घन हले शिरावर चरणचालिने धुन्द
भिजविते मुक्त-जल पदर रेशमि रुन्द
क्रीडतात कुन्तल कुरळ कपाळावरती
गुणगुणती कंकण करात यौवन-छन्द,
डोंगरी हवेची देहलतेत मिरास
की द्राक्षांचा घड मोहरला भरघोस
व्याधाचा नयनी किरणविलास अधीर
वक्षावर बहरे नवतीचा उल्हास.
कान्तीत केतकी केवळ घवघवलेली
कचभुजंग मानेजवळी विळखा घाली
रविपरी उदेला प्रणयाग्नी ह्रदयात
प्राचीसम म्हणुणि आरुणता ये गाली.
पलिकडे खळाळे निर्मळ निळसर पाणी
उत्तुंग तरूंची सभी सभोती श्रेनी
एकाकी धूसर पाउलवाट मधे ही
तिजवरुन विहारे वनामधे वनराणी !