एका तळ्याकाठी दोन बैल भांडत होते. त्या तळ्यात राहणार्या एका बेडकाने ते पाहिले. मग तो इतर बेडकांस सांगू लागला, 'अरे, ते पहा समोर काय चाललं आहे ? आता आपल्यावर काय वेळ येणार आहे याची मला फार काळजी वाटते.'
यावर दुसरा बेडूक त्याला म्हणाला, 'अरे, तू इतका का भितोस ? त्या बैलांच्या भांडणाशी आपला काय संबंध ? त्यांची जात, रीत, भक्ष्य सगळेच वेगळं. ते आपल्याला त्रास देण्यासाठी भांडत नाहीत. त्याचं भांडण एकमेकांचा पराभव करण्यासाठी चाललं आहे.' यावर पहिल्या बेडकाने त्यास उत्तर दिले, 'मित्रा तू म्हणतोस ते खरं असलं तरी आता भांडता भांडता जो बैल हरेल तो पळत या तळ्यावर येईल आणि त्याच्या पायाखाली चिरडून आपल्यातले कितीतरी बेडूक मरतील. म्हणजे पाहा त्यांच्या भांडणाचा आपल्याशी किती निकटाचा संबंध आहे की नाही?
तात्पर्य - थोरांच्या भांडणाने जवळच्या गरीबांना विनाकारण दुःख होते म्हणून थोरांच्या भांडणापासून गरीबांनी दूर रहावे.