तिघेजण रानातून प्रवास करीत असता त्यांच्या अंदाजापेक्षा प्रवास जास्त लांबीचा ठरला व त्यांच्या जवळचे सामान संपले. फक्त एकाला पुरेल इतकेच अन्न राहिले. तेव्हा उरलेल्या अन्नाची व्यवस्था कशी करावी याबद्दल प्रश्न उत्पन्न झाला. एकाने सुचविले की, सर्वांनी झोपावे व ज्याला अतिशय चमत्कारिक स्वप्न पडेल त्याने राहिलेले अन्न घ्यावे.' याला सर्वांनी मान्यता दिली व ते सगळे झोपी गेले.
मध्यरात्री दोघे उठले व एकमेकांना आपले स्वप्न सांगू लागले. एकजण म्हणाला, 'अरे, मला काय विलक्षण स्वप्नं पडलं ! मला एकदम कोणीतरी उचललं नि इंद्राच्या सिंहासनासमोर बसवलं !' दुसरा म्हणाला, 'आणि मी वार्याच्या सोसाट्याने यमदरबाराजवळ जाऊन थडकलो !'
तिसरा माणूस बिछान्यावर पडून त्यांचे बोलणे ऐकत होता. त्याला ह्या दोघांनी त्याचे स्वप्न सांगण्याविषयी आग्रह केला. तो ओरडला, 'अरे, गप्प रहा, तुम्ही कोण असाल ते असा, पण गप्प रहा !' ते म्हणाले, ' का ? आम्ही तर तुझे सहप्रवासी आहोत.' तो म्हणाला, 'काय ? तुम्ही परत आला ? ते म्हणाले, 'अरे, आम्ही कुठेच गेलो नाही.' त्यावर तिसरा म्हणाला, 'बरं तर मग ते मला स्वप्नच पडलं असावं. मला दिसलं की तुम्हापैकी एकजणाला इंद्राच्या सिंहासनाकडे आणि दुसर्याला यमाच्या दरवाज्याजवळ नेलं त्यामुळे मला वाटलं की आपले सहप्रवासी पुन्हा दिसणार नाहीत, म्हणून मी उरलेलं अन्न खाऊन टाकलं.'
तात्पर्य - मूर्खपणाचा फायदा शहाणे लोक करून घेतात.