एका गावातल्या सगळ्या बोकडांनी सभा भरवून खाटकाच्या हाती न सापडण्याची तजवीज कशी करावी याविषयी विचार केला. आपल्या मालकाचा डोळा चुकवून सर्वांनी पळून जावे, ही युक्ती सर्वानुमते ठरली व ती त्याच दिवशी अमलात आणावी असे ठरले. ते ऐकून त्यातला एक म्हातारा शहाणा बोकड त्यांना म्हणाला, 'अरे, तुम्ही हे लक्षात ठेवा की, आपण जरी पळून गेलो, तरी बोकडाच्या मांसाशिवाय लोक राहतील ही गोष्ट शक्य नाही. शिवाय खाटीक लोक आपल्या कामात तरबेज असल्याने आपला जीव घेताना ते आम्हाला फार वेळ धडपडत ठेवत नाहीत, पण आपण एकदा येथून निघून रानावनातून हिंडू लागलो म्हणजे भलत्याच अडाणी लोकांच्या हाती सापडू व ते आपले हालहाल करून आपल्याला मारतील.' हे ऐकताच बोकडांनी आपला पहिला ठराव रद्द केला व ते आपापल्या घरी गेले.
तात्पर्य - कोठेही जाऊन दुःख टाळता येणे जर शक्य नसेल तर निदान जेथे कमी दुःख होईल. अशी जागा निवडणे जास्त शहाणपणाचे होय.