पुळणीत टेकले माथे श्रांत अधीर,
दर्यावर होता वाहत मन्द समीर,
काजळले होते गगनाचे कंगोरे,
कल्लोळत अन्तररि काहि तरी काहूर !
उद्दाम निराशा करि तांडव ह्रदयात,
घोंगावे वादळ जेवी जीर्ण गडात,
सांदीत बसूनि रातकिड्यांची सेना
निज अक्रोशाने निनादवी घन रात.
तो वळले डोळे नकळत बाजुस वरती,
दृष्टीत डोंगरापरी भरे ती मूर्ति,
क्षण एक आतला शान्त गल्बला झाला
ओसरता वारा जशी स्थिरावी ज्योती.
ती कणखर मूर्ती धीट मराठी थाट
आदळतो जीवर अजून पश्चिम-वात,
ती अंजिक्य छाती ताठर अन् रणशील.
जी पाहुनि सागर थबके, परते आत.
कङ्गाल खोपटी कोळ्यांची पायाशी
वर असीम गगनी नक्षत्रांच्या राशी,
तम-लांछित सागर पसरे या बाजूस,
उन्मत्त गोपुरे दूर टेकडीपाशी.
ते होते जीवित- हाती धरिनि हताश
खळखळती ज्यांवर दृढ पोलादी पाश
ध्वज चढवायाची एक अदम्य मनीषा
ते होते जीवित- अन् हा जीवितभास !
कण क्षुद्र घेउनी सुखदुःखांचे हाती,
धापावत आम्ही जीवनमार्गावरती,
पर्णापरि वार्यावरती हलतो, डुलतो
जो धुळीत लाभे अखेरची विश्रांती.
हे जीवन कसले, ही मरणांची माला,
मासोळी झटते तोडायास गळाला,
दर्याला वाहे दुभंगलेली नाव
क्षण खाली वरती, क्षणात आणि तळाला !