जीवन लहरी

’कुसुमाग्रज’ या टोपणनावाने श्री. विष्णू वामन शिरवाडकर (१९१२-१९९९) यांनी मराठीत लेखन केले.


रात्र अशी अन्धेरी

तेवत ना दीप कुठे

चुकलेली चाकोरी

अन्थरले पथि काटे

तूच इथे पाठविले

तूच दिवे मालविले

पंकी पद पडता मग

बघशी का रागाने ?

आशा रात्री रचते

वैभवशाली नगरी

अनुभव परि तुडवित ती

येतो दिवसा दारी

करुनीया विकट हसे

आशेला आणि पुसे

वेड्यापरि बसशी का

रात्रीची जागत तू ?

मातीचा इमला हा

कणकण हळू ढासळतो

अविरत नद काळाचा

भवताली फेसळतो

लाटा उठती, फुलती

भिंती पडती, बुडती

अन्ती अवशेष नुरे

हीच असे का नियती !

N/A

References :

कवी - कुसुमाग्रज

ठिकाण - नाशिक

सन - १९३३


Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP