१६१.
दया, क्षमा, शांति, हेंच सुखाचं माहेर
x x x रावांनी केला सौभाग्याचा आहेर.
१६२.
बिल्वर केले, पाटल्या केल्या, सरी आतां करावयाची
x x x रावांचं नांव घ्यायला मागं नाहीं सरायची.
१६३.
गोमंतकीय आंबा चवीला लागतो गोड
x x x रावांची मिळूं दे जन्मोजन्मीं जोड.
१६४.
चमकली रोहिणी हंसला रजनीनाथ
x x x रावांच्या जीवनांत माझी आहे साथ.
१६५.
सुशील सासू सासरे, सद्गुणी मातापिता
x x x रावांचं नांव घेतें सर्वांच्याकरितां.
१६६.
काव्यामध्यें श्रेष्ठ अलंकार आहेत उपमा उत्प्रेक्षा
x x x राव सुखी असोत हीच माझी अपेक्षा.
१६७.
चांगल्या कुळीं जन्मलें, चांगल्या कुळीं आलें
x x x रावांच्या मुळं भाग्यशाली झालें.
१६८.
सृष्टीच्या बागेंत सूर्यनारायण झाले माळी
x x x रावांचं नांव घेतें सर्वांच्या पंक्तीच्या वेळीं.
१६९.
घर भरावं लक्ष्मीनं, जग भरावं कीर्तीनं
x x x रावांच जीवन उजळीत मी रहावं प्रीतीच्या ज्योतीनं.
१७०.
काश्मीरशोभा पाहून थक्क झाले कवी
x x x रावांचं नांव घेतांना थबकला रवी.
१७१.
राम झाले विजयी सीतेला स्मरुन
x x x रावांचं नांव घेतें शांता-दुर्गेला स्मरुन.
१७२.
सोन्याच्या कामाला सोनार लागतो कुशल
x x x रावांचं नांव घेतें चांगलं अस्सल.
१७३.
चंदन कापूर कस्तुरी अत्तराचा वास
x x x रावांचं नांव घेतें तुमच्याचकरतां खास.
१७४.
संसाररुपी बागेंत प्रेमरुपी सरोवर, आयुष्याचा प्रवास करतें
x x x रावांच्या बरोबर.
१७५.
क्षत्रीय कुळीं जन्मलें भाग्य या कन्येचें
x x x रावांचं नांव झालें सार्थक या जन्माचें.
१७६.
सौभाग्याच्या साक्षीनं काळ्या मण्याची पोत आली जीवनांत
x x x रावांच्या असूं दे मी नित्य स्मरणांत.
१७७.
कण्वमुनीचा आश्रम शकुंतलेचं माहेर
x x x रावांनीं दिला मला सौभाग्याचा आहेर.
१७८.
केळीच्या पानावर गाईचं तूप
x x x रावांचं कृष्णासारखं रुप.
१७९.
सासू नी सासरे, जसा वाडयाचा कळस, नणंद अक्काबाई जशी दारींची तुळस,
x x x रावांचं नांव घ्यायला मला नाहीं आळस.
१८०.
निळें पाणी, निळे डोंगर, हिरवें हिरवें रान
x x x रावांचं नांव घेऊन, राखतें सर्वांचा मान.