एक कोल्हा एका विहिरीत पडला व त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागले. तो आपले डोके मोठ्या मुष्कीलीने पाण्याबाहेर ठेवू शकत होता. इतक्यात एक लांडगा त्या ठिकाणी आला व विहिरीत पडलेला कोल्हा पाहून मोठ्या कळवळ्याने त्याला म्हणाला, 'अरेरे ! मित्रा तूच का आत पडला आहेस ? तिथे तुला फारच थंडी वाजत असेल, आणि तू पडलास तरी कसा विहिरीत ? तुझी स्थिती पाहून मला फार वाईट वाटतं हे कसं काय झालं ते तरी मला कळू दे.' त्यावर कोल्हा म्हणाला, 'मित्रा, तू कृपा करून जर एखादी दोरी आत सोडशील तर तुझ्या या शाब्दिक कळकळीपेक्षा ती मला या वेळी अधिक उपयोगी पडेल. विहिरीतून वर येण्यासाठी तू मला मदत कर, म्हणजे मी माझी हकीगत तुला सांगतो.'
तात्पर्य - एखाद्या संबंधाने नुसत्या शब्दांनी खूप कळकळ दाखविण्यापेक्षा त्याला थोडी जरी प्रत्यक्ष मदत केली तरी त्याची किंमत फार मोठी आहे.