शनि पूजन
शनि हा सूर्यपुत्र म्हणून ओळखला जातो. परंतु त्यांच्यात कोणतीही मैत्री नसते. शनि ग्रह सूर्याला प्रदक्षिणा घालतो. जन्मकुंडलीमध्ये शनि जर शुभ स्थानावर असेल तर जातकाला यश, ऐश्वर्य, दीर्घ आयुष्य आणि चिंतन शक्ति देतो. परंतु तो जर अशुभ स्थानात असेल तर अनाचार वाढवतो. शनिची दशा ही अडीच वर्षे आणि साडेसात वर्षे असते. सौरमंडळात शनिचे स्थान पश्चिमेला असते. शनि ग्रहाच्या प्रसन्नतेसाठी भैरव देवाची साधना उपयुक्त असते. शनिवारी उपवास करणार्यांनी दुपारनंतर भोजन करावे. भोजनात मिठाचा वापर करू नये.
आव्हान मंत्र
काळी फुले आणि काळ्या रंगाच्या अक्षता हातात घेऊन खालील मंत्र म्हणून शनिदेवाला आवाहन करावे.
नीलांबुजसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम् ।
छाया मार्तण्ड सम्भूतं शनिमावाहयाम्यहम् ॥
स्थापना मंत्र
त्यानंतर खालील मंत्र म्हणून शनिदेवाची प्रार्थना करावी.
ॐ भूर्भुवः स्वः शनैश्चर इहागच्छ इहतिष्ठ ।
ॐ शनैश्चराय नमः ॥
नंतर काळी फूले आणि काळ्या अक्षता नवग्रहात असलेल्या शनिच्या स्थानावर सोडून द्यावे.
ध्यान मंत्र
खाली दिलेला ध्यान मंत्र म्हणावा.
ॐ सूर्यपुत्रो दीर्घदेही विशालाक्षः शिवप्रियः ।
मन्दाचारः प्रसन्नात्मा पीडा हरतु ते शनिः ॥
शनिमंत्र
शनिदेवाच्या मंत्राची जपसंख्या २३००० आहे.
ॐ शं शनैश्चराय नमः ।
ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनये नमः ।
शनि यंत्र
या यंत्राची बेरीज कुठुनही केली तरी ३३ इतकीच येते. हे यंत्र कोणत्याही महिन्यातील शुक्लपक्षात येणार्या पहिल्या शनिवारी सूर्यास्ताच्या एक तास आधी डाळिंबाची काडी किंवा काळ्या घोड्याच्या नालेपासून बनवलेली लेखणी अष्टगंधाच्या शाईत बुडवून भुर्जपत्रावर लिहावे. नंतर त्या यंत्राला धूप, दीप, काळी फुले वाहून
ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनये नमः ।
या मंत्राचा जप करावा आणि ते यंत्र लोखंडाच्या ताईतामध्ये किंवा काळ्या किंवा निळ्या वस्त्रात घालून धारण करावे.