. कर्म धर्म यथासांग होवोत अथवा न होवोत पण परमेश्वराच्या कीर्तनाचे प्रेम सोडू नये आगामी घटनांनी सुख लाभो अथवा न लाभो पण मुखाने रामनामाचा जप करण्याचे सोडू नये हेच धर्मशीलतेचे वर्म आहे.

९२

गव्हांची राशी जोडल्या हातीं । सकळ पक्वान्नें ते होतीं ॥१॥
ऐसा नरदेह उत्तम जाण । वाचे वदे नारायण ॥२॥
द्रव्य जोडितां आपुले हाती । सकळ पदार्थ घरां येती ॥३॥
भावें करी संतसेवा । एका जनार्दनीं प्रिय देवा ॥४॥

भावार्थ

सर्व प्रकारची स्वादिष्ट पक्वाने तयार करण्यासाठी आरंभी गव्हाच्या राशी प्राप्त झाल्या पाहिजेत त्या साठी पुरेसे द्रव्य (पैसा)हाताशी असला पाहिजे म्हणजे सगळे पदार्थ घरी येतात. त्या प्रमाणेच उत्तम नरदेह प्राप्त झाला असतां मुखाने नारायणाच्या नामस्मरणाचे उत्तम धन जोडून संतसेवेने देव आपलासा करता येतो असे एका जनार्दनीं या अभंगात सुचवतात.


९३

वेदोक्त पठण करितां चढे मान । तेणें होय पतन कर्मभूमी ॥१॥
सोपें ते साधन संतांसी शरण । तेणें चुके बंधन जडजीवा ॥२॥
अभ्यासाचा सोस वाउगाची द्वेष ।न करी सायास नाम जपे ॥३॥
एका जनार्दनीं सायासाचे भरी । नको पडूं फेरी चौर्यांशीच्या ॥४॥

भावार्थ

वेदांचे शास्त्रोक्त पठण करून मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा संतांना शरण जाणे हे सोपे साधन आहे. त्यामुळे जडजीवाचे बंधन तुटून जन्म मरणाच्या फेर्‍यातून सहज सुटका होते. हा अभ्यासाचा सोस सोडून संतांनी दिलेल्या नामाचा जप करावा असे एका जनार्दनीं या अभंगात सांगतात.

९४

पालटे भावना संतांचे संगती । अभाविकांहि भक्ति प्रगटतसे ॥१॥
ऐसा ज्याचा उपकार । मानिती निर्धार वेदशास्त्रे ॥२॥
तारिती आणिका देऊनि विठ्ठलमंत्र । एका जनार्दनी पवित्र नाम गाती ॥३॥

भावार्थ

संतांच्या सहवासात सामान्य माणसाच्या भावनांमध्ये बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य असते. संतसंगतीने अभाविक माणसांत भक्ती प्रगट होते. संतांचे हे उपकार वेदशास्त्रेसुध्दा मान्य करतात असे प्रतिपादन करून एका जनार्दनी म्हणतात, अनेक साधकांना विठ्ठलनामाचा मंत्र देऊन संत त्यांची संसारचक्रातून सुटका करतात.

९५

नरदेहीचा हाचि मुख्य स्वार्थ । संतसंग करी परमार्थ ॥१॥
आणिक नाही पां साधन । मुखी हरि हरि स्मरण ॥२॥
सोडी द्रव्य दारा आशा । संतसंगे दशा पावावी ॥३॥
जरी पोखले शरीर । तरी ते केव्हाहि जाणार ॥४॥
जनार्दनाचा एका म्हणे । संतांपायी ठाव देणे ॥५॥

भावार्थ

संतसंगतीने परमार्थ साधणे हाच नरदेहाचा मुख्य स्वार्थ आहे. सदासर्वदा हरि नामाचे मुखाने स्मरण करणे याशिवाय दुसरे कोणतेही साधन नाही. पत्नी आणि संपत्ती ही सुखाची साधने नसून त्यांची आशा सोडून द्यावी. शरिराचे कितिही पोषण केले तरी ते केव्हांतरी मृत्युमुखी पडणार हे अटळ आहे. एका जनार्दनीं म्हणतात, संतचरणीं संपूर्ण विश्रांति लाभेल.

९६

नको दुजी रे वासना । मिठी घाली संतचरणा ।
पंढरीचा राणा । आपोआप हृदयीं ॥१॥
हाचि धरी रे विश्वास ।सांडी वाउगा हव्यास ।
नको आशा तृष्णा पाश । परतें टाकी सकळ ॥२॥
भगवद्भक्तींचे लक्षण । सर्वांभूतीं समाधान ।
पाहतां दोष आणि गुण । वाउगा शीण मना होय ॥३॥
सर्वांभूती देव आहे । सर्व भरूनीं उरला पाहे ।
रिता नाहीं कोठे ठाव । देवाविण सर्वता ॥४॥
म्हणोनि नको भेदभाव । एक वचनीं एक ठाव ।
एका जनार्दनीं स्वयमेव । देव उभा पंढरी ॥५॥

भावार्थ

संतांना सर्वभावे शरण जाऊन त्यांच्या चरणांचा आश्रय घेतल्याने पंढरीचा राजा आपोआप हृदयी प्रगट होतो या सद्गुरू वचनावर विश्वास ठेवून आशा -तृष्णेचे पाश तोडून टाकणे हेच भगवंताच्या भक्तीचे मुख्य लक्षण आहे. कुणाचेही दोष-गुण न पाहतां सर्व प्राणिमात्रांशी सम भावाने वर्तन ठेवले असतां मनाला समाधान मिळते. सर्वत्र एकच परमात्म तत्वत भरून उरले असताना भेदभावाचे कारण नाही. या सत्य वचनावर पूर्ण विश्वास ठेवल्याने हेच परमात्म रूप पंढरींत स्वयमेव उभे ठाकले आहे अशी मनाची खात्री होते असे एका जनार्दनीं या अभंगात सुचवतात.

९७

सगुण चरित्रें परम पवित्रें सादर वर्णावी । सज्जनवृंदें आधीं वंदावीं ॥१॥
संतसंगें अंतरंगें नाम बोलावें । कीर्तनरंगी देवासन्निध सुखें डोलावें ॥२॥
भक्तिज्ञानविरहित गोष्टी इतरां न कराव्या । प्रेमभरें वैराग्याच्या युक्ति विवराव्या ॥३॥
जेणें करूनी मूर्ति ठसावी अंतरी श्रीहरीची । ऐशी कीर्तनमर्यादा आहे संतांच्या घरची ॥४॥
अद्वय भजनें अखंड स्मरणें वाजवी करताळी । एका जनार्दनीं मुक्त होय तत्काळीं ॥५॥

भावार्थ

निर्गुण, निराकार परमात्मा संतरूपाने सगुण रूप धारण करतो तेव्हां या संतांच्या परम पवित्र अशा चरित्रांचे भक्तांनी अत्यंत आदराने वर्णन करावे. या संतजनांना आधी वंदन करावे. भक्ति आणि ज्ञान यांचे विवरण असलेल्या गोष्टी या संताकडून श्रवण कराव्यात, प्रेम आणि वैराग्याच्या युक्ति समजून घ्याव्या. त्यायोगे श्रीहरिची मूर्ती हृदयांत ठसेल. संतांच्या सहवासांत कीर्तनरंगीं रंगून जावे, अद्वितीय मधुर भजनांत हाताने टाळी वाजवत श्रीहरिचे अखंड स्मरण करावे असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, या भक्तिमार्गाने साधक सर्व बंधनातून तात्काळ मुक्त होतो.

९८

आली आषाढी जाये पंढरीसी । चित्त पायांपाशीं विठोबाच्या ॥१॥
वैष्णव गर्जत नामामृत सार । फुटतसे पाझर कामक्रोधा ॥२॥
एका जनार्दनीं धरूनी विश्वास ।जाये पंढरीस होय संतांचा दास ॥३॥

भावार्थ

आषाढी एकादशीच्या पर्वकाळी पंढरीस जाऊन मनाने विठ्ठल चरणांशी एकरूप व्हावे. तेथे विठोबाच्या नामाचा अखंड गजर वैष्णव करीत असतात. या नामामृताने अंतरीचे सारे कामक्रोध पाझरून जाऊन चित्त शुध्द होते. एका जनार्दनीं सांगतात, या वचनावर विश्वास ठेवून पंढरीस जाऊन संतचरणीं शरणागत व्हावे.

९९

संतवचने साधे मुक्ती । संतवचनें ब्रह्मस्थितीं ।
कर्माकर्मांची शांती । संतवचनें ॥१॥
संतवचनें याग । संतवचनें सांग योग ।
संतवचनें अनुराग । घडतां संग संतांचा ॥२॥
संतवचनें ब्रह्मप्राप्ती । सायुज्य मुक्ती ।
ब्रह्मादि पदें येती । संतवचने समोर ॥३॥
संतवचनें सर्व सिध्दी । संतवचनें समाधी ।
संतवचनें उपाधी । एका जनार्दनीं तुटतसे ॥४॥

भावार्थ

या अभंगात संत एकनाथ संतवचनाचा महिमा वर्णन करतात. संतवचन श्रवण करून त्यावर पूर्ण विश्वास ठेवला तर सर्व प्रकारचे योग याग केल्याचे पुण्य प्राप्त होते. संताच्या सहवासांत संतवचने ऐकून चित्तांत प्रेम भक्ती निर्माण होऊन ब्रह्मज्ञान होते. संतवचनाने सर्व सिध्दी प्राप्त होतात. सर्व संकटांचा परिहार होऊन मन शांत झाले कीं, समाधी पर्यंत प्रगती होते. संतवचनाने समीपता, सलोकता, सरुपता आणि सायुज्यता मुक्ती प्राप्त होतात. संत वचनाने सर्व उपाधी तुटतात.


१००

धन्य हरिहर भवभयहर । आठव सत्वर करीं मन ॥१॥
तयांच्या चिंतनीं हरतील दोष । नित्य होय वास वैकुंठासी ॥२॥
नारदादि संतां करावें नमन ।धरावे चरण हृदयकमळीं ॥३॥
एका जनार्दनीं संतचरण ध्यातां । मुक्ति सायुज्यता हातां येते ॥४॥

भावार्थ

हरिहर (श्री विष्णु आणि श्रीशंकर )संसाराचे भय नाश करणारे असून त्यांचे मनाने चिंतन केल्यास देह, बुध्दी, मन यांचे सर्व दोष नाहीसे होतात. सलोकता मुक्ती प्राप्त होऊन वैकुंठांत नित्य निवास करता येतो. नारदां सारखे संत त्रिकालज्ञानी असून त्यांच्या चरणीं नतमस्तक व्हावे. एका जनार्दनीं म्हणतात, संतचरणांचे ध्यान केल्याने सायुज्यता मुक्ती मिळण्याचे भाग्य लाभते.

१०१

पायांवरीं ठेविती भाळ । तें प्रेमळ वारकरी ॥१॥
जन्मोजन्मीं त्यांचा संग । गा अभंग सर्वदा ॥२॥
सर्वकाळ वाचे । दुजें साचें नाठविती ॥३॥
एका जनार्दनीं त्यांचा संग । घडावा सर्वांगें मजसी ॥४॥

भावार्थ

सर्वदा भक्तिपूर्ण अभंग गाणारे भोळेभाबडे प्रेमळ वारकरी संतचरणीं मस्तक ठेवून आदराने वंदन करतात. जन्मोजन्मी त्यांच्या सहवासांत राहून वाचेने हरिचे अभंग गावेत. अन्य कशाचिही अपेक्षा करू नये अशी ईच्छा एका जनार्दनीं या अभंगात व्यक्त करतात.

१०२

धर्म अर्थ काम । जिहीं अर्पिला संपूर्ण ॥१॥
तेचि जाती या वाटा । पंढरी चोहटा नाचती ॥२॥
आणिकांसी नोहे प्राप्ती । संत गाती तो स्वादु ॥३॥
शीण आदि अवसानीं । पंढरपूर न देखतां नयनीं ॥४॥
उभा विटे समचरणीं ।एका शरण जनार्दनीं ॥५॥

भावार्थ

धर्म, अर्थ, काम हे पुरुषार्थ ज्यांनी पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणीं अर्पण केले आहेत असे वारकरी पंढरीला जाऊन किर्तनरंगीं नाचतात. त्यांना संतसंगतीचा जो आनंद मिळतो त्याची इतरांना प्राप्ती होत नाही. पंढरीला जाऊन ज्यांनी समचरणीं विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाचे दर्शन घेतले नाही त्यांनी जन्माचा व्यर्थ शीण घेतला असे जनार्दन स्वामींना शरणागत झालेले एका जनार्दनीं म्हणतात.

१०३

नको तुझें आम्हां कांही । वास पंढरीला देई ॥१॥
दुजे कांहीं नको आम्हां । द्यावा चरणाचा महिमा ॥२॥
संतांची संगत । दुजा नाही कांहीं हेत ॥३॥
काकुलती येतो हरी । एका जनार्दनीं निर्धारीं ॥४॥

भावार्थ

या अभंगात एका जनार्दनीं अत्यंत व्याकुळ अंत:करणाने श्रीहरीची विनवणी करीत आहेत. विठ्ठल चरणी संपूर्ण शरणागती आणि संतसंगत या दोन गोष्टींचे दान द्यावे, अन्य कोणतिही अपेक्षा नाही.

१०४

देहाचिया आशा पुत्रादिक धन । कासया बंधन घडे मग ॥१॥
सांडोनि उपाधी करावें भजन । तेणें जनार्दन कृपा करी ॥२॥
एका जनार्दनीं निराशीं तो धन्य । तयाचें चरण वंदूं आम्ही ॥३॥

भावार्थ

पुत्रलाभ व्हावा, धनलाभाचा योग यावा या देहाच्या अपेक्षा आहेत. त्यामुळे संसाराचे बंधन पडते. या उपाधी सोडून देऊन परमेश्वराच्या भजनाचा आनंद घेतल्याने जनार्दन कृपा करतो. एका जनार्दनीं म्हणतात, निरपेक्ष साधक धन्य होय. त्यांचे चरण वंदनीय असतात.

१०५

संत जाती हरिकीर्तना । त्यांच्या वाहीन मोचे वहाणा ॥१॥
हेंचि भवसिंधुचे तारूं । तेणें उतरूं पैलपारू ॥२॥
जन्मोजन्मीचें भेषज । ते हें संतचरणरज ॥३॥
संतचरणींच्या पादुका । जाहला जनार्दन एका ॥४॥

भावार्थ

संत हे भवसिंधू पार जाण्यासाठी तारू (छोटे जहाज)असून त्याद्वारे हा संसार सागर सहज तरून जाणे शक्य होते. संताच्या चरणांची धूळ हे जन्मांतरीच्या भवरोगा पासून मुक्ती देणारे औषध आहे असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, संत जेव्हां हरिकीर्तनाला जातात तेव्हां तेव्हां त्यांच्या पायीच्या वहाणा वाहून नेण्याचे सद्भाग्य प्राप्त व्हावे. किंबहुना संताच्या पायींच्या वहाणाच आपण व्हावे अशी कामना करतात.

१०६

संत भलते याती असो । परीं विठ्ठल मनीं वसो ॥१॥
घेईन मी पाठवणी ॥२॥
ज्ञाती कुळासी संबंध । मज नाही भेदाभेद ॥३॥
भलते ज्ञातीचा । विठ्ठल उच्चारी वाचा ॥४॥
तेथें पावन देह चारी । एका जनार्दनीं निर्धारी ॥५॥

भावार्थ

परमेश्वराची निष्काम भक्ती मनाचा सारा संकुचितपणा घालवून देऊन भेदाभेद नाहिसे करते हा नवविचार या अभंगात एका जनार्दनीं प्रगट करतात. ज्या संताच्या मनांत अखंडपणे विठ्ठल नांदत असतो तो कोणत्याही जातीकुळाचा असला तरी तो वंदनीय मानावा. विठ्ठल नामाचा सदैव जप करणाय्रा भक्ताचे चारी देह ( स्थूल, सूक्ष़मकारण व महाकारण) पावन असतात.

१०७

सोनियाचा दिवस आजी झाला । संतसमागम पावला ॥१॥
तणें फिटलें अवघे कोडे । झालें परब्रह्म उघडें ॥२॥
एका जनार्दनीं सेवा । करीन मी त्यांची भावा ॥३॥

भावार्थ

संतांच्या संगतीचा लाभ जेव्हां होतो तो दिवस सोनियाचा दिन म्हणून साजरा करावा. साधकाच्या मनातील को हम? (मी कोण?) या कोड्याचे उत्तर मिळून अद्वैत तत्वाचा बोध होतो. देव भक्तातिल द्वैत संपून आपण परब्रह्म परमेशाचा अंश आहोत याची खात्री पटते. सर्वत्र दृष्टीपुढे परब्रह्म दिसू लागते. असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, या संत कृपेने जिवाभावाने संतसेवेच्या व्रताचा अंगिकार करावा.

१०८

जगीं जनार्दन मुख्य हाचि भाव । संत तेचि देववृत्ती ऐसी ॥१॥
समाधी साधन माझें संतजन । विश्रांतीचें स्थान संतापायीं ॥२॥
योगयाग धारणा पंचाग्नि साधन । तें हें माझें ध्यान संतांपायीं ॥३॥
एका जनार्दनीं तयांचा सांगात घडो मज निश्चित सर्वकाळ ॥४॥

भावार्थ

परमात्म तत्व आत्मरूपाने सर्व जगांत नांदत आहे. जगाच्या कल्याणासाठी देव संतरूपाने सगुण रूपांत साकार होतो. हे संतजन मनाच्या विश्रांतीचे स्थान आहेत. संतकृपेनेच समाधी अवस्थे पर्यंत साधकाची प्रगती होते. योगयाग, धारणा, पंचाग्नि साधन हे सर्व भक्तीमार्ग केवळ संतचरणांचे ध्यान केल्याने साध्य होतात असे स्पष्ट करून एका जनार्दनीं संतांचा सहवास सदासर्वदा घडावा अशी मनापासून प्रार्थना करतात.

१०९

धन्य आज दिन संतदर्शनाचा । अनंत जन्माचा शीण गेला ॥१॥
मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे । कदा न सोडावे चरण त्यांचे ॥२॥
विविध तापांची जाहली बोळवण । देखिल्या चरण वैष्णवांचे ॥३॥
एका जनार्दनीं घडो त्यांचा संग । न व्हावा वियोग माझ्या चित्ता ॥४॥

भावार्थ

ज्या वैष्णवांच्या दर्शनाने, आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक अशा तिन्ही तापांपासून भक्तांची सुटका होते त्या संतचरणांचे दर्शन झाले. अनेक जन्माचा शीण गेला. या संतांना आलिंगन देऊन त्यांचे चरण कधीच सोडू नये अशी कामना व्यक्त करून या संतदर्शनाचा आनंद या अभंगात एका जनार्दनीं व्यक्त करतात.

११०

संतसुखसागरीं । बुडी दिधली निर्धारी ।
भव दु:ख हरी ।संतनामें ॥१॥
ऐसा संतांचा महिमा । नाहीं द्यावया उपमा ।
ब्रह्मसुखधामा ।पुढें नाचे ॥२॥
बोलती तें वचन साचें । नाहीं बोलणें असत्याचें ।
नामी प्रेम जयाचें । जडोनी ठेले ॥३॥
कृपावंत संत । दीन तारिले त्वरित ।
एका जनार्दनीं मात । श्रवण मज झाली ॥४॥

भावार्थ

संतांनी दिलेल्या नामाच्या आधाराने संतरूपी सुखसागरांत बुडी मारली आणि भवदु:खाचा निरास झाला. संतकृपेचा महिमा अनुपमेय असून त्याचे वर्णन करता येत नाही. या नामाची अवीट गोडी लागली आणि ब्रह्मसुखाची प्राप्ती झाली. संत वचन सत्यवचन आहे याची प्रचिती आली. कृपावंत संत दीन भक्तांना त्वरित तारून नेतात याची खात्री पटली असा अढळ विश्वास या अभंगात एका जनार्दनीं व्यक्त करतात.

१११

तुम्ही संतजन । माझें ऐका हो वचन ॥१॥
करा कृपा मजवरी । एकदां दाखवा तो हरी ॥२॥
आहे तुमचे हातीं । म्हणोनि येतो काकुळती ॥३॥
एका जनार्दनीं म्हणे थारा । संती द्यावि मज पामरा ॥४॥

भावार्थ

संतजनांनी आपली विनंती ऐकून आपल्यावर कृपा करावी आणि एकदांतरी हरिदर्शनाची आस पुरवावी अशी कळकळीची विनंती करून एका जनार्दनीं म्हणतात, हरिदर्शनाची भक्तांची आस केवळ संतच पूर्ण करु शकतात असा विश्वास असल्याने आपणास चरणाशी थारा द्यावा.

११२

जाहली भाग्याची उजरी । संतसेवा निरंतर ॥१॥
हेंचि मज वाटे गोमटें । येणें भवभ्रम फिटे ॥२॥
करिता सावकाश ध्यान । होय मनाचें उन्मनी ॥३॥
एका जनार्दनीं संत । सदा शांत अंतरीं ॥४॥

भावार्थ

संतांची निरंतर(अखंड) सेवा करावी हे मनाचे सर्वसुंदर सुख आहे हा विचार भाग्य उजळवून टाकणारा आहे. संतसेवेने चित्ताचे सारे भ्रम नाहिसे होऊन शांतपणे हरिचरणांचे ध्यान करणे शक्य होईल त्या ध्यान योगाने मनाचे उन्मन होऊन ते उच्च पातळीवर स्थिर होईल. संत मनाने सदा शांत असतात असे एका जनार्दनीं म्हणतात.

११३

कृपाळ उदार तुम्हीं संत । दीन अनाथ तारिले ॥१॥
हाचि महिमा ऐकिला । जीव गुंतला चरणीं ॥२॥
करा माझें समाधान । देउनी वचन अभयाचें ॥३॥
यावरी फार् बोलूं नेणें । उचित करणें तुम्हासी ॥४॥
एका जनार्दनीं शरण । आहे मी दीन पामर ॥५॥

भावार्थ

दीन अनाथांना तारून नेणारे संत अत्यंत कृपाळू आणि उदार मनाचे असतात. हा संतांचा महिमा ऐकून त्यांच्या चरणांशी जीव गुंतला. या थोर संतांनी अभयदान देऊन मनाचे समाधान करावे. या शिवाय संतांना शरणागत असलेल्या दीन पामराचे अधिक कांही मागणे नाही. असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात. संत सर्व उचित गोष्टी जाणतात.

११४

संतांचिये पायीं मज पैं विश्रांती । नाही माया भ्रांति तये ठायीं ॥१॥
सांगतो तें मनी धरावें वचन । संतांसी शरण जावें सुखें ॥२॥
संत तुष्टलिया देवा आनंद होय । मागें मागें धांवे तया पाठी ॥३॥
एका जनार्दनीं माहेर सुखाचे । घेतल्या वाचे संतनाम ॥४॥

भावार्थ

संताच्या जीवनांत माया आणि भ्रांती (भ्रामक कल्पना) यांना थारा नाही. संतचरणीं साधक देह मनाने पूर्ण विश्रांत होतो. या वचनावर विश्वास ठेवून संतांना सर्वभावें शरण जावे. समाधानी संत पाहून देवही प्रसन्न होतात, एका जनार्दनीं म्हणतात, संतचरण हे सर्व सुख देणारे माहेर आहे. संतानी दिलेल्या नाममंत्राचा अखंड जप करावा.

११५

ब्रह्मांडभरी कीर्ति संतांचा महिमा । वर्णावया आम्हां मती थोडी ॥१॥
एक मुखें वानूं चतुरानन शीणू । सहस्त्र मुखें गुणु वानितां नयें ॥२॥
एका जनार्दनीं वर्णीन पवाडे । उभा वाडेकोडे पंढरीये ॥३॥

भावार्थ

संतांची कीर्ति अवघ्या ब्रह्मांडांत दुमदुमत आहे. संताचा महिमा वर्णन करणे चार मुखे धारण करणार्या ब्रह्मदेवालासुध्दां शक्य झाले नाही. सहस्त्र मुखे धारण करूनही संतांच्या गुणांचे यथार्थ वर्णन करता येणार नाही. संतांचे गुणवर्णन अल्पबुध्दी, एक मुखी भक्त करू शकत नाही. असे स्पष्ट करून एका जनार्दनीं म्हणतात, पंढरीच्या पुण्यक्षेत्रांत उभे राहून संतमहिमा वर्णन करून त्यांचे पोवाडे गाईन.

११६

गर्भवासा भीती ते आंधळे जन । मुक्तीसी कारण नाहीं आम्हां ॥१॥
गर्भवास झालिया संतसेवा घडती । मुक्त जालिया न कळे भगवद्भक्ती ॥२॥
आम्हीं सुखे गर्भवास घेऊं देखा । मुक्तीचिया मस्तकां पाय देऊं ॥३॥
एका जनार्दनीं गर्भवास सोसूं । संताचा सौरस हातीं लागे ॥४॥

भावार्थ

परत परत जन्म घेऊन गर्भवासाचे दु:ख भोगण्यास जे लोक घाबरतात त्यांना अज्ञानी समजावे. जन्माला येऊन संतसेवेची संधी मिळून भगवंताची भक्ती प्राप्त होते. मुक्ती मिळाल्यास साधक भक्तिला मुकतो असे सांगून एका जनार्दनीं या अभंगात सांगतात, मुक्तिचा हव्यास सोडून सुखाने गर्भवास सोसल्यास संतकृपेचे अमृत हाताला लागेल.

११७

तुमचे कृपेचें पोसणें । त्याचे धांवणें करा तुम्ही ॥१॥
गुंतलोंसें मायाजळीं । बुडतो जळीं भवाच्या ॥२॥
कामक्रोध हे मगर । वेढिताती निरंतर ॥३॥
आशातृष्णा या सुसरी । वेढिताती या संसारीं ॥४॥
म्हणोनी येतों काकुळती । एका जनार्दनीं विनंती ॥५॥

भावार्थ

संतांच्या कृपेवर पोषण झालेल्या या जीवास संतानीच धावण्याचे बळ द्यावे. संसारमायेच्या जाळ्यांत गुंतून पडलेल्या साधकाची सुटका करावी. भवसागराच्या अथांग जळांत बुडणिर्या साधकास कामक्रोध रुपी मगर वेढून टाकतात, आशातृष्णा या सुसरींचे रूप घेऊन संसारमायेंत ओढीत नेतात. या दु:खाने व्याकुळ झालेले एका जनार्दनीं संतांना विनंती करतात.

११८

संत ते सोईरे सांगातीं आमुचे । तेणें कळिकाळाचें भय नाहीं ॥१॥
जयाची आवडी धरी नारायण । म्हणोनि चरण धरूं त्यांचे ॥२॥
परलोकीचे सखे सोईरे सांगाती । मज ते आदी अंती सांभाळिती ॥३॥
एका जनार्दनीं धरुनि विश्वास । होईन त्यांचा दास जन्मोजन्मी ॥४॥

भावार्थ

संत हे साधकाचे परलोकी सांभाळ करणारे सोईरे असून निरंतर सोबत करतात. साधकाचे कळिकाळापासून रक्षण करतात, निर्भय बनवतात. संत साधकाचे जन्मा पासून अंतापर्यंत सांभाळ करतात. प्रत्यक्ष नारायणाला या संताची आवड असते. अशा दयाळू संतांच्या चरणीं पूर्ण शरणागत असलेले एका जनार्दनीं संताचा जन्मोजन्मी दास होऊन राहण्याचा निश्चय करतात.

११९

बहुतांच्या मता । आम्हीं न लागूं सर्वथां ॥१॥
धरूं संतांचा सांगात । तेणें होय आमुचें हित ॥२॥
जाऊं पंढरीसी । नाम गाऊं अहर्निशीं ॥३॥
करूं हाच नित्य नेम । आणिक नको निजधाम ॥४॥
एका जनार्दनीं नाम । गाऊं आवडीनें राम ॥५॥

भावार्थ

संतांची संगती जोडून पंढरीस जावे, तेथे वैष्णवांच्या मेळाव्यांत रात्रंदिवस पांडुरंगाचे नाम घ्यावे हाच नेम सदैव आचरणांत आणावा. निजधामाचा मोह सोडून देऊन मनापासून रामनामाचा जप करावा असे मनोगत व्यक्त करून एका जनार्दनीं म्हणतात, बहुतेक लोकांचे मत याविरूध्द असले तरी ते सर्वथा स्विकारणे योग्य नव्हे.

१२०

अर्ध क्षण घडता संतांची संगती । तेणें होय शांती महत्पापा ॥१॥
संतसंग देई संतसंग देई । आणिक प्रवाही घालूं नको ॥२॥
संसार मज न करणें सर्वथा । परमार्थ पुरतां हातीं देई ॥३॥
जनार्दनाचा एका करूणावचनीं ।करी विनवणी पायांपाशीं ॥४॥

भावार्थ

अत्यंत अल्प अशा संतसंगतीने सुध्दां महान पापांचे परिमार्जन होते. दुस्तर संसार प्रवाह टाळून परमार्थाच्या मार्गाने जाण्याचा निश्चय करून जनार्दन स्वामींना शरणागत असलेले एका जनार्दनीं परमेश्वर चरणी विनंती करतात कीं, या परमार्थ तत्वाचे संपूर्ण ज्ञान त्यांना प्राप्त व्हावे यासाठी संतसंगतीचा लाभ व्हावा.

१३०

सोईरे धाईरे आम्हां संतजन । तयाविण चिंतन आन नाही ॥१॥
हाचि माझा भाव हीच माझी भक्ति । आणिक विश्रांति दुजी नाहीं ॥२॥
हेंचि माझें कर्म हाचि माझा धर्म । वाउगाचि श्रम न करी दुजा ॥३॥
हेंचि माझे ज्ञान हेचि माझे विज्ञान । संतांविण शरण न जाय कोणा ॥४॥
एका जनार्दनीं हा माझा निश्चय । वंदीन मी पाय सर्वभावें ॥५॥

भावार्थ

संतचरणांचे अखंड चिंतन ही च खरी भावभक्ती असून संतचरण हे च विश्रांतीचे एकमेव स्थान आहे. संतसेवा हा च धर्म असून इतर कांही कर्म करण्याचे श्रम निरूपयोगी आहेत. संतचरणीं संपूर्ण शरणागत होणे हें च सर्वोत्तम ज्ञान असून हे स्वानुभातून प्राप्त झालेले विज्ञान आहे अशी खात्री पटली आहे. संताशिवाय कुणालाही शरण जाणार नाही हा निश्चय करून एका जनार्दनीं संतांना सर्वभावें वंदन करतात.

१३१

अंगीं जया पूर्ण शांती । वाचा रामनाम वदती ।
अनुसरले चित्तवृत्ती । संतचरणीं सर्वदा ॥१॥
घडो तयांचा मज संग । जन्ममरणाचा फिटतसे पांग ।
आधिव्याधि निरसोनि सांग । घडतां संग वैष्णवांचां ॥२॥
जें दुर्लभ तिहीं लोकां । आम्हां सांपडलें फुका ।
एका जनार्दनीं घोका । नाम त्यांचे आवडीं ॥३॥

भावार्थ

ज्यांचे अंत:करणांत पूर्ण शांती नांदत असून वाचेने सतत रामनामाचा जप करीत असतात, त्यांच्या चित्तवृत्ती संतचरणी सदैव लीन असतात त्या साधकांची संगती आपणास घडावी अशी अपेक्षा या अभंगात एका जनार्दनीं व्यक्त करतात. या संतसंगाने देह-मनाच्या सर्व आधिव्याधि निरसून जातील आणि जन्ममरणाची सारी बंधने तुटून जातील असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, तिन्ही लोकांत दुर्लभ असे ज्ञान सहज प्राप्त झाले आहे. मनापासून आवडीने या भक्तांचे नामस्मरण करावें.

१३२

देऊनियां अभयदान । संतीं केलें मज पावन ।
निरसोनी भवबंधन । तारिलें मज ॥१॥
ऐसा संतसमागम । नाहीं आणीक विश्राम ।
योगियांचें धाम । कुंठीत पैं झाले ॥२॥
आणीक एक वर्म । मुख्य इंद्रियांचा धर्म ।
मन ठेवुनी विश्राम । नामचिंतन करावें ॥३॥
एका जनार्दनीं जाण ।संत आमुचें निजस्थान ।
काया वाचा मन । दृढ पायीं ॥४॥

भावार्थ

जन्ममरणाचे भवबंधन निरसून संत अभयदान देतात आणि भक्तांना पावन करतात. या संतसंगंती शिवाय मनाला दुसरा विश्राम नाही. शांत चित्ताने परमेश्वराच्या नामाचे चिंतन करावे हे आणखी एक रहस्य सांगून एका जनार्दनीं म्हणतात, संत हे आपले सर्वसुखाचे स्थान आहे हे जाणून काया वाचा मनाने संतचरणीं दृढ व्हावे.

१३३

जाणते संत जाणते संत । जाणते संत अंतरीचें ॥१॥
जे जे इच्छा देती फळ । काळ वेळ चुकवोनी ॥२॥
मनोरथ पुरले वो माझे । एका जनार्दनीं वोझें ॥३॥

भावार्थ

संत हे अत्यंत जाणते असून अंतर मनाच्या इच्छा जाणून ते साधकांना त्याप्रमाणे फळ देतात. काळ आणि वेळ यांचा विचार न करता ते शरणागताचे मनोरथ पूर्ण करतात. असे एका जनार्दनीं या अभंगात सुचवतात.

१३४

जाणती ते हातवटी । संत पोटी दयाळु ॥१॥
न म्हणती अधम जन । करीती कृपेचे पोषण ॥२॥
शुचि अशुचि न म्हणे कांहीं । एकरूप वर्ते देहीं ॥३॥
एका जनार्दनीं मज । तारियेलें तेणें सहज ॥४॥

भावार्थ

संतांचा स्वभाव दयाळु असल्याने ते सहजपणे अंतरीचे भाव जाणतात. अधम जनांवर सुध्दां पूर्ण कृपा करतात. शुध्द अशुध्द (सोवळे ओवळे ) याचा विचार न करता सर्वांवर सारखी कृपा करतात. असे सांगून एका जनार्दनीं आपल्यावर संतांनी सहज कृपा केली असा स्वानुभव कथन करतात.

१३५

जयाच्या चरणां मिठी घाली भावें । धन्य ते जाणावे सदैव संत ॥१॥
प्रेमाचे सागर भक्तीचे उदधी । तोडिला उपाधी नाममात्रें ॥२॥
जडजिवां तारक सत्य सत्य वाचें । आणीक तें न वचे उपमे त्याच्या ॥३॥
एका जनार्दनीं कृपाळु संतजन । तेणें मज पावन कलें जगीं ॥४॥

भावार्थ

ज्यांच्या चरणांना भावभक्तीने मिठी घालाविशी वाटते ते संत धन्य होत. ते संत प्रेमाचे सागर असून भक्तीचे महासागर आहेत हे जाणावे. त्यांना दुसरी कोणतिही उपमा नाही. असे संत जड जीवांचा उद्धार करणारे असतात हे सत्य वचन आहे. हे संत केवळ नाममंत्र देवून भक्तांची उपाधी दूर करतात. एका जनार्दनीं म्हणतात, हे संत अत्यंत कृपाळु असून जगांत अनेकांना पावन करतात.

१३७

ऐकोनी संतकीर्ति ।मना आलीसे विश्रांती ।
नाहीं पुनरावृत्ती । जन्माची तया १॥
धन्य धन्य संतजन । मज केलें वो पावन ।
विश्रांतीचें स्थान । हृदयीं माझ्या ठसविलें ॥२॥
बहु जाचलों संसारे । बहु जन्म केले फेरे ।
ते चुकविले सारे । आजी कृपा करूनी ॥३॥
शरण एका जनार्दनीं । माझें हरिलें मीपण ।
तुम्ही कृपा करून । अभय वर दिधला ॥४॥

भावार्थ

संतांची कीर्ति ऐकून मनाला पूर्ण विश्रांती मिळाली. हे संतजन धन्य होत जे साधकांना पावन करून हृदयांत विश्रांतीचे स्थान निर्माण करतात. जन्म-मरणाचे अनेक फेरे करून अनंत यातना सहन सहन कराव्या लागतात. संतकृपा होतांच या सर्व जाचांतून सुटका होते. साधकाचे मीपण (अहंकार) लयास जाते. एका जनार्दनीं म्हणतात, संतांनी अभय वर दिल्याने जन्म-मरणाचे फेर्यातून कायमची सुटका झाली.

१३८

जयाचिये द्वारीं तुळशीवृंदावन । धन्य ते सदन वैष्णवांचे १॥
उत्तम चांडाळ अथवा सुशील । पावन सकळ वैकुंठी होती ॥२॥
जयांचिया गळां तुळशीमाळा । यम पदकमळा वंदी त्याच्या ॥३॥
गोपीचंदन उटी जयाचियां अंगीं । प्रत्यक्ष देव जगीं तोचि धन्य ॥४॥
एका जनार्दनीं तयाचा सांगात । जन्मोजन्मीं प्राप्त हो कां मज ॥५॥

भावार्थ

भक्त उत्तम कुळातिल असो, सुशील असो अथवा चांडाळ असो वैकुंठ लोकांत जाऊन सर्व पावन होतात. असा विश्वास व्यक्त करून एका जनार्दनीं म्हणतात, ज्याच्या गळ्यांत तुळशीची माळ असते त्यांच्या चरणांना यम (मृत्युदेव) वंदन करतात. ज्याच्या दारांत तुळशी वृंदावन असते ते वैष्णवांचे घर धन्य होय. गोपीचंदनाची उटी जो भक्त आवडीने अंगाला लावतो तो या जगीचा देव च समजावा. या पुण्यशील संतांचा सहवास आपणास प्रत्येक जन्मीं प्राप्त व्हावा अशी एका जनार्दनीं परमेश्वर चरणीं प्रार्थना करतात.

१३९

जडजीवांसी उध्दार । करावयासी निर्धार ॥१॥
पापी दोषी जैसे तैसे । लाविलें कांसें आपुल्या ॥२॥
जया जें जें गोड लागें । तें तें अंगें देताती ॥३॥
एका जनार्दनीं शरण । शरणागत नाहीं न्युन ॥४॥
भावार्थ
जडजीवांचा उद्धार करण्यासाठी परमात्मा संतरूपाने सगुण साकार अवतार धारण करतो. अनेक दोष असलेल्या पापी लोकांना नाममंत्र देवून संत सन्मार्गाला लावतात. ज्याला जे आवडते ते प्रदान करतात. एका जनार्दनीं म्हणतात, शरणागताची कोणतिही उणीव ध्यानीं न धरतां संत सर्वांना समानतेने कृपादान देतात.

१४०

धर्माची वाट मोडे । अधर्माची शीग चढे ।
तें आम्हां येणें घडे । संसारस्थिती ॥१॥
आम्हां कां संसारा येणें हरिभक्ति नामस्मरणें ।
जडजीव उध्दरणें । नामस्मरणें करुनी ॥२॥
सर्व कर्म ब्रह्मस्थिती । प्रतिपादाव्या वेदोक्ती ।
हेंचि एक निश्चिती । कारण आम्हां ॥३॥
नाना मतें पाषांड । कर्मठता अति बंड ।
तयाचें ठेंगणें तोंड । हरिभजनें ॥४॥
विश्वरूप सृष्टी । अर्जुना दाविली दृष्टी ।
भिन्नं भेदाची गोष्टी । बोलूं नये ॥५॥
एका जनार्दनीं । धरिती भेद मनीं ।
दुह्रावले येथुनी । निंदक जाण ॥६॥

भावार्थ

जेव्हां जगांत अधर्माची वाढ होऊन धर्माचे प्राबल्य कमी होते तेव्हा परमेश्वराला संत रुपाने अवतार घ्यावा लागतो. हरिभक्ती आणि नामस्मरण यांचा महिमा वर्णन करून जडजीवांचा उद्धार करण्यासाठी, वेदांच्या मतांचे प्रतिपादन करण्यासाठी संतांचे आगमन होते. नाना प्रकारची नास्तिक मतांतरे, कर्मठता यांचे अवडंबर कमी करुन सामान्य लोकांना भक्तिमार्ग दाखवून हरिभजनाचा महिमा वाढीस लागतो. कुरूक्षेत्रावर अर्जुनाला विश्वरूप दर्शन देवून श्रीहरिने त्याच्या मोहाचे बंधन नाहिसे केले. एका जनार्दनीं म्हणतात, मनातिल भेद भाविकाला भावपूर्ण भक्तिपासून दूर नेतात.

श्रीसद्गुरुमहिमा

१४१

धन्य धन्य श्रीसद्गरूभक्त । गरूचे जाणती मनोगत ॥१॥
गुरूचरणीं श्रध्दा गाढी । गुरूभजनाची आवडी ॥२॥
गुरूचें नाम घेतां वाचें । कैवल्य मुक्ति तेथें नाचे ॥३॥
गुरूचे घेतां चरणतीर्थ । भक्ति मुक्ति पवित्र होत ॥४॥
गुरूकृपेचे महिमान । शरण एका जनार्दन ॥५॥

भावार्थ
या अभंगात एका जनार्दनीं सद्गुरुंच्या भक्तांचा महिमा वर्णन करतात. या भक्तांची गुरूचरणांवर अतूट श्रध्दा असते. गुरूभजनाची त्यांना विलक्षण आवड असते. सद्गुरूंच्या नामस्मरणाने कैवल्यमुक्तीची द्वारे उघडतात. सद्गुरूंच्या चरणांचे तीर्थ मनांत पवित्र भक्तिभाव निर्माण करतात. हे सद्गुरूभक्त धन्य असून ते सद्गुरूंच्या मनातिल भाव जाणतात.

१४२

धन्य धन्य सद्गुरुराणा । दाखविलें ब्रह्म भुवना ॥१॥
उपकार केला जगीं । पावन जालों आम्हीं वेगीं ॥२॥
पंढरी पाहतां । समाधान जालें चित्ता ॥३॥
विटेवरी समचरण । एका जनार्दनीं निजखूण ॥४॥

भावार्थ

सद्गुरु कृपेने प्रत्यक्ष ब्रह्मभुवनाचे दर्शन पंढरींत घडले. विटेवर समचरण ठेवून उभा ठाकलेला पांडुरंग पाहून भाविक जन पावन झाले. चित्त समाधानाने परिपूर्ण भरले. जगावर उपकार करणारे हे सद्गुरू धन्य होत. असे एका जनार्दनीं या अभंगात स्पष्ट करतात.


References : N/A
Last Updated : April 03, 2025

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP