आला पंचमीचा सण आला पंचमीचा सण
लोकाच्या लेकी बा म्हायारीं माजी बाळाई सासरीं
आरं तूं सोपान बाळा जा रं बाळी आनायाला
कर तानीयाच लाडू कर भुकईच लाडू
कर बुत्ती नी भाकरी जातों बाळाई आनायी
गेला घोड्याच्या पागला शेलका वारू सोडीयला
आला वाड्या घेऊयीनी आला वाड्या घेऊयीनी
घातला मखमाली जिन बडलं रेशमी पटारू
घोड्याव बा स्वार झाला गेला वाड्याच्या भाईरी
लागला राजस मारगी लागला राजस मारगी
लागला वनाच्या वाटला पांचीं वनं वलांडिलीं
साव्या सातव्या वनायाला दिसलं बाळीचं सासर
गेला वाड्या जवयीळी गेला वाड्यायाच्या आंत
अंगणीं भाला रवीयालां त्येला वारू बांधियीला
बाळीनं पावना देकीयला शेला वलनी झळकीला
झारी बुडवी रांजनांत दिली बंधूच्या तळातांत
घेतलं चवरंगी सूप पेटविली वैलचूल
गेली उतरंडीयीला काढल्या साळी नि बा डाळी
बाळीनं सैंपाक बा केला बंधू भोजन वाढीयीलं
बंधू घरीं गोष्ट करी बाळी घेऊन जायायाची
दिली बाळी लावूयीनी चालला बाळी घेऊयीनी
वारुवरी स्वार झाला आंला वाड्याच्या भाईरी
लागला राजस मारगी पांच वनं वलांडिलीं
साव्या सातव्या वनायाला वाडा लाग दिसायाला
आला आपुल्या वाड्याला आला वाड्यायाच्या आंत
घेतली बाळी उतरूनी गेली आईच्या जवळी
आई मी ग काय नेसूं नेस जा माजं पातयीळ
नग तुजं पातयीळ देग वैनीची कासाई
नेसली वैनीची कासाई गेली पाटलाच्या आळी
म्होरं बाई काडीयील्या पाटलाच्या पोरीबाळी
आली आपुल्या वाड्याला लागली पंचीम खेळायाला
नागा घेतल्या बा लाह्या नागा घेतलं बा दूधतूप
नागा घेतलं हळद कुंकूं नागा घेतलं पवयीतं
गेली वाड्याच्या भाईरी संग सार्या पोरीबाळी
सगळ्या गडनी मिळूयीनी चालल्या संग मिळूयीनी
म्होरं पाटील कुलकर्ण्यांच्या मागं तेल्या तांबूळ्याच्या
गेल्या नागा जवयीळी नागा लाह्या वाहीयील्या
नागा वाहिलं दूधतूप नागा वाहिलं हळदकुंकूं
हातां हात लावीयला एक फेरजी धरीला
दान फेर धरीयील तीन फेर धरीयील
चवथ्या पांचव्या फेरायाला याक हळदीचं बोटू
याक कुंकवाचं बोटू लागलं वैनीच्या कासाई
बाळीनं तें बा देखीयीलं हातचा हात सोडीयीला
ततनं धांवत पळत आली वाड्या निगुयीनी
गेली वाड्यायाच्या आंत गेली गाईच्या जवळी
हळद कुंकवाचं बोटू लागलं वैनीच्या कासाई
तेवढं वैनीनं देखीयीलं गेली गाईच्या गोठ्यायाला
तिथं निजरं सुर्म झाली घेतली खाट नी वाकाळ
आला सुबाना बा बंधू तुमी सर्वी हाईसा बा
माजी अस्तुरी कुठं हाई गेली असल पान्यायाला
सर्व घर धुंडीयलं सगळी वाट धुंडीयीली
गेला गाईच्या गोठ्यायाला देखीली बा अस्तुयीरी
याक हळदीचं बोटू याक कुंकवाचं बोटू
माज्या कासाई लागलं माजी कासाई नासली
तिला नेऊनी वधावी दुरुनीं रगात धरावं
त्यांत कासाई बुडवावी सूर्या किरनीं वाळवावी
घडी चापूनी घालावी मला आनून दावावी
गेला आइच्या जवळी अग तूं अंबिका ग माता
कर बाळीची तयारी सासर्याला धाडायाची
गेली मदूरा पटेला घेतलं चोळी पातयीळ
गेली कासाराच्या आळी काकनं बाळीला लावीलीं
आली वाड्या घेऊयीनी भरली बुत्ती दुरुयीडी
झाली बाळीची तय्यारी चुलीव ठेवीलं ग पानी
पैला तांब्या धरनीला आई सुकून बा झाला
लेकी कशायाचा झाला आपल्या घरीं जायायाचा
बाळी पातळ नेसयीती पैली निरी धरनीला
आई सुकून बा झाला लेकी कशायाचा झाला
अशी कां ग म्हनतीस संग सोपाना बाळ हाई
बंधू न्हवं त्यो वयीरी त्येच्या कंबरला सुरी
घात वाटं करीयील अग तू अंबिका ग माता
बाळ जेवाया बसली पैला घास धरनीला
केली बुत्ती नी भाकरी घेतली बुत्ती नी भाकरी
बाळी घोड्याव बसवीली गेला वाड्याच्या भाईरी
लागला राजस मारगी पांच वनं वलांडिलीं
साव्या सातव्या वनायाला नवी वाट फुटयीली
आरं तूं सोपान दादा न्हवं ही सासर्याची वाट
माज्या सासर्याच्या वाटं केळी नारळी बन दाट
हितं कार्या बोर्यायाळं कांटकुट वाटयीला
साव्या सातव्या वनायाला बाळी खालीं उतरीली
काडली कंबरीची सुरी ठेवली बाळीयीच्या शिरी
दुरनीं रगात धरीयीलं त्यांत कासाई बुडवीली
सुर्यां किरनीं वाळीवीली चापून घडी घातीयीली
शेल्या पदरीं बांधीयीली आला आपुल्या वाड्यायाला
गेला गाईच्या गोठ्यायाला काळी कासाई दावीली
आली उठून घरायाला फिरली नार घरांदारां
बाळी झाली जाईझाड गेली सासूच्या सपयीनीं
पांची उतरंडी ढासळल्या अवा सुकूनं मोटा झाला
घात झाला वाटवरी आली बाळाई सपनीं
जमूयीनी सर्वजन आली पांचव्या वनायाला
डावी करंगळी कापीयीली पतीनं अमृत शिंपीयीलं
बाळ झाली साजीवंत आली धरनीच्या वरी
नेली आपुल्या वाड्यायाला लागली राज करायाला