नदीकाठी राहणार्या एका बेडकाचे व उंदराचे त्या जागेची मालकी कोणाची याबद्दल भांडण लागले. उंदीर मोठ्या धूर्तपणे गवताआड लपून बेडकावर हल्ला करी. ती त्याची लबाडी पाहून बेडकाने एका उडीसरशी त्याला गाठून म्हटले, 'भल्या गृहस्था, माझ्यासमोर राहून माझ्याशी लढ. असा भित्र्यासारखा लपून का हल्ला करतोस ?' काही वेळातच त्यांचे भांडण फारच वाढले व कणसे हातात घेउन एकमेकांना मारू लागले. तेव्हाच आकाशातून एका घारीने झडप घालून दोघांनाही उचलून नेले.
तात्पर्य - दोघेजण भांडत असता, दोघांचा शत्रू तिसरा कोणीतरी त्यांच्या गैरसावधपणाचा फायदा घेऊन त्यांचा नाश करील काय याचा ते विचार करीत नाहीत हे योग्य नव्हे.