सासू सुनांची कुरबुर झाली सासू झनकार्यानं गेली
आली गारूड्याच्या आळीं आरं तूं गारूड्या रं दादा
माजा मैतर हूशील का सर्प धरूनी देशील का
गारूडी मैतारू झाला सर्प धरूनी दीला
सासू आली घरायासी शिजून शिंक्याला लावीयला
बाहेरून आली राई सून अवो अवो अत्याबाई
अवो अवो अत्याबाई ह्या भगूल्यांत हाई काई
तुज्या ग म्हायारीचा मेवा ताटीं घेऊनी ग खावा
अवो अवो अत्याबाई पैला घास कडू हाई
दारीं लिंबूण्याचं झाडू पडलं असल पिकलं पानू
चवथ्या पांचव्या घासायाला राई धरनीं पडयीली
चूल बाजूस काडीली राईला गाडून टाकीयीली
गेली गोइंदाच्या सपनीं आरं आरं तू गोइंदा दादा
चूल बाजूस काडीयीली मला गाडून टाकीयीली
गोइंदा तिथून निगाला गेला वारूच्या पागला
ढवळा वारू शिणगारीला वारूवरी स्वार झाला
लागला वनाच्या मारगीं लागला राजस मारगीं
याक वन वलांडिलं दोन वनं वलांडिलीं
तीन वनं वलांडिलीं चवथ्या पांचव्या वनायाला
आलं राईचं सासर गोइंदा आला घरायाशीं
आवो आवो अत्याबाई माजी राई कुठं हाई
तुमी सर्वी दिसत हाई माजी राई दिसत न्हाई
गेली असल धुयीयाला गेली असल पानीयाला
तिथून गोइंदा निगाला घेतली सोन्याची कुदयीळ
घेतलं रूपीयाचं खोरं राईला काढून घेतीयीली
राईला मांडीव घेतीयीली डावी करंगळी कापीयीली
राईला साजिवंत केली म्हायाराशीं गोइंदानं नेली